Tuesday, June 9, 2020

(लघुकथा) हे कसले दुःख

कविताच्या वडिलांचे निधन होऊन पाच दिवस उलटले होते. सर्वकाही आवरल्यावर पाहुणे वगैरे सगळे निघून गेले होते. दुसऱ्या दिवशी सीमानं सासूबाईंना विचारलं,"मी शाळेला जाऊ का?"
आईनं आजीकडे पाहिलं.आजीनं सक्त ताकीद दिली होती की, बाराव्वा झाल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही.
सीमा गपगुमान आतल्या खोलीत निघून गेली. कविता हे सगळं पाहत होती. सीमा तिची फक्त वयनीच नव्हती तर तिची मैत्रीण,बहीण सर्वकाही होती. तिला तिच्या वयनीची अडचण ठाऊक होती. ती एका शाळेत शिक्षिका होती. शिवाय उद्यापासून विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होणार होत्या. ती परीक्षेची इंचार्ज होती.

कविताने मनातल्या मनात एक दृढनिश्चय केला आणि उठून आजीजवळ आली. आजीला म्हणाली,"आजी, दादा-अण्णा कामाला जाऊ शकतात तर वयनी का नाही जाऊ शकत.
आजी तापली. ती म्हणाली ,"पुरुष लोक कामाला गेले नाहीतर घर कसं चालेल? त्यांना जावंच लागेल."
कविता म्हणाली,"वयनीदेखील आपल्या कामावरच जाणार आहे , तीही काही पार्टी करायला किंवा कुणाच्या लग्नाला चाललेली नाहीए."
आजी ओरडली,"आज तुझी जीभ खूपच चाललीय गं"
पण कवितानं जसं काही ठरवूनच टाकलं होतं. ती म्हणाली,"आजी मला सांग, बाबा कुणाचे वडील होते-दादाचे की वयनीचे?"
"दादाचे!" आजी म्हणाली.
पुन्हा ठामपणे कविता म्हणाली,"मग सगळ्यात जास्त दुःख कुणाला झालं? दादाला की वयनीला? " कविता आपलं बोलणं पुढं रेटत म्हणाली,"मग सगळ्यात दुःख दादाला झालं असेल तर त्यानं घरात राहायला हवं. वयनी का? मी कॉलेजला जाऊ शकते तर वयनी का नाही जाऊ शकत? हे कसले दुःख? हा कसला शोक?"
"आजोबांच्या निधनानंतर वयनी तिच्या माहेरच्या लग्नालाही जाऊ शकली नाही. वयनीच्या वडिलांच्या निधनावेळीही तिला लगेच बोलावून आणण्यात आलं. तेव्हा काय तिला दुःख नव्हतं का? वयनीला काही सुख-दुःख नाही का? "
आजी उठली आणि तडक आतल्या खोलीत गेली. सीमाच्या डोक्यावर हात ठेवत तिला शाळेला जायची परवानगी देत आवरायला सांगितलं. सीमाला परवानगी मिळाल्याच्या समाधानापेक्षा अधिक कविताच्या डोळ्यांत दिसणारा आनंद मोलाचा वाटला.

No comments:

Post a Comment