विराट सातवीत होता. हुशार पण लहरी महंमद. 'आली लहर, केला कहर',असंच काहीसं होतं त्याचं. कुणाशी बोलायचं नाही,कुणाच्यात मिसळायचं नाही. आपण, आपलं घर आणि टीव्ही हेच त्याचं विश्व. मैदानावर जाऊन खेळल्याचं त्याला कुणी पाहिलं नाही आणि काही मदत केल्याचं आईलाही काही आठवत नाही. विराटच्या तक्रारी मात्र भरपूर!डब्याला हे नको, ते नको. पायी चालत शाळेला जायला नको. परिणाम काय तर गड्याच्या शरीराचं वजन भलतंच वाढलेलं. साहजिकच आईबाबाला आपल्या मुलाची काळजी सतावायला लागली.
दोघांनी विराटला उन्हाळी शिबिरात दाखल करायचं ठरवलं. काहीतरी नवीन शिकेल, आयुष्याकडे बघण्याची दिशा मिळेल, असं त्यांना वाटलं.
विराट शिबिराला जायला तयार नव्हताच. पण आई-बाबाने ठरवलेच होते,त्याला शिबिराला धाडायचे,त्यामुळे त्याच्या कुठल्याच कुरकुरीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही. शिबीर होतं शहराजवळच्या डोंगर परिसरात. हिरवीजर्द झाडी, जवळून वाहणारी नदी हा परिसर सगळ्यांनाच आवडणारा होता.
शिबिराचा पहिला दिवस धावपळीचा गेला. आयोजकांचा वेळ काहीसा नियोजन आणि ऍडजस्ट यातच गेला. सगळेच अनोळखी. कुणीच विराटशी बोलायला आलं नाही. बाकीचे मात्र आपापले मित्र बनवून मस्त एन्जॉय करत होते. विराट कुणाशी बोलायला गेला नाही आणि त्याच्याकडं कुणी आलं नाही.
संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली. सगळे पंक्तीत येऊन बसले. हा मात्र आपल्याला कुणी जेवायला बोलावतं का, याची वाट पाहत राहिला. आता त्याला आईची आठवण झाली. त्याला भूक लागायच्या अगोदरच आई जेवायला वाढायची. आता त्याला रडू येत होतं. शेवटी तो उठला आणि स्वतःच जेवायला गेला. बघतो तर काय ! ताटात गरमागरम भाकरी आणि पिठलं. ताटात आणखी कांदा,लोणचं, मिरचीचा खर्डा, दही असे जिन्नस होते. इतर मुलं जेवणावर ताव मारत होती. हा मात्र ताटाकडे पाहातच राहिला. हे पदार्थ त्याने कधी खाल्लेच नव्हते. त्यानं ताट वाढणाऱ्या लोकांकडे आणि त्याच्या आजूबाजूला पाहिलं. कुठे पावभाजी, मॅगी, पिझ्झा दिसतोय का! पण तिथे असलं तर काहीच नव्हतं.
शेवटी तो मोठ्यानं ओरडला, "मला असलं जेवण नकोय"
सगळी मुलं त्याच्याकडे पाहू लागले. सर त्याच्याजवळ आले. म्हणाले,"विराट, जेवण एकदा खाऊन बघ. पुन्हा पुन्हा मागशील. आणि ही मुलं बघ किती आवडीनं खाताहेत."
सरांपुढे तो काहीच बोलला नाही,पण चेहऱ्यावर संताप मात्र ओसंडून वाहत होता. शेवटी नाईलाज झाला. बळेबळेच खाऊ लागला. आणि काय आश्चर्य! पिठल्या-भाकरीची चव मस्तच वाटली. त्यानं तिखट खर्डा दह्यात घालून खाल्ला. काय टेस्ट ! तो अगदी पोट भरून जेवला. जेवण झाल्यावर सरांनी काही सूचना दिल्या आणि झोपायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी खूप लवकर उठवलं गेलं. मुलं उठली ,पण विराट तसाच आळसानं पडून राहिला. सरांनी उशिरा उठल्याची शिक्षा सांगितली. सकाळच्या नाश्त्यासाठी लागणाऱ्या कांदेपोहेसाठी कांदे चिरायला लावले. विराट गप्पगुमान कांदा चिरायला बसला. आताही त्याला आईची आठवण झाली. आई आपल्यासाठी सगळं करते. सकाळी लवकर उठते. सगळ्यांचं आवरते. किती कष्ट करते. आपण मात्र लोळत पडतो नाहीतर टीव्ही पाहत बसतो. कामं वेळच्यावेळी झाली पाहिजे, हा आईचा अट्टाहास असायचा. असं आळसानं पडून राहिल्यानं काय होतं, हेही आई सांगायची, पण आपण ऐकून कुठे घेत होतो. कांदा चिरताना त्याचे होणारे हाल त्याला बरेच काही शिकवून गेलं.
शिबिरात स्वावलंबनाला महत्त्व होतं. वेळोवेळी तेच सांगितलं जात होतं. नवनवीन गोष्टी शिकवल्या जात होत्या. पण प्रत्येकवेळी विराटची फजिती होत होती. त्याच्याकडून कुठलेच काम वेळेत होत नव्हते. घरची आठवण येत होती,पण आता काही इलाज नव्हता. नाईलाजानं त्याला स्वतःची कामं स्वतः करायला लागायची. श्रमदान आणि इतर स्वच्छता, सामुदायिक कामे करताना त्याची भंबेरी उडायची. कारण त्याला कुठलंच काम धड येत नव्हतं. पण हळूहळू त्याला कामाची व्हायला लागली. मात्र यासाठी चार-पाच दिवस गेले. इतर मुले मात्र पहिल्या दिवसापासून शिबिर एन्जॉय करत होते.
आता तो अन्नाला नावे ठेवत नव्हता. मुलांशी स्वतः हून बोलत होता. मैदानी खेळात भाग घेत होता. पुढे येऊन गाणी-गोष्टी सांगत होता. दहा दिवसांच्या कालावधीत त्याला टीव्हीची मात्र अजिबात आठवण आली नाही. शिबिरात विराट चांगलाच रमला होता. बघता बघता दहा दिवस कसे गेले त्याला कळलेच नाही. आता त्याची पुष्कळ मुलांशी मैत्री झाली होती. आता त्याला आणि त्याच्या मित्रांना दुरावणार याचे वाईट वाटत होते. मैत्री, मैदानी खेळ, सभाधिटपणा काय असतो, हे सगळे त्याला शिबिरात कळले. अभ्यासात हुशार असला तरी बाहेरचं जीवन त्याला माहित नव्हतं.
घरी आल्यावर त्यानं सगळं आईला सांगितलं. यापुढे आपण आळस करणार नाही. तुला त्रास देणार नाही. हेही सांगितलं. आईच्या कामात मदत करण्याचा इरादाही बोलून दाखवला. आईला खूप आनंद झाला. शिबिर सार्थकी लागलं होतं. रात्री जेवणात आईच्या हातचं पिठलं- भाकरी खाताना त्याला खूप आनंद झाला. डब्याला पिठलं-भाकरी देत जा, असं त्यानं फर्मानही सोडलं.
No comments:
Post a Comment