शाळेत दर शनिवारी बालसभेचं आयोजन करण्यात येतं. शाळा सातवीपर्यंत होती. प्रत्येक वर्गातला एक विद्यार्थी पुढं येऊन आपली कविता,गोष्ट, एकाद सुभाषित, श्लोक, एकाद गाणं सादर करत करत असे.आजही सभेसाठी विद्यार्थी शाळेच्या व्हरांड्यात एकत्र आले होते. मुलं आपापली रचना पुढे येऊन सादर करत होती. काही प्रेरक गोष्टी,काही कविता विद्यार्थ्यांना भावायच्या.प्रेरणा-उत्साह वाढवायच्या,तेव्हा विद्यार्थी टाळ्या वाजवून दाद द्यायचे.
मुलांचं सादरीकरण झाल्यावर मुख्याध्यापक पुढे आले आणि म्हणाले," तुम्हां सगळ्यांना ठाऊक आहे की,आपण बालसभेचे आयोजन का करतो ते!मुलांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळावं, त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या प्रतिभेला चालना मिळावी म्हणून आपण दर शनिवारी बालसभा भरवतो. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो आणि व्यासपीठावर येऊन बोलल्यानं भीती कमी होते. मला वाटतं, प्रत्येक वर्गातल्या प्रत्येक मुलानं पुढं आलं पाहिजे आणि आपली कला सादर केली पाहिजे."
यानंतर शाळेतले पाटील गुरुजी पुढे आले. त्यांनी एका विद्यार्थ्याला पुढे बोलावले. सातवीतला अशोक उठून पुढं गेला. त्याला जवळ घेत पाटील गुरुजी म्हणाले,"अशोक मला सांग, सकाळी तू किती चपात्या खातोस?"
अशोक घाबरतच म्हणाला,"दोन ,गुरुजी."
त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आपलंसं करत गुरुजी पुढे म्हणाले,"आणि संध्याकाळी?"
"दोन!" अशोक थोडासा सावरत म्हणाला.
"म्हणजे तू आठवड्याला 28 चपात्या आणि त्याच्याबरोबर भाजी,डाळ,भात वगैरे खातोस. होय ना?" पाटील गुरुजींनी विचारलं.
"हो, गुरुजी!" अशोक आता सहजपणे म्हणाला.
"हे बघ अशोक!आता तुला एक काम करावं लागणार आहे. मी तुला एका आठवड्याच्या सगळ्या चपात्या म्हणजे 28 चपात्या, भाजी-भात आणून देणार आहे. त्या तू एका दमात खायच्या. खाणार ना?" गुरुजींनी काहीसे हसत हसत विचारले.
"कसं शक्य आहे गुरुजी. एका दमात सगळ्या चपात्या कशा जातील?" अशोक आता धीटपणे म्हणाला.
"का जाणार नाहीत?" गुरुजींनी विचारलं.
"गुरुजी, सकाळचे आणि संध्याकाळचे जेवण एकाच वेळी खाणं शक्य नाही ,तिथे एका आठवड्याचे जेवण एकाचवेळी कसे जाईल?" अशोकने आश्चर्याने विचारले.
"मला हीच गोष्ट सगळ्यांना समजावून सांगायची आहे. जसं एका आठवड्याचं भोजन एका वेळी खाता येत नाही,तसं पूर्ण एका वर्षांचा अभ्यास पंधरा दिवसांत किंवा महिन्यात कसा केला जाऊ शकतो? "
विद्यार्थी मनातल्या मनात विचार करू लागले की गुरुजी सांगतात ते बरोबर आहे.
"मुलांनो,जो विद्यार्थी परीक्षेच्या अगोदर पंधरा दिवस किंवा महिनाभर अभ्यास करतो,त्याला परीक्षेत अडचणी या येणारकज! त्याला कमी गुण मिळणार. पुढे अशीच सवय लागली तर त्याला त्याचं स्वप्न पूर्ण करता येणार नाही. शेवटी त्याची भर बेरोजगारांमध्ये पडेल. अशा विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारमय होऊन जाईल. जो विद्यार्थी नियमितपणे दररोज अभ्यास करेल,त्याचं मात्र भविष्य चांगलं असणार आहे." पाटील गुरुजी समजावून सांगत म्हणाले.
सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून गुरुजींनी सांगितलेले विचार मनापासून पटल्याचे सांगून दिले. नंतर 28 चपात्यांचे गुरुजींचे प्रेरणादायी उद्बोधन त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनात कायमचा ठसला. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत 7038121012
No comments:
Post a Comment