Sunday, June 21, 2020

लग्न करताना...


आपल्याकडे लग्न जमले की लगेच बार उडवून देण्याची घाई करतात. याला आपल्याकडे एक पद्धत म्हणूनच बघितले जाते. त्यामुळे लग्न ठरले की, आठ-पंधरा दिवसांत किंवा महिन्याभरात लग्नाचा सोहळा उरकून टाकतात. मात्र यामुळे दोन जीवांना समजून घ्यायला वेळ मिळत नाही. आजची पिढी शिकली-सवरलेली आहे. त्यामुळे त्यांनी जोडीदार कसा असावा, याची मनात एक अपेक्षा धरून ठेवलेली असते. जर का त्यांच्या अपेक्षेला तडा गेला की, पुढचं सगळं अवघड होऊन बसतं. त्यामुळे लग्न ठरल्यावर जोडीदाराला समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. पाच-सहा महिने तरी यासाठी सहज मिळायला हवेत. या कालावधीत दोघेही एकमेकांना भेट राहतील, एकमेकांच्या घरी जातील-येतील साहजिकच घरातले लोक समजून घेता येतील, भीती कमी होईल. या कालावधीत औपचारिकता कमी झाल्याने जोडीदाराच्या, त्यांच्या घरच्या लोकांच्या रुजलेल्या प्रवृत्ती वागण्या-बोलण्यातून दिसायला लागतात.
क्षुल्लक गोष्टींमध्ये सुद्धा दुमत यायला लागते. आपल्या कल्पनेतील आणि स्वप्नातील सगळे कुणालाच मिळत नाही. मात्र यामुळे आपल्याला काय मिळणार आणि काय नाही, याचा अंदाज यायला लागतो. आणि जे मिळणार नाही, त्याच्याने आपल्याला काही अडचण येणार नाही ना, त्याच्याशिवाय चालणार आहे का, याचा अंदाज येतो.
खरे तर याचा अधिक फायदा मुलींना होतो, कारण ती नवीन घरात नांदायला जाणार असते. तिथला परिसर, वातावरण, सवयी, प्रवृत्ती तिला पोषक आहेत का,हे कळून येते. दोघांचे सूर जुळले तर दोघे विश्वासाने संसाराला सुरू करू शकतात. दुर्दैवाने काहींच्याबाबतीत उलट होऊ शकते. काहींना मुली- मुलंमधले दोष, व्यसन, आजार, विक्षिप्तपणा लक्षात येतो. हेकेखोरपणा, आदळआपट अथवा समजून घेण्याचा अभाव या गोष्टी कळतात. थोडक्यात काय तर पुढे आयुष्यभर ज्याच्याशी संसार करायचा आहे, त्याच्याशी सूर जुळतात का, याचा अंदाज येतो. पुढे आयुष्यभर एकमेकाला दोष देत बसण्यापेक्षा किंवा नंतर घटस्फोट घेण्याची नौबत येण्यापेक्षा मुलामुलींना एकमेकांना समजून घेण्यासाठी काही काळ मिळायला हवा. लग्न झाल्यावर तोडणं तसं अवघड असतं. असू दे! काही दिवस जाऊ दे, सुराला लागतील, असे सांगत वडीलधारी मंडळी त्यांचा संसार टिकवण्याचाच प्रयत्न करतात. घटस्फोट घेतल्यानंतर दोघांनाही पुढे लग्न जमवताना अडचणी येतात. यात मुलींच्याबाबतीत अधिक चौकसपणाला सामोरे जावे लागते. दोन कुटुंब दुरावताना समज-गैरसमज यांना स्थान मिळते. त्यामुळे अगोदरच दोघांचे सूर जुळतात की नाही, हे पाहायला लग्न ठरल्यावर काही अवधी मिळायला हवा. 

No comments:

Post a Comment