Monday, June 22, 2020

स्वावलंबनाचे धडे

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला पायबंद घालता यावा यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपल्याला खूप काही शिकवलं आहे. अनेक धडे दिले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत सगळ्यांच्या गरजा फारच कमी आल्या. घरात बसून राहिल्याने अधिक काळ हा नवीन खाद्य करण्यात आणि शिकण्यात गेला. मात्र यातून एकमात्र झाले. शिकणाऱ्या मुली छानपैकी स्वयंपाक करायला शिकल्या. त्यांना त्यांची आई किंवा विशेषतः युट्युबने साथ दिली. दहावी, बारावी किंवा कॉलेजला जाणाऱ्या मुली घरात सहसा काही काम करत नव्हत्या. त्यांच्या अभ्यासामुळे त्यांची आई त्यांना कामही लावत नव्हती. पण या कालावधीत या मुली स्वयंपाक खोलीत जाऊ लागल्या आणि आईला मदत करू लागल्या. यात बऱ्याच मुली सुगरणही झाल्या. काहींच्या आयांना मुलींचे भविष्य उज्ज्वल असल्याचा साक्षात्कारही झाला.

मुलेही घरातल्या छोट्या-मोठ्या कामात मदत करायला शिकली. काहींनी आपली आवड जोपासली, हे जरी खरे असले तरी मुलांनी या कालावधीत काही प्रमाणात स्वावलंबनाचे धडेही गिरवले. ' माझा मुलगा काहीच करत नाही, अगदी कपही उचलून ठेवत नाही, त्याला आईच लागते', असं अनेकजणी कौतुकाने सांगत असल्याचं आपण पाहिलं आहे. पण या कालावधीत काही मुलं उत्साहाने, उत्स्फूर्तपणे घरकामात भाग घेतल्याचं पाहायला मिळालं. पण ज्या आयांनी आपल्या मुलांना काम करू दिलं नाही, त्यांनी मात्र अजूनही वेळ गेली नाही,त्यांनी आपल्या मुलांना स्वावलंबनाचे धडे देऊन त्याचे महत्त्व स्पष्ट करायला हवे. त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी. स्वतःचे काम स्वतः केल्याने काही कुणाचं नुकसान होत नाही. उलट फायदाच होतो. अडचणीच्यावेळी याच गोष्टी उपयोगाला येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज जी परिस्थिती ओढवली आहे, त्याहीपेक्षा अधिक भयानक परिस्थिती भविष्यात ओढू शकते. त्यामुळे एकाद्या गोष्टीमुळे आपले काम अडणार नाही, असे घडू नये, यासाठी आपल्याला अनेक बारीक-बारीक गोष्टी यायला हव्यात. मागच्या वर्षी अनेक शहरांमध्ये महापुराने दणका दिला. अनेकांना जगण्यासाठी अन्न पाकिटं पुरवण्यात आली. वीज गेल्याने अनेकांना अडचणी आल्या. या कालावधीत वीज जोडणी, स्वच्छता, स्वयंपाक मोबाईल दुरुस्ती करता येणाऱ्या लोकांना फार त्रास झाला नाही, पण ज्यांना काहीच येत नव्हते, जे फक्त दुसऱ्यावर अवलंबून होते, त्यांचे हाल झाले. आपत्तीजनक परिस्थितीत कामाला येणाऱ्या गोष्टी आपण अहिकून घ्यायलाच हव्यात.
 जुन्या काळात एकत्र कुटुंब होतं. महिला फारशा घराबाहेर पडत नव्हत्या. पण आजची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. उद्या मुलीही कामानिमित्त घराबाहेरच राहणार आहेत. आजच्या गरजा वाढल्याने त्याची पूर्तता करताना दोघा नवरा- बायकोला काम करावे लागणार आहे. 'हाऊस वाईफ' ही संकल्पनाच संपुष्टात येणार असल्याने मुळा-मुलींना सर्वच गोष्टी यायला हव्यात. पैशांची बचत करण्यासाठी कपड्यांना इस्त्री करण्यासारख्या गोष्टी शिकून घ्यायला हव्यात.
टाळेबंदी काळात अनेक घरात मोठयांनी आपल्या मुलांचे-मुलींचे केस कापले. हाही एक धडा मिळाला आहे. घरातला नळ खराब झाला असेल तर तो बसवणे, दुरुस्ती करणे अशा गरजेच्या आणि महत्त्वाच्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. अशा गोष्टी स्वतः केल्याचा आनंदही खूप मोठा असतो. भविष्यात या गोष्टींची गरजच आहे. म्हणूनच लहानपणापासूनच कामाचं हे बाळकडू मुलांना मिळायला हवं आणि पालकांनी ते द्यायला हवं. घरातली कामं गौण नाहीत, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवं. हे काम एक आईच योग्य पद्धतीने करू शकते. टाळेबंदी हे एक निमित्त होतं. आता हाच धागा पकडून घराला एक शिस्त लावता येईल आणि ते गरजेचं आहे.
प्रत्येकालाच घरातल्या कामांमध्ये खारीचा वाटा उचलायला शिकवायला हवं. त्या निमित्ताने एक नवी सुरूवात करायला हवी. अजूनही घरात मुलीलाच जास्त काम लावलं जातं आणि मुलांना काही सांगितलं जातं नाही किंवा विचारलं जात नाही. खरे तर हे अयोग्य आहे. घरातूनच समानतेची बीजं रोवल्यास पुढच्या पिढय़ांचं आयुष्य सुकर होऊ शकेल. मुलीच्या मनातीलअढी  यामुळे कमी होईल. घरात कामांचे योग्य आणि समानतेने वाटप झाल्यास कुणी काही कुरकुर करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे कुटुंबव्यवस्थाही बळकट होईल.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत (सांगली)7038121012

No comments:

Post a Comment