Thursday, March 26, 2020

भारतीय प्रेक्षकांच्या तिरस्काराचा धनी: बॉब क्रिस्टो


बॉब क्रिस्टोयाला आपण नेहमी पडद्यावर नायकाकडून मार खाताना पाहिलं आहे. त्याला मार खाताना पाहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आहेत. पण या माणसाच्या आयुष्याचा प्रवास रंजक आहे. ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये जन्मलेल्या रॉबर्ट जॉन क्रिस्टो ऊर्फ बॉब क्रिस्टोच्या नशिबात भारत आणि इथेच शेवटचा श्वास लिहिले होते. भारतीय प्रेक्षकांच्या मनातील चीड मनात साठवून बॉब इथलाच झाला. इतकेच नव्हे तर त्याने मधल्या काळात लोकांना फिटनेसचे धडे दिले. अनेकांच्या तब्येती त्याने बनवल्या. वास्तविक परवीन बॉबीच्या सौंदर्यावर फिदा होऊन तो तिच्यासाठी भारतात आला होता. अशा या कलाकाराने 20 मार्च 2011 मध्ये बेंगळुरूमध्ये आपला देह ठेवला.
बॉबचा सिडनीमध्ये जन्म झाला. सिव्हिल इंजिनिअर बनलेल्या बॉबने ऑस्ट्रेलियन सैन्यात स्पेशल एअर सर्व्हिसमध्ये असताना रोडेशिया ( आताचा झिम्बावे) मध्ये दोन रशियन जहाजांना जलसमाधी दिली होती. दक्षिण वियतनाममध्ये त्याने पूल बांधले. बॉब दक्षिण अफ्रिकेत मॉडलिंग रॅम्पवरदेखील उतरला. खूप पैसे कमावले. एका जपानीकडून मार्शल आर्ट शिकला. हॉलीवूडमध्ये छोटी छोटी कामे केली. आर्ट डायरेक्टर बनून त्याने सेट बनवण्याचे काम केले. असा त्याचा छानछौकी प्रवास सुरू असताना त्याने परवीन बॉबीचे छायाचित्र पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर लट्टू झाला. तिला भेटायला तो मुंबईला आला. परवीन बॉबीला सेटवर मेकअपशिवाय पाहिल्यावर त्याचा हिरमोड झाला. पण तो इथेच बॉलीवूडमध्ये रमला आणि इथलाच झाला.
बॉबने अनेक देश पाहिले होते. जाईल तिथल्या काही गोष्टी तो शिकत आला. भारतात आल्यावरही तो गप्प बसला नाही. इथे त्याने हिंदी, तामिख आणि उर्दू भाषा शिकून घेतली. भारतीयांचे प्रेम पाहून शेवटी एकदा तो म्हणालाच, इथे खूप छान वाटतं. आपल्या घरासारखं वाटतं. इथेच मरायला मला आवडेल.
दुसर्या महायुद्धाच्यावेळी वडिलांचा हात धरून तो ऑस्ट्रेलियातून जर्मनीला गेला होता. तिथे त्याने नाटकांमध्ये काम केले. तिथेच शिकला. जर्मन भाषा शिकून घेतली. जर्मन युवती हेल्गाशी लग्न केले.एक मुलगा आणि दोन मुलींचा बाप बनला. पण हेल्गाचा अपघात झाल्यावर त्याचे आयुष्यच बदलून गेले. मॉडलिंग विश्वात रमलेल्या बॉबने विश्वभ्रंमती सुरू केली. रोडेशियामध्ये असताना त्याने बॉलीवूडविषयी वाचले. परवीन बॉबीचे छायाचित्र पाहिले. तिच्या सौंदर्यावर फिदा झाला. तिला भेटायला तो थेट मुंबईला आला. तेव्हा द बर्निंग ट्रेनचे शुटिंग सुरू होते. यावेळी त्याने परवीन बॉबीला मेकअपशिवाय पाहिले आणि त्याच्या सौंदर्याचा ताजमहाल कोसळला. पण नंतर ते दोघे चांगले मित्र बनले. एकत्र काम केले. संजय खानने त्याने पुन्हा मस्कतला जाण्यापासून रोखले आणि आपल्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. मग काय! बॉब इथेच रमला. संजय खानने त्याला अब्दुल्ला (1980) मध्ये भूमिका दिली. यानंतर तो पडद्यावर मार खात राहिला.
सायकलने युरोप फिरलेल्या बॉबच्या नशिबात भारताल्या प्रेक्षकांच्या तिरस्काराचे ओझे लिहिले होते. प्रेक्षक त्याच्या भूमिकांविषयी तिरस्कार करत होते. कारण बॉबला अशाच भूमिका मिळत गेल्या. कधी गोरा इंग्रज बनून अत्याचार करणे, कधी हिरोइनच्या अब्रूवर हात टाकणे, कधी स्मगलर बनणे आणि शेवटी हिरोच्या हातून मार खाणे अशाच भूमिका त्याला मिळत गेल्या. मिस्टर इंडियामध्ये ज्यावेळेला बॉब हनुमान मूर्तीच्या गदेने मारले जात होते, तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवत होते. मर्दमध्ये अमिताभकडून चाबकाचे फटके खाल्ले. यावेळी प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बॉब 60 वर्षांचा होता तेव्हा स्लिप डिस्कचा आजार जडला. 2001 मध्ये त्याने चित्रपटांना निरोप दिला. नंतर संजय खान यांच्या गोल्डन पॉम स्पॉमध्ये हेल्थ आणि फिटनेस डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली. भारतीय प्रेक्षकांनी त्याचा तिरस्कार केला असला तरी त्याने लोकांचे आरोग्य सुधारण्याचेही कामही केले.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत



1 comment: