भारतामध्ये अराजकता पसरवण्याच्या पाकिस्तानच्या नापाक योजना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पुन्हा एकदा उघडकीस आणल्या आहेत. यावेळी प्रकरण ड्रोनशी संबंधित आहे. एका वर्षात आपल्या सीमेवर 90 ड्रोन पकडले किंवा नष्ट केले गेले. त्यांच्यासोबत आलेले अमली पदार्थ आणि शस्त्रेही जप्त करण्यात आली. सुरक्षा दलांनी आतापर्यंत पाडलेल्या ड्रोनमधून रायफल, पिस्तूल, एमपी4, कार्बाइन, कार्बाइन मॅगझिन, ग्रेनेड तसेच अंमली पदार्थ जप्त केले आहेत. पाकिस्तानचे 81 ड्रोन पंजाबच्या सीमेवर तर 9 ड्रोन राजस्थानच्या सीमेवर आढळून आले आहेत.
ड्रोनद्वारे भारतीय सीमेवर ड्रग्ज आणि शस्त्रे पाठवण्यामागे पाकिस्तानचा हेतू स्पष्ट आहे. साहजिकच पाकिस्तानला भारतात अराजकता पसरवायची आहे. त्याचबरोबर लोकांना, विशेषत: तरुणांना ड्रग्जच्या दलदलीत अडकवून त्यांना भारताविरुद्ध वापरायचे आहे. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या समस्येमागे पाकिस्तानचा हात आहे, हे लपून राहिलेले नाही. पाकिस्तानचे कोणतेही पाऊल अनपेक्षित मानले जाऊ शकत नाही. भारतात अस्थिरता आणि हिंसेची बीजे पेरण्यासाठी तो नेहमीच तयार असतो. त्यासाठी तो नवनवीन मार्ग शोधत असतो. कधी अतिरेकी हल्ल्यातून, तर कधी शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीच्या रूपाने त्याच्या कारवाया सुरू असतात. या कारवाया उघडकीस येत आहेत. कधी तो भारतातील नागरिकांना फसवून भारताविरुद्ध वापरताना दिसतो, तर कधी आपल्या दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करायला लावतो. या दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी आपले सैनिकसुद्धा पुढे पाठवायला तो मागेपुढे पाहत नाही. या दहशतवादी कारवाया त्यालाही अडचणीत आणत आहेत, हे खरे असले तरी त्यातून तो काहीच बोध घ्यायला तयार नाही. भारताला कसे नामोहरम करायचे, हेच तो पाहत असतो. त्याची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली आहे की तेथील नागरिक अन्नालाही महाग झाले आहेत. आता तो स्वतः दहशतवादी हल्ल्यांचा सामना करत आहे. आपण स्वतः उद्वस्त होत असतानाही तो आपल्या नापाक कृत्यापासून परावृत्त होताना दिसत नाही. चीनने तर त्याला कह्यातच घेतले आहे.
भारताने प्रत्येक वेळी पाकिस्तानचा पराभव केला आहे. असे असूनही दक्षतेची व सतर्कतेची गरज आहे. तो खलिस्तानी फुटीरतावाद्यांना उघड पाठिंबा देत आहे. काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी तो नवनवीन क्लृप्त्या वापरत आहे. ड्रोनद्वारे ड्रग्ज आणि शस्त्रे पाठवणे हा देखील त्यातलाच एक प्रयत्न आहे. त्याचे ड्रोन पकडले जात असले तरी काही ड्रोन इच्छितस्थळी पोहचताही असतील. सापडलेल्या ड्रोनसंबंधी चौकशी सुरू आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारतात येणारी शस्त्रे आणि ड्रग्ज कोणाकडे येत आहेत आणि ते कोणत्या स्वरूपात वापरले जाणार आहेत किंवा होते, याचाही शोध घेतला पाहिजे. तपास यंत्रणांनी देशभर पसरलेल्या या जाळ्याचा पर्दाफाश करायाला हवा. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment