इंडियन रोड काँग्रेसच्या 82 व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गांधीनगर येथे सांगितले की, भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघात होतात, ज्याचे एक कारण अनेकदा सदोष रस्ते अभियांत्रिकी आहे.अपघात होतात आणि दीड लाख लोकांचा मृत्यू होतो, तर तीन लाख लोक जखमी होतात. यामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) तीन टक्के तोटा होतो. बळीच्या बकऱ्याप्रमाणे प्रत्येक अपघातासाठी चालकाला जबाबदार धरले जाते. मात्र रस्त्याच्या चुकीच्या अभियांत्रिकीमुळेदेखील अनेकदा अपघात होतात. असे स्पष्ट करताना त्यांनी जीव वाचवण्यासाठी अभियंत्यांना अपघात प्रवण रस्त्यांतील अभियांत्रिकी त्रुटी दूर करण्याचे आवाहन केले.
मंत्री गडकरी यांनी खरे तर लाखमोलाची गोष्ट केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) जारी केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी (2022) भारतात एकूण 4,61,312 रस्ते अपघातांची नोंद झाली. या अपघातांतील मृतांची संख्या 1,68,491 वर पोहोचली असून सुमारे 4.45 लाख लोक जखमी झाले आहेत. 2021 च्या तुलनेत भारतात अपघातांची संख्या सुमारे 12 टक्क्यांनी वाढली आहे, तर मृत्यूच्या संख्येत 9.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतात 2019 मध्ये चार लाख 80 हजार 652 अपघात झाले आणि त्यात एक लाख 51 हजार 113 व्यक्ती मृत्युमुखी पडल्या.वाढते अपघात आणि त्यात आपण गमावत असलेल्या मनुष्यबळाचे चित्र भयावह आहे. रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱयांच्या संख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. त्या खालोखाल चीन आणि अमेरिका आहे. आपल्या देशातील अपघातांच्या कारणांचा शोध घेताना चालकांचा निष्काळजीपणा आणि वेग अशा गोष्टींना जबाबदार धरले जाते. मात्र यात रस्ता बांधणीच्या सदोषांचाही मोठा आहे, याचा विचारच केला जात नाही. वास्तविक रस्ता सुरक्षेविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने राज्य सरकारांना काही सूचना केल्या आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेताना रस्त्यांच्या बांधकामाचा आराखडा हा घटकही प्रामुख्याने विचारात घ्यायला हवा, असे नमूद केले आहे. मात्र रस्त्यांच्या बांधणीचे स्वरूप, अभियांत्रिकी यांतील उणीवांची चर्चादेखील होत नाही. या प्रश्नाची सोडवणूक करायची असेल तर सर्व पातळ्यांवर समन्वित प्रयत्नांची गरज आहे.
सुरक्षित रस्त्यांची बांधणी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, रस्ता वाहतूकविषयक नियमांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा, प्रबोधन व त्यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर अशा सर्व आघाड्यांवर काम व्हायला हवे आहे. त्यासाठी सर्व संबंधित खात्यांमध्ये उत्तम समन्वय आणि कायदा अंमलबजावणीची प्रभावी यंत्रणा यांची आवश्यकता आहे.भारतीय रस्त्यांच्या संदर्भात भौमितिक त्रुटींचा प्रश्न खूप मोठा आहे. सुरक्षेच्या संदर्भात रस्त्यांचे ऑडिट न करता ते उपयोगात आणले जातात. चुकीच्या रस्ता बांधणीमुळे अपघात झाला तर एकूणच त्या रस्त्याची केवढी मोठी किंमत मोजावी लागते,याचा विचार होत नाही. सुरुवातीच्या भांडवली खर्चापेक्षा कितीतरी अधिक किंमत मोजावी लागते आणि यात होणारे नुकसान अपरिमित असते. त्यामुळे अपघाताच्या अन्य कारणाबरोबरच रस्ता बांधणी व त्यातील अन्य त्रुटींचा विचार करून रस्त्यांची निर्दोष बांधणी आणि आखणी व्हायला हवी.
गडकरी यांनी याच भाषणात म्हणाले, “माझाही अपघात झाला आणि माझी चार हाडे मोडली. अनेक लोक मरत आहेत. 18 ते 34 वयोगटातील लोकांमध्ये 60 टक्के अपघाती मृत्यू होतात आणि त्यापैकी बरेच अभियंते आणि डॉक्टर असू शकतात. हे देशासाठी चांगले नाही. अभियंता मंडळींना उद्देशून ते म्हणाले, एक अभियंता म्हणून तुम्ही स्वतःहून दखल घेऊन अपघाताची कारणे दूर केली पाहिजेत. मी तुम्हाला विनंती करतो की सदोष अभियांत्रिकीमुळे होणारे रस्ते अपघात टाळण्यासाठी काम करा.” आपल्या देशातील वाढते रस्ते अपघात लक्षात घेता रस्ते तयार करताना अपघात टाळण्यासाठी ते योग्य प्रकारे इंजिनीयर केलेले आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे.
-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली
No comments:
Post a Comment