आज मोबाईल फोन इतका महत्वाचा झाला आहे की जगात क्वचितच कोणी असेल जो मोबाईल वापरत नाही. अर्थात या मोबाईलमुळे आपली बरीच कामे सोपी झाली आहेत, पण अनेक नवीन समस्याही आणल्या आहेत. यापैकी एक म्हणजे वेगाने वाढणारा इलेक्ट्रॉनिक कचरा. जगभरात 1,600 कोटींहून अधिक मोबाईल फोन वापरले जात आहेत, त्यापैकी सुमारे एक तृतीयांश म्हणजेच 530 कोटी या वर्षी कचऱ्यात फेकले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
आणखी एका रंजक गोष्ट म्हणजे हे सर्व टाकून दिलेले मोबाईल फोन एकमेकांच्या वर ठेवले तर त्यांची एकूण उंची सुमारे 50 हजार किलोमीटर असेल, जी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा सुमारे 120 पट जास्त असेल. जर आपण त्याची चंद्राच्या अंतराशी तुलना केली तर तो त्याच्या सुमारे एक आठवा भाग व्यापेल. इंटरनॅशनल वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट फोरम (डब्लूइइइ -WEEE) ने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. डब्लूइइइ (WEEE) अहवाल, आंतरराष्ट्रीय व्यापार डेटावर आधारित असून हा “ई-कचरा” मुळे वाढत्या पर्यावरणीय समस्यांवर प्रकाश टाकतो.
अनेकजण जुने फोन रिसायकलिंग करण्याऐवजी स्वतःकडे तसेच ठेवू देतात, त्यामुळे हा कचरा वर्षानुवर्षे वाढत असल्याचे समोर आले आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ग्राहकांकडून वारंवार गोळा केलेल्या छोट्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये मोबाईल फोन चौथ्या क्रमांकावर आहे.
इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात दरवर्षी होतेय वाढ- तसं पाहिलं तर जगभरातील वाढता इलेक्ट्रॉनिक कचरा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. समस्या या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरात नाही तर आपण ज्या प्रकारे वापरत आहोत आणि त्यांचे व्यवस्थापन करत आहोत त्यामुळे समस्या निर्माण होत आहे. या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सबद्दलची आमची वाढती ओढ हे समस्यांचे कारण आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये उत्पादित सेल फोन, इलेक्ट्रिक टूथब्रश, टोस्टर आणि कॅमेरा इत्यादीसारख्या लहान इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे एकूण वजन सुमारे 24.5 दशलक्ष टन इतके आहे, जे गिझाच्या ग्रेट पिरॅमिडच्या वजनाच्या चार पट आहे. जगभरातील एकूण इलेक्ट्रॉनिक कचर्यापैकी सुमारे 8 टक्के या छोट्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा वाटा आहे.
इंटरनॅशनल वेस्ट इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट फोरम (WEEE) संशोधकांनी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, 2021 मध्ये 57 दशलक्ष टनांपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण झाला. असा अंदाज आहे की निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या या पर्वताचे वजन चीनच्या ग्रेट वॉलपेक्षा जास्त आहे, जी पृथ्वीवर मानवाने बांधलेली सर्वात जड वस्तू आहे. 2020 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल ई-वेस्ट मॉनिटरच्या अहवालानुसार, 2019 मध्ये सुमारे 54 दशलक्ष मेट्रिक टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण झाला. तसे पाहिल्यास 2014 पासून गेल्या पाच वर्षांत हा इलेक्ट्रॉनिक कचरा सुमारे 21 टक्क्यांनी वाढला आहे. 2030 पर्यंत हा कचरा 74 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. 2019 मध्ये जागतिक स्तरावर केवळ 17.4 टक्के इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा केला गेला आणि त्याचा पुनर्वापर केला गेला. याचा अर्थ असा की कचऱ्यामध्ये असलेले लोखंड, तांबे, चांदी, सोने आणि इतर मौल्यवान धातूंपैकी उर्वरित 82.6 टक्के कचरा टाकण्यात आला किंवा जाळला गेला.
ई-कचरा: कचरा किंवा संसाधन- भारतातीळ इ-कचऱ्याविषयी बोलायचं तर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) डिसेंबर 2020 मध्ये जारी केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की 2019-20 मध्ये भारतात सुमारे 10.1 लाख टन इलेक्ट्रॉनिक कचरा निर्माण झाला होता. 2017-18 मध्ये ते 25,325 टन आणि 2018-19 मध्ये 78,281 टन होते. 2018 मध्ये भारताने केवळ 3 टक्के ई-कचरा गोळा केला होता, तर 2019 मध्ये हा आकडा केवळ 10 टक्के होता. हे स्पष्ट आहे की देशात मोठ्या प्रमाणात हा कचरा गोळा केला जात नाही, रिसायकलिंग तर सोडूनच द्या. अशा परिस्थितीत या कचर्यामध्ये जे मौल्यवान धातू आहेत ते वाया जातात. साहजिकच यामुळे संसाधनांचा अपव्यय होत आहे. आपण या संसाधनांचा पुनर्वापर करू शकतो. 2019 मध्ये इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा पुनर्वापर न केल्यामुळे झालेल्या नुकसानाबद्दल बोलायचे झाले तर ते सुमारे 4.3 लाख कोटी रुपये आहे, जे जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.
या संदर्भात युनिटारचे प्रमुख डॉ. रुएडिगर कुहर म्हणतात की, जर आपण या समस्येचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर पुढील 30 वर्षांत या वाढत्या जागतिक ई-कचऱ्याचे प्रमाण दुप्पट होऊन 100 दशलक्ष टन होईल. अनेक देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. ही अधिकाधिक गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनेही वाढत्या ई-कचऱ्यात भर घालत आहेत. या वाढत्या समस्येचा गांभीर्याने विचार करायला हवा. याला सामोरे जाण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. राष्ट्रीय अधिकारी, अंमलबजावणी संस्था, उपकरणे उत्पादक, पुनर्वापर करणारे, संशोधक तसेच ग्राहकांनी त्यांचे व्यवस्थापन आणि पुनर्वापरात योगदान देणे आवश्यक आहे.
– मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली
No comments:
Post a Comment