Tuesday, October 4, 2011

बालकथा एक होती तारका

गोष्ट प्राचीन काळची आहे. एका गावात एक वृद्ध जोडपे राहात होते. त्यांना मूलबाळ नव्हते. पण तरीही ते कुणाला दोष न देता दिवस आनंदात  घालवत  होते.
एका दिवसाची संध्याकाळ. दोघेही शेतातून घरी परतत होते. वाटेत त्यांना एक लाकडी पेटी दिसली. त्यांनी काही वेळ कसलासा विचार केला आणि पेटी उचलून घरी आणली. त्याचे कुलूप फोडून  ती उघडली. आणि पाहतात तर काय , आत सुंदर, गोंडस चिमुरडी  मुलगी शांत झोपली होती. तिला पाहताच दोघांना खूप खूप आनंद  झाला. जणू काही ही सुंदर मुलगी परमेश्वरानेच पाठवली आहे असे त्यांना वाटले. तसे समजूनच देवाचे आभार मानून त्यांनी तिचा सांभाळ करण्याचे ठरवले.
ते तिच्या संगोपनात गर्क झाले. तिला अगदी फुलासारखे जपू लागले. दिवस जात होते, तशी ती मोठी होत होती. ती अधिकच देखणी दिसू लागली. ती त्या दोघा वृद्धांनाच माता-पिता समजू लागली. त्यांच्या प्रत्येक आज्ञेत राहू लागली. शिवाय त्यांची काळजी करू लागली. त्यांना कामात मदत  करू लागली. दोघांनी तिचे नाव तारका ठेवले.
वयात आली तेव्हा तर ती एखाद्या राजकन्येहून अधिक सुंदर दिसू लागली. तिच्या सौंदर्याची कीर्ती सर्व दूर पसरली. तिला मागणी घालण्यासाठी लांब लांबचे राजपुत्र, राजे- महाराजे येऊ लागले.  तिच्या सौंदर्यावर भाळून , तिचा विरह सहन न होऊन कित्येक वेडेपिसे झाले. मात्र तिने कुणालाच दाद दिली नाही. सगळ्यांना तिने स्पष्ट नकार दिला.
एक दिवस त्या राज्याचा सम्राट स्वतः तिला पाहायला आला. तिच्या सौंदर्यावर तोही भाळला. त्याने लगेच तिला लग्नाची मागणी घातली. पण तारकाने त्यालाही नकार दिला. त्याने तिला पळवून नेण्याची धमकी दिली. त्यावर तारका त्याला म्हणाली, ' माझा पती चंद्र आहे. त्या सुधारकाची मी राणी आहे. माझे लग्न त्याच्याशी झाले आहे. मी लवकरच त्याच्याकडे आकाशात परतणार आहे. त्यामुळे राजा अविचार सोडून दे.'
भल्या भल्या राजा- महाराजांना आपले मांडलिकत्व पत्करायला लावणार्‍या सम्राटाचा अहंकार दुखावला. त्याला   तिच्या नकाराचा संताप आला.  त्याने गर्जना केली, ' तू चंद्राकडे जातेसच कशी ते मी पाहतो.' त्याने सिपायांना आदेश दिला. ' तारका आणि त्या चंद्रावर बारीक नजर ठेवा. पळून चालली तर तिला ठार मारा. '
सम्राटाच्या सिपायांनी जागता पाहारा ठेवला. दुसर्‍यादिवशी अंधार होताच, आकाशात ढगांनी गर्दी केली. जोराचा वारा सुटला. लोक सैरावैरा धावू लागले. इतक्यात तारका दिशेने आकाशातून प्रचंड मोठा एक प्रकाशाचा गोळा आला आणि काही क्षणात तारकाला वरती घेऊन गेला.  तिच्यासोबत वृद्ध माता-पिता गेले. शेवटी सम्राटाचा अहंकार आणि क्रोध व्यर्थ गेले. ( जपानी लोककथा)                                                                   - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    

बालकथा एक दिवसाचा राजा

एका गुरूकुलात राजपुत्रासोबत  व्यापार्‍यांची दोन मुलंही अध्ययन करीत होती. अध्ययनाच्या शेवटच्या वर्षी व्यापारीपुत्र राजपुत्रापासून लांब लांब राहू लागले. राजपुत्राने त्यांना कारण विचारले. त्यावर शेठपुत्र म्हणाले,  'तू राजपुत्र आहेस. आज ना उद्या राजा  होशील. आम्ही मात्र व्यापारीच होऊ आणि आपले पोट भरत राहू. कुठे तू आणि कुठे आम्ही. तुझ्यापासून लांब असलेलंच बरं.'   राजपुत्र म्हणाला, ' तुम्ही माझे मित्र आहात. मैत्री राहिली तर भविष्यात कधी ना कधी मी तुम्हाला एक दिवसाचा राजा बनवीन.' ऐकून दोघा मित्रांना खूप आनंद झाला.  अध्ययन पूर्ण झाल्यावर सगळे आपापल्या घरी परतले.
काही काळ लोटला. राजपुत्र राजा बनला. तिकडे शेठपुत्रसुद्धा आपापल्या नगरीतले  शेठ म्हणून ओळखले जाऊ लागले. दिवस जात होते. एक दिवस पहिल्या शेठपुत्राला व्यापारात मोठा तोटा झाला. कर्ज देणार्‍यांनी तगादा लावला. त्याला आपल्या राजपुत्र मित्राची आठवण झाली. तो त्याच्याकडे गेला. आणि आपल्या वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला,' ठीक आहे, आज दिवसभर तू राज्यकारभार सांभाळ.'
शेठपुत्राने पहिल्यांदा कोशाध्यक्षास बोलावणे पाठवले.  शेठपुत्रास  कर्ज दिलेल्या लोकांनाही बोलावण्यात आले. कोषाध्यक्षास राज खजिन्यातून व्याजासह मुद्दल देण्यास सांगितले. त्यानुसार देणेकर्‍यांचे सारे पैसे चुकते करण्यात आले. सगळ्यांना आनंद झाला. काही धन त्याने परोपकारात घालवले. घोडागाडी भरून सोने-चांदी आपल्या घरी पाठवून सुखी आणि संपन्न झाला.
काही दिवसांनी दुसर्‍या व्यापारीपुत्राचा धंदाही डळमळीत होऊ लागला. तोसुद्धा आपल्या राजपुत्र मित्राकडे गेला. वचनाची आठवण करून दिली. राजा म्हणाला, ' उद्या या नगरीचा राजा तू हो.' शेठपुत्र हर्षोल्हासित झाला. दुसर्‍यादिवशी सकाळी उठल्यावर त्याने सेवकांकरवी दाढी केस बनवले. मालिश करवून घेतली. अंघोळ केली. राजवस्त्रे नेसली. नंतर भोजनखान्यात राजेशाही भोजनावर मनसोक्त ताव मारला. यामुळे त्याचे शरीर जड झाले. त्याला झोप येऊ लागली.त्याने विचार केला, थोडा वेळ आराम करावा आणि मग राजदरबारात जाऊन कारभार पाहावा. एक दिवसाचा राजा राजमाहालात जाऊन झोपला. जाग आली तेव्हा सूर्य मावळत होता. तो घाबरला. पण आता त्याच्या हातात काही राहिले नव्हते. कारण त्याची वेळ संपली होती. तो जसा आला , तसा राजमाहालातून बाहेर पडला. त्याने वेळेचे महत्त्व जाणले नाही. ( राजस्थानी लोककथा)
                                                         - मच्छिंद्र ऐनापुरे, जत    


Sunday, October 2, 2011

रावणराज

दसरा विशेष                                  
   रावण नावाची जगात दुसरी कुठली व्यक्ती नाही. राम भेटतील, पण रावण नाही. रावण हा फक्त रावण आहे. राजाधिराज, लंकाधिपती महाराज रावणाची रणनीतीची ख्याती सर्वदूर होती. परंतु शेवटी दशरथपुत्र रामापुढे तो निष्प्रभ ठरला. वाल्मिकी रामायणानुसार एक पराक्रमी, धर्मात्मा, नीती आणि राजनीती शास्त्राचा ज्ञाता, शास्त्रज्ञ , ज्योतिषाचार्य, रणनीती निपुण असा एक सर्व कुशल राजनीतीज्ञ, सेनापती आणि वास्तूकलेचा मर्मज्ञ असण्याबरोबरच ब्रम्हज्ञानी आणि बहुविद्यांचा जाणकार होता. त्याला मायावी म्हटले जात होते. कारण तो इंद्रजाल, तंत्र-मंत्र , संमोहन आणि विविध प्रकारची जादू जाणत होता. त्याच्याजवळ एक असे वेगवान विमान होते, जे कोणाजवळही नव्हते. या सगळ्या कारणांमुळे त्याची मोठी दहशत होती.
दशाननाची दहा डोकी
रावणाला दहा डोकी नव्हती. पण दहा डोकी असल्याचा भ्रम निर्माण करायचा. म्हणूनच त्याला दशानन म्हटले जाते. रावणाच्या गळ्यात नऊ मणी असायचे. या नऊ मण्यांमध्ये त्याचे डोके- तोंड दिसायचे. यामुळेच त्याला दहा डोकी आहेत, असा भ्रम व्हायचा. जैन शास्त्रात रावणाला प्रती नारायण मानले गेले आहे.
रावणाचे कुटुंब
दानववंशीय योद्ध्यांमध्ये विश्वविख्यात दुन्दुभीच्या काळात रावण होऊन गेला. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी होते. ब्रम्हदेवाचे पुत्र पुलस्त्य आणि  पुलस्त्यचा मुलगा विश्रवा. याला चार संतती. रावण  सर्वात मोठा होता. अशाप्रकारे तो ब्रम्हाचा वंशज होता. ऋषी विश्रवाने ऋषी भारद्वाजची पुत्री इडविडाशी विवह केला होता. इडविडाने दोन पुत्ररत्नांना जन्म दिला होता. त्यातल्या एकाचे नाव कुबेर आणि दुसर्‍याचे विभिषण. विश्रवाची दुसरी पत्नी  कैकसी हिच्यापासून रावण, कुंभकर्ण आणि शुर्पणखा यांचा जन्म झाला होता. लक्ष्मणने शुर्पणखाचे नाक छाटले होते, जी रावणाची बहीण होती. यामुळेच रावणाचे हरण केले होते. कुंभकर्णाच्याबाबतीत म्हटलं जातं की तो सहा महिने झोपलेला असायचा आणि    सहा महिने जागा. रावणाचा सावत्रभाऊ विभिषण रावणाची साथ सोडून युद्धाच्यावेळी रामाला येऊन मिळाला होता.
कुबेर रावणाचा सावत्रभाऊ. कुबेर धनपती होता. कुबेराने लंकेवर राज्य करून त्याचा विस्तारही केला होता. रावणाने कुबेराकडून लंका बळकावून घेतली. आणि तिथे आपले राज्य स्थापित केले होते. लंका भगवान शंकराने विश्वकर्मातून निर्माण केली होती. असं मानलं जातं की माली, सुमाली आणि माल्यवान नावाच्या दैत्यांद्वारा त्रिकुट सुबेल पर्वतावर वसवलेली लंकापुरी देवांनी जिंकून कुबेराला दिली  व त्याला लंकापती केले. रावणाला अनेक बायका होत्या. यात मंदोदरीचे स्थान सर्वात वरचे. सुंबा राज्याचा राजा आणि वास्तुशिल्पकार मयदानवाने रावणाच्या पराक्रमावर प्रभावित होऊन आपली अतिशय रुपसौंदर्यपुत्री मंदोदरीचा विवाह रावणाशी करून दिला. मंदोदरीच्या मातेचे नाव हेमा होते, जी एक अप्सरा होती. मंदोदरीकडून रावणाला परमपराक्रमी पुत्र प्राप्त झाला होता, त्याचे नाव मेघनाद.मेघनादने इंद्राचा पराभव केला होता. त्यामुळे त्याला इंद्रजित असेही म्हटले जाते.
नाभीमध्ये जीव
 रावणाने अमृत्व प्राप्तीसाठी भगवान ब्रम्हाची घोर तपस्या करून वरदान मागितले. पण ब्रम्हदेवाने त्याच्या वरदानाकडे कानाडोळा केला. मात्र त्याचे जीवन नाभित असल्याचे सांगितले.
शिवभक्त रावण
एकदा रावण आपल्या पुष्पक विमानातून प्रवास करीत असताना वाटेत जंगलक्षेत्र लागले. त्या क्षेत्राच्या पर्वतावर भगवान शिव ध्यानमग्न बसले होते. शिवाचा गण नंदी याने रावणाला रोखले. आणि म्हटले की येथून गमन करण्यास मनाई आहे. कारण भगवान तपमग्नतेत आहेत. रावणाला आपला रस्ता आडवल्याबद्दल राग आला. त्याने आपले विमान खाली उतरवून नंदीचा चांगलाच पाण उतारा केला. नंतर शिव ज्या पर्वतावर विराजमान होते. त्यास तो उचलू लागला. हे पाहून भगवान शिवने आपल्या अंगठ्याने पर्वत दाबला. त्यात रावणाचा हात पर्वताखाली सापडला.  आपल्याला मुक्त करण्यात यावे यासाठी रावणाने शिवाची प्रार्थना केली. यानंतर तो शिवभक्त बनला.
रावणाची ग्रंथसंपदा  
रावणाने शिव तांडव स्त्रोत्राबरोबरच अनेक तंत्र ग्रंथांची निर्मिती केली. काहींचे म्हणणे असे की लाल किताब ज्योतिष हा प्राचीन ग्रंथसुद्धा रावणसंहितेचा भाग आहे. रावणाने ही विद्या भगवान सूर्यापासून शिकली होती.    श्रावणसंहितांशमध्ये   या दुर्लभ विद्येबाबत विस्ताराने लिहिले आहे.
रावण राज्य विस्तार
 रावणाने सुंबा आणि बलीद्वीप जिंकून आपल्या अधिपत्याखाली आणले होते. त्याचबरोबरच अंगद्वीप, मलयद्वीप, वराहद्वीप, शंखद्वीप, कुशद्वीप, यवद्वीप, आणि आंध्रालयावर विजय प्राप्त केला होता.यानंतर रावणाने लंकेला आपले लक्ष्य बनवले.
रावणाचे पुष्पक विमान
रावणाने कुबेराला पदच्युत करून लंकेची सत्ता बळकावली. धनपती कुबेराजवळ पुष्पक विमान होते. ते रावणाने हिरावून घेतले होते. हे पुष्पक विमान इच्छेनुसार लहान्-मोठे होत असे. शिवाय मनाच्या गतीने उड्डान करीत असे.
अहंकारामुळे नाश
रावण पराक्रमी, विद्यावंत, रणनीतीज्ञ अशा सर्व क्षेत्रात पारंगत होता. त्याच्या कौशल्य-निपुणतेची चर्चा सर्व दूर पसरली होती. पण त्याच्यात एक अवगुण होता. तो खूप अहंकारी होता. त्याला स्वतः चा मोठा अभिमान वाटे. यामुळेच दशरथपुत्र राम त्याला भारी पडला.
दशाननाच्या पुतळ्याचे दहन
देशभरात दसर्‍याच्यादिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करून लोक एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा देतात. याच दिवशी रामाने रावणाचा वध करून विजय मिळवला होता. म्हणून या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात.  

Saturday, October 1, 2011

बालकथा राजकन्या आणि साप

राजा शिवशक्तीला एकुलता एक राजपुत्र होता. त्याच्या पोटात एक साप वास करीत होता. यामुळे तो अत्यंत कमजोर बनला होता. अनेक वैद्यांनी त्याच्यावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही. निराश होऊन त्याने घर सोडले. इकडे-तिकडे भटकत भटकत तो दुसर्‍या राज्यात पोहचला. तिथे तो भिक मागून आपले पोट भरू लागला आनि एका मंदिरात  दिवस काढू लागला.
     या राज्याच्या राजाचे नाव बली होते. त्याला दोन राजकन्या होत्या. त्या रोज सकाळी राजाच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायच्या. पहिली नमस्कार करून म्हणायची," महाराजांचा विजय असो, आपला आशीर्वाद असावा. आपल्या आशीर्वादाने सुख-वैभव मिळू दे."  धाकटी  म्हणायची," महाराज, आपल्याला आपल्या कर्माची फळे मिळू देत."
    राजा म्हणायचा," माझ्या कर्मामुळेच तुम्ही इतक्या सुखात राहता आहात." धाकटी  राजकन्या म्हणायची, " नाही महाराज, हे माझ्या कर्माचे फळ आहे." राजा धाकटीच्या बोलण्याने नाराज व्हायचा.
    एक दिवस राजाने प्रधानाला आदेश दिला, " कडवे बोल बोलणार्‍या ह्या माझ्या धा़कट्या राजकन्येचा
 विवाह एखाद्या भिकार्‍याशी लावून द्या. भोगू देत तिला तिच्या कर्माची  फळे !"
    प्रधानाने तिचा विवाह मंदिरात राहणार्‍या भिकारी राजपुत्राशी लावून दिला. राजकन्या अगदी प्रसन्न मनाने आपल्या पतीची सेवा करू लागली. काही दिवसांनी ती आपल्या पतीसह परराज्यात निघून गेली. तिथे एका सरोवराच्या काठाला झोपडी बांधून राहू लागली.
    एक दिवस राजपुत्र-पतीस घराची राखण करण्यास सांगून घरसामान आणण्यासाठी स्वतः नगरात गेली. इकडे राजपुत्र एका दगडावर डोके ठेऊन स्वस्थ झोपला होता. त्याच्या पोटातला साप बाहेर आला. इतक्यात तिथे असणार्‍या बिळातला एक सापही  बाहेर आला. तो पोटात वास करणार्‍या सापाला म्हणाला," किती दृष्ट आहेस तू? त्या बिचार्‍या राजपुत्राला किती छळतोस. त्याला जुन्या राईची कांजी पाजल्यास तू तात्काळ मरशील. हे कुणाला ठाऊक नाही असं तुला वाटतं का ?"
     पोटातल्या सापाला राग आला. " तू काय स्वतःला साळसूद समजतोस? स्वतःच बघ. बिळात सोन्याच्या नाण्यांची दोन हंडे लपवून ठेवला आहेस आणि मला शहाणपणा शिकवतोस. बिळात उखळते तेल किंवा पाणी ओतल्यास भाजून मरून जाशील." राजकन्या परतली होती. ती लपून त्यांचे बोलणे ऐकत होती. तिने त्यांनीच सुचवलेल्या उपायांचा अंमल करून दोघांचाही वध केला. बिळातले हंडे काढून घेऊन ती आपल्या राज्यात आली आणि पतीसोबत सुखा-समाधानात राहू लागली. 
                                                              - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकथा महाल आणि धर्मशाळा

एक संन्यासी राजाच्या महालाखाली येऊन झोपला. पाहरेकर्‍यांनी त्याला तेथून हटविण्याचा खूप प्रयत्न केला पण, त्याने त्यांना अजिबात जुमानले नाही. पाय पसरून स्वस्थ झोपून राहिला.
पाहरेकर्‍यांनी त्याला सांगितले, ‘हा राजाचा महाल आहे. तुला आराम करायचा असेल तर धर्मशाळेत जा."  संन्यासी म्हणाला," हा महाल नाही. धर्मशाळा आहे. मी इथेच विश्रांती करणार." असाच काही काळ वाद होत राहिला. पण संन्यासी आपल्या मतावर ठाम राहिला. शेवटी संन्यासी  ऐकत नाही म्हटल्यावर त्याची बंदीखान्यात रवानगी करण्यात आली.
दुसर्‍यादिवशी दरबारात त्याला राजासमोर उभे करण्यात आले. राजा म्हणाला, " एका संन्यासानं खोटं बोलणं उचित नाही. तुला माहित नाही काय कि हा माझा महाल आहे तो ? यास तू धर्मशाळा कसे म्हणतोस ?"
" राजा, हा महाल नाही, धर्मशाळा आहे." संन्यासी.
राजा आश्चर्यात बुडाला. राजा काही बोललाच नाही. संन्याशानेच विचारले," महाल आणि धर्मशाळा यात फरक काय?"
" महाल कायमच्या निवासासाठी असतो तर धर्मशाळा काही काळाच्या विश्रांतीसाठी." राजा उत्तरला.
" राजा, तू ज्या महालात राहतोस ,तो कुणी बनवला ?"
" माझ्या वडिलांनी- महाराजांनी"
" ते या महालात किती वर्षे राहिले ?"
 " पाच वर्षे."
"त्यानंतर...?"
" आता मी राहतो आहे."
" तू या महालात कायम राहणार आहेस काय ?"
हे वाक्य ऐकल्यावर मात्र राजाचे डोळे उघडले. त्याने विचार केला, संन्यासी म्हणतो ते बरोबरच आहे. हे जीवन म्हणजे काही दिवसांचा प्रवासच होय. आणि ज्याला मी आजपर्यंत महाल म्हणत होतो, ती तर विश्रांतीची एक धर्मशाळाच आहे.                                        - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकथा आंबट आंबा

मेवाडचा महाराणा आपल्या एका नोकरास नेहमी सोबत ठेवत असे. मग ते युद्धाचे मैदान असो अथवा परमेश्वराचे मंदिर. एकदा महाराणा एकलिंगजी देवाच्या दर्शनाला गेले. सोबत नोकर होताच. दर्शन झाल्यावर जरा पाय मोकळे करण्यासाठी दोघे तलावाकाठी फिरायला आले. तिथे त्यांना एका झाडाला खूप आंबे लगडलेले दिसले. त्यांनी त्यातला एक आंबा तोडला. त्याचे चार भाग केले. त्यातला एक भाग नोकराला देत म्हणाले," खाऊन पहा आणि चव कशी आहे ती  सांग मला.'
नोकराने आंबा खाल्ला नी म्हणाला, " खूप गोड आहे, महाराज. आपल्याला एक विनंती आहे, महाराज. मला आणखी एक फोड देण्यात यावी."  महाराजांनी त्याला आणखी एक आंब्याची फोड दिली. तीही खाऊन नोकर म्हणाला, " व्वा काय स्वाद आहे, अगदी अमृतासमान ! महाराजांनी आणखी एक फोड देणयाची कृपा करावी."
महाराजांनी त्याला तिसरी फोडही दिली. ते खाताच नोकर म्हणाला," काय मधुर आहे. व्वा, मजा आली. महाराज, ही राहिलेलीही  फोड देऊन माझ्यावर कृपा करावी." आता मात्र महाराणांना संताप आला. ते म्हणाले," तुला लाज वाटत नाही ? तुला सर्वकाही पहिल्यांदा मिळतं. तरीही तुझा हव्यास संपला नाही. आता ही फोड अजिबात मिळणार नाही." असे म्हणतच राजाने राहिलेली आंब्याची फोड दाताखाली धरली. आणि काय आश्चर्य ! त्यांनी ती लगेच थुंकून टाकली. " बाप रे! इतकी आंबट. आणि तू तर गोड आहे म्हणालास ? आणि अमृततुल्य म्हणत खाऊनही टाकल्यास. असे का म्हणालास ?"
नोकर म्हणाला," महाराज, आयुष्यभर तुम्ही मला गोड गोड आंबेच देत आला आहात. आज आंबट आंबा निघाला म्हणून कसे म्हणू की हा आंबट आहे. असं म्हणणं म्हणजे कृतघ्नपणा नव्हे काय ?" महाराजांनी त्याला गळ्याशी घेतले.                                                        - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

बालकथा हिंसा वर्ज्य आहे

एकदा स्वामी रामनरेशाचार्य भक्तांना सांगत होते,  आमच्या मठात एक आंब्याचे झाड होते. मठाचे व्यवस्थापक मला म्हणाले, " मी आंब्याचे झाड तोडायला येईन. तेव्हा तुम्ही मला आडवायचं. " मी म्हणालो, " तुम्ही असे का म्हणता ?" ते म्हणाले," या आंब्याच्या झाडाला भीती घालायची. तीन्-चार वर्षे झाली झाड फळच देईना झाले आहे."
दुसर्‍यादिवशी ते कुर्‍हाड घेऊन आले. म्हणाले," आता तोदतोच याला. काही उपयोगाचे नाही हे झाड. किती वर्षे झाली अजिबात फळच देत नाही. काय करायचे याला ठेऊन?" मी त्यांना रोखलं. "अहो, तोडू नका त्याला. एक वेळ संधी द्या त्याला."  असा आमचा नाटकी संवाद घडला. पण आश्चर्य असं की पुढच्या वर्षी झाडाला आंबेच आंबे लगडले."
झाडांमध्येसुद्धा प्राण असतो. संवेदना असते. तेही घाबरते. त्याच्यातही आत्मा वास करत असतो. ही काही आजची गोष्ट नाही. आपल्याला सांगितलं जातं की अमूक एक काम केलं की पुढच्या जन्मी या वृक्षाचा जन्म मिळतो. तर तमुक काम केलं की त्या वृक्षाचा जन्म मिळतो.वृक्ष तोडण्याच्या कृतीलाही पाप समजलं जातं. आजपर्यंत या दुनियेतला वृक्ष तोडणारा कुठलाही माणूस मोठा झाला नाही. लाकडे तोडून काही दिवस पैसेवाले होतात. पण ते फार काळ काही टिकत नाही. कारण जिवंत वृक्षावर जो कोणी कुर्‍हाड चालवेल, त्याचे दिवस भरलेच म्हणून समजा. मारण्याचा अधिकार फक्त परमेश्वराला आहे. कारण त्यानेच त्याला बनवले आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी मारेल तर त्याला शिक्षा होईल. एखाद्याला वाणीनेही मारले जाऊ शकत नाही. मनाचाही प्रहार केला जाऊ शकत नाही. तर मग शरीराची गोष्टच सोडा.                       - मच्छिंद्र ऐनापुरे, जत