Friday, January 6, 2012

महापुरुष स्वामी विवेकानंद

दोन-अडीच  वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले होते की, जपान भारताचा कायमचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन यांनी म्हटले आहे की,  जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग   अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो,
 भारतभूमी ही ऋषी-मुनींच्या वास्तव्याने पावन झालेली, मानव जातीला आत्मिक समाधान मिळावे, या कळकळीतूनच ही महात्मे समाजाशी समरस झालेली. . देशकालमानानुसार मानवी आचरण बदलते. पण मानवी वृत्ती मात्र कायम राहते. एकोणीसाव्या शतकाच्या प्रारंभी समाजमनावर पाश्चात्य वाड.मय, धर्मविचार, पाश्चात्य आचार, विद्या म्हणजे एकंदर संपूर्ण औद्योगिकीकरणाची जबर छाप पडली होती. सर्व धर्माचे आपल्या सनातन तत्त्वांकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. या  पाश्चात्य सभ्यतेच्या  उसळलेल्या  लाटेला  थोपवून धरणे नितांत गरजेचे होते.  आपल्या भारतात सांस्कृतिक प्रलय घडवून आणण्याइतकी   या लाटेत ऊर्मी होती, परंतु ही लाट एका दीपस्तंभाचे पाय धुवून परत फिरली तो दीपस्तंभ म्हणजेच स्वामी विवेकानंद होय.
भारतीय महापुरुषांच्या परंपरेतील सर्वज्ञात महापुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद. भारताच्या आध्यात्मिक वैभवाची श्रेष्ठता अधिकारवाणीने सांगणारा हा भारतपुत्र कुणाला माहित नाही?  स्वामीजींना हे विराट ज्ञान ज्यांच्याकडून प्राप्त झाले, ज्यांनी या हिर्‍याला उत्तमरित्या  पारखले व  त्यांच्या हातून अद्वितीय असे कार्य करवून घेतले ते युगावतार म्हणजेच त्यांचे गुरू 'श्री रामकृष्ण परमहंस.'  रामकृष्ण परमहंस यांनी धर्माचा नवा आशयघन अर्थ समाजापुढे उलगडला. विविध धर्म्-संप्रदायांमध्ये सुरू असलेल्या आणीबाणीच्यावेळी 'कोणत्याही धर्मात गेलात तरी, शेवटी त्याच एका ईश्वराप्रती तुम्ही पोहोचाल, तेच एकमात्र सत्य आहे.' असा धर्माचा सार्वजनिक अर्थ त्यांनी सांगितला आणि मानवतेला महत्त्व देणारी हीच भावधारा स्वामी विवेकानंद यांनी पाश्चात्य जगाच्या व्यासपीठावरून विश्वाच्या प्रवाहामध्ये नेऊन सोडली.
'आत्मनो मोक्षार्थ जगद्धितायच' आपल्या या मानसिकतेबरोबरच स्वामीजींनी जनहित साधले. ते स्वतः ठणकावून सांगायचे की, धर्माच्या गोष्टी इथे सांगायच्या असतील, तर आपल्या या देशातील लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवावा लागेल. पददलितांच्या हिताशी अगदी घट्ट जोडून घ्यावे लागेल. आपल्या भारतभूमीत प्रथम आध्यात्मिक विचारांचा पूर वाहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. . त्यांच्या विचार विश्वाचा परीघच फार मोठा होता. स्वामीजींनी १९०० च्या आधी अमेरिकेत ' रिलीजन ऑफ लव्ह' या विषयावर व्याख्याने दिली. त्यामध्ये  म्हणाले होते, ' बौद्धीक विकासासाठी आपल्याला ग्रंथांचे पुष्कळ साहाय्य होऊ शकते: पण अध्यात्मिक  उन्नतीसाठी मात्र ग्रंथांची प्रायः काहीच मदत होत नाही. आपल्या आत्मजागृतीसाठी बाहेरून येणारी शक्ती ही आपल्या गुरूंकडून आली पाहिजे. जी व्यक्ती ही शक्ती देते , त्या व्यक्तीमध्ये ही शक्ती संचारित करण्याचे सामर्थ्य असले पाहिजे आणि क्षेत्रसुद्धा नांगरून तयार पाहिजे आणि ज्यावेळी या दोन्ही गोष्टी  पूर्ण होतात, त्यावेळी धर्माचे रोप मोठ्या आश्चर्यकारक रीतीने फोफावू लागते. धर्मोपदेशक हा जसा अलौकिक असला पाहिजे, तसाच उपदेश ऐकणाराही अलौकिक पाहिजे.' भारताबरोबरच परदेशातील जनतेला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवून त्यांना राजयोग, कर्मयोग, कठोपनिशद, भक्तीयोग समजावून सांगण्याचे बळ त्यांच्यात होते. म्हणूनच त्यांना मानवजातीचे आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच त्यांनी मानवतेच्या विकासासाठी अन्य क्षेत्रातही तितकेच मोलाचे मार्गदर्शन केले. देश, धर्म, वंश, जात या सार्‍या कृतीम भिंतींना पाडून एकत्र येण्यातच कल्याण आहे, हा त्यांनी आजच्या नवयुगाला दिलेला अभिनव संदेश आहे.
'श्रीरामकृष्ण - विवेकानंद' या गुरू- शिष्यांची पहिली भेट झाली, ती १८८१ मध्ये. स्कंद जयंतीच्या उत्सवात झाली.  पुढे  इथूनच स्वामीजींच्या जीवनाला नवे वळण मिळाले. या गुरु-शिष्यांचे नाते मोठे अलौकिक , असामंजस्य असे होते.  याबरोबरच स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे 'शिकागो धर्मपरिषद.' रेव्हरंड जॉन हेन्री बॅरीज यांनी या सर्वधर्म परिषदेविषयी आपल्या एका ग्रंथात लिहिले आहे, ' जगातल्या दुसर्‍या कोणत्याही सभेची  जगभर कधी इतक्या उत्कंठतेने वाट पाहिली गेली नाही. तीस महिन्यांपर्यंत जगातील सर्व लोहमार्ग आणि सागरीमार्ग अजाणता सर्वधर्म परिषदेचे कार्य करीत होते.' ११ सप्टेंबर १८९३ च्या प्रभाती आर्ट इन्स्टिट्यूट ऑफ शिकगोमध्ये सर्वधर्म परिषदेचे उदघाटन झले. ईश्वरवाद ( ब्राम्हसमाज) , यहुदी, इस्लाम, हिंदू, बौद्ध, ताओ, कन्फ्युशिअस, शिंटो, पार्शी , कॅथॉलिक, ग्रीकचर्च, आणि प्रोटेस्टंट असे सर्व धर्माचे अनुयायी परिषदेचे प्रतिनिधीत्व करीत होते. हजारो लोकांमध्ये स्वामी विवेकानंद उठून दिसत होते, ते त्यांच्या भारदस्त लाल पोषाख, पिंगट चेहरा आणि त्यावर चढवलेले पिवळे पागोटे यामुळे हजारो लोकांमध्ये स्वामी उठून . श्रोता समुदायावर स्वामीजींच्या पहिल्या शब्दांचा जो विद्युल्लतेसारखा प्रभाव पडला, तो सर्वश्रुत आहे. 'अमेरिकन भगिनी आणि बंधुनों' असे जेव्हा त्यांनी सभेला सम्बोधित केले , तेव्हा कान बधीर करणारा टाळ्यांचा कडकडाट सतत दोन मिनिटे सुरू होता. त्यांच्या विचारांमुळे व व्यक्तिमत्वामुळेही ते परिषदेत फार लोकप्रिय बनले. विख्यात अमेरिकन विदुषी मेरी लुई बर्क म्हणतात, ' विवेकानंद हे एक संन्यासी असून हार्वर्ड विद्यापीठातील प्रा. राईट यांच्या उद्धॄतीनुसार ते जगातील सर्वात अधिक शिक्षित व्यक्तींपैकी एक होत.' याही उपर त्यांच्या अलोट लोकप्रियतेचे आणखीही एक कारण होते, ते म्हणजे तेव्हा यापूर्वी कधीही अमेरिकन लोकांनी आध्यात्मिक सत्ये संपूर्णपणे जीवनात मूर्त झालेली बघितली नव्हती. तिथे सर्वधर्मपरिषदेत मानवाला महान आध्यत्मिक व्यक्तीबद्दल वाटणारे आकर्षण सहज स्फूर्तपणे अजाणताच प्रगट झाले होते. हजारो लोक या आश्चर्यकारक मनुष्याला पंधरा मिनिटे ऐकण्यासाठी म्हणून तासनतास बसून राहत. अमेरिकेच्या निरनिराळ्या शहरांमधून एकेकावेळी बारा-बारा, चौदा-चौदा व्याख्याने देऊन स्वामींनी जो झंझावती दौरा केला, त्यामुळे त्यांना तुफानी हिंदू असे नाव मिळाले होते. स्वामीजींच्या व्याख्यानांनी प्रत्येकालाच एकीकडे हलवून सोडले असले तरी दुसरीकडे अधिक सखोल स्तरावर जीवनभर राहणार्‍या आकांक्षांना व विचारांनाही गतिमान केले होते. त्यांच्या ह्या जागतिक भ्रमणातून त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी काही ज्ञानाची बिजे पेरली की, आजही स्वामीजी त्या प्रत्येक ठिकाणी त्यातून उगवलेल्या ज्ञानामृताच्या रुपाने जिवंत आहेत. १८९७ मध्ये 'रामकृष्ण मिशनची' स्थापना करून स्वामी विवेकानंद एक 'योद्धा संन्यासी' बनून स्वतः लढाईत उतरले आणि खर्‍या अर्थाने त्यांनी वैराग्य, अध्यात्म, चारित्र्य या सर्व शब्दांच्या व्याख्या स्पष्ट केल्या. स्वामीजींचा एक एक विचार म्हणजे संपूर्ण भारतवर्षाला मिळालेला एक एक अमूल मंत्र आहे. १२ जानेवारी १८६३ ते ४ जुलै १९०२ या अवघ्या ३९ वर्षे पाच महिने आणि २४ दिवसांत त्यांच्या शरीरात वास्तव्यास असलेल्या दिव्य आत्म्याने महामायेचे भयंकर युद्ध जिंकले.
खरेच! स्वामी विवेकानंद म्हणजे एक मौलिक विचार, एका महासागराप्रमाणे अथांग, गाढ पांडित्य आहे.
परतत्वे सदालीनो रामकृष्ण समाज्ञया
यो धर्मस्थापनरतो विरेशं तं नमाम्यहम || 

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी

सांगली/ प्रतिनिधी
जत येथील मराठी साहित्य सेवा मंचच्या वतीने आयोजित १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जत तालुक्यातील येळवी येथे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून अहमदनगर येथील ज्येष्ठ चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर लाभणार असल्याची माहिती साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, मराठी साहित्य सेवा मंच अध्यक्ष माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी दिली.
या एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे, तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्य सहकारी बँक माजी संचालक विलासराव जगताप यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘मराठी साहित्य-दुष्काळ व उपाययोजना’ या विषयावर डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात नातेपुते येथील प्रा. सुनीता सूर्यवंशी, मिरज येथील प्रा. राजेंद्र जेऊर व डॉ. श्रीकांत कोकरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारच्या सत्रात बारामती येथील प्रा. रवींद्र कोकरे व जत येथील अनिल देशपांडे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
गडहिंग्लज येथील कवी विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, कडेगाव येथील चंद्रकांत देशमुख, पुणे येथील अरुण कटरे, सांगोला येथील दयासागर बन्न्ो, प्रा. आबासाहेब शिंदे, भरत पाटील व सुनील जवंजाळ, नागठाणे येथील लता ऐवळे व रमजान मुल्ला, मंगळवेढा येथील प्रा. दत्ता सरगर, औरंगाबाद येथील डॉ. सूरज चौगुले, प्रा. संतोष काळे, चंद्रकांत बाबर, महादेव सवाईसर्जे व रत्नकुमार गोर्हे आदी नवोदित कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पत्रकार व लेखक प्रा. मच्छिंद्र ऐनापुरे यांचा ‘हसत जगावे’ या विनोदी संग्रहाचे, तर डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या ‘रंगपंचमी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, पुरस्कार वितरण व अध्यक्षीय भाषण होणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार उमाजी सनमडीकर, जत पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब, उपसभापती मीनाक्षी अक्की, आर. के. माने, येळवी गावचे सरपंच मारुती जमदाडे, दादासाहेब माने व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित राहणार असल्याचेही प्रकाश जमदाडे, माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी सांगितले.
ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवारी Bookmark and Share Print E-mail
सांगली/ प्रतिनिधी
जत येथील मराठी साहित्य सेवा मंचच्या वतीने आयोजित १७वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जत तालुक्यातील येळवी येथे रविवार, दि. ८ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनास अध्यक्ष म्हणून अहमदनगर येथील ज्येष्ठ चित्रपट गीतकार व कवी बाबासाहेब सौदागर लाभणार असल्याची माहिती साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष तथा सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती प्रकाश जमदाडे, मराठी साहित्य सेवा मंच अध्यक्ष माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी दिली.
या एकदिवसीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात रविवार दि. ८ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे, तर या साहित्य संमेलनाचे उद्घाटन राज्य सहकारी बँक माजी संचालक विलासराव जगताप यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ‘मराठी साहित्य-दुष्काळ व उपाययोजना’ या विषयावर डॉ. कृष्णा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात नातेपुते येथील प्रा. सुनीता सूर्यवंशी, मिरज येथील प्रा. राजेंद्र जेऊर व डॉ. श्रीकांत कोकरे यांचा सहभाग असणार आहे. दुपारच्या सत्रात बारामती येथील प्रा. रवींद्र कोकरे व जत येथील अनिल देशपांडे यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे.
गडहिंग्लज येथील कवी विलास माळी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होत असून, कडेगाव येथील चंद्रकांत देशमुख, पुणे येथील अरुण कटरे, सांगोला येथील दयासागर बन्न्ो, प्रा. आबासाहेब शिंदे, भरत पाटील व सुनील जवंजाळ, नागठाणे येथील लता ऐवळे व रमजान मुल्ला, मंगळवेढा येथील प्रा. दत्ता सरगर, औरंगाबाद येथील डॉ. सूरज चौगुले, प्रा. संतोष काळे, चंद्रकांत बाबर, महादेव सवाईसर्जे व रत्नकुमार गोर्हे आदी नवोदित कवी सहभागी होणार आहेत. सायंकाळी पत्रकार व लेखक प्रा. मच्छिंद्र ऐनापुरे यांचा ‘हसत जगावे’ या विनोदी संग्रहाचे, तर डॉ. सरिता पट्टणशेट्टी यांच्या ‘रंगपंचमी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन, पुरस्कार वितरण व अध्यक्षीय भाषण होणार आहे. या कार्यक्रमास माजी आमदार उमाजी सनमडीकर, जत पंचायत समिती सभापती मन्सूर खतीब, उपसभापती मीनाक्षी अक्की, आर. के. माने, येळवी गावचे सरपंच मारुती जमदाडे, दादासाहेब माने व सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती सुरेश शिंदे आदी उपस्थित राहणार असल्याचेही प्रकाश जमदाडे, माणिक कोडग व लवकुमार मुळे यांनी सांगितले.

Tuesday, January 3, 2012

स्त्री शिक्षणातील क्रांतिज्योती: सावित्रीबाई फुले

    क्रांतिदूत ज्योतिराव फुले व सावित्रीबाई यांनी १८४८ साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली.१८५३ साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी देशातील पहिली शाळा काढून परंपरावाद्यांच्या गुलामगिरीत असनार्‍या स्त्रिया, दलित, मागासवर्गीय यांच्यासाठी ज्ञानाची कवाडे उघडून हजारो वर्षे अज्ञानाच्या अंधारात चाचपडत असणार्‍या या समाजात ज्ञानज्योत पेटवून त्यांचे जीवन प्रकाशमय करण्याची किमया केली. नायगावच्या सावित्री खंडोजी नेवसे पाटील पुण्याच्या सावित्रीबाई जोतिराव फुले झाला. तेव्हापासून  त्यांच्या जीवनाला आणि देशाच्या इतिहासाला वेगळे वळण मिळाले. भारतीय समाजात वेगळेच स्थित्यंतर घडून आले. सार्‍या जगाला वंद्य ठरलेल्या जोतिरावांच्या कार्याला सक्रिय साथ-संगत देत त्यांनी कार्यकर्तृत्व घडवले ही साथसंगत केवळ ‘मम’ म्हणणारी आणि उखाण्यात सांगणारी कधीच नव्हती. अंत:प्रेरणांसह परिवर्तनाचे मैदान त्यांनीही निवडले. परिवर्तनासाठी समाजभूमी तयार करणारी भूमिका घेतली.जात, वर्ण, वंश, लिंग, धर्म या आधारावर विषमता पोसणार्‍या समाजाला छेद दिला. भेदाभेद करणार्‍या तथाकथित संस्कृतीला आव्हान दिले. शोषितांच्या उत्थापनाचा ध्यास आणि शोषकांच्या स्वार्थी प्रवृत्तीविरुद्धचे युद्ध जोतिराव गोविंदराव फुले आणि सावित्रीबाईंनी पुकारले. त्यामुळेच, आज भारतभर अनेक सावित्री विविध क्षेत्रांत आपली मुद्रा उमटवीत आहेत.
      शूद्र-अतिशूद्रांसाठी शिक्षण खुले करायचे असेल, अनाथ मुलांचा, फेकून दिलेल्या मुलांचा सांभाळ करायचा असेल, घराचेच अनाथालय करायचे असेल किंवा अशा अनाथांचे आई-वडील बनायचे असेल तर प्रत्येक वेळी सावित्रीबाई आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहताना दिसल्या आहेत. अशी भूमिका करताना त्या अनेकदा स्वतःची प्रज्ञा, स्वतःचा विचारही ठामपणे वापरतात. केवळ पतीभक्त आणि पतीनिष्ठा म्हणूनच त्या हे सारे करीत आल्या, असे नाही तर समाज बदलाची तीव्र आकांक्षा पतीप्रमाणे त्यांच्याही मनात सतत होती. पतीचे आदेश पालन करणारी एक पत्नी एवढीच त्यांची भूमिका नाही, तर स्वतंत्रपणे अनेक लढायांना निमंत्रण देणारी आणि त्या लढणारी वीर पत्नी, वीर महिला म्हणूनही त्यांची भूमिका होती. खरोखरच त्या स्वतःचा विचार आणि स्वतःचा कणा घेऊन जगणाऱ्या महिला होत्या, हे फुल्यांच्या निधनानंतरही सिद्ध झाले. फुल्यांच्या सर्व लढाया तर त्यांनी पुढे नेल्याच, शिवाय स्वतःच्या लढायाही त्या लढल्या. पायाला भिंगरी लावून त्या फिरल्या. अनेक आंदोलनांचे स्वतः नेतृत्व केले. रुग्णांची सेवा केली. शिक्षणाची चळवळ पुढे नेली आणि व्यवस्थेच्या मानेवर तर उभ्या राहिल्याच राहिल्या.महात्मा फुले आणि क्रांतिज्योती फुले त्यापैकी एक होते. त्यांचे अवघे जीवन, अवघा श्‍वास, अवघ्या हालचाली या समाजाशी, लढायांशी जोडल्या गेल्या आहेत. स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत हे पती-पत्नी एकाच विषयावर चर्चा करताना दिसतात आणि तो विषय म्हणजे गड्या आपल्याला समाज बदलायचा, व्यवस्था बदलायची, माणसांचे अवमूल्यन थांबवायचे आणि त्यासाठीच जगायचे. समाजक्रांती हेच या दाम्पत्याच्या जगण्याचे प्रयोजन होते. त्यासाठीच ते जगले.

     स्त्रियांना कोणतेच स्वातंत्र्य नव्हते त्या काळात स्त्रियांसाठी परिवर्तनाचे प्रशस्त मार्ग त्यांनी निर्माण केले. शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रिया यांच्या सामाजिक, धार्मिक कौटुंबिक स्वातंत्र्यासाठी नवा विचार, नवे कार्य आरंभिले आणि पूर्णत्वास नेले. आपल्या आयुष्यातील पन्नास वर्षे सामाजिक युद्धात घालविली. या युद्धात झालेले आघात, छळ सहन केला. मात्र, आपला मार्ग आणि शेवटी अपले यश कायम ठेवले. सार्‍या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. विविध वर्गांसाठी अभ्यासक्रम तयार केले. असंख्य मुलींना प्रेरणा देऊन ज्ञानक्षेत्रात आणले. शिक्षण नव्हे, ज्ञान दिले. त्यातूनच मुक्ता साळवेंचा विद्रोही आविष्कार घडला. आधुनिक भारताच्या शिक्षणाचे नायकत्व सावित्रीबाई फुले यांच्याकडे जाते.
    सामान्यांच्या आशा-आकांक्षांचे, शोषितांच्या संपन्न स्वप्नांचे जग निर्मिण्याची मागणी होते आहे. सावित्रीबाईंच्या कार्य-विचारांना व्यापक, विशाल, अथांग अर्थ प्राप्त झाला आहे. नवा समाज आणि नव्या समाजाची नवी संस्कृती याचा ध्यास या कार्य-विचारातून प्रकट झाला. त्यासाठीच सावित्रीबाईंच्या विचारांची, कार्याची वर्तमानाला गरज आहे. त्यातून भविष्य निर्माण होईल. गर्भातच स्त्री संपविणार्‍या या वर्तमानाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे, विचाराचे सरण अटळ आहे.

Monday, January 2, 2012

भ्रष्टाचार प्रश्न मिटणार नाही.

देशापुढील अनेक समस्यासह, भ्रष्टाचार, महागाईसारखे अनिर्णीत आणि अनियंत्रित प्रश्नांमुळे समाजात सतत रोष वाढत चालला आहे; पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून झटपट पैसा मिळवण्याची स्पर्धा दिसून येत आहे. आर्थिक धोरणे पूर्वी सामाजिकतेवर आधारित होती, आता त्यांचे लक्ष्य बदलले आहे. सामाजिकतेऐवजी भांडवल उभारणीला महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समतेच्या उद्देशाने आखण्यात येणा-या मोठमोठय़ा योजनांनासुद्धा भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने त्यांचे लाभ अपेक्षित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मोठय़ा संख्येने जागृत होणा-या समाजाला, तरुणवर्गाला या उणिवा आणि चलाखी चटक्न कळते. त्यामुळेच भ्रष्टाचारविरोधासारख्या मोहिमांत आता लक्षणीय सहभाग वाढू लागला आहे. येत्या काही वर्षातील राजकारणाला त्याची गांभीर्याने दखल घ्यावी लागेल. मात्र सरकारने केवळ कायदे करून भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही. कायदा हा सर्व समस्यांवर अक्सीर इलाज आहे, असा आपला गैरसमज हो ऊन बसला आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करण्याचा आग्रह धरला जातो. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगाराचा अधिकार आणि आता जनलोकपाल कायद्याचा आग्रह धरला जात आहे. पण नैतिकता, नीतिमत्ता काय कायद्याने उत्पन्न होणारी चीज आहे काय ? याचा विचार व्हायला हवा आहे. बेरोजगार तरुणांना विनाव्यत्यय आणि चिरीमिरी न देता रोजगाराची कामे मिळू शकतील का?, पोलिस शिपाई-हवालदार आणि पालिका कर्मचा-यांच्या भ्रष्ट व्यवहारातून सामान्यांची सुटका होऊ शकेल का?, पैसे न मोजता मतदारांची रेशनकार्डे मिळतील का?, प्रामाणिकपणे स्वबळावर काम करू इच्छिणा-यांना सुलभपणे परवानगी, परवाने मिळतील का, असे अनंत प्रश्न सर्वसामान्यांपुढे आहेत. अनुत्तरीत प्रश्नांच्या यादीला अंत नाही. या प्रश्नांना ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांच्या  आंदोलनातूनसुद्धा उत्तरे मिळाली नाहीत. तसेच प्रत्येक चांगली गोष्ट कायद्यानेच होते हा एक भ्रम आहे. कायद्याविनादेखील समस्याविरहीत सुदृढ समाज निर्माण करायावयाचा झाल्यास प्रथम मूल्यांची रुजवण महत्त्वाची आहे. त्याची सुरुवात घरा-घरातून व्हायला हवी.

Sunday, January 1, 2012

जिवाशी खेळणारा मोबाईल

      लोकांना स्वतः च्या जिवाची पर्वा नाही आणि सरकार नावाची सत्ताधारी मंडळीही काही करायला तयार नाहीत. त्यामुळे या देशाचे कसे होणार, हा प्रश्न सतावणारा आहे. सध्या भारतातल्या मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जीवनाशी खेळत आहेत. सरकार त्यांच्यावर कडक निर्बंध आणायचे सोडून अप्रत्यक्षरित्या त्यांना साथच देत आहे, ही मोठी लाच्छंनास्पद आणि चिंताजनक बाब आहे.
      आपल्या देशातल्या कोट्यवधी लोकांना आपल्या हातात आणि खिशात मोबाईल असल्याचा मोठा आनंद वाटतो. कारण आता त्यांना कुठुनही आणि कोठेही क्षणात संपर्क साधता येतो, बोलता येते आणि ख्याली-खुशाली सांगता-जाणता येते. आपल्या खेडयातल्या गुराख्याकडे आणि शहरातल्या हमालाकडेही मोबाइल असल्याने त्याचे अप्रूप आता काही राहिले नाही. ती आता नित्याची, गरजेची वस्तू बनली आहे. पण या कित्येक लोकांना माहित नाही की, मोबाइल हँडसेटमधून एक अशी इलेक्ट्रो मॅग्नेटिक ऊर्जा बाहेर पडते, जी आपल्या आरोग्याला मोठी घातक आहे. सरकार काही नियम सांगून आपला हात झटकून मोकळे झाले आहे. कुठल्याही मोबाइलच्या जाहिरातीमध्ये मुले किंवा गर्भवती महिलांना न दाखवण्याचा फतवा काढला आहे. तसेच हँडसेटमध्ये विकिरण स्तर दाखवण्याची सुविधा अनिवार्य करण्याचा मोबाईल कंपन्यांना आदेश दिला आहे.
      पण केवळ एवढे करून भागण्यासारखे नाही. सरकारने मोबाइल कंपन्यांना आपल्या मोबाइल हँडसेटमध्ये विकिरण स्तर दाखवण्याच्या सुविधा देण्याचे आदेश दिले आहेत. पण तेवढ्याने ही समस्या सुटणारी नाही. विकिरणाची अधिकची तीव्रता मानवी शरीराला मोठी घातक असल्याचे म्हटले जाते. मोबाईल टॉवर परिसरातल्या नागरिकांनाही त्याचा मोठा तोटा आहे. विकिरणात घट होण्याबाबत अथवा करण्याबाबत उपाय अवलंबण्याचे निर्देश दिले नाहीत. त्यामुळे मोबाईल कंपन्यासुद्धा विकिरण स्तर घटविण्यापेक्षा तांत्रिकदृष्ट्या ते कमी दाखवण्याचा खेळ खेळण्याची अधिक शक्यता आहे. चुकीच्या पद्धतीने विकिरण स्तर दाखवला जाऊ शकतो. या निर्णयामुळे मोबाईल कंपन्यांना विकिरण घटविणे अनिवार्य नाही, फक्त दाखवणे अनिवार्य आहे. ही कंपन्यांसाठी मोठी पळवाट आहे.
      खरे तर आरोग्य आणि जीवनापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी होऊ शकत नाही. कमीत कमी तरी कुठलेही आधुनिक उत्पादन किंवा तंत्रज्ञानाची गरज  कधीही जीवनापेक्षा भारी असू शकत नाही. पण आपल्या देशातल्या सरकारला आपल्या लोकांची अजिबात चिंता नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. जनतेच्या जिवाशी खेळून रुपये- पैशांचा धंदा चालवला जात असेल तर सरकारने त्याला रोखण्याची आवश्यकता आहे. मात्र इथे सरकार त्याला प्रोत्साहनच देताना दिसत  आहे.
      लोकांच्या जिवांशी खेळण्याचा स्वार्थ फक्त कंपन्याच करण्यास धजावू शकतात. त्यामुळे सरकारने मोबाईल फोन सेवेपासून लोकांचे संरक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी बरेच काही करण्याबरोबरच  गंभीरपणेही   पावले  उचलण्याची गरज आहे. मोबाइलसंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या आंतरमंत्रालयीन समितीच्या बर्‍याच चांगल्या शिफारशी केंद्र सरकारने नाकारल्या आहेत, ही बाबसुद्धा दुर्दैवी म्हटली पाहिजे. त्यामुळे मागे काही दिवसांमध्ये खूपच चिंताजनक संकेत पुढे आले. कंपन्या मोबाईल  टॉवर लावण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणू देण्यास तयार नाहीत. म्हणजे कंपन्या मोबाइल सेवा सुरक्षित बनवू इच्छित नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. त्यांना कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. सुरक्षित तंत्रज्ञानावर खर्च करायची त्यांची तयारी नाही, मग अशा परिस्थितीत लोकांनीच सावध राहणे भाग आहे. पण त्याबाबतीतही ठणाणाच आहे. आपल्या देशात तंत्रज्ञानाबाबत अज्ञानी असलेला एक मोर्ठा वर्ग आहे. त्यांना वस्तू वापरायच्या प्राथमिक गोष्टी  माहित आहेत मात्र का, कशा , केव्हा, कुठे वापरायच्या आणि वापराचे तोटे याविषयीच्या ज्ञानाबाबत मात्र अनभिज्ञ आहे. हा वर्गही मोठा आहे.
      दुसरा वर्ग सगळे माहित असूनही जीव धोक्यात घालतो आहे. हा वर्ग पैशासाठी धावाधाव , राबराब राबतो, स्वत: च्या शरिराचे मातेरे करतो. आणि शेवटी मिळविलेला पैसा शरिराच्या दुरुस्तीसाठी औषध-पाण्यावर उधळत राहतो. लोकांनी आरोग्याबाबत जागृत असायलाच हवे. भ्रष्टाचाराचा सगळ्यांनाच उबग आला आहे. म्हणूनच  त्याविरुद्धच्या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळू शकतो. सरकारला त्यामुळेच  हलणे भाग पडले. म्हणजे सरकारसुद्धा हलविल्याशिवाय हलत नाही. त्यासाठी लोकांना  सारखे सारखे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल   की काय कोण जाणे ? पण स्वतः च्या आरोग्याबाबत कंटाळा करणार्‍यांना पुढे पुढे अशा आंदोलनाचाही कंटाळा येईल त्याचे काय?     

निर्णय योग्य

कुठल्याही गंभीर अपराधाचा सामना करीत असलेल्या व्यक्तीला निवडणुकीची उमेदवारी मिळणार नाही, अशी व्यवस्था करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला असून त्याचे स्वागतच करायला हवे. ही एक चांगली सुरुवात म्हणायला हवी. निवडणूक आयोगानुसार निवडणुकांच्या एकवर्षापूर्वीपर्यंत जर कुणी कुठल्या गंभीर अपराधाचा सामना करीत असेल तर त्या व्यक्तीला निवडणुकीचे तिकीट मिळणार नाही. यामध्ये बलात्कार, हत्या, लुटमार आणि अपहरण सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी आयोगानेच कुठल्याही व्यक्तीवर सहा महिन्यांपूर्वी प्राथमिकी दाखल झाल्यास किंवा त्याच्यावर न्यायालयात आरोप सिद्ध झाल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. नुकत्याच  पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात निवडणूक पद्धतींमध्ये सुधारणा करण्याबाबतचा निर्णय होण्याची आवश्यकता होती, मात्र ती झाली नाही.  निवडणूक आयोगात सुधार आणण्याचे  सर्वात महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत. सर्वच पक्षांमध्ये कुठलातरी आरोप असलेले लोक आहेत. न्यायालय ही एक स्वतंत्र संस्था आहे. ती सर्व बाजूंनी विचार करूनच कुठल्याही व्यक्तीवर आरोप ठेवते. त्यामुळे त्यांच्या कार्यावर विश्‍वास ठेवून अशा लोकांना निवडणूक प्रक्रियेच्या बाहेर ठेवण्यात येते. मात्र आरोप सिद्ध होण्यास विलंब होत असल्याने अडचणी येतात. त्यामुळे गंभीर गुन्ह्यात अडकेली व्यक्ती जनतेचा प्रतिनिधी होऊ नये, यासाठीचा हा निर्णय योग्य आहे, असे म्हणायला हवे.                                                                                   

मी लाच देणार नाही

भ्रष्टाचाराचा मुद्दा गेले वर्षभर अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे  सतत चर्चेत राहिला. भ्रष्टाचार निर्मूलन हा खरे म्हणजे राजकीयदृष्ट्या दुर्लक्षितच राहिला आहे, हे त्यासंबंधीच्या ४२ वर्षे प्रलंबित बिलावरून स्पष्ट होते. ते बिल २२ डिसेंबर २०११ रोजी लोकसभेत सादर झाले. त्यासाठी प्रखर अण्णा-आंदोलन झाले;  त्याला मोठ्या अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यामुळे नाईलाज म्हणून  सरकारने लोकपाल बिल आणले. या आंदोलनाचे पुढे काय व्हायचे ते होवो, पण आपण तरी या नव्या वर्षाच्यानिमित्ताने काही संकल्प करू या. कदाचित लोकपाल बिलाचा कायदा झाला तरी  भ्रष्टाचाराचे संपूर्ण उच्चाटन होईलच, असा कोणाचाही दावा नाही. भ्रष्टाचाराचा थेट संबंध नैतिक पतनाशी आणि विनाशकारी लोभाशी आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर मनोवृत्तीत बदल होत नाही, तोपर्यंत भ्रष्टाचाराची कीड समाजाची घडी विस्कटून टाकतच राहणार आहे. नववर्षाचा संकल्प यादृष्टीने स्वयंसुधारणेच्या वाटेवरचे एक पाऊल ठरू शकतो. मी लाच देणार नाही; किंबहुना लाच द्यावी लागेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, असा संकल्प सामूहिकरीत्या व्हायला हवा.  हा संकल्प नक्कीच सोपा नाही. चिरीमिरीशिवाय जिणे नाही, त्याच्याशिवाय जीवन नाही. आपण सवयीचे गुलाम झालो आहोत. पण तरीही संकल्प तडीस न्यायला काहीच हरकत नाही. कुठलीही गोष्ट झटक्यात होत नाही. त्याला यथावकाश लागतो. त्यामुळे  तुमच्या कामाला विलंब लागला तरी चालेल पण, हा संकल्प सोडू नका. परिस्थिती बदलयाचे आपल्याच हाती आहे. आंदोलन केले, पाठिंबा दिला, सरकारला शिव्या घातल्या म्हणजे भ्रष्टाचार संपत नाही. सुरुवात आपल्यापासून व्हायला हवी, नाही का?