Tuesday, February 7, 2012

आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच !

आधुनिक तंत्रज्ञानाच्याबाबतीत आपला भारत देश भलेही अग्रणी राष्ट्रांमध्ये सामिल झाला असला तरी जागतले सर्वाधिक कुपोषित बालके भारतात आहेत, हे वास्तव नाकारून चालत नाही. भुकेल्या, उघड्या- नागड्या व कंगाल अशा आफ्रिकेसारख्या देशांपेक्षाही आपल्या देशाची वाईट दशा आहे. याचा अर्थ आपल्या देशातल्या आर्थिक विकासाचा फायदा केवळ मूठभर लोकांनाच झाला आहे, असे स्पष्ट होते. याचा विचार होण्याची गरज आहे.
     अलिकडच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात मोबाईलधारकांची संख्या ८६.८७ कोटी इतकी झाली आहे. याबाबतीत चीन जगात अव्वल क्रमांकावर असून आपला देश दुसर्‍या क्रमांकावर आहे. अलिकडच्या आणखी एका आकडेवारीनुसार २०११ च्या अखेरपर्यंत देशातले १२.१ कोटी लोक आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी इंटरनेटचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सगळ्याचा विचार करता भारत आपल्या शेजारील चीन आणि अमेरिकेनंतर जगातल्या तिसर्‍या क्रमांकाचा नेटचा वापर करणारा देश ठरला आहे. देशाने खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतरच्या दशकानंतर म्हणजे २००१ मध्ये इथल्या नोंदणीकृत कार, जीप आणि टॅक्सी यांची एकूणसंख्या ७० लाख अठ्ठावन्न हजार होती, ती २००८ मध्ये वाढून १ कोटी ४२ लाख २२ हाजारावर पोहचली. या सात वर्षात एकूण सर्व प्रकारच्या नोंदणीकृत वाहनांची संख्यासुद्धा ५ कोटी ४९ लाख ९१ हजारावरून १० कोटी ६५ लाख ९१ हजारावर जाऊन पोहचली. ही आकडेवारी खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थन करणारी मंडळी ही अर्थव्यवस्था धनकुबेरांना पोसणारी असल्याचे म्हणणार्‍या व त्या विरोधात बोलणार्‍यांच्या तोंडावर फेकताना दिसतात. या व अशाच प्रकारच्या आकडेवारीच्या जोरावर ते उदारीकरण सामान्य जनतेच्या जीवनात क्रांतिकारी परिवर्तन आणणारे असल्याचे सांगायला अजिबात थकत नाहीत. परंतु, वैश्विक स्तरावर संपतीचे आकलन आणि अभ्यास करणारी 'वेल्थ एक्स'च्या ताज्या सर्व्हेक्षणाने भारतातले कटू वास्तव पून्हा एकदा त्यांच्या डोळ्यांसमोर आणून ठेवले आहे.
      या रिपोर्टनुसार सव्वा अब्ज लोकसंख्या असलेल्या देशात केवळ आठ हजार दोनशे लोकांची एकूण संपत्ती ९४५ अब्ज डॉलर आहे. जी इथल्या जीडीपी ( उत्पन्नाच्या) च्या तीन चतुर्थांशाइअतकी आहे. अर्थात या रिपोर्टमध्ये तर आश्चर्य व्यक्त करण्यासारखं नवं काहीच नाही. कारण हा मुद्दा नवा नाहीच. भूक, गरिबी आणि मानवी विकासाच्या आधारावर प्रसिद्ध होणार्‍या अनेक आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्मध्ये आर्थिक विकासाचा फायदा फक्त मूठभर लोकांनाच झाला असल्याचे स्पष्ट होते. भूक, गरिबी आणि मानवी विकासाचा निर्देशांक याबाबतीत भारत खालच्या क्रमांकावर आहे. जगात तिसरी आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या भारताला गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेल्या वैश्विक भूक सूचकांक २०११ मध्ये ८१ देशांच्या यादीत ६० व्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय खाद्यनीती शोध संस्थे (वॉशिंग्टन) ने ही यादी प्रसिद्ध करताना मुलांचे कुपोषण, बालमृत्यूचे प्रमाण आणि योग्य कॅलरीपासून वंचित लोकांच्या आधार आदी गोष्टींचा विचार घेण्यात आला आहे. या सूचीमध्ये भारताची अवस्था भुकेल्या, नागड्या-उघड्यांचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या आफ्रिकेच्या अनेक देशांपेक्षा वाईट दाखवण्यात आली आहे. या तथ्याला अधोरेखित करणारा आणखी एक रिपोर्ट संयुक्त राष्ट्र संघाने याच महिन्यात प्रसिद्ध केला आहे. मानव विकास सूचकांकाच्या १८७ देशाच्या यादीत भारत १३४ व्या स्थानावर आहे. हा सूचकांक एखाद्या देशाच्या लोकांच्या राहणीमान, शिक्षण आणि आरोग्यसंबंधांवरच्या गोष्टींवर अवलंबून असतो.
      अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या आंतरराष्ट्रीय रिपोर्टनुसार जगातील सर्वाधिक कुपोषित मुले भारतात आहेत, असे आढळून आले आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीही याचा स्वीकार करून ही बाब देशासाठी लाजिरवाणी असल्याचे म्हटले आहे. देशातले ४८ टक्के मुले कुपोषितग्रस्त आहेत आणि याबाबतीत भारत जगात १५८ व्या क्रमांकावर आहे. इथल्या बालमृत्यूचे प्रमाण प्रतिहजारी ५२ इतका आहे. आणि या दुर्दैवी गोष्टीत भारत जगात १२२ व्या स्थानावर आहे. या रिपोर्टमध्ये या सगळ्यांची कारणे नमूद करण्यात आली आहेत. आपल्या देशातले सरकार सार्वजनिक आरोग्य सुविधांवर एकूण उत्पन्नाच्या केवळ १.१ टक्का खर्च करत असते. सार्वजिक आरोग्यावर खर्च करणार्‍या देशांमध्ये भारत १६२ व्या क्रमांकावर आहे. आरोग्य सेवांवरील सरकारी खर्चाचा मुलांच्या कुपोषण आणि बालमृत्यू प्रमाणाशी थेट संबंध आहे.   पण या लाजिरवाण्या आकड्यांकडे साफ दुर्लक्ष करीत सरकार आणि योजना आयोग खेळण्यासारख्या सामान्य झालेल्या मोबाईल विक्रीच्या आकड्यांना 'प्लॅश' करून गरिबीचे आकडे कमी करण्याचा व गरिबीचे मोजमाप बदलून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या जबाबदारीतून पळ काढण्याचा हा निर्लज्जपणाचा कळस म्हणायला होय.
     संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारचे मंत्री देशाच्या दाहकतेची  सत्यता स्पष्ट करणार्‍या या आंतरराष्ट्रीय आकड्यांना फेटाळून लावण्याचे नेहमीचे काम करीत असले तरी आपल्या देशातल्याच काही सरकारी समित्यांची आकडेवारीसुद्धा या लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी आहेत्.सरकारने स्थापन केलेल्या अर्जूनसेन गुप्ता समितीने २००९ मध्ये जारी केलेल्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, उदारीकरणाच्या इतक्या वर्षांनीही देशातील जवळपास ७७ टक्के लोकसंख्या २० पेक्षा कमी रुपयांमध्ये आपली गुजराण करीत आहे. अशा प्रकारच्या रिपोर्टनंतरसुद्धा सरकार अर्थव्यवस्थेच्या विकास वेगाच्या आकड्यांच खेळ खेळताना दिसत आहे.
     आजारी कंपन्यांच्या उपचारासाठी  'बेल ऑट पॅकेज' चा प्रस्ताव न मागतासुद्धा तयार होत असेल तर मग आजारी गरिबांच्या उपचारासाठी का पॅकेज जाहीर होत नाहीत? अशावेळेला योजनाकारांना मल्टी नॅशनल औषधी कंपन्या , महागडी खासगी दवाखाने, मोठमोठ्या उपचार केंद्रांच्या धंद्यांची फिकीर वाटते? , का त्यांच्या वाट लागण्याने विकासाच्या आकड्यांचे गणित बिघडण्याची भीती सतावते? का सरकार लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचा प्रकार करत आहे, असा सवाल आहे.
     शेवटी भुकेल्या पोटाच्या आवाजात दम तो काय असणार आहे, म्हणा! पण तरीसुद्धा भुकेने व्याकुळ झालेले पोटसुद्धा मोठे विस्फोटक असते, याचे भान ठेवायला हवे. गतवर्षात ट्युनीशिया,लिबियासह अनेक देशातील सत्ता भुकेच्या विस्फोटातच होरपळून भस्मसात झाल्या, हे आपण पाहिले आहे. भारतात ज्या काही मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभारलेल्या गेल्या आहेत, त्या नाममात्र मजुरीवर राबलेल्या  लाखो गरिबांच्या कष्टावर थाटल्या गेल्या आहेत.  इंग्रज भारतातून साडे सहा दशकापूर्वीच आपला गाशा गुंडाळून गेले असले तरी इथे आता दुसर्‍या इंग्रजांचे राज्य स्थापित झाले आहे. गरीब्-श्रीमंत यांमधील दरी रुंदावत चालली आहे. विकास वरून खालीपर्यंत येताना कसा झिरपत झिरपत येत कसा भकास बनतो, हे आपण पाहतच आलो आहोत. हे असेच चालत राहिले तर  अशा कितीही पंचवार्षिक योजना आल्या तरी फरक तो कितीसा पडणार आहे? 

Monday, February 6, 2012

सप्रेम नमस्कार.

     आपले कौतुक भरल्या शब्दांचे पत्र मिळाले.  वाचकाचे 'दाद'  देणारे पत्र आल्यावर कुठे चार-दोन शब्द लिहिणार्‍याला माझ्यासारख्याला स्वर्ग दोन बोटेच उरला. खूप खूप आनंद झाला. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण लिहितो ते चांगलं की वाईट, योग्य की अयोग्य किंवा समाजाला लाभो अथवा न लाभो आणि  विचारातील प्रगल्भता की अप्रगल्भता याचा कुठलाही विचार न करता लिहित राहणे, या मताशी ठाम राहिल्याने सगळा लेखन प्रपंच घडून येत आहे. आपल्यासारख्यांचे कौतुकाच्या शब्दसुमनांच्या वर्षावाने आणखी हुरुप येतो. 'गड्या तुझ्या लिखाणात काही तरी दम आहे, लिहित राहा', असं माझं मन विश्वास देतं ... आणि लिहित राहतो.
     मी एक शिक्षक आहे. मी काही रिटायर्ड शिक्षक पाहिले आहेत. निवृत्तीनंतर गप्पांमध्ये दिवस घालवणारे, आणखी कशाकशात वेळ घालवणारे. वास्तविक हा प्राणी ज्ञानी समजला जातो. तो कधीही रिटायर्ड होऊ शकत नाही. त्याच्यात रोज काही ना काही नवं शिकण्याची , नवं दुसर्‍याला देण्याची ऊर्मी असते. मात्र अशा रिकामटेकड्या रिटायर्ड शिक्षकांकडे पाहिल्यावर आपलंही जीवन असंच जाणार का? या प्रश्नाने मला सतावले. मला असे दिवस घालवायचे नाहीत, असा मी चंग बांधला आणि आपल्याला जे थोडं फार जमतं त्यात आपला वेळ दवडावा, असे ठरवले. आणि लिखाणाचा प्रपंच हाती घेतला. निदान माझा रिटायर्ड काळ फुकाचा जाणार नाही. अर्थात माझ्या निवृत्तीला अजून वीस-पंचवीस वर्षे बाकी आहेत. पण त्यावेळच्यासाठीचा हा सराव म्हणायला हरकत नाही.
     माझ्या लिखाणाला कुठलाच विषय वर्ज्य ठेवला नाही. राजकीय, सामाजिक, चित्रपट, आर्थिक, आरोग्य, साहित्य अशा सगळ्या विषयात माझ्या मतीप्रमाणे विहार करतो. इतरांच्या चांगल्या, भावलेल्या लेखांचा संग्रह करतो. वाचतो. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व वृत्तपत्रे ( इंटरनेट आवृत्ती) पाहतो. चांगल्या विषयांचा, स्फूट लेखनाचा शोध घेतो.टिपणं काढतो. त्याचा उपयोग मला माझ्या लिखाणात होतो . केवळ वृत्तपत्रातच लिहायचं असं बंधन नाही ठेवलं. आधुनिकतेचा स्वीकार करत जे लिहितो, ते माझ्या ब्लॉगवर  http://www.machindra-ainapure.blogspot.com/   टाकतो. ब्लॉगमित्रांशीही चर्चा करतो. आणि जमलंच तर मधून मधून 'बातमीदार' ( पुण्यनगरी) म्हणूनही पाट्या टाकण्याचे काम करतो. असा हा माझा लेखन प्रपंच. पण यातून मजा घेतो.
     पत्र बोअरिंग वाटलं ना? पण  ... असो.  प्रत्यक्षात मात्र मी अबोल आहे.
     कोकणचं विशेषतः हिरवाईचं खूप आकर्षण राहिलं आहे. दुष्काळातल्या माणसांना कोकण म्हणजे धरतीचा स्वर्गच!  तो थोडा फार पाहायला मिळालाय. अजून खूप पाहायचाय. तृप्त व्हायचं आहे. पण नोकरी, प्रपंच सांभाळत ... सांभाळत....
    पुनश्चः एकदा आपले मनपूर्वक आभार!
                                                                                                                                                                 ..                                                                                                                        आपला,           ..             .                                                                                                                      मच्छिंद्र ऐनापुरे

Saturday, February 4, 2012

नेता-तंत्र

म्हणायलाच आहे गणतंत्र
पण इथे दिसतो केवळ नेतातंत्र
देशभक्त, हुताम्यांचे
खोटे झाले मंत्र
फासावर जाऊन त्यांनी
देश केला स्वतंत्र
पण, खुर्चीत बसून यांनी आज
विकायला काढला देशाचा चंद्र

Thursday, February 2, 2012

जोक सांगु परि

रविवार , १८  जुलै २०१०
खुळा- डॉक्टर, मी स्वत:ला देव समजू लागलोय.डॉक्टर- केव्हापासून आजार आहे हा?खुळा- हे जग बनवलं तेव्हापासून.- मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली.
बबन्या- आई म्हणते की, म्हशीचं दूध पिलं की डोकं जोरात चालतं.गुलब्या- तुझी आई तुला खुळ्यात काढतीय. जर असं असतं तर तिला होणारं रेडकू सायंटिस्ट झालं नसतं का?- मच्छिंद्र ऐनापुरे, जत.
मुन्नाभाई- अरे सर्किट, आज तर जान्हवी समोर अपुन की वाट लग गई.सर्किट- क्या हुआ मुन्नाभाई?मुन्नाभाई- ती म्हणाली, की अपुन के एंगेजमेण्ट पर तू मला रिंग देणार ना, तर मी म्हणालो, आयला शपथ रिंग देणार; पण तू बोल रिंग लॅण्डलाइनवर देऊ का मोबाईलवर!मच्छिंद्र ऐनापुरे, जत.
रविवार,  नोव्हेंबर २००९
मुन्नाभाई- अरे सर्किट, आज तर जान्हवी समोर अपुन की वाट लग गई.सर्किट- क्या हुआ मुन्नाभाई?मुन्नाभाई- ती म्हणाली, की अपुन के एंगेजमेण्ट पर तू मला रिंग देणार ना, तर मी म्हणालो, आई शपथ रिंग देणार; पण तू बोल रिंग लॅण्डलाइनवर देऊ का मोबाईलवर!मच्छिंद्र ऐनापुरे, जत.
रविवार, १३ जून २०१०
बबन्या जिलेबीवाल्याला- ‘तू ही जिलेबी किती वर्षांपासून बनवतो आहेस?’जिलेबीवाला- २० वर्षांपासून.बबन्या- तुला लाज वाटत नाही. इतकी वर्षे जिलेबी बनवतोस पण तुला अजूनही ती सरळ बनवता येत नाही.मच्छिंद्र ऐनापुरे, जत.


जलसाक्षरता

      भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी देशाचे वर्णन 'तळ्यांचा देश' असा केला आहे. यावरून आपल्या पूर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्यावेळी जाणले होते, याचा प्रत्यय येतो. त्यांच्या जागरूकतेमुळे ! एके काळी सुजलाम आणि सुफलाम असणार्‍या या देशाला ग्रहण लागले असून आता  दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहेत. दुष्काळाच्या गर्तेत सापडलेल्या देशाला वचविण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशात अलिकडच्या काळात विचित्र अशी परिस्थिती निर्माण होत आहे. कुठे महापुराचा झटका तर कुठे अवर्षणाचा फटका बसत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे पाण्याविष्यी सखोल अभ्यासाची गरज असून मुबलक पाण्यासाठी चर्चा व त्यावर तोडगा अपेक्षित आहे. युनेस्कोने पाणी विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन यावर अभ्यासक्रम तयार केला आहे. अशाप्रकारचा अभ्यासक्रम आपल्याकडेही राबविणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना पाणी मोजण्याचे तंत्र शिकवले पाहिजे. जगातील जलसंपत्तीचा आढवा घेतल्यास असे आढळून येईल की, एकूण उपलब्ध जलसंपतीपैकी ९७ टक्के पाणी समुद्रात तर २ टक्के पाणी हिमस्वरुपात असून केवळ एक टक्का पाणी मानवाच्या विविध गरजांसाठी उपलब्ध आहे. या एक टक्क्यापैकी ८०  टक्के पाणी शेतीसाठी वापरले जाते.
      पाण्याचा विषय केवळ शासनाचा विषय आहे अथवा शुद्ध पाणी देणे ही जबाबदारी निव्वळ शासनाची आहे, असे समजण्याचे कारण नाही. पाणी या अतिमहत्त्वाच्या विषयावर समाजजागृती आवश्यक आहे. आणि समाजाची संघटित रचनाच या उद्भणार्‍या प्रश्नांची सोडवणूक करू शकते. संघटित शक्तीच तंत्रविज्ञान कसं वापरायचे हे जाणून घेऊ शकते. पाण्याचे महत्त्व ज्या देशांना कळले, त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे म्हणायला हरकत नाही. अन्य देशांच्या तुलनेत भारतीय याबाबतीत मागे असल्याने संधी न दवडता आतापासूनच योग्य नियोजन करण्याची गरज आहे. उपलब्ध पाण्यावरच आपल्याला गुजणार करावी लागणार असून पृथ्वीच्या पोटात आता पाणी नाही, हे सांगण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही.
      आपला देश पाच लाख खेड्यांनी वसलेला आहे. यातल्या किमान दोन लाख खेड्यांना उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत संपल्याने भयंकर अशा टंचाईला सामोरे जावे लागते. शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची बातच सोडा ,पण  केवळ पाणी मिळवण्यासाठी लोकांना आठ-दहा किलोमीटरची पायपीट रोज करावी लागते. हा सर्वाधिक त्रास  या ग्रामीण महिलांनाच सहन करावा लागतो. पाण्याची गरज ही केवळ पिण्यासाठी आणि शेतीसाठी नसून एकूणच जेवन समृद्ध करण्यासाठी आहे, ही बाब लक्षात घ्यायला हवी. उद्योगीकरण, वीजनिर्मिती आणि पर्यावरण संरक्षण यासाठी जलजागृतीबरोबर आता जलसाक्षरतेची गरज निर्माण झाली आहे. एकमेकांचे सहकार्य आणि सहविचार यासाठी अपेक्षित आहे.
     निसर्गाने दिलेल्या पाण्याचे आकडेवारीत नियोजन करण्याची शिकवण म्हणजे जलसाक्षरता म्हणायला हरकत नाही. २०५० सालात भारतात पाण्याची काय परिस्थिती असेल याचे आजच नियोजन झाले पाहिजे. पाण्याचा प्रश्न आता धसास लावला नाही तर मोठ्या पश्चातापाशिवाय आपल्या हातात काही राहणार नाही. त्यावेळी 'तहान लागल्यावर विहीर काढण्या'साठीसुद्धा संधी मिळणार नाही. 'माती आणि पाणी' न जपणारा देश भविष्यात पृथ्वीच्या पटलावर अस्तित्वात राहणार नाही. जलसंधारणाद्वारे पाणी साठवून ठेवता येते. त्यामुळे पावसाळ्यात पडणार्‍या प्रत्येक थेंबाला अडवून त्याची साठवणूक केली पाहिजे.तसे केले तरच आपल्याला दुष्काळाशी सामना करावा लागणार नाही. जलजागृतीचे काम राष्ट्रसंघाने हाती घेतले आहेच.सद्याचे दशक जलकृती कार्यक्रमाचे ठरविण्यात आले आहे.  त्याला निदान स्वतः च्या स्वार्थासाठी तरी साथ द्यायला हवी.  

बालकथा पश्चाताप

   
एक व्यापारी होता. त्याने आपल्या कामासाठी एक घोडा आणि एक गाढव पाळले होते. तो घोड्याचा उपयोग स्वतः च्या सवारीसाठी तर गाढवाचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करायचा.  गाढवाच्या   पाठीवर माल लादून गावोगावी जायाचा आणि  माल विकायचा. व्यापार्‍याने घोड्याला जादा पैसे देऊन विकत घेतले असल्यामुळे तो त्याची अधिक खातिरदारी करायचा.  काळजी घ्यायचा.  घोड्याच्या  पाठीवर ओझेसुद्धा लादायचा नाही.
     एक दिवस व्यापारी घोड्यावर बसून आणि गाढवावर ओझे लादून कोठे तरी निघाला होता. गाढवावर क्षमतेपेक्षा अधिकच ओझे लादले गेले होते.  त्यात गाढव खूपच  कृश होते.  रस्ताही  खाच-खळग्यांचा होता.  त्यामुळे त्याला चालताना भलताच त्रास होत होता. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत होता.  त्याला त्याचे स्वतः चे मन एवढे मोठे ओझे वाहून नेण्याविषयी हमी  देत नव्हते. त्याचा आत्मविश्वास आणि पाय गाळटले होते. तो घोड्याला म्हणाला," घोडे दादा, माझ्याच्याने चालवत नाही रे! आता मी इथेच दम तोडतोय की काय असं वाटायला लागलं आहे,  माझा थोडा भार हलका करशील का? तुझे फार उपकार होती."
     परंतु, मालकाच्या लाडा-प्रेमाने लाडावलेला,  वाढलेला घोडा मात्र मोठा गर्विष्ठ बनला होता. तो अहंकार भरल्या स्वरात म्हणाला," हे काय बरळतोयस तू? माझी पाठ  ओझे वाहून नेण्यासाठी वाटली की काय तुला?   मी का तुझे ओझे वागवू? खबरदार, पून्हा असा म्हणालास तर...?" बिचारे गाढव काहीच बोलले नाही. ते रडत-खड्त आपले पाय ओढत राहिले आणि शेवटी धापकन पडले. त्याचा एक पाय मोडला. ते पाहून व्यापार्‍याला मोठे वाईट वाटले. त्याची दया आली. लागलीच  त्याने  गाढवावरचे सगळे ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. आणि  गाढवालासुद्धा वर चढवले. आता घोड्याचा सारा अहंकार गळून पडला. आता त्याला पश्चाताप वाटू लागला. मघाशी गाढवाची गोष्ट ऐकली असती आणि   त्याचा  भार थोडा हलका केला असता तर  आता ही कंबरडे मोडणारी आपत्ती ओढवली नसती.  त्याला मदत केली असती तर माझेही भले झाले असते आणि त्याचेही! पण आता नाईलाज होता.  .... घोडा मान खाली घालून निमूटपणे चालू लागला. 

हेडफोनच्या अतिवापराचे धोके लक्षात घ्यायला हवेत

     
     हेडफोनचा आणखी एक बळी मुंबईत गेला. हेडफोन लावून रूळ ओलांडणार्‍या सौरभ ओमप्रकाश पेंडकर (२0, रा. चेंबूर) या महाविद्यालयीन तरुणाला पुष्पक एक्स्प्रेसने कुर्ला स्थानकात उडविले. एक्स्प्रेस येत आहे बाजूला हो, हा प्रवाशांचा आवाज हेडफोनमुळे त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. काही दिवसांपूर्वी  गाझियाबादमध्येही अशीच घटना घडली. एका तरुणाला  रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे रेल्वे येत असल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे त्या दुर्दैवी अपघातात तो मरण पावला.
     कानाला हेडफोन लावून गाणे ऐकणारे तरुण हे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये, वाहनांमध्ये  हमखास दिसतात. आजकाल मोबाइलप्रमाणेच सध्या हेडफोनही तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाहनांमधून प्रवास करताना, गाडी चालवताना, जेवताना इतकेच काय तर अगदी अभ्यास करतानासुद्धा हेडफोनवर गाणी ऐकण्याचा मोह तरुणांना आवरत नाही. पण या सवयीमुळे अनेक शारीरिक, मानसिक आजार तर जडतातच, पण त्याचबरोबर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचेही समोर आले आहे. याचा परिणाम  अनेकदा हा छंदच जीवघेणा ठरत आहे. वरील दुर्दैवी घटना याची साक्ष आहे.  
     शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयातील तरुणांपर्यंत सर्वांना अशाप्रकारची सवय लागली आहे. कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद आणि त्यामुळे मुलांमध्ये वाढलेला एकाकीपणा या सतत कानाला हेडफोन लावण्याच्या सवयीला कारणीभूत गोष्टी आहेत, असे म्हणायला हवे.  भावनांना वाट करून देण्यासाठीचे माध्यम म्हणून मुले याकडे सहज वळतात, असे काही मानसोपचार तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा मोबाइलवर बोलणे सुरू झाल्याने अनेकदा मोबाइलवर तासभरही संवाद चालतो. त्यात एकावेळी अनेक कामे करण्याच्या सोयीमुळे हे हेडफोन गरजेचे बनले आहेत.      दररोज दोन दोन तासाहून अधिक हेडफोनचा वापर करणे शारीरिक आणि मानसिक आजाराला निमंत्रण असल्याचेही  मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कमी ऐकू येणे, दुसर्‍याने उच्चारलेला शब्द व्यवस्थित ऐकू न येणे, अशा तक्रारी असणार्‍या रुण्गांची संख्या वाढत आहे. तासंतास फोनवर बोलल्यामुळे किंवा जास्त काळ डीजेच्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे कानांच्या पेशींची कार्यक्षमता कमी झाल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो,असे डॉक्टर मंडळी सांगताना दिसतात. याचा मानसिक इफेक्टही मोठा धोकादायक आहे. 
     हेडफोनचा वापर हा आता सवयीचा भाग बनल्याचे तरुण सांगत असले तरी पण हेडफोनवर गाणे ऐकताना जीवनातील परिस्थितीशी समान असे गाणे ऐकून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. पण या स्वप्नाच्या विश्वातून बाहेर येऊन वास्तविकतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना मोबाइल आणि हेडफोनद्वारे गाणे ऐकत असल्याने सभोवतालच्या जगाचा विसर पडतो. त्यामुळे ही सवय अपघातास कारणीभूत ठरते. म्हणून किमान गाडी चालवताना किंवा रस्त्यावर चालताना तरी याचा वापर टाळणे आवश्यक आहे. हेडफोन हे अपघातांबरोबरच पिढीला भावनिक शून्यतेकडे नेण्याचे काम करतात. त्यामुळे हेडफोनचा वापर कमी प्रमाणात केला गेला पाहिजे.