Thursday, February 2, 2012

बालकथा पश्चाताप

   
एक व्यापारी होता. त्याने आपल्या कामासाठी एक घोडा आणि एक गाढव पाळले होते. तो घोड्याचा उपयोग स्वतः च्या सवारीसाठी तर गाढवाचा वापर माल वाहतूक करण्यासाठी करायचा.  गाढवाच्या   पाठीवर माल लादून गावोगावी जायाचा आणि  माल विकायचा. व्यापार्‍याने घोड्याला जादा पैसे देऊन विकत घेतले असल्यामुळे तो त्याची अधिक खातिरदारी करायचा.  काळजी घ्यायचा.  घोड्याच्या  पाठीवर ओझेसुद्धा लादायचा नाही.
     एक दिवस व्यापारी घोड्यावर बसून आणि गाढवावर ओझे लादून कोठे तरी निघाला होता. गाढवावर क्षमतेपेक्षा अधिकच ओझे लादले गेले होते.  त्यात गाढव खूपच  कृश होते.  रस्ताही  खाच-खळग्यांचा होता.  त्यामुळे त्याला चालताना भलताच त्रास होत होता. तो एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकत होता.  त्याला त्याचे स्वतः चे मन एवढे मोठे ओझे वाहून नेण्याविषयी हमी  देत नव्हते. त्याचा आत्मविश्वास आणि पाय गाळटले होते. तो घोड्याला म्हणाला," घोडे दादा, माझ्याच्याने चालवत नाही रे! आता मी इथेच दम तोडतोय की काय असं वाटायला लागलं आहे,  माझा थोडा भार हलका करशील का? तुझे फार उपकार होती."
     परंतु, मालकाच्या लाडा-प्रेमाने लाडावलेला,  वाढलेला घोडा मात्र मोठा गर्विष्ठ बनला होता. तो अहंकार भरल्या स्वरात म्हणाला," हे काय बरळतोयस तू? माझी पाठ  ओझे वाहून नेण्यासाठी वाटली की काय तुला?   मी का तुझे ओझे वागवू? खबरदार, पून्हा असा म्हणालास तर...?" बिचारे गाढव काहीच बोलले नाही. ते रडत-खड्त आपले पाय ओढत राहिले आणि शेवटी धापकन पडले. त्याचा एक पाय मोडला. ते पाहून व्यापार्‍याला मोठे वाईट वाटले. त्याची दया आली. लागलीच  त्याने  गाढवावरचे सगळे ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. आणि  गाढवालासुद्धा वर चढवले. आता घोड्याचा सारा अहंकार गळून पडला. आता त्याला पश्चाताप वाटू लागला. मघाशी गाढवाची गोष्ट ऐकली असती आणि   त्याचा  भार थोडा हलका केला असता तर  आता ही कंबरडे मोडणारी आपत्ती ओढवली नसती.  त्याला मदत केली असती तर माझेही भले झाले असते आणि त्याचेही! पण आता नाईलाज होता.  .... घोडा मान खाली घालून निमूटपणे चालू लागला. 

No comments:

Post a Comment