फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कुमार नावाचा एक तरुण होता. त्याला बारीक्-सारीक गोष्टींचा मोठा राग यायचा. संतापाच्या भरात तो वाट्टेल तसे बोलायचा, वागायचा. त्याच्या या सवयीची मोठी चिंता त्याच्या वडिलांना लागून राहिली होती. एकदा एका भल्या माणसाचे ऐकून त्यांनी खुपसे खिळे आणले आणि कुमारला दिले. म्हणाले," तुला राग आला की आपल्या घरासमोरच्या झाडावर जाऊन ठोकायचे."
कुमार सांगितल्याप्रमाणे वागू लागला. पहिल्यादिवशी त्याने जवळ जवळ तीस खिळे ठोकले. असे बरेच दिवस चालू राहिले. पण खिळ्यांची संख्या काही कमी होईना. वडिलांना चिंता सतावू लागली. पण पुढच्या काही आठवड्यात मात्र थोडा फरक पडला. कुमार रागावर नियंत्रण आणण्यात यशस्वी हो ऊ लागला. आता झाडावरील रोजच्या खिळ्यांची संख्या कमी हो ऊ लागली.
अलिकडे तो केवळ एक-दोन खिळेच ठोकू लागला. कुमारला आता समजून चुकलं होतं की झाडावर खिळे ठोकण्यापेक्षा रागावर नियंत्रण आणणं अधिक सोपं आहे. त्याचे वडिलसुद्धा त्याच्यात झालेल्या या बदलामुळे खूश होते. पण कुमार संपूर्णपणे रागावर नियंत्रण आणू शकेल, याबाबत ते अद्याप आशावादी होते.
शेवटी एक दिवस असा आला की, कुमारने त्यादिवशी एकही खिळा ठोकला नाही. कुमारने ही गोष्ट आपल्या वडिलांना जाऊन सांगितली. वडिलांनी त्याला आणखी एक काम करण्यास सांगितले. त्याने झाडावर जितके खिळे ठोकले होते, ते सर्व काढायला सांगितले. झाडावरचे सर्व खिळे काढायला कुमारला मोठा त्रास झाला. वेळही वाया गेला. पण शेवटी कसे तरी त्याने सर्व खिळे उपटून काढले.
कुमार सर्व खिळे काढल्याचे आपल्या वडिलांना सांगायला गेला.वडील त्याला घेऊन झाडाजवळ आले. ते म्हणाले," तू फार मोठं चांगलं काम केलं आहेस. पण या झाडाच्या अंगावरच्या खिळ्याच्या खुणा बघ. या खुणांमुळे झाड किती विद्रूप झालं आहे बघ. अगोदर किती सुंदर दिसत होतं. तूसुद्धा राग- क्रोध करायचास, त्यामुळे अशाप्रकारच्या खुणा दुसर्याच्या मनावर ओरखडल्या जायच्या. मने घायाळ व्हायची. तू कितीही क्षमा मागितलीस तरी हे ओरखडे मिटत नाहीत. माणसाने दुसर्याचे मन दुखावेल, अशाप्रकारे वागू नये, हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होतो.
कुमारला आपल्या संतापाचा होणारा परिणाम समजला होता. यापुढे कधीही राग- क्रोध करणार नाही, असे त्याने वडिलांना वचन दिले.( लोककथा)
No comments:
Post a Comment