Friday, February 10, 2012

मुलांना समजून घ्या

    शाळेतील वर्ग- शिक्षिकेच्या कडक स्वभावाचा राग आल्याने    एका विद्यार्थ्याने वर्गातच चाकूने भोसकून त्यांचा खून करण्याची दुर्दैवी, गंभीर आणि शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी  घटना चैन्नईतल्या एका खासगी शाळेत गुरुवारी घडली. शिक्षक आणि पालकांची झोप उडवणार्‍या या घटनेमुळे  अनेक प्रश्न उपस्थित झाले असून घडलेल्या घटनेला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे. अलिकडे मुले अशी का वागत आहेत? या प्रश्नाने पून्हा एकदा समाजाला घेरले आहे. 
     उमा महेश्वरी  असे या दुर्दैवी शिक्षिकेचे नाव आहे. महेश्वरी या गुरुवारी सकाळच्या सुमारास पहिल्या माळ्यावरील वर्गामध्ये शिकवत होत्या. त्यावेळी त्याच शाळेत नववीच्या  इयत्तेत शिकणारा मोहम्मद इरफान नावाच्या मुलाने उमा महेश्वरी (४२) या आपल्याच वर्गशिक्षिकेचा चाकूने वार करून खून केला. त्यात त्या  जागीच गतप्राण झाल्या.  शिक्षिकेने ओरडल्याचा राग धरून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शिक्षिका शांत स्वभावाच्या आणि शिस्तीप्रिय शिक्षिका होत्या तर मुलगा तो एकलकोंडा वृत्तीचा होता, त्याची कोणाशीही मैत्री नव्हती, असे त्याच्या वर्गमित्रांनी सांगितले आहे. पण या दुर्दैवी घटनेमुळे शिक्षणक्षेत्र हदरून गेले आहे. मुलांसमोर शिक्षकांनी कसे पेश व्हायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांना समजून घेऊन वागणं महत्त्वाचं आहे, अन्यथा अशा घटना घडत राहणार आहेत.
     काही शिक्षक मुलांना  अत्यंत कठोर शिक्षा करतात किंवा   मुलाला मानसिक त्रास होईल अशी अपमानमानास्पद  वागणूक देत असतात. अर्थात  विद्यार्थ्याला चुकीचे गांभीर्य समजावे आणि  पुन्हा भविष्यात तशी चूक करू नये, या आपलेसेपणाने ही पावले उचलली जात असतात. पण जरा जाणिवपूर्वक पाहिल्यास असे लक्षात येईल की  अशा प्रकारच्या शिक्षेने अथवा  अपमानजनक वागणूकीमुळे मुलांचे वर्तन सुधारण्याला फारशी मदत होत नाही.  कारण या शिक्षा मुलांच्या मनावर एवढा गंभीर परिणाम करतात की, ते त्याच्याव्यतिरिक्त इतर कशाचा विचारही करू शकत नाहीत. मुलांची मानसिकता आता बदलत चालली आहे. सुखाधीन वातावरणामुळे अशा कठोर शिक्षेची, बोलण्याची त्यांना सवय नसते. वारंवारच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे त्यांच्यात एकप्रकारची असुरक्षित भावना निर्माण होत जाते.
      शिवाय शिक्षेमुळे मुलांमध्ये राग, चिडचिडेपणा, दु:ख, भीती आणि न्यूनगंडाची भावना निर्माण होतात. अशा परिस्थितीत तो आपल्या झालेल्या चुकीबद्दल विचार करू शकत नाही. त्याचं मन अनेक भावनांनी भरून गेलेलं असतं. इतरांसमक्ष झालेली मारहाण किंवा अपमानास्पद वागणूक त्याला सहन होत नाही. जेव्हा पालक किंवा शिक्षक  इतरांसमोर मुलाला मारतात अथवा काही वाईट्-साईट बोल  बोलतात तेव्हा त्या मुलाची अवस्था मोठी विचित्र होते. त्याच्या मनाला मोठ्या वेदना होत असतात.  त्यानंतरही  तो नेहमी त्या अपमानाबद्दलच विचार करत असतो. काही वात्रट मुले त्याची खोड काढतात. शिक्षेचा व वागणुकीचा विषय काढून त्याची छेड काढतात. त्यामुळे त्याला आणखीनच शरमिंदा झाल्यासारखे होते. किंवा सहकार्‍यांच्या अशा वागण्यांने 'आगीत तेल ओतण्याचा' प्रकार घडतो. आणि शिक्षकांविरोधात पेटून उठतो. त्यांच्याविषयी कमालीची चीड निर्माण होते. मुले चिडवायला 'बरा बकरा ' मिळाला म्हणून त्याच्या पाठी हात धुवून लागतात. मात्र त्याच्या मनात रागाचा भडका उडत असतो.
      आपल्या आईवडिलांनी इतरांसमोर अशी वागणूक का दिली, असा त्याच्यापुढे प्रश्न पडतो.  अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे मग त्यास मोठ्याने दिलेल्या शिक्षेबद्दलही फारसे काही वाटत नाही. पुढे तर  त्यांच्यातील संवादही कमी होतात. त्यामुळे दोन गोष्टी होण्याची शक्यता असते. पहिली म्हणजे तो मुलगा तुमचा बदला घेण्याचा विचार करतो, तर दुसरा पर्याय म्हणे त्याचा मोठ्यांवर असणारा विश्वास पूर्णपणे नाहीसा होतो. मात्र आई- वडील , शिक्षक त्याच्या या परिस्थितीला तो स्वतः   जबाबदार असल्याचे मानतात.  मुलांना अशा प्रकारची शिक्षा करण्यामागे शिक्षक, त्यांचे वर्तन सुधारण्याचा हा एकमेव मार्ग असल्याचे कारण देतात. पण ते हे विसरतात की, या सर्वांमध्ये मुलांना ज्ञानार्जन करण्याचा त्यांचा मुख्य हेतूच मागे राहतो. मुलाच्या चुका अथवा खोडकरपणच्या उत्पत्तीमागील कारणे शोधण्याची गरज असते. त्याचा शोध घेऊन त्याच्याशी समुपदेशक या नात्याने वागल्यास त्याच्या वागणुकीत बदल करण्यास मदत होते. अन्यथा मुले शिक्षक- पालकांपासून लांब लांब जात राहतात.  तसेच विद्यार्थी नंतर त्या शिक्षकाच्या विषयाचाही तिटकारा करू लागतात. अनेकदा पालक तक्रार करतात की, त्यांची मुले ठरावीक विषयाचे शिक्षक कडक असल्यामुळे त्यांच्या विषयाचे तास बुडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्या विषयात इंटरेस्ट दाखवत नाहीत. शिक्षकांनी आपल्या कडक शिस्तीच्या पडद्याआड कनवाळू पालकाची भूमिकाही ठेवायला हवी.
       शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांना शिस्त लागावी म्हणून प्रयत्न करण्यात चुकीचे काहीच नाही. मुलांना शिक्षा जरूर करावी  मात्र, त्यासाठी मुलांना अपमानास्पद वाटेल अशी नसावी. शिक्षा करताना त्याच्या अभ्यास, कृतीकार्य, शारीरिक - मानसिक पातळीचा विचार केला जावा.  चूकीबद्दल मुलांना अपमानास्पद वाटणारी शिक्षा करणे चुकीचेच आहे. त्यामुळे ते   आणखी बंडखोर होण्याची  शक्यता अधिक असते. त्यामुळे परिस्थिती बदलण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करून उपाय शोधावा.  आता मारण्याची शिक्षा करण्याचा किंवा अपमानास्पद वागणूक देण्याचा काळ राहिलेला नाही. सध्याची सामाजिक, आर्थिक स्थिती बदलली आहे, तशी मुलांची मानसिकताही बदलली आहे. मुले जशी शारीरिक कमकुवत बनत चालली आहेत, तशी त्यांची मानसिक कमकुवताही वाढत चालली आहे. मुलांची सहनशीलता कमी होत चालली आहे. अपमान सहन न झाल्यास मुले आत्महत्येला कवटाळतात.  ती वाढवण्याच्यादृष्टीकोनातून पालकांनी प्रयत्न करायला हवे. मुले मनाने खंबीर बनविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शिक्षक- पालकांनी मुलांना  सुधारण्याचा  50 वर्षापूर्वीच्या जुन्या पद्धतीचा अवलंब आता टाळायला हवा. त्यासाठी नव्या पर्यायाचा शोध आणि अवलंब आवश्यक बनला आहे. शेवटी शिक्षक- पालकांनाच या गोष्टी कराव्या लागणार आहेत.       

No comments:

Post a Comment