फार वर्षांपूर्वी जपानमधील एका गावात एक वृद्ध जोडपं राहात होतं. दोघेही जवळच्या जंगलात काम करायचे. त्यातून येणार्या मोबदल्यात कसेबसे आपले पोट भरायचे. ते राहत असलेल्या भागात सतत बर्फ पडायचा. नवीन वर्ष यायला काही दिवसच बाकी होते. त्यांच्याजवळ नवीन वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करावे, असे सामानसुमान वगैरे अजिबात नव्हते.पैसाआडकाही नव्हता.
म्हातारी भाताच्या वाळलेल्या लांब पिंजरपासून डोक्याची सुंदर हॅट बनवत होती. तिने आतापर्यंत चार सुंदर हॅट बनविल्या होत्या. ती आपल्या नवर्याला म्हणाली," शहरात जाऊन हॅट् विकून या. जे पैसे येतील , त्यातून खाय-प्यायच्या जिनसा आणा. नव्या वर्षात आपल्याकडे काही तरी खायच्या चिजा हव्यात... ."
वृद्ध आपल्या बायकोकडे कौतुकाने पाहून हसला आणि म्हणाला, " जातो, उद्या सकाळीच जातो. आता तूही झोप. रात्र फार झाली आहे. .. आणि बर्फ पडायलासुद्धा पडतो आहे." दोघेही झोपी गेले.
पहाटे लवकरच वृद्ध शहरात जायची तयारी करू लागला. त्याच्याजवळ एकच कोट होता. तोही जागोजागी फाटला होता. त्याने चारही हॅट एका दोरीत गुंतवून आपल्या पाठीवर टाकले. आपली काठी घेऊन बाहेर पडण्यासाठी दरवाज्यात आला. बर्फ पडायचा तर कधीच थांबला होता. पण रस्ते सगळे बर्फाने झाकून गेले होते. आणि शिवाय थंडगार वारासुद्धा सुटली होता.
त्याने दरवाजा उघडला, तसा थंडगार वारा अंगाला झोंबला. अंगावर शहारे आले. त्याची बायको जवळ आली. आपल्या डोक्याचा स्कार्फ खोलला नी त्याच्या डोक्याला व कानाला व्यवस्थित गुंडाळून दिला. म्हातार्याला आपल्या बायकोची काळजी वाटू लागली. तो म्हणाला," अगं, हे काय करतेस? तुला थंडी बाधली तर माझ्याकडे इलाज करायला पैसे नाहीत."
ती हसत म्हणाली," नाही हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तर घरातच थांबणार. थोडीच बाहेर जाणार आहे? आणि शिवाय चुलीसमोरच तर बसून राहणार आहे. पण तुम्ही बर्फात जाता आहात.. चला, आता निघा लवकर. संध्याकाळी माघारी यायला उशीर होईल."
वृद्ध आपली काठी टेकवत बर्फाळ वाटेवरून वाट काढत शहराच्या दिशेने निघाला. म्हातार्याच्या मनात विचार सुरू झाले... 'चारही हॅट विकले गेले तर आपल्याला नव्या वर्षात काहीच खायला-प्यायला कमी पडणार नाही. नव्या वर्षाची सुरुवात तर चांगली होईल.' या विचाराने त्याच्या पायात थोडे त्राण आले. आता त्याचे पाय भरभर चालू लागले.
त्याला चालायला लागून आता बराच उशीर झाला होता. इतक्यात त्याला समोर नेहमीच वाटेला लागणारे मंदिर दिसले. तो तिथे पोहचल्यावर थोडावेळ थांबला. जरा आराम करावे, असे त्याला वाटले. इतक्यात त्याची दृष्टी मंदिराच्या कोपर्यात असलेल्या दगडी बुद्ध मूर्तींवर गेली. तिथे पाच दगडी पाच मूर्ती होत्या. त्यांच्या डोक्यावर बर्फाचा थर साचला होता. या थंडगार बर्फामुळे परमेश्वराला किती यातना होत असतील. असा विचार मनात येताच तो उठला. त्या मूर्तींच्या डोक्यावरचा सगळा बर्फ त्याने बाजूला केला. आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला. असे केल्याने त्याच्या मनाला खूप समाधान वाटले. मग तो पून्हा आपल्या प्रवासाला निघाला.
थोड्या वेळाने तो शहरातल्या बाजारात पोहोचला. तिथे खूप गर्दी आणि वर्दळ होती. बाजार माणसांनी भरला होता तर विविध वस्तूंनी सजला होता. तर्हेतर्हेची मिठाई आणि वस्तू विकली जात होती. खरेदी केली जात होती. तो म्हातारासुद्धा एका बाजूला उभा राहून ओरडू लागला," हॅट घ्या हॅट, हॅट घ्या..."
बराच वेळ झाला तरी त्याची एकही हॅट विकली गेली नाही. ओरडून ओरडून त्याचा घसा कोरडा पडला होता. त्याला थकवाही जाणवू लागला होता. संध्याकाळची सावली गडद होत चालली होती. त्याने हताश होऊन माघारी परतण्याचा निर्णय घेतला. मनात मात्र एकच गोष्ट घोळत होती. आपण बनवलेले हॅट विकले गेले नाहीत, हे कळल्यावर तिला किती वाईट वाटेल. तिने किती छान हॅट बनविले होते. पण कोणीच विकत घेतले नाहीत. 'आजकाल लोकांच्या आवडी-निवडी फार बदलल्या आहेत. जुन्या जमान्यातल्या उपयोगी वस्तूसुद्धा आता त्यांना बेकार वाटू लागल्या आहेत. आता त्यांना केवळ चकचकीत, फॅशनच्या वस्तू हव्या आहेत.' असा विचार करतच तो घरची वाट चालू लागला. इतक्यात बर्फ पडायला सुरुवात झाली. त्याने आपल्या डोक्याच्या रक्षणासाठी हॅट डोक्यावर धरल्या. आणि भरभर चालू लागला. रात्र होण्यापूर्वी त्याला घरी पोहोचायचे होते.
चालता चालता तो पून्हा त्याच मंदिराजवळ आला, ज्याच्या अंगणात बुद्धाच्या पाच मूर्ती होत्या. त्याने पाहिले, त्यांची डोकी पुन्हा बर्फाने झाकली गेली होती. त्याने मनातल्या मनात विचार केला,' बिचारे परमेश्वर! रात्रभर थंड सोसत राहतील.' पून्हा एकदा तो त्या मूर्तींच्या डोक्यावरचा बर्फ काढू लागला. पण पडणार्या बर्फामुळे पुन्हा त्यांची डोकी बर्फाने पांढरी होऊ लागली. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने आपल्या डोक्यावरचे एकावर एक रचलेले हॅट काढले आणि त्या मूर्तींच्या डोक्यावर चढवले. आता बर्फ त्यांच्या डोक्यावर न पडता हॅटवर पडत होता. म्हातार्याला समाधान वाटले. तो कौतुकाने त्यांच्याकडे पाहू लागला. पण एका बुद्धाच्या डोक्यावर काहीच नव्हते. ते पाहिल्यावर त्याला फार वाईट वाटले. तो काही तरी शोधण्यासाठी इकडे-तिकडे पाहू लागला. पण परमेश्वराचे डोके झाकावे, असे काहीच दिसले नाही. त्याने पाचव्या बुद्धाची क्षमा मागितली," माझ्याजवळ फक्त चारच हॅट आहेत. आता मला क्षमा कर." असे म्हणून आपली काठी सांभाळत अंगणातून तो मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने चालू लागला. तेवढ्यात जोराचा वारा सुटला आणि त्याच्या डोक्याला बांधलेला स्कार्फ फडफडू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपण आपल्या डोक्याला स्कार्फ बांधला आहे. त्याने त्याची गाठ सोडली. आणि चांगल्याप्रकारे पून्हा बांधू लागला. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार आला. तो आनंदातच माघारी आला. त्या पाचव्या बुद्धाच्या मूर्तीसमोर येऊन उभा राहिला. पाचव्या बुद्धाच्या डोक्यावरील बर्फ बाजूला केला आणि आपला स्कार्फ काढून त्याने बुद्धाच्या डोक्यावर चांगला घट्ट बांधला. त्या चार हॅटवाल्या आणि एका स्कार्फवाल्या बुद्धास नमस्कार करून तो पून्हा आपल्या घरच्या वाटेला लागला.
आता बर्फ जोराचा पडत होता. थंड वारासुद्धा जोराचा वाहू लागला होता. पण आता त्या वृद्ध व्यक्तीला कशाचीच पर्वा नव्हती. त्याचे मन खूप प्रसन्न झाले होते. कारण सगळ्या बुद्ध मूर्तींच्या डोक्याला आता थंड लागणार नव्हती. त्याच्या चालण्यात एक विचित्र वेग होता.लवकरच म्हातारा आपल्या घराजवळ पोहोचला. त्याने दरवाजा वाजवला. लागलीच दरवाजा उघडला गेला, कारण त्याची बायको दरवाजाजवळच त्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहात बसली होती. तिने पाहिले, आपल्या नवर्याच्या डोक्यावर पुष्कळ बर्फ जमा झाला आहे. सकाळी जाताना बांधलेला स्कार्फ आणि चार हॅटही नाहीत.
ती म्हणाली," हॅट तर विकले गेले असतील, परंतु तुमचा स्कार्फ कोठे आहे?"
म्हातारा तोपर्यंत चुलीजवळच्या आगीजवळ जाऊन बसला होता. शरीरात आता थोडी- थोडी गरमी येत होती. त्याने आपल्या बायकोला तिथेच यायला खुणावले.तेव्हा त्याने आपल्या पत्नीला सारी हकिकत सांगितली. आणि तिची क्षमा मागत म्हणाला," हे बघ, मी तर रिकाम्या हातांनी माघारी आलो आहे. तू इतक्या मोठ्या कष्टाने बनवलेल्या चारही हॅट मी दान करून आलो आहे. इतकंच नव्हे तर तुझा स्कार्फसुद्धा देऊन आलो. "
चुलीतल्या निखार्याच्या प्रकाशात चमकणारा त्या वृद्धेचा चेहरा सोन्यासारखा उजळून निघाला. आणि तिचे डोळे अश्रूंनी भरले. ती कापर्या स्वरात म्हणाली," तुम्ही आज जीवनातलं सर्वात मोठं चांगलं काम केलंत. मी बनवलेले हॅट परमेश्वराच्या उपयोगाला आले, यापेक्षा आणखी कोणती गोष्ट मोठी असणार आहे. शिवाय माझा स्कार्फ फारच जीर्ण झाला होता. कोण जाणे , तो बर्फाची थंडी थोपवू शकतो की नाही? हे प्रभु, माझ्या पाचव्या बुद्धाचे थंडीपासून संरक्षण कर. " असे म्हणून तिने हात जोडले आणि अदृश्य परमेश्वराला नमस्कार केला.
म्हातारीने चुलीवर थोडा भात शिजवायला ठेवला होता. दोघांनी मिळून तो आपापल्या ताटात वाढून घेतला. आणि तो खावून झोपी गेले. अचानक मध्यरात्रीच्या अंधारात त्यांना वाटलं की आपल्या घराभोवती काही तरी गडबड चालू आहे. ते दोघेही घाबरले. आपल्या घराला चोरांनी वेढा घातलाय की काय, असे त्यांना वाटले. बिच्चारे चोर! त्यांना या गरिबाचेच घर मिळावे का, चोरी करायला! ज्यात त्यांना काहीच सापडणार नाही. पण इतक्यात त्यांना पावलांचा आवाज कमी कमी होत चालल्यासारखा वाटू लागला. कोण आहेत, पाहावं म्हणून त्यांनी हळूच आपल्या घराचा दरवाजा उघडला. आणि पाहतो तर काय आश्चर्य! त्यांच्या दरवाज्यात चार टोपल्या फळे, भाजीपाला आणि माशांनी भरलेल्या ठेवलेल्या दिसल्या. तांदळाने भरलेली चार पोती ठेवली होती. तर एका टोपलीत खूपसे सुंदर रेशमी आणि लोकरीने बनवलेले स्कार्फ ठेवलेले होते. आश्चर्याने वृद्धेचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. ती उदगारली," अहो, दरोडेखोर दरोड्याचा माल ठेऊन पळाले वाटतं."
पण म्हातारा त्या सामानांकडे पाहत नव्हता. तो चांदण्या रात्री बर्फात दूर चाललेल्या सावलींकडे पाहात होता. त्यातल्या चार सावलींच्या डोक्यावर त्याच्या पत्नीने बनवलेले हॅट होते. आणि पाचव्या सावलीच्या डोक्यावर वार्याने फडफडणारा स्कार्फसुद्धा स्पष्ट दिसत होता.
आता ती वृद्धासुद्धा त्या सावलींकडे पाहात होती. दोघा पती-पत्नीने आवाक होऊन एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले. मग दोघांनी मिळून एकदम हात जोडले आणि प्रार्थनेच्या मुद्रेत मान झुकवून जमिनीवर बसले. ( जपानी लोककथा)
No comments:
Post a Comment