राणा राजसिंह मोगल बादशहा औरंगजेबच्या काळात उदयपूरमध्ये राज्य करीत होता. तो स्वतंत्र राजा होता. औरंगजेब क्रूर आणि सांप्रदायिक शासक होता. त्याच्या पणजोबा अकबरसारखे त्याचे उदार हृद्य नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रात शूर शिवाजी महाराज, पंजाबमध्ये १० वे गुरू गोविंदसिंह आणि राजस्थानात राणा राजसिंह यांनी त्याला मेटाकुटीला आणले होते.
उदयपूरजवळ रूपनगर नावाचे एक छोटेसे राज्य होते. इथला राजा विक्रमसिंह सोळंकी हा औरंगजेबाचा सामंत राजा होता. त्याला एक कन्या होती. राज्यकन्या चंचल. ती खूप सुंदर होती.
एक दिवस एक म्हातारी कुंटीण रूपनगरच्या राजवाड्यात राजे-रजवाडे, नवाब आणि बादशहा यांच्या प्रतिमा विकण्यासाठी आली होती. प्रतिमा विकण्याबरोबरच ती हेरगिरी करून खबर गोळा करायची आणि विकायची. राजकन्या चंचल औरंगजेबाच्या क्रूर शासनाचा तिरस्कार करायची. राजसिंहसारख्या स्वतंत्र राजाचा मात्र मोठा आदर करायची.
तिने औरंगजेब आणि राजसिंह या दोघांच्या प्रतिमा विकत घेतल्या. त्यातली औरंगजेबाची प्रतिमा तिने त्या म्हातारीसमक्ष जमिनीवर आपटून तुडविली. वर रागाने म्हणाली," औरंगजेबालासुद्धा असा कुचलला पाहिजे."
राजकन्येची मैत्रीण निर्मला भयंकर घाबरली. या घटनेची कोठे वाच्यता करू नये म्हणून तिने म्हातारीला भरपूर धन देऊन पाठवून दिले. पण खबर विकणे, हा तिचा धंदाच होता. थेट तिने दिल्ली गाठली. आणि ही खबर औरंगजेबाची मुलगी- जेबुन्निसाच्या कानावर घातली. यासाठी तिला मोठे बक्षीस मिळाले.
इकडे क्रोधाने लालेलाल झालेल्या जेबुन्निसाने ही खबर आपल्या पित्याल्या सांगितली. चंचलच्या उद्दामपणाचा त्याला भयंकर राग आला. त्याने तिचा बदला घेण्याचे ठाणले. त्याची उदयपुरी बेगमसुद्धा तिथेच होती. ती नेहमी नशेत असायची. कुत्सित हसून म्हणाली," तिला दिल्लीला बोलावून घेण्यात यावं, जहापनाह. मी तिच्याकडून जुते साफ करून घेईन. झाडूपोछा करायला लावीन. तिला आपल्या पायाची दासी बनवीन."
औरंगजेबाने रूपनगरला पैगाम पाठवला," आम्ही राजकन्या चंचलशी शादी करणार आहोत. तिला दिल्ली आणण्यासाठी २००० सैन्य पाठवित आहोत. शादी इथेच होईल."
आपण नकार दिला तर आपण आणि आपले राज्य राहणार नाही, याची कल्पना राजा विक्रमसिंह सोळंकीला होती. त्या काळात काही राजपूत राजकन्यांनी मोगलांशी निकाह लावला होता. सारासार विचार करून त्याने शेवटी बादशहाच्या पैगामाचा स्वीकार केला.
औरंगजेब आणि उदयपुरी बेगम यांच्या इराद्याची खबर औरंगजेबची एक राजपूत राणी जोधपुरी बेगम हिला लागली होती. तिने ती गपचिप दूताकरवी चंचलपर्यंत पोहचवली. चंचल भयभयीत झाली. ती व तिची मैत्रीण निर्मल हिने राणा राजसिंहकडे एक पैगाम धाडला. " बादशहा औरंगजेबची बेगम बनण्यापेक्षा आम्ही मृत्युला कवटळणे पसंद करू. बादशहाला नकार कळविण्याइतके माझे पिता सक्षम नाहीत. परंतु आपल्याला आम्ही राजपुतांचे आन आणि शान समजत आलो आहोत. आमचे रक्षण कराल, अशी आशा आहे."
तेव्हा भारतीय राजा आपल्या शरणार्थी याचकाच्या रक्षणासाठी आपला जीवसुद्धा द्यायला तयार असत. चंचल तर एक स्त्री होती. स्त्री रक्षणाच्या हाकेला ठोकरणारा क्षत्रियच काय पण पुरुष म्हणण्याच्या लायकीचा समजला जात नसे. राणाने चंचलचे रक्षण करण्याचे निश्चित केले.
पण राणाकडेसुद्धा औरगंजेबाच्या फौजेशी मुकाबला करण्याइतपत मोठे सैन्य नव्हते. देशातल्या अन्य राजांमध्ये एकता नव्हती. त्यामुळे मदतसुद्धा मिळू शकत नव्हती. शेवटी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. युक्तीचा वापर करण्याचे ठरवले. त्याने आणि सेनापतींनी एक युक्ती योजली.
उदयपूर आणि रूपनगर मोठमोठ्या डोंगरांनी वेढलेले होते. त्याकाळी डोंगरकपारीतूनच मार्गक्रमण करण्याशिवाय पर्याय नव्हता. राणाने मार्गाच्या दोन्ही बाजूच्या डोंगरांवर सैन्य तैनात केले.
मोगल फौज याच मार्गावरून राजकन्या चंचलच्या पालखीसह येणार होते. पुढे पालखी आणि मागे फौज असा लवाजमा होता. सैन्यांनी पालखी पुढे जाऊ दिली आणि वरून मोठमोठे दगडधोंडे खाली ढकलून सोडून दिले. त्यामुळे मार्ग बंद झाला. पुन्हा फौजेवर दगडांचा आणि गरम तेलाचा मारा करून फौजेला नामोहरम केले. आणि चंचलची गपचुप उदयपूरला रवानगी करण्यात आली.
पराभवाची खबर मिळताच संतापाने बादशहाच्या अंगाचा तीळपापड झाला.. त्याने फौजेला उदयपूरच्या दिशेने कूच करण्याचा आदेश दिला आणि स्वतः, जेबुन्निसा, उदयपुरी बेगम आदींसह त्यांच्यासोबत होता.
राणा राजसिंहजवळ सैन्य फारसे नसले तरी त्याच्याकडे बुद्धी-चातुर्य, आणि धैर्य होते. त्याने आपल्या विश्वासू साथीदाराला मोगल व्यापार्याच्या वेशात मोगल फौजेत पाठवून दिले. त्याने बादशहाला खबर दिली की या मार्गाने आपण पुन्हा फसाल. राणा खूप चलाख आहे. त्याने आपल्याशी दोन हात करण्याची जय्यत तयारी केली आहे. औरंगजेबाने आपला मार्ग बदलला.
औरगंजेबाची फौज, मुलगी आणि बेगम सगळे तळपत्या वाळवंटात चांगलेच फसले. तप्त वाळू आणि डोळ्यांत, अंगात शिरणारा वारा यामुळे त्यांना चालणे मुश्किल झाले. चालून थकलेल्या फौजेला एका खिंडीत गाठून राणाच्या सैन्याने सळो की पळो करून सोडले. अनेकजण भरकटून गेले. बादशहाची मुलगी आणि बेगम यांना बंदी बनवून उदयपूरला आणण्यात आले. रसद लुटण्यात आली. तहान-भुकेने व्याकूळ झालेल्या औरंगजेबाने तहाचा संदेश धाडला.
बेगम आणि जेबुन्निसाला एक दिवस चंचलच्या चाकरीला लावून जाणीव करून देण्यात आली. नंतर मात्र सगळ्यांना सन्मानाने वागवण्यात आले. राणा राजसिंह हिंसेच्या विरोधात होता. शरण आलेल्याला मारण्यात शूरता नव्हती. कायरता होती. शेवटी त्याने औरंगजेबाची मुक्तता केली. त्याची मुलगी, बेगम यांना सन्मानाने परत दिल्लीला पाठविण्यात आले.
पण औरंगजेब धोकेबाज होता. त्याने तह मोडला. पुन्हा त्याने फौजेची जमवाजमव केली. आणि दिलेरखानला पाठवले. दिलेरखान उदयपूरवर चाल करून आला. पण राणाही काही कमी चालाख नव्हता. त्याला औरगंजेबाची करणी ठाऊक होती. दरम्यानच्या काळात त्याने आपल्या शेजारील राजांना एकत्र आणले. राणाच्या विजयाने उत्साहित झालेले राजे त्याच्या मदतीला धावून आले. त्यात विक्रमसिंहसुद्धा होता. सर्वांनी मिळून औरंगजेबाच्या फौजेचा पाडाव केला. दिलेरखानाला पळवून लावले.
त्यानंतर मात्र उभ्या हयातीत औरंगजेबाने उदयपूरकडे तोंड वर करून कधी पाहिले नाही. राजा विक्रमसिंह सोळंकीने आपली कन्या चंचल हिचा विवाह राणाशी करून दिला.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment