Sunday, February 19, 2012

मानवतेच्या प्रकाशिका

     काही माणसं आपल्यासारखीच असतात. त्यांनाही जीवनातल्या अनेक कटू अनुभव , संकटं यांच्याशी झुंज द्यावी लागली आहे.  परंतु, त्याचे आदर्शवादी विचार,  ध्येय आणि कर्म इतरांमध्ये आदराची, आदर्शाची भावना निर्माण करतात. त्यांचे जीवन दीपस्तंभासारखे होऊन मानवतेला प्रकाश दाखवते. त्यांचा आदर्श, त्यांच्या कार्याचे अनुकरण इतरांनी केल्यास जगातल्या बर्‍याच समस्या संपून जातील. मात्र ही माणसं आपल्या कार्याचा कुठलाही गाजावाजा न करता नि: स्वार्थपणे आणि सातत्याने कर्म करीत आहेत. अशा काही पद्मश्रींच्या कार्यांचा परिचय.
अनाथांच्या नाथः डॉ. उमा तुली
     सदुसष्ठ वर्षीय डॉ. उमा तुली यांनी आपले जीवन गोरगरीब, उपेक्षित, अनाथ, वंचित यांची सेवा करण्यासाठी वाहिले आहे. यामुळेच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे. मध्यप्रदेशातल्या ग्वालियर आनि उज्जैनमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी समाजसेवेला आपले कार्यक्षेत्र बनवण्याचा निश्चय केला. त्यांनी गरजू, निराधार  मुलांच्या शिक्षण, त्यांचे आरोग्य व बेघर यांचे  पूनर्वसन हे आपले ध्येय ठेवले. या ध्येयाच्या प्राप्तीसाठी त्यांनी 'अमर ज्योति चॅरिटेबल ट्रस्ट' ची स्थापना केली. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन मध्य प्रदेश सरकारने त्यांची अपंगांच्या  मदतीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीच्या आयुक्तपदी नियुक्ती केली. प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांनी आधारभूत अशा योजना बनवल्या आहेत. खासकरून शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असणार्‍या मुलांच्या  आणि अन्य अपंग प्रकाराच्या मुलांना जीवनाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बनविण्यात आलेल्या त्यांच्या कार्ययोजनांमुळे  त्यांना  मोठी ख्याती मिळाली.  १९९५ मध्ये पार पडलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली परेडमध्ये 'अमर ज्योती चॅरिटेबल ट्रस्ट' च्या मुलांना  सहभाग घेण्याची संधी मिळाली, अशी देशातली एकमेव अशी संस्था आहे.
अनाथ, अपंग , निराधार मुलांची मातेच्या ममतेने सेवा शुश्रूषा करणाऱ्या डॉ. तुली यांच्या कार्याची दखल अनेक संस्था, देशांनी घेतली. त्यांना राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अलिकडेच त्यांना 'पद्मश्री' पुरस्कारही मिळाला.  सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या होत्या की, हा पुरस्कार माझ्यातला जोश आणि उत्साह वाढविणारा आहे. प्रत्येक माणसाने समाजासाठी काही ना काही देण्याचा भाव मनी ठेवल्यास चांगले समाजस्वास्थ्य निर्माण होईल.  
शमशाद बेगम:  मानवतेतला  प्रकाश
     छतीसगडच्या दुर्गम जिल्ह्यातल्या गुंडरदेही या एका छोट्याशा गावातल्या शमशाद बेगम आज छत्तीसगडच्या अनेक गावांमधल्या महिलांची 'प्रेरणा'  बनल्या आहेत. त्यांनी  स्वतः सुरुवातीला खूप हालअपेष्टा सोसल्या आहेत. अनेक संकटे, समस्या यांना तोंड दिले आहे. या समस्या, हाल-अपेष्टा  दुसर्‍याच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी झटत  आहेत. खरोखरच त्या दुसर्‍याच्या जीवनात प्रकाश आणणार्‍या प्रेरणा ठरल्या आहेत. १९९० मध्ये सरकारच्या सर्व शिक्षा अभियानच्या माध्यमातून त्या समाजसेवेशी  जोडल्या गेल्या. असहाय्य, निराधार, मागास आणि गरीब महिलांसाठी शिक्षण किती महत्त्वाची  कामगिरी बजावू शकते, याची कल्पना आल्याने त्यांनी अशिक्षित महिलांसाठी स्वतः ला वाहून घेण्याचे ठरवले.  गावातील व आजूबाजूच्या गावांमधील अशिक्षित महिलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्याच्या उद्देशाने  गावात एक समूह तयार केला. आज त्यांच्या कार्याचा वेलू गगनावरी गेला आहे.   केवळ शिक्षणच नव्हे तर महिलांना  मदत धावून जाणारी व  त्यांना स्वावलंबी बनण्यास प्रेरित करणारी मोठी फळी निर्माण झाली  आहे. ज्या महिला शिकत राहिल्या, त्या बेगमच्या समुहाच्या अविभाज्य भाग  बनल्या आहेत. ही संस्था स्वता: च्या  पायावर उभी आहे. केवळ दुर्गम भागातच  एक हजारच्या जवळपास  'स्वसहायता समूह केंद्र' कार्यरत आहेत. आतापर्यंत २५ हजाराच्या आसपास महिलांना शिक्षित करण्याचे काम या समुहाने केले असून त्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम  आहेत.
 स्त्री शक्तीच्या सूत्रधारः फूलबसनबाई
     फूलबसनबाई यादव यांना छतीसगडमध्ये 'स्त्री शक्ती'च्या सूत्रधार म्हणून ओळखले जाते. शमशाद बेगम यांच्याप्रमाणेच यांनीही गरीब आणि मागास समाजाच्या मुलांच्या व  महिलांच्या प्रगतीसाठी अभूतपूर्व असे योगदान दिले आहे. गेल्या दोन दशकापूर्वी त्यांनी स्वयंसहायता समुहांची स्थापना केली. गरिबांच्या मदतीसाठी त्यांनी एक आराखडा तयार केला आहे. गाव आणि वाड्यावस्त्यांवर सातवीपर्यंतच्या मुलांसाठी आणि महिलांसाठी सरकारच्या मदतीतून   प्राथमिक शाळा चालवल्या जातात.  त्यांचे प्रमुख ध्येय आहे ते महिलांना शिक्षित करणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनविणे. त्याचबरोबरच त्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहाशी जोडणे. या यांच्या अजोड कामगिरीसाठी त्यांना २००८ मध्ये जमनालाल बजाज आणि २०११ मध्ये अमोदिनी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. फुलबसन यांचे म्हणणे असे की,  ग्रामीण वातावरण आणि घरची गरिबी यामुळे  गरीब कुटूंबातल्या महिलांच्या हालाखीची आपल्याला जवळून कल्पना आहे. शिक्षणाचा अभाव  हेच महिलांच्या मागासलेपणाचे कारण आहे, असे त्या मानतात. महिला सबलीकरणाच्या मार्गात येणार्‍या अडचणी दूर करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभवातून घेतली आहे.
गरिबांच्या मदर तेरेसा:  बिन्नी यंगा
     बिन्नी यंगा यांना अरुणाचल प्रदेशच्या मदर तेरेसा म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांनी इथे  अनाथ मुले आणि गरजू महिलांच्या उद्धारासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. १९७९ मध्ये त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात 'ओजू वेल्फेयर असोशिएशन'च्या माध्यमातून  केली. 'इवलेसे रोप लावियले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी,' या वचनाप्रमाणे गेल्या गेल्या तीन दशकात बिन्नी यंगा यांच्या कार्याचा विस्तार उत्तर-पूर्व प्रदेशातल्या गावागावात  झाला आहे. आज त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्त्यांची फळी काम करीत आहे. गरजवंत मुलांची निवड करून त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बिन्नी यांची संघटना प्रयत्नशील आहे. महिलांसंबंधीत असलेल्या वाईत चालीरिती थांबवण्यासाठी बिन्नी यांनी आपले सारे आयुष्य  वेचले आहे. अनाथ मुलांना शिकवून्-सवरून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी अनाथश्रम, शाळा आणि प्रशिक्षण केंद्र यांची स्थापन केली आहेत.
गांधीवादी सिद्धांत : डॉ. गुट्टा मुनिरत्नम
     आंध्र प्रदेशमध्ये १९३६ मध्ये जन्मलेल्या डॉ. मुनिरत्नम यांनी ग्रामसेवा हेच आपल्या आयुष्याचे  मिशन बनविले आहे. गांधीवादी मुनिरत्नम यांनी यासाठी गांधीजींच्या सिद्धांतांचा मार्ग पत्करला आहे.  खेड्यात राहणारा गरीब आणि ग्रामीण समाजाच्या विभिन्न समस्या यांचे  निदान त्यांनी गांधीवादी दृष्टीकोनातून  शोधले आहे. यासाठी त्यांनी राष्ट्रीय सेवा समिती नावाची संस्था स्थापन केली आहे. स्वदेशी आणि ग्रामस्वराज्यच्या सिद्धांतानुसार लघु कुटिरौद्योगांची स्थापना करून खेड्यातल्यांना आत्मनिर्भर बनवणे, हे त्यांचे ध्येय  राहिले आहे. शिवाय ते अनेक समाजसेवी संस्थांशीही निगडीत आहेत.
 दिलदार महिला: रितादेवी
      मोठमोठ्या इमारतींच्या राजधानी दिल्लीत झोपडपट्ट्यांनाही कमतरता नाही. दिल्ली दिलवाल्यांची म्हटले जाते, परंतु ती  फक्त म्हणायलाच आहे. दिल्ली तशी मोठी निर्दयी आहे. गरिबांचे जीवन  इथे नरकापेक्षाही भयंकर आहे. मात्र या गरिबांच्या गरजेला, मदतीला धावून जाणारी एक दिलदार महिला इथे काम करते आहे. तिचे नाव आहे, रिता देवी. आपल्या ट्र्स्टच्या माध्यमातून कार्य करीत आहेत. 'इला ट्र्स्ट' च्या माध्यमातून गरिबांच्या मदतीला धावून जातात. मोफत औषधोपचारापासून अन्न, कपड्यालक्त्यांपर्यंत सगळ्या  मूलभूत गरजा गरिंबांना मिळाव्यात यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. 

No comments:

Post a Comment