Sunday, February 19, 2012

बालकथा द एलिफंट्स चाइल्ड

     लाखो वर्षांपूर्वी हत्तीला सोंड नव्हते. त्याच्याजागी चपलासारखे काळे, फुगरे फक्त नाक होते. त्याला तो घुमवू- फिरवू शकत होता. पण त्याच्याने कुठली एखादी  वस्तू उचलता येत नव्हती. यातल्या कळपातले एक हतीचे पिल्लू मात्र सगळ्यांपेक्षा वेगळे होते. त्याला जगातल्या प्रत्येक गोष्टींबद्द्ल   जिज्ञासा होती. तो अफ्रिकेत राहणारा असला तरी  आपल्या जिज्ञासापोटी त्याला  संपूर्ण  जगभर  फिरायला आवडायचे.  एक दिवस त्याने शहामृगला विचारले, " तुझ्या शेपटीवर पंख कसे रे उगवलेत?"
     शहामृगने त्याला उत्तर द्यायचे सोडून आपल्या पंजाच्या तीक्ष्ण नखांनी घायाळ करून टाकले. परंतु,  हत्तीचे पिल्लू निराश झाले नाही. तो प्राण्यांना त्यांच्या जन्माबाबतचे नानाविध प्रश्न विचारायचा. एकदा त्याने त्याच्या मोठ्या काकूला- हिप्पोपोटेमसला विचारले," तुमचे डोळे लाल का बरं?" काकूनंही  त्याला बदडून काढलं. नंतर त्याने बॅबून माकडाला विचारले," त्याच्या शरीरावर इतके केस कसे?'  बॅबूनसुद्धा काही कमी नव्हता. तोही हातात काठी घेऊन  हत्तीच्या पिलाला मारू लागला.
     एवढे सगळे होऊनही हत्तीचे पिलू  नवनव्या शोधात राहिला. एक दिवस आफ्रिकेतील प्राण्यांचा कळप कुठे तरी निघाला होता. हतीचे पिलूसुद्धा सोबत होते. त्याने सगळ्या प्राण्यांना एक मजेशीर प्रश्न केला ,"मगर रात्री काय खाते?' पण  उत्तर द्यायचे सोडून सगळ्यांनीच एकदम त्याला  बदडून काढायला सुरुवात केली. रागाने हत्तीचे पिलू त्यांना सोडून पळाले.  पळता-पळता हत्ती  एका झुडपाजवळ आला. तिथे एक पक्षी बसला होता.  हत्तीचे पिलू त्याला म्हणाले," माझ्या जिज्ञासेपोटी सोबत्यांनी मला मार मार मारले. आता तू तरी सांगू शकतोस का की, मगर रात्री काय खाते?' पक्षाला त्याची दया आली. तो म्हणाला," तू लिंपोगो नदीवर जा."
     दुसर्‍यादिवशी पिलाने आपल्या घरच्यांना सांगितले," मी लिंपोगो नदीवर चाललो आहे. " घरचे काहीच म्हणाले नाहीत. हत्तीचे पिल्लू आनंदाने नदीच्या दिशेने निघाले. वाटेत केळी, ऊस, टरबूज खात ते लिंपोगो नदीवर आले. या नदीच्या चोहोबाजूला दाट जंगल होते. इथे त्याची भेट एका मोठ्या दुरंगी सापाशी झाली. त्याने सापाला विचारले," तू मगरीला पाहिले आहेस काय?"
     साप आरामात दगडावर बसला होता. हे ऐकून त्याला संताप आला. त्याने शेपटीने हत्तीवर वार केला. " अरे, तूसुद्धा तेच करतो आहे, जे इतरांनी केले." साप काही म्हणाला नाही. हती सापाला तिथेच सोडून पुढे निघाला. नदीच्या काठाला एका जागी  जाडजूड लाकडाच्या ओंडक्यासारखे  काही तरी पडले होते. त्यावर त्याचा पाय पडला. ती वस्तू हलली. त्याने रागाने डोळे वटारले.
     " माफ करा. तुम्ही मगरीला कुठे पाहिले आहे काय?" हत्तीच्या पिलाने विचारले. ती मगरच होती.तिने प्रश्न ऐकून आपली शेपटी वर उचलली. हत्ती समजून चुकला,  हासुद्धा त्याला मारणार. तो थोडा मागे सरकला. मगर म्हणाली," घाबरू नकोस. तू असा माझ्याजवळ ये. मीच मगर आहे." हे ऐकून हत्तीला खूप आनंद झाला. तो मगरीवर चढून म्हणाला," तर तूच मगर आहेस. तुझ्या शोधासाठी तर मी इतके दिवस भटकत होतो. आता तू सांग बरं,  रात्री काय खातेस?"
     मगर म्हणाली," माझ्याजवळ ये, मी तुझ्या कानात सांगते." हत्तीने आपले तोंड  मगरीच्या तोंडाजवळ नेले. मगरीने झडप घालून त्याचे नाक आपल्या तोंडत धरले. दुरंगी साप हा सारा प्रकार  पाहात होता. तो ओरडून हत्तीला म्हणाला," तुला तुझा जीव वाचवायचा असेल तर पूर्ण ताकदीनिशी  स्वतः ला सोडवून घे. नाही तर ती तुला खोल् पाण्यात घेऊन जाईल आणि तुला रात्रीचे भोजन बनवील."
     हे ऐकताच हत्ती मागच्या पायावर बसला. सगळी शक्ती एकवटून तो  आपले नाक सोडविण्याचा प्रयत्न करू लागला. इकडे मगरसुद्धा तितक्याच ताकदीने त्याला पाण्यात खेचत होती. या ओढाओढीच्या नादात हत्तीचे नाक लांबू लागले. बघता-बघता हत्तीचे नाक पाच फुट लांब झाले. त्याला भयंकर वेदना होऊ लागल्या. त्याचा धीर सुटत चालला. ते पाहून साप खाली उतरला. तो म्हणाला," थांब , मीसुद्धा तुला मदत करतो." सापाने एका दगडावर आपले तोंड चिपकवले आणि हत्तीच्या कमरेभोवती विळखा घातला. शेवटी महत्प्रयासाने मगरीच्या तोंडातून हत्तीचे नाक सुटले. मगर पाण्यात गडप झाली.
     हत्तीने सापाचे मनपूर्वक आभार मानले. त्याने आपले लांब नाक केळ्याच्या सालीने गुंडाळले आणि  नदीच्या पाण्यात सोडले. सापाने विचारले,"हे काय करतो आहेस?" हत्ती म्हणाला," अरे बाबा, माझ्या नाकाचा नक्शाच पार बिघडून गेलाय. त्याला ठीक करतोय. ... " पण नाक जसंच्या तसंच  राहिलं. थोड्या वेळाने  एका माशीने हत्तीच्या खांद्याला जोराचा दंश केला. हत्तीने लांब नाक वर केले आणि एक जोराचा फटका मारला. माशी जागच्या जागी मरून पडली.  साप म्हणाला," अरे, या लांब नाकाच तर तुला फायदाच झाला की!"
     हत्तीने केळीचा एक मोठा घड आपल्या नाकाने उचलला आणि  तोंडात कोंबला. साप म्हणाला," व्वा, ही तर मोठी कमालच झाली. अगोदर तर असे नाक नव्हते."' होय... होय. असे अजिबात नव्हते. पण ठीक आहे. " हत्ती म्हणाला. पाहता पाहता त्याने खूपशी ओली माती उचलून आपल्या डोक्यावर टाकली आणि निपचिप पडून राहिला. साप म्हणाला," विचार काय करतोयस? आता तर तू लांब नाकाने तुझ्या शत्रूलासुद्धा नामोहरम  करू शकतोस."
     ही गोष्ट ऐकल्यावर मात्र हत्तीने अक्षरशः आनंदाने उडी मारली. " व्वा मित्रा, तुझ्या सल्ल्यासाठी धन्यवाद. आता मी सार्‍यांचा सूड घेईन." असे म्हणत हत्ती माघारी फिरला. तो अगदी अभिमानाने आपले लांब नाक इकडे- तिकडे हलवत, मिरवत  चालू लागला. सर्वात प्रथम तो हिप्पोपोटेमसजवळ आला. हिप्पोला आपल्या लांब नाकाने खूप बदडून काढले. लोळवले . स्वतःच्या  विजयाने तो हर्षभरीत झाला. अभिमानाने त्याने लांब नाक वर हवेत घुमवले.
     काही दिवस सतत चालत राहिला. मग आपल्या घरी पोहचला. त्याला पाहिल्यावर सार्‍यांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. " अरे, तुझ्या या नाकाला काय झालंय. मोठं विचित्र दिसू लागलं आहे. तुझ्यावर  भुताटकी  तर झाली नाही ना?" घरचे म्हणाले.
     " आता याने तुमची सगळ्यांची मी पिटाई करतो." असे म्हणून त्याने   ज्यांनी ज्यांनी त्याला मारले होते, त्या सार्‍यांना  चांगले बदडून काढले.  सगळे त्याची माफी मागू लागले. नंतर त्याने लांब नाकाचा दुसरा चमत्कारही दाखवला. सारे हत्ती त्याची स्तुती करू लागले. ते म्हणाले," आम्हीसुद्धा आमचे नाक असेच बनवणार!"
     हत्तीने घडलेली सारी हकिकत सांगितली. मग काय? सगळेच लिंपोगो नदीच्या दिशेला धावले. ते परत यायचे तेव्हा, त्यांचे छोटे नाक लांब झालेले असायचे. लांब नाक घेऊन ते अभिमानाने हवेत मिरवायचे.  आनंदाने नाचायचे. हळूहळू वनातले सारे हत्ती लांब नाकाचे बनले. पुढे याच लांब नाकाला सोंड या नावने ओळखले जाऊ लागले.  ( मूळ लेखक- 'द जंगल बुक'चे रचनाकार रुडयार्ड किपलिंग)           स्वैर भाषांतर - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment