Tuesday, February 14, 2012

लोककथा

पोपट आणि कावळा
      एक पोपट होता. त्याचं नाव होतं, अंकू. एक दिवस अंकूची आई म्हणाली," बाळा अंकू, आता तू मोठा झालास. कमवायच्या योग्यतेचा झालास. जा, काही कमवून आण." आईने सांगितल्यावर अंकू निघाला. उडत उडत तो खूप लांब आला. तळ्याच्याकाठी एक आंब्याचे झाड होते. त्यावर खूपसे आंबे लगडले होते. पोपट त्या झाडावर येऊन बसला. त्याने पोटभर मनसोक्त  आंबे खाल्ले आणि तळ्याचे थंडगार  पाणी प्याला. ...फांदीवर बसून आता त्याला सुस्ती चढू लागली होती,  इतक्यात तेथून गुराखी निघाला. त्याने  गुराख्याला हाक मारली.  गुराखी म्हणाला," दादा, माझ्या आईला सांगा, तुमचा मुलगा मजेत आहे.  तो पिकलेले आंबे खातो. थंडगार पाणी पितो..."  गुराखी म्हणाला," बाबा रे, या गायींना असा वार्‍यावर सोडून मी भला निरोप द्यायला कसा जाणार ?  हवी तर तुला ही एक गाय घे..." 
      पोपटाने गाय ठेवून घेतली. आंब्याच्या झाडाला बांधली. थोड्या वेळाने तेथून आणखी एक गुराखी निघाला. त्यानेही एक म्हैस दिली.  आणखी काही वेळाने शेळ्या- बकर्‍या चारत गुराखी आला. त्यानेसुद्धा  एक बकरी दिली. अशाप्रकारे त्या वाटेवरून जाणार्‍या प्रत्येकाने काही ना काही त्याला दिले. त्यामुळे आता त्याच्याकडे घोडा, ऊंट, हत्ती हे प्राणीसुद्धा आले.  या सगळ्यांना घेऊन एक दिवस अंकू मोठ्या शहराच्या बाजारात गेला आणि त्यांना विकून टाकले. विकल्यामुळे अंकूजवळ पुष्कळसे पैसे जमा झाले. त्यातून त्याने सोने-चांदी विकत घेतली.    त्यातून दाग-दागिने बनवले. ते त्याने कान, नाक चोच आणि गळ्यात  घातले. उरलेले पैसे  त्याने चोचीत  आणि पंखांमध्ये लपवले.  यानंतर मात्र तो आपल्या घराच्या दिशेने निघाला. घरी पोहचता पोहचता रात्र झाली. अंकूने दाराची कडी वाजवली आणि आईला हाक मारली," आई... आई,  दरवाजा उघड,  ढोल  वाजव. अंकू आता पंख झाडेल, घरभर पैसाच पैसा पडेल." आईने विचार केला," इतक्या मध्यरात्री अंकू कसा काय येईल? हा कोणी तर चोर असावा." आईने दरवाजा उघडला नाही.
      आईने दरवाजा उघडला नाही, मग तो आजीकडे गेला. आजीला हाक मारली. आजीने आपल्या नातवाचा आवाज ओळखला. तिने उठून  दरवाजा उघडला. तो घरात आला. आजीने त्याला झोपायला छानशी रजई दिली. तो आजीला म्हणाला," तू ढोल वाजवं, पैसा पडलं" आजीला आनंद झाला. ती  म्हणाली, " बाळा, तू इथेच थांब. आता इतक्यात ढोलवाल्याला बोलावून आणते. आजीने ढोलवाल्याला बोलावून आणले. अंकू खूश होऊन आपले पंख, पंख आणि कान  झाडू लागला. त्यातून पटापट पैसे पडू लागले. काही वेळातच घरात सगळीकडे पैसाच पैसा झाला.
      सकाळ झाली. शेजारी कावळीण राहत होती. तिला कळले की, अंकूने खूप पैसे कमवून आणले आहेत. ती आपल्या मुलाला म्हणाली," बाळा ऊठ, तूसुद्धा कमवून आण बरं" कावळा पैसे कमावयाला निघाला. पण शेवटी कावळा तो कावळाच. तो कचर्‍याच्या ढिगारावर चढला. आपल्या पंखांमध्ये, चोचीत आणि कानांत वेगवेगळ्या प्रकारची  केरकचरा भरला. रात्र झाली, तेव्हा तो घरी परतला. त्याने दरवाजाची कडी वाजवली. पोपटाप्रमाणेच आईला हाक दिली. आईने पटकन दरवाजा उघडला. खाट टाकला. ढोल  वाजवू लागली आणि कावळ्याने पंख फडफडायला सुरुवात केली. सगळ्या घरभर केरकचरा पडू लागला. थोड्याच वेळात घरभर कचरा झाला. हे पाहून कावळ्याच्या आईला भयंकर संताप आला,  तिने कावळ्याला झटकन घराबाहेर हाकलून लावले.                        

No comments:

Post a Comment