Wednesday, February 8, 2012

सुसंस्कृत पिढी घडविण्याचे केंद्र

     भारतातील महाविद्यालयांतून शिक्षण घेत असलेल्या युवक-युवतींना ग्रामीण परिसराची जाणीव व्हावी, त्यांची सामाजिक कार्यात रुची वाढावी, र्शमदानाचे महत्त्व समजावे, सांस्कृतिक आदान-प्रदान होत असताना गतिक्षम नेतृत्व निर्माण व्हावे, या उद्देशाने महात्मा गांधी जन्मशताब्दी वर्षाचे निमित्त साधून २४ सप्टेंबर १९६९ पासून राष्ट्रीय सेवा योजना स्थापण्यात आली. युवक हा राष्ट्रीय सेवा योजनेचा केंद्रबिंदू असून, युवाशक्ती ही राष्ट्रीय संपत्ती आहे. युवकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना करीत आहे. देशाला सर्वोच्च स्थानावर नेणारा सुसंस्कारित युवक घडला नाही, तर देशाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे युवाशक्तीकडे राष्ट्रीय संसाधन म्हणून पाहण्याची गरज आहे. थोर समाजसेवक बाबा आमटे म्हणत, तरुणांचे हात उगारण्यासाठी नसून, देश उभारण्यासाठी आहेत. या तरुणांच्या शक्तीचा उपयोग ग्रामीण जनतेच्या विधायक कार्यासाठी करून घ्यायला हवा. युवकांमध्ये नैतिक व सामाजिक मूल्ये रुजवली पाहिजेत. वाढत्या आत्महत्या, पैशांची लालसा वाढत चालल्याने गरज भागविण्यासाठी धुंडाळलेला वाममार्ग, वाढती व्यसनाधीनता, आदी समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालय पातळीवर व्हायला हवे. सुदृढ युवक हा सुदृढ समाजाची निर्मिती करू शकतो, हे लक्षात घेऊन या योजनेला सर्व स्तरांतून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. महाविद्यालयीन शिबिरे, विद्यापीठस्तरीय शिबिरे, मेगा कॅम्प शिबिरे, राज्यस्तरीय शिबिरे, आदींच्या माध्यमांतून व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रप्रेम, युवक नीतिमूल्ये, सामाजिक संस्कार, अंधर्शद्धा निर्मूलन, पर्यावरण संतुलन, वृक्षलागवड, मूल्यशिक्षण, साक्षरता यांसारख्या मूल्यांचा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्रसार सुरू आहे. तरुण हाच खरा देशाचा आधारस्तंभ आहे.
- मच्छिंद्र ऐनापुरे, जत.
lokmat, kolhapur. 8/2/2012

No comments:

Post a Comment