Thursday, February 2, 2012

हेडफोनच्या अतिवापराचे धोके लक्षात घ्यायला हवेत

     
     हेडफोनचा आणखी एक बळी मुंबईत गेला. हेडफोन लावून रूळ ओलांडणार्‍या सौरभ ओमप्रकाश पेंडकर (२0, रा. चेंबूर) या महाविद्यालयीन तरुणाला पुष्पक एक्स्प्रेसने कुर्ला स्थानकात उडविले. एक्स्प्रेस येत आहे बाजूला हो, हा प्रवाशांचा आवाज हेडफोनमुळे त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. काही दिवसांपूर्वी  गाझियाबादमध्येही अशीच घटना घडली. एका तरुणाला  रेल्वे रूळ ओलांडताना हेडफोनवर गाणी ऐकत असल्यामुळे रेल्वे येत असल्याचा आवाज आला नाही. त्यामुळे त्या दुर्दैवी अपघातात तो मरण पावला.
     कानाला हेडफोन लावून गाणे ऐकणारे तरुण हे महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये, वाहनांमध्ये  हमखास दिसतात. आजकाल मोबाइलप्रमाणेच सध्या हेडफोनही तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. वाहनांमधून प्रवास करताना, गाडी चालवताना, जेवताना इतकेच काय तर अगदी अभ्यास करतानासुद्धा हेडफोनवर गाणी ऐकण्याचा मोह तरुणांना आवरत नाही. पण या सवयीमुळे अनेक शारीरिक, मानसिक आजार तर जडतातच, पण त्याचबरोबर यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचेही समोर आले आहे. याचा परिणाम  अनेकदा हा छंदच जीवघेणा ठरत आहे. वरील दुर्दैवी घटना याची साक्ष आहे.  
     शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयातील तरुणांपर्यंत सर्वांना अशाप्रकारची सवय लागली आहे. कुटुंबातील कमी होत चाललेला संवाद आणि त्यामुळे मुलांमध्ये वाढलेला एकाकीपणा या सतत कानाला हेडफोन लावण्याच्या सवयीला कारणीभूत गोष्टी आहेत, असे म्हणायला हवे.  भावनांना वाट करून देण्यासाठीचे माध्यम म्हणून मुले याकडे सहज वळतात, असे काही मानसोपचार तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. प्रत्यक्ष भेटून बोलण्यापेक्षा मोबाइलवर बोलणे सुरू झाल्याने अनेकदा मोबाइलवर तासभरही संवाद चालतो. त्यात एकावेळी अनेक कामे करण्याच्या सोयीमुळे हे हेडफोन गरजेचे बनले आहेत.      दररोज दोन दोन तासाहून अधिक हेडफोनचा वापर करणे शारीरिक आणि मानसिक आजाराला निमंत्रण असल्याचेही  मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. कमी ऐकू येणे, दुसर्‍याने उच्चारलेला शब्द व्यवस्थित ऐकू न येणे, अशा तक्रारी असणार्‍या रुण्गांची संख्या वाढत आहे. तासंतास फोनवर बोलल्यामुळे किंवा जास्त काळ डीजेच्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे कानांच्या पेशींची कार्यक्षमता कमी झाल्यास कायमचा बहिरेपणा येऊ शकतो,असे डॉक्टर मंडळी सांगताना दिसतात. याचा मानसिक इफेक्टही मोठा धोकादायक आहे. 
     हेडफोनचा वापर हा आता सवयीचा भाग बनल्याचे तरुण सांगत असले तरी पण हेडफोनवर गाणे ऐकताना जीवनातील परिस्थितीशी समान असे गाणे ऐकून भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जातो. पण या स्वप्नाच्या विश्वातून बाहेर येऊन वास्तविकतेचे भान ठेवणे गरजेचे आहे. गाडी चालवताना किंवा रस्त्यावरून चालताना मोबाइल आणि हेडफोनद्वारे गाणे ऐकत असल्याने सभोवतालच्या जगाचा विसर पडतो. त्यामुळे ही सवय अपघातास कारणीभूत ठरते. म्हणून किमान गाडी चालवताना किंवा रस्त्यावर चालताना तरी याचा वापर टाळणे आवश्यक आहे. हेडफोन हे अपघातांबरोबरच पिढीला भावनिक शून्यतेकडे नेण्याचे काम करतात. त्यामुळे हेडफोनचा वापर कमी प्रमाणात केला गेला पाहिजे.                            

No comments:

Post a Comment