देशाच्या अद्वितीय आणि अतुट अशा प्राकृतिक संपत्तीची व आदिवाशी जमातींच्या सर्वोपरी आश्रयाची अंगे असलेली भारतातील वने नामशेष होत चालली आहेत. देशातील 78 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्र वनाच्छादित असून, हे प्रमाण एकूण क्षेत्रफळाच्या 23.81 टक्के एवढे आहे. मात्र 2009 च्या तुलनेत 367 चौरस हेक्टरने वनक्षेत्र कमी झाले आहे. हे केंद्रीय वनखात्याच्या सर्वेक्षणातून अलिकडेच स्पष्ट झाले आहे आणि असाच वेग राहिला तर पुढच्या शंभर वर्षात दोन तृतीयांश वने नष्ट होऊन जातील. वनांच्या बेसुमार कत्तलीमुळे पर्यावरणाबरोबर सामाजिक आणि आर्थिक नुकसान होत आहे.
दहा वर्षापूर्वी देशात एकूण ७.८३ कोटी हेक्टर क्षेत्रावर वन होते. आता त्यात घट होऊन २३.८१ टक्के इतकेच राहिले आहे.वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने केलेल्या अतिक्रमणामुळे भारतातील वनक्षेत्र कमी होत आहे. जे ३३ टक्के असायला हवे होते. यामुळे वनांशी जोडल्या गेलेल्या २० कोटी लोकांच्या जिवीकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अर्थात फक्त आपल्याच देशात वनसंपत्ती नष्ट होत आहे असे नाही. जगभरात लोकसंख्या वेगाने वाढत आहे. आणि या वनाच्या माध्यमातून माणसे पैसा कमवायला असुसली आहेत. त्यामुळे वनक्षेत्र धोक्यात आले आहे. गेल्या दहा वर्षात वने नष्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आली आहे. ब्राझीलमध्ये १७ हजार. म्यानमारमध्ये ८ हजार, इंडोनेशियामध्ये १२ हजार, मेक्सिको ७ हजार, कोलंबिया ६ हजार ५००, थायलंड ६ हजार , जैरे ४ हजार आणि भारतात ४ हजार प्रति चौ. किमी या हिशोबाने वने नष्ट होत चालली आहेत. म्हणजे एका वर्षात २ लाख ४ हजार, अर्थात १७० लाख हेक्टर वनक्षेत्र संपुष्टात आले आहे. २०४० पर्यत १७ ते ३५ टक्के घनदाट वने संपुष्टात येतील. शिवाय वनातील २० ते ७५ ट्क्के दुर्मिळ जीवसृष्टी नष्ट होत जातील.
येणार्या १५ वर्षात वनांमधील १५ टक्के विविध वनस्पतीच्या प्रजाती लुप्त होऊन जातील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. वनांच्या या महाविनाशाला सगळ्यात मोठा फटका आपल्या देशाला सोसावे लागेल. कारण जैवविविधतेच्या दृष्टीने सगळ्यात समृद्ध असा देश कोणता असेल तर आपला भारत देश. आपल्या देशात कमालीची विविधता आहे. प्राकृतिक, भौगोलिक, हवामान आदी सर्व क्षेत्रात विविधता आहे. प्रकृतीच्या या अद्वितीय रचनेमुळे जगात जितक्या काही जीवजंतूच्या जाती आहेत, त्यापैकी ६४ टक्के दुर्मिळ वन्य जीव आणि ७ ट्क्के वनस्पती आजही एकट्या भारतात आहेत. शिवाय जागतिक वनाच्या तुलनेत भारतातल्या वनांवर १६ टक्के पेक्षासुद्धा अधिक लोकसंख्या अवलंबून आहे.
संपूर्ण जगभरात १ कोटीपेक्षा अधिक जीव आणि वनस्पतीच्या प्रजाती आढळून येतात. यापैकी आतापर्यंत १४ लाख जीवांची व वनस्पतींची परिचयसुची तयार करण्यात आली आहे. यापैकी तब्बल ५० ते ९० टक्के प्रजाती भारतात आढळून येतात. ही बाब भारताच्यादृष्टीने फार महत्त्वाची आहे. हे देशाचे वैभव आहे. अद्वितीय आणि अतुट अशी प्राकृतिक संपत्ती आहे. ही संपत्ती संवर्धन, वृद्धींगत करायची असेल तर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
No comments:
Post a Comment