कोट्टलगी नावाच्या गावात रामाप्पा आणि सोमाण्णा यांच्या झोपड्या शेजारी शेजारी होत्या. या दोघांमध्ये दाट मैत्री होती. दोघांच्या झोपड्यांदरम्यान एक पिंपळाचे झाड होते. झाडाखाली एक बसण्या-उठण्यासाठी पार होता. त्यांना जेव्हा केव्हा सवड मिळे, तेव्हा पारावर बसून दोघे गप्पा मारत असत.
एक दिवस दोघेही पारावर गप्पा मारत बसले होते. रामाप्पा म्हणाला," आपण एक ना एक दिवस श्रीमंत होऊ. तेव्हा छानसे बंगले बांधू. पण गड्या हे झाड आणि हा पार तोडायचा नाही. आपल्या बंगल्यांच्याही खिडक्या या दिशेने सोडू."
"रामू, खरेच असे करू. माझीसुद्धा हीच इच्छा आहे. पण एक काम करू. या मातीच्या पारावर संगमरवरी फरशा आणून बसवू. म्हणजे छान होईल. खर्चही फार येणार नाही. "
रामाप्पा यावर काही बोलणार इतक्यात त्याची पत्नी कपडे सुकवण्यासाठी बाहेर आली. ती म्हणाली," आरसा तुटलाय म्हटलं. नवीन आणायला सांगून दहा दिवस झाले .... इथे रिकाम्या चकाट्या पिटत बसण्यापेक्षा शहरात जाऊन आरसा तरी आणा."
" या काय तुला चकाट्या वाटतात? लक्ष्मी कुठल्या दिवशी घरी येईल सांगता येत नाही. आम्ही याच गोष्टी बोलत होतो. ..." रामाप्पा समजावणीच्या स्वरात म्हणाला. त्याचवेळी सोमाण्णाची पत्नीसुद्धा खरकटे टाकण्यासाठी बाहेर आली. ती आपल्या पतीला म्हणाली," किती दिवस झाले सांगतेय, उंदीर पकडायचा पिंजरा आणा म्हणून ! पण तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्याल तर शपथ्थ! उंदीर किती माजलेत बघा. "
दोघांच्याही बायका घरात गेल्या. रोजची कटकट बंद करावी म्हणून दोघेही शहरात जायला निघाले. शहरात जाण्यासाठी त्यांना जंगलातून जावे लागे. अंधार होण्याच्या आत गावात पोहचू, या उमेदीने ते भरभर चालायला लागले. पण जंगलाच्या मध्यापर्यंत गेल्यावर अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. धड पुढे जाता येत नव्हते, धड मागे!नाईलाज म्हणून ते एका चिंचेच्या झाडाखाली उभे राहिले. इतक्यात कोठे तरी वीज पडली. आणि मोठाचा आवाज झाला. रामाप्पा घाबरून गट्ट झाला. म्हणाला," आरसा आणि पिंजर्याच्या भानगडीत आपण भलत्याच ठिकाणी अडकलो. सोमू, आपण या जंगलातून सुखरूप जाऊ शकू का रे?"
" घाबरू नकोस. पाऊस थांबेल. रात्र झाली तरी काही हरकत नाही. आपण सुखरूप घरी जाऊ. हे तर नावालाच जंगल आहे. इथे कुठले आलेत वाघ आणि सिंह! " सोमाण्णा म्हणाला. पाऊस थांबायला मध्यान्ह रात्र उलटली. गार वारा अंगाला झोंबत होता. दोघेही माघारी जाऊ लागले. थोडे अंतर चालून गेल्यावर त्यांना दोन हडळी वडाच्या पारंब्यावर झोके खेळताना दिसल्या. त्या जोरजोरात फिदीफिदी हसत होत्या.
घाबरून दोघेही त्यांची नजर चुकवून चालू लागले, पण तेवढ्यात दोघींनी त्यांना पाहिले. त्यातली एक हडळ बुटकी होती तर एक उंच सडपातळ होती. हडळी टाळी वाजवून म्हणाल्या," घाबरू नका. इकडे या."
दोघेही घाबरून लटलट कापत हडळींसमोर उभे राहिले. उंच हडळ म्हणाली," तुमच्या दोघांची लग्ने झालीत का?" रामाप्पा मनातल्या मनात म्हणाला, हा काय प्रश्न झाला? पण स्वतः ला सावरत म्हणाला," हो, झालंय. म्हणून तर आम्ही इथे अडकलोय. पत्नींच्या विरोधात काही बोलायची सोय राहिलेली नाही. विरोधात काही बोलता आले नाही म्हणून शहरात जायला निघालो होतो. आणि ... " त्याने संपूर्ण किस्सा सांगितला.
किस्सा ऐकल्यावर बुटकी हडळ म्हणाली, " तुम्ही तुमच्या बायकांना पसंद करता का फक्त घाबरता?" रामाप्पा आणि सोमाण्णा म्हणाले," पसंद करतो आणि घाबरतोही." "खूप वर्षांपासून आम्हाला तुमच्यासारख्या माणसांची वाट पाहात होतो. आता आम्ही सांगतो तसे वागायचं." रामाप्पाने विचारले," पण आम्हाला त्याचा काय फायदा?"
दोघी आपापसात काही तरी पुटपुट्ल्या आणि म्हणाल्या," आम्ही सांगू तसे वागलात तर तुम्हाला एकेक सोन्याची मोहर देऊ. पण उद्या पून्हा याचवेळेला येऊन आम्हाला सांगा, तुमच्या बायका तुमच्याशी कशा वागल्या ते! " सोन्याच्या मोहरा म्हटल्यावर दोघेही आनंदून गेले. म्हणाले," बोला, आम्हाला काय करावं लागेल ?" हडळींनी त्यांना काय करायचे ते सांगितले. वर म्हणाल्या," पून्हा त्यांना काही बोलू नका. जा आणि उद्या रात्री याच ठिकाणी परत या."
रामाप्पा आणि सोमाण्णा दोघेही हडळींविषयी बोलत - चालत पहाटे पहाटे घरी परतले. दरवाजा ठोठावला. रामाप्पाच्या पत्नीने विचारलं," रिकमेच आलात? आरसा कोठे आहे?" रामाप्पा काही न बोलताच तिला बाजूला सारून आत गेला. " वेडबिड लागलं की काय?" असे बोलून तिने जोराच दरवाजा बंद केला.
इकडे सोमाण्णाच्या पत्नीनेही, पती रिकामे हात हलवत परतल्याचे पाहून विचारले," पिंजरा कुठाय?" सोमाण्णा न बोलता तिचा खांद्याला धक्का मारून आत गेला. सोमाण्णाच्या पत्नीला आश्चर्य वाटले. थोडावेळ ती नि:स्तब्ध उभी राहिली व म्हणाली," हडळीनं पछाडलंय की काय यांना?"
दुसर्यादिवशी मध्यरात्री दोघेही जंगलात आले. त्यांनी आपण काय केलं आणि पत्नींनी आपल्याशी कसा व्यवहार केला, या सगळ्या गोष्टी हडळींना सांगितल्या. त्यांची उत्तरे ऐकून त्या खो खो हसत सुटल्या. वडाच्या बुंद्याला एक छिद्र होते. त्यातल्या दोन मोहरा काढून दिल्या. मोहरा घेऊन खूश होऊन माघारी चालले. तेवढ्यात हडळी म्हणाल्या," थांबा! तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे. स्वतः ला वाईट वाटून घेऊ नका. आम्ही खट्याळ हडळी आहोत. आम्हाला फक्त गंमत पाहायला आवडते. आणि ... तुम्हाला आणखी मोहरा पाहिजेत ना?"
" पाहिजेत तर..! उद्या सकाळपर्यंत मला लक्षाधीश व्हायला आवडेल." रामाप्पा म्हणाला. " मला तर उद्याची वाटच पाहायची नाही, आताच मला कोट्याधीश व्हायचं आहे." सोमाण्णा खिशातली मोहर हातात घेत म्हणाला. त्यांच्या बोलण्यावर खळाळून हसत हडळी म्हणाल्या," इच्छा करणं काही वाईट नाही. पण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या जंगलातील चंदन तोडाल. नाही तर हकनाक तुरुंगाची हवा खाल. आम्ही सांगतो तसे करा. आणि काय घडेल ते आम्हाला सांगा." जाताना त्यांनी पत्नींशी कसा व्यवहार करायचा ते सांगितले.
रात्री घरी आल्यावर दोघेही त्यांच्या बायकांवर भडकले आणि म्हणाले," तुमचं नशीब फुटकं आहे. आमच्या अंगात लाखो रुपये कमावण्याची ताकद आहे. पण तुमच्यामुळे आम्हाला पाच रुपयेसुद्धा मिळेनासे झाले आहेत. तुम्हाला थोडी जरी लाज शरम असती तर माहेरी निघून गेला असता."
यावर दोघांच्याही पत्नी काही बोलल्या नाहीत. त्यांनी मौनव्रत धारण केलं. दुसर्यादिवशी दोघेही हडळींकडे गेले. म्हणाले," आम्ही आमच्या पत्नींना घरातून जायला सांगितले, पण तरीही गेल्या नाहीत की काही बोलल्या नाहीत. आम्हालाच त्यांच्या वागण्याचे मोठे आश्चर्य वाटत आहे."
हडळींना त्यांच्या बोलण्यावर मोठमोठ्याने हसावंस वाटत होतं, पण ऐकून त्या भलत्याच निराश झाल्या. आणि संतापाने म्हणाल्या," शी... काय ह्या बायका तरी! बायक्या म्हणवून घेण्याच्या लायकीच्या तरी आहेत का? आमच्या पतींनी असे म्हटल्यावर आम्ही पटकन जाऊन विहीरीत उड्या घेतल्या. आणि आम्ही हडळी झालो. तुमच्या दोघांच्या बायका मोठ्या सहनशील आणि जिद्दी दिसतात."
" नुसत्या सहनशील नव्हे तर दुसर्यांच्या नवर्यांचे कान फुंकणार्यांना चांगली अद्दल घडविणार्याही आहोत." आवाज ऐकातच चौघेही चपापून आवाजाच्या दिशेने पाहू लागले. आपल्या पतींविषयी जाणून घेण्यासाठी रामाप्पा व सोमाण्णा यांच्या पत्नी त्यांचा पाठलाग करत करत आल्या होत्या. आता त्यांना कळले की आपल्या पतींमध्ये हा बदल कोणांमुळे घडला आहे तो! सोबत आणलेल्या लिंबाच्या ओल्या फोक घेऊन त्या हडळींना मारायला धावल्या. हडळी आरडाओरडा करत माकडासारखे झाडावर उड्या मारू लागल्या आणि थोड्या वेळाने अदृश्य झाल्या.
आश्चर्याने पाहत असलेले रामाप्पा व सोमाण्णा पत्नींना म्हणाले," आता खूप झालं. चला मुकाट्याने घरी." दोघांनीही ओळखलं होतं की आता काही आपली धडगत नाही. निंबाची ओली फोक आपल्या अंगावर उमटू नये म्हणून ते आपल्या पत्नींना म्हणाले," थांबा, कदाचित हडळींनी झाडाच्या छिद्रामध्ये मोहरा ठेवल्या असतील." असे म्हणून त्यांनी त्या छिद्रात हात घातला आणि काय आश्चर्य! त्यातून खूप अशा मोहरा निघाल्या. घरी येताना दोघांनीही मोहरा वाटून घेतल्या. नंतर त्यांनी छानसे बंगले बांधले. आणि ठरल्यानुसार पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या पारावर आपल्या संगमरवरी फरशा बसविल्या. आणि पत्नींसोबत आरामात राहू लागले.
खुपच छान लिहिले आहे
ReplyDeleteमाझ्या साईटचा पत्ता:
१)संपुर्ण मराठी फेसबुक http://www.marathifanbook.com
२) http://www.prashantredkarsobat.in
685940
ReplyDelete685940
ReplyDelete