Tuesday, August 18, 2015

दवंडी पिटवणे : कला लोप पावली


     काळाच्या ओघात आणि आधुनिक माध्यमांच्या अंगिकारामुळे अनेक पारंपारिक कला लोप पावत चालल्या आहेत. अशातलीच एक कला म्हणजे दवंडी पिटवणे! आजच्या मोबाईल, एसएमएस आणि ई-मेलच्या जमान्यात ही कला पुरती लोप पावली आहे.
      पूर्वीच्या काळी गावात एखादी महत्त्वाची गोष्ट ग्रामस्थांसमोर आणायची झाल्यास ती दवंडीच्या माध्यमातून पोहचवली जायची. साधारणत: गावातल्या सार्वजनिक मालमत्तेचा लिलाव असो अथवा पंचांसमोर आलेला भांडणाचा, वादाचा न्यायनिवाडा असो किंवा बैठका असोत यासाठी गावातल्या सरपंचांकडून दवंडीचा मजकूर दिला जात असे. यात विषय, एकत्र जमण्याचे ठिकाण , तारीख आणि वेळ यांचा समावेश असायचा.
      दवंडी पिटवणारा गावातल्या मुख्य ठिकाणी जाऊन दवंडीद्वारे त्याची कल्पना गावातल्या लोकांना द्यायचा. ही दवंडी देण्याची एक लकब होती. हातातल्या डफावर जोरजोराने थाप मारीत तो तोंडाने ऐका हो ऐका... अशी आरोळी ठोकायचा. लोक आपला कामधंदा सोडून त्याच्याभोवतीने उभे राहायचे. बर्‍यापैकी लोक जमले की तो त्याला दिलेला मजकूर मोठ्या आवाजात सांगायचा. त्यावळचे तराळ विशेषत: शिकलेले नसायचे. केवळ लक्षात ठेवून ते आपल्याला सांगितलेला मजकूर पक्का लक्षात ठेवून सांगायचे.
      परंतु, काळ बदलला. भौतिक साधने आली. कामाच्या पद्धती बदल्या, तशा अशा पारंपारिक कलांनाही कालबाह्य व्हावं लागलं. आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. ज्याला लिहिता-वाचता येत नाही, अशा लोकांकडेही मोबाईल आला आहे. एकादे-दोन क्रमांक लक्षात ठेवले की, हा फोन कोणाचा आहे, असे लोक सांगू शकतात. सत्तेचे विकेंद्रीकरण होत चालल्याने ग्रामपंचायतीला आणि शिपायांनाही मोठा भाव आला आहे. ही मंडळी आता मोबाईलवरच सगळे संदेश देऊ लागले आहेत. निरक्षर महिला सदस्या असली तरी तिच्या घरात कोणी ना कोणी शिकलेला असतो. त्यामुळे मजकूर कळवून घ्यायला फारसा वेळ लागत नाही.
      सध्या तर गावागावात, चावडीवर संगणक आला आहे. त्यासाठी खास ऑपरेटरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यात आता ई-मेलचीही भर पडली आहे. भौतिक सुखाची साधनं, माहिती देणारी टीव्ही, वृत्तपत्रांसारखी माध्यमं  घराघरात पोहचली असल्याने लोकांना गावात काय नवीन आहे, याची कल्पना येत आहे. काही महत्त्वाच्या घटना असल्या तरच लोक गावचावडीवर जमा होतात, अन्यथा आपापल्या कामात गुंतून राहतात. साहजिकच दवंडी देणार्‍याची गरजच उरली नाही. नोटीसा वेगैरे द्यायच्या असतील तर शिपाई किंवा कोतवाल ही कामे पाहत आहेत.




 

सजग तरुणाईला हवीय प्रतिष्ठा आणि स्थैर्य

     लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच यंदा पहिल्यांदाच युवा वर्ग मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहे. त्यांच्यात कमालीचा उत्साहही  दिसतो आहे. त्यांचा उत्साह कुणाला तारक आणि मारक ठरणार हे काही दिवसांत कळणार असले तरी त्यांची मने जाणून घेणे, राजकारण्यांना आवश्यक आहे. वास्तविक त्यांच्या निर्णयावरच देशातले  राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. देशभरात पसरलेले राजकीय अराजक , बिघडलेली सामाजिक परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे काहीसा अस्वस्थ झालेला आजचा तरुण वर्ग काही तरी चांगले घडण्याच्या  आणि घडविण्याच्या अपेक्षेत आहे.
      आजचा तरुण हुशार आहे. त्याला परिस्थितीची जाण आहे. त्याला भ्रष्टाचार समूळ नष्ट करावयाचा आहे, देशातली बेरोजगारी मिटावी, असे त्याला कळकलीने वाटते आहे. आज समाजात वावरताना महिला सुरक्षित नाहीत, याची त्याला जाणीव आहे आणि त्यांना सुरक्षितता  मिळावी असे वाटते आहे.याशिवाय आपल्या देशाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढावे, अशा खूपशा अपेक्षा त्यांना आहेत. याचे मूळ देशातल्या व्यवस्थेत आहे. त्या व्यवस्थेत अमूलाग्र बदल व्हावा आणि यासाठी राजकीय व्यवस्था बदलायला हवी, हे आता आजच्या तरुण वर्गाला उमलले आहे.
      अलिकडच्या  काळात अनेक घोटाळे उघडकीस आले. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले आहे. आणि ज्यांना देशाच्या उन्नतीसाठी कायदे करण्यासाठी संसदेत वा विधिमंडळतात पाठवले, त्याच लोकांनी सभागृहाच्या शिष्टाचाराला काळिमा फासला. के सगळे ही तरुणाई पाहात आली आहे. वाढती गरिबी, चोरी-दरोडे, आर्थिक फसवणुकी प्रकार हे चित्र देशाच्या प्रतिष्ठेला घातक आहे, याची जाण त्यांना आहे.
 हे  सगळे घडत असताना आजचा तरुण वर्ग घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वावरतो आहे. त्याला जागतिकीकरणाची आस आहे, त्यात तो स्वत: ला सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याबरोबरच तो सामाजिक, राजकीय स्थितीबद्दल जागरूकही आहे. आजच्या नव्या तंत्र ज्ञानाला त्याने आपलेसे केले आहे. स्वत: त्याच्याशी जोडून घेतले आहे. तो सतत माहिती आणि ज्ञानाविषयी अपडेट राहत आहे. हे सगळे खरे असले तरी त्यांच्यात भरकटलेपणाही जाणवतो आहे. पहिल्यासारखे पुढार्‍यांच्या मागे लागून केवळ दारू आणि मटण त्याला नको आहे. त्याला स्वत: एक इमेज बनवायची आहे. मात्र यासाठी तो उतावळा आहे. आपण लवकरात लवकर सेटल व्हायला हवं, म्हणून सतत धडपडत आहे. आणि यातच त्याची चूक होते आहे. संधीसाधू लोक याचाच फायदा घेतात. आजचा तरुण त्यात फसत चालला आहे.
       आजचा तरुण आपली मते पटकन जाहीर करतो. त्याला विस्तृत विचार करावासा वाटत नाही.सोशल मिडियावरची त्यांची मतं त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे जाणवून देतात. सव्वाशे कोटीच्या देशात जादूची कांडी फिरवावी, तसा लगेच काही चमत्कार घडणार नाही, मात्र त्यांचा ही माजलेली आराजकता घालवण्याप्रती किती चीड आहे, हे त्यांच्या उत्साहावरून जाणवते आहे. हा उत्साह चांगलाच आहे, परंतु, त्याबरोबर विचाराची, आणि शांतपणे मते मांडण्याचीही आवश्यकता आहे.
      तरुणाईला  विकास हवाय. हा विकास समाजकारणातून यायला हवा. केवळ सवंग लोकप्रियता मिळवून राजकारण कराणारा नेता त्यांना नको असला तरी तरुणाईला अती घाईही महागात पडणार आहे. आजचा तरुण विचारी आहे, हे खरे आहे, मात्र त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी झाला आहे. आज जे काही आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. चोर्‍या-मार्‍या होत आहेत, यात तरुण पिढीच आहे. स्त्रिया किंवा तरुणींवर जे अत्याचार होत आहेत, त्यात आजची तरुणाईच आहे. असल्या प्रवृतींना खतपाणी घालणार्‍यांना पहिल्यांदा करा. जे या जाळ्यात अडकले आहेत, त्यांचे मत परिवर्तन करा.
      आजच्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही या तरुणाईची मते जाणून घ्यायला हवीत. ही तरुण पिढी आता केवळ दारू-मटणाला भूलणारी नाही. त्यांना सर्वच दृष्टीने स्थैर्य हवे आहे. त्यांना रोजगार हवाय. त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते देण्याचे काम राजकीय पक्षांनी, नेते म्हणवणार्‍यांनी करणं गरजेचं आहे.  तरुणाईची मते जाणून घेण्याची संधी या निवडणुकीद्वारे मिळणार आहे. ही संधी दवडली तर  तरुणाई त्यांना माफ करणार नाही.     
 

महिला नेतृत्व असमानता; भारताच्या माथी लागलेला कलंक


      सोळाव्या लोकसभेच्या स्थापनेसाठी चाललेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान राजकारणातल्या महिलांच्या सहभागाबाबतच्या चर्चेला सध्या उधाण आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका सर्व्हेक्षणामुळे तर त्याबाबतची हवा आणखीणच गरम झाली आहे. या सर्व्हेक्षणानुसार राजकारणात महिलांना नेतृत्व देण्याच्याबाबतीत भारत फारच पिछाडीवर असल्याचे दिसून येते. सध्याच्या संसदेतील महिलांच्या संख्येच्या आधारावर जगातल्या देशांची एक रँक निश्‍चित करण्यात आली आहे. 189 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक 111 वा आहे. संयुक्त राष्ट्राची भागिदार म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंतर संसदीय संघ (आयपीयू) संस्थेने आपल्या दरवर्षाच्या रिपोर्टनुसार एक रँक बनवली आहे. यात जगातल्या 189 देशांचा समावेश आहे. आपल्या देशातल्या महिलांच्या संसदीय प्रतिनिधींच्या संख्येनुसार देश महिला समानतेबाबत किती मागासलेला आहे, याची प्रचिती येते.   देशातल्या  545 खासदारांच्या लोकसभेत महिला खासदारांच्या संख्येचे प्रमाण 11.4 टक्के आहे. तर  राज्यसभेत हेच प्रमाण फक्त 10.6 आहे. संसदेतले वैश्‍विक स्तरावरील हेच प्रमाण 22 टक्के इतके आहे. अलिकडच्या काळात विश्‍व  स्तरावर संसदेतले महिलांच्या सहभागाचे प्रमाण 1.5 ने वाढले असल्याचे सव्हेक्षण सांगते, हे जरी खरे असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात  मात्र आपल्या देशातले आकडे वेगळेच बोलतात. 4896  खासदार आणि आमदार असलेल्या आपल्या भारतात फक्त 418 महिला  खासदार आणि आमदार आहेत. म्हणजे हे प्रमाण फक्त 9 टक्के इतके आहे.  1952 च्या पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या फक्त 20 होती.  ती 15 व्या लोकसभेपर्यंत येता येता 59 पर्यंत पोहचली. आतापर्यंतच्या वाढत चाललेल्या लोकसंख्येच्या प्रमाणात ही आकडेवारी फारच दीनवाणी आहे. गेल्या सहा दशकांमध्ये महिला खासदारांचे प्रमाण 4.1 पासून 10.9 पर्यंत पोहचले आहे. या नुसार वैश्‍विक स्तराशी तुलना केल्यावर तर आपला देश फारच मागे असल्याचे दिसून येते. आयपीयूच्या यादीत असलेला रवांडा नावाचा छोटासा देश याबाबतीत अग्रस्थानावर आहे. तिथल्या संसदेत 60 टक्के महिला आहेत. हेच प्रमाण अमेरिकेत 20,कॅनडा 29.6, फ्रान्स 22.5 आणि नॉर्वेमध्ये 39.6 इतके आहे.
      आपल्या देशातल्या मतदान प्रक्रियेत जवळजवळ निम्म्याने महिलांचा सहभाग आहे, परंतु राजकारणातला सहभाग त्या प्रमाणात नाही, हे मोठे दुर्दैवी आहे.  संसद किंवा विधीमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक 1996 पासून लटकलेले आहे. राजकारणात महिलांना समान अधिकार देण्याबाबतच्या मुद्द्यावर आपला विचार किती कूपमंडुकीय आहे, हेच दर्शविते. बांगलादेश, चीन, पाकिस्तान, आफगाणिस्तान, इटली आणि इराकसह जगभरातल्या शंभराहून अधिक संसदीय सभागृहांमध्ये महिलांसाठी कुठल्या कुठल्या प्रमाणात आरक्षण आहे. आपल्या देशात 1996 पासून लोकसभेच्या स्थापनेचे  पाच-सहा टप्पे उलटले. पंधरावी लोकसभाही विसर्जित होतेय, तरीही  महिलांसाठीच्या 33 टक्क्याच्या आरक्षणाचे विधेयक काही पारित हो ऊ शकले नाही.
       काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाने महिलांची भागिदारी असलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपन्यांचे सर्व्हेक्षण केले होते. तिथल्या आर्थिक घडामोडींचा अभ्यास केला होता.  त्यातले निष्कर्ष महिलांसाठी मोठे उत्साहवर्धक आहेत. या कंपन्यांशी संबंधीत असलेल्या गुंतवणूकधारकांना 53 टक्के लाभांश आणि 24 टक्क्यांहून  अधिक विक्रीचा लाभ मिळालेला होता. याच धर्तीवर विचार केला तर आपल्या लक्षात ये ईल की, ज्या देशाच्या संसदीय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक, त्या देशाची प्रगती  वाखाणण्यासारखी आहे. आपल्या देशातही आता ती वेळ आली आहे.  देशातल्या राजकारण्यांनी किंवा नेतृत्वांनी महिलांविषयीचे धोरण उदार ठेवण्याची गरज आहे.  आज आपल्या देशातल्या एकूण मतदारांपैकी निम्मी संख्या महिलांची आहे. तरीही देशातल्या राजकारणात महिलांचे नेतृत्व कमकूवत होत चालले आहे. सध्या देश निवडणुकीला सामोरा जात आहे. राजकीय पक्षांनी महिलांना पुढे आणण्याच्यादृष्टीकोनातून पावले उचलण्याची गरज आहे.  संसदेत महिलांसाठी  प्रतिनिधीत्व वाढवून वैश्‍विक स्तरावर भारताच्या माथी लागलेला महिला असमानतेचा कलंक पुसून टाकण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी, पक्ष नेतृत्वांनी पुढे यायला हवे.

पेपरवाला पोर्‍या: सकाळी सकाळी प्रकाश दाखवणारा

     सकाळी ठरल्या वेळेत पेपर आला नाही तर मन अस्वस्थ व्हायला होतं. काही तरी हरवल्यासारखं, राहून गेल्यासारखं होतं. कित्येकदा वृत्तपत्रात वाचण्यासारखं नवीन असं काही नसतंच. टीव्ही, इंटरनेटच्या आजच्या जमान्यात सगळंच अगोदर कळतं. परंतु तरीदेखील वृत्तपत्र वाचण्याची तल्लफ काही जात नाही. तीदेखील एक नशा आहे. दारुड्याला, मावा-गुटखा खाणार्‍याला विचारा, तल्लफ काय असते ती! वृत्तपत्र वाचण्याचीही एक तल्लफ आहे. त्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. अर्थात ती ठरल्या वेळेला मिळायला हवी.    सकाळच्या चहा किंवा नाष्टाबरोबर वृत्तपत्र नसेल तर चहा, नाष्टाचा स्वाददेखील बेचव लागतो. ऋतु कोणताही असो, पावसाळा असो की हिवाळा. पेपरवाला ठरल्यावेळी हमखास येतो. कितीही विपरीत वातावरण असलं तरी त्याचं आगमन त्याच्या निष्ठेला, त्याच्या जबाबदारीला आपलं मन सलाम करायला उठतं.
      जवळजवळ सगळीचं वृत्तपत्रं रात्री उशिराच प्रेसमधून बाहेर पडलेली असतात. आता नव्या तंत्रज्ञानामुळं काही वृत्तपत्रांनी पुरवण्यादेखील नेहमीच्या अंकात समाविष्ठ करून देतात. या अगोदर स्थानिक पुरवण्या, विशेषांक, रविवारसह अन्य विषयांवरच्या पुरवण्या पेपरवाल्या मुलालाच घालाव्या लागत होत्या. अजूनही काही वृत्तपत्र पुरवण्या स्वतंत्ररित्या देतात, तेव्हा या मुलांची दमछाक होते. काही स्थानिक लोक वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा खर्च परवड्त नाही, म्हणून आपल्या संस्थेच्या जाहिरातीच्या पॉंम्लेट वृत्तपत्रात घालायला देतात. चार पैशाच्या आशेपायी ही मुलं तीदेखील कामं न कुरकुरता करतात. ही मुलं आपली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडताना दिसतात.या मुलांचा दिवस पहाटेलाच सुरू होतो. 
      एका मुलाकडे अनेक वृत्तपत्रांची चळत असते. एजंट किंवा मालक आपलं काम करीत असतात. मात्र खरं काम या पेपर वाटणार्‍या मुलांचं आहे. पोस्टमनसारखं जाण्या-येण्याचा एरिया ठरवून त्या विविध वृत्तपत्रांची मांडणी करून सायकलच्या मागच्या कॅरेजला लावतो किंवा पिशवीत सरकावतो. आणि अनेक बातम्यांचं ओझं घेऊन तो सायकलला टांग मारतो. वृत्तपत्रात काय छापलं आहे, हे त्याच्या खिजगणीतही नसतं. ॠायकल चालवता चालवता मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच विचार घुमत असतो. कुणाला कोणतं वृत्तपत्रं द्यायचं आहे, कुणाकडे किती महिन्याचं बील बाकी आहे. तू रोज पेपर टाकत नाहीस, तुला मिळणार नाही, असे ओरडणारी अन्नू आँटीचं काय करायचं. असे एक ना अनेक सवाल, प्रश्‍न  त्याच्या डोक्यात फिरत असतात. टसगल प्लोर घरांमध्ये पेपर वाटणं सोपं असतं, सायकलवर बसल्या-बसल्या पेपर फेकता येतो. पण डबल फ्लोर घरांमध्ये पेपर टाकायचं म्हणजे सायकलला स्टँड लावून वरपर्यंत जावं लागतं. कधी सायकल पडते, मग पुन्हा चळत बांधावी लागते. पहाटेच्यावेळी कुत्र्यांच्या हमला असतोच. कधी कधी पेपरच्या गाड्या वेळेत येत नाहीत. कधी एका वृत्तपत्राची गाडी आलेली असते, तर दुसर्‍या वृत्तपत्राची नाहीच.त्याच्यासाठी मग थांबावं लागतं आणि कस्टमरच्या बोलल्या बोलण्याला सहन करावं लागतं. सारखं बोलून सारवासारव करावी लागते. लोकांना मात्र वेळच्यावेळी पेपर हवा असतो. एवढं सगळं झेलत तो रुटीन पार पाडत असतो.
      वर्षातले बारा महिने एकच काम. त्यात बदल असा नाहीच! मला वाटतं, या पेपरवाल्या पोरांशिवाय आणखी कोणाचं असं ताईट रुटीन नसणार आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाला वाटत असतं की, सगळ्यात अगोदर वृत्तपत्र आपल्याच हाती पडावं. मोठ्या शहरात तर हीच मुलं अगदी अचूक नेम धरल्यासारखे वृत्तपत्र खालून दुसर्‍या-तिसर्‍या फ्लोरवर टाकत असतात की, ते बरोबर हव्या त्या घरात किंवा दारासमोर जाऊन पडतं.
      सकाळचं वृत्तपत्र आणि त्याचा सुवास हवाहवासा वाटतो. ते हाती पडल्यावर धन्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या पचनक्रियेला खाद्य मिळाल्यासारखं वाटतं आणि तृप्ती झाल्याचंही समाधान वाटतं. सकाळी पेपर वाचायला नाही मिळाला तर दिवसाचा मूडदेखील बिघडून जातो. माझे काही वार्ताहर मित्र तर पहाटे पहाटेच पेपरची वाट पाहात स्टँडच्या एरियात  घुटमळताना पाहिली आहेत. त्यांना तर आपण दिलेली बातमी कशी लागली आहे आणि कुठे लावली आहे, हे पाहण्याची अतुरता असते. असं हे पेपरचं अनोखं वेड आहे.
      घरात आल्यावर मुलाला दिनविशेषचं पान हवं असतं किंवा क्रीडा पान. मुलीला आजचा मेनू काय दिलाय याची उत्सुकता. मग त्या मायलेकीच्या त्यावर गप्पा! सकाळी जरी सगळ्या पानांवर एकदा नजर फिरवली तरी समाधान होतं. नंतर त्या पेपरची पानं कुठे कुठे गेलीत, याची चिंता नसते. त्याची चिंता गृहकुट्उंबाला असते. त्यातून तिला महिन्याच्या रद्दीचे पैसे मिळत असतात. त्यामुळे तिचा पेपर वाचून (की चाळून) झाला की तो घडी घालून रद्दी ठेवण्याच्या जागी व्यवस्थित पडलेला असतो. नंतर दिवसभर त्याच्यकडे बघायचं झालं नसलं तरी दुसर्‍यादिवशीच्या वृत्तपत्राची वाट पाहतच असतो.

बालकथा - गाढव ते गाढवच

       मन्या घुबड उदास असायचा. जंगलात सगळ्यांचे मित्र होते.ते आपसात खेळायचे, हसायचे-खिदळायचे, हुंदडायचे, मिळून खाऊ खायचे. मिळून गाणी गायचे. मोठी धम्माल करायचे. मन्या घुबड मात्र बिलकूल एकटा असायचा. ना मित्र होते, ना नातेवाईक! झाडाच्या उंच फांदीवर आपल्या घरात एकटाच पडून राहायचा. जंगलातल्या दुसर्‍या लोकांना हसताना-खिदळताना पाहून त्याला आणखी वाईट वाटायचे.
       बिचार्‍यानं तरी काय करावं?सगळ्यांसोबत तो खेळू शकत नव्हता. कारण तो दिवसा झोपायचा. तो काही आपल्या मर्जीने झोपायचा नाही , तर निसर्गानंच त्याला असं बनवलं होतं. रात्री सगळे झोपी गेले की, तो जागा व्हायचा. त्यावेळी त्याला वाटायचं, आपणही फांद्या-फांद्यांवर उड्या माराव्यात, झाडाच्या उंच शेंड्यांवर जाऊन मोठ्या मोठ्यानं गावं. रात्रीच्या किर्र वातावरणात त्याचा गाण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या पक्ष्यांच्या घरांच्या बत्त्या उजळायच्या. खिडकीतून डोकी बाहेर काढून सगळे एका दमात ओरडायचे. कोण घुबड रात्रीचं किंचाळतंय?
      तो दबल्या आवाज म्हणायचा, मी घुबडच तर आहे!
 घुबड आहेस ना! मग  गपचिप पहारेदारीच काम कर! ओरडून आमची झोपमोड का करतोस?
 सगळ्यांची बोलणी खाऊन मन्या  आपल्या घरात येऊन गप्प पडायचा.
       एकदा रात्रीच्यावेळी मन्या आपल्या घरट्यात निपचिप पडला होता.रात्री त्याला कशाची भीती वाटत नसे. उलट अंधारात तो अगदी लांबच सहज पाहू शकत होता.त्यारात्री त्यानं पाहिलं की तिकडे लांब झाडं खूप कमी आहेत. आणि शहराकडं जाणारा रस्ताही दिसतो आहे. तिथे कोणी तरी होतं. तो गपचिप झाडावर बसला. पाच-दहा मिनिटे तशीच गेली. मन्या अजूनही तसाच बसला होता. आता मन्याच्या मनात कसलं तरी काहूर उठलं. कोण आहे? कशाला आला आहे? अगोदर असं काही घडलं नव्हतं.का कोणी शिकारी जाळं टाकून सकाळ होण्याची प्रतीक्षा करतो आहे? तो हळूच घराबाहेर आला. तो उडत उडत तिथल्या झाडावर जाऊन बसला. खाली वाकून पाहिल्यावर तो चकीत झाला. कोणी शिकारी-बिकारी नव्हता. गाढव होते.
  गाढव इथे कसे? मन्या पुटपुटला.
 मन्या सगळ्यात खालच्या फांदीवर आला. त्यानं गाढवाला विचारलं, तू इथे काय करतोयस?
 गाढव उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला इथेदेखील चैन पडत नाही.
      मन्यानं गाढवाकडं निरखून पाहिलं. गाढव खूप उदास दिसत होतं. थकल्यासारखा वाटत होता. त्याला गाढवाविषयी सहानुभूती वाटली. तो प्रेमाने म्हणाला, घाबरू नकोस. मी मन्या. वर पहा मी इथे बसलो आहे.तिकडे नव्हे, इकडे... अरे, बरोबर तुझ्या डोक्यावरच्या फांदीवर. आता सांग, कोण तुला शांतपणे जगू देत नाही.?
      गाढवाने भराभर आपल्या पापण्यांची उघडझाप केली आणि येणार्‍या अश्रूंना मोकळे. थोड्या वेळाने  म्हणाला, तुला काय सांगू? तू  तरी काय करशील?
      कोणाला तरी आपले दु: ख ऐकवले की, मन हलकं होतं... आणि तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस, तोपर्यंत मी तरी कशी मदत करणार बरं. तसं माझं नाव मन्या. मला आपला मित्र समझ.
      मित्र शब्द ऐकून गाढव खूश झाला. त्याने डोळे गोल गोल फिरवले. लांबसे कान मस्तपैकी हलवले. शेपटी त्याने कितीदा तरी आपटली.
 मला आतापर्यंत कोणी मित्र नव्हता. तू मित्र ना मग माझी परेशानी ऐक.
      गाढवाने सांगायला सुरुवात केली, गावात एक परीट होता. त्याने मला विकत घेतले. त्याच्याजवळ सार्‍या गावाचे कपडे धुवायला येत असत. मळकट कपडे माझावर लादून धुवायला घेऊन जात असे. धुतलेले ओले  कपडे पुन्हा माझ्यावर लादून गावात आणत असे.ओले कपडे घेऊन भरभर  चालू लागलो  नाही तर मला काठीने  पायांवर मारत  असे. ठीक आहे, मारलं तर मारलं . निदान जेवण तर चांगलं द्यावं की नाही? नाही! मला जेवण द्यायचं म्हणजे त्याच्या उरावर ये ई. भुकेमुळे मला रात्री धड झोपही यायची नाही. सकाळी पुन्हा काम सुरू.
      गाढवाने सांगितले, आज रात्री माझ्या खोपटाचा दरवाजा उघडा होता. मी निघून आलो. वाटेत हरभर्‍याचं शेत होतं. मन भरून खाल्लो. खूप मजा आली. मग इकडे आलो. बर्‍याच दिवसांनी पोटभर खाल्लो.
 अरे गड्या,  मीच  एकटा दु:खी आहे, असा समजत होतो. पण तुही दु:खी आहेस. आता  सांग, पुढं काय करायचं ठरवलं आहेस?
 अजून तरी कुठला विचार  केला नाही. परत जायचा तर प्रश्‍नच नाही. काय करू?
 तुला मित्र म्हटलंय तर काही तरी विचार करायलाच हवा. असं कर. आता तू इथे या झाडींच्या मागे झोप. मी विचार करतो. मग सांगेन.
       इथे परटाच्या लाठीची भीती नव्हती. गाढव झुडपाच्या पाठीमागे जाऊन डाराडूर झोपी गेला. दुसर्‍यादिवशी मन्या म्हणाला, मित्रा, काम तर करावंच लागेल. कामाशिवाय दोन-चार दिवस ठीक आहे, पण सारी जिंदगी कशी जगणार?  असं करू, काही दिवस तू इथे राहा. दिवसभर आपण दोघे झोपू. रात्री तू शेतात जाऊन पोटभर खाऊन येत जा. तोपर्यंत  तुझ्यसाठीच्या कामाचा बंदोबस्त करीन. जिथे काम कमी आणि राहण्या-खाण्यासाठी चांगली व्यवस्था असेल, तिथे तू जा. गाढवाला फार आनंद झाला. तीन-चार दिवस त्याने आरामात काढले. गाढव मस्त रमले. त्याची तब्येत अगदी टणटणीत झाली.
      पाचव्या दिवशी मन्या अगदी आनंदाने परतला. मित्रा, फार चांगली नोकरी  मिळाली आहे. उद्या तू कामावर जा. रात्री भेटायला येत जा.   इकडे परटाचे  गाढवावाचून सगळे काम बिघडले. त्याने गाढवाची शोधाशोध केली, पण गाढवाचा पत्ता काही लागला नाही. परीट आता त्याच्या शोधासाठी जंगलाच्या दिशेने येत होता.
      नोकरी मिळ्याल्याचे  ऐकून गाढवाला फार आनंद झाला.  आनंदातच तो उड्या मारु लागला.  आता त्या राक्षस परटापासून मुक्त झालो. आज तर मला गाणं गावंसं वाटू लागलं आहे. असे म्हणच तो आपल्या भसड्या आवाजात गायला लागला.  गप्प गप्प!  मन्या ओरडला. अरे, मोठ्याने ओरडू  नकोस. पण गाढव आपल्याच मस्तीत होता. तो जोरजोरात गातच होता.
 हे तर माझेच गाढव आहे. परटाने त्याला ओळखले.  आणि त्याला काठीने बडवत घराकडे घेऊन चालू लागला.  मन्याने  अफसोसपणे मान हलवली. आणि पुटपुटला, शेवटी गाढव ते गाढवच!
 

Wednesday, August 12, 2015

दप्तराच्या ओझ्याचा विचारचं का करायचा?

     
 मुलांच्या दप्तरांचं ओझं पालकांच्या, शिक्षकांच्या, शाळेच्या, समाजाच्या, मिडियाच्या,शासनाच्या चिंतेचा विषय ठरला आहे.न्यायालयानेही हा विषय मनावर घेतला आहे.  शासनाने हे ओझं कमी करण्याच्या कामी कमिटीही स्थापन केली आहे. त्यांच्या हालचाली चालू आहेत. हे सगळं चाललं असताना काही उपक्रमशील शिक्षकांनी आपापल्या परीनं मुलांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी उपक्रम राबवून हातभार लावत आहेत. शासनाकडे उपक्रम सादर करीत आहेत. आपणदेखील या कामी  हातभार लावावा, असे वाटल्याने मीदेखील  यादृष्टीने शिक्षक, पालक, शिक्षण अधिकारी चर्चा केली. त्यातून काही मुद्दे माझ्यापुढे आले, तेच मी इथे मांडत आहे.
     पूर्वी, अर्थात आमच्या वेळेला एक पाटी, एक पिशवी आणि एक-दोन पुस्तके या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नव्हतं. पुढे शिक्षणाचा प्रसार वाढला.शासनाने मोफत पाठ्यपुस्तके द्यायला सुरवात केली.पालकालाही आपल्या पाल्याला शिकवलं पाहिजे असे वाटायला लागले, त्याला हवी ती गरज पालक पुरवू लागले. खासगी शाळांचा पसारा वाढला, तसा दप्तराचा बोझ्यादेखील वाढला. मात्र ग्रामीण शाळांपेक्षा खासगी शाळांच्या मुलांच्या दप्तराचं ओझं अधिक आहे. मुलांच्या दप्तरात असतं तरी काय पाहू. सर्व विषयांची पुस्तकं,तितक्याचं वह्या,कंपासपेटी,प्रयोग वही, मार्गदशिका(गाईड),जेवणाचा डबा,पाण्याची बाटली, हवामानानुसार छत्री, रेनकोट किंवा छत्री, पी.टी. तासासाठीचे शर्ट-पँट याशिवाय नकळतचं बरंच काही.याच्यानं दप्तर फाटून आतल्या वस्तू बाहेर डोकावू लागल्या. आणि मुलं ती वागवत नेताना झुकू लागले.
      पण दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार केला असता, इतरांशी चर्चा केली असता दप्तराचं ओझं पुष्कळ म्हणजे पुष्कळचं कमी करता येणं शक्य आहे. आमच्या वेळेला आम्ही शिल्लक कोरी पानं काढू त्याचे पायडिंग करायचो. त्याचा विषयासाठी उपयोग करायचे. पण आता तसा उपयोग होताना दिसत नाही. त्याला खर्च योतो. लिहिताना अडचण येते. मुलांनादेखील ते आता आवडत नाही. पण वह्या कमी कशा करता येतील? याला एक उपाय आहे. 1)एक फाईल बनवावी. त्या फाईलमध्ये किमान (जितके  विषय आहेत तितके  ग्रहीत धरून) बारा कागद लावावेत. फाईलमधील कागदांचे विषयांप्रमाणे गट करावेत.प्रत्येक गटावर विषयांचे नाव, प्रकरणाचे नाव, त्याचा क्रमांक आणि तारीख टाकावी.
      2) शाळेला नेताना ही एकच फाईल न्यावी.शाळेत जे लेखन करायचे, ते या फाईलमधील विषयांनुरुप लावलेल्या कागदांमधे करावी. प्रकरण पूर्ण होईपर्यंत तो संच तसाच जवळ ठेवायचा.पूर्ण झाला की, तो पिन लावून वेगळा करायचा.
     3) प्रत्येक विषयांची स्वतंत्र फाईल घरी ठेवावी. फाईलीवर ठळक अक्षरात विषयाचं नाव मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहावे.प्रकरण किंवा धडा पूर्ण होई तोपर्यंत घरी आल्यावर शाळेत नेलेले कागद त्या त्या विषयाच्या फाईलीत लावावीत.यासाठी पालकांनी मुलांना थोडी फार मदत करावी. यामुळे वह्यांचं ओझं शून्यवत होईल.शेवटपर्यंत फक्त एकच फाईल न्यावी लागेल. घरी आल्यावर त्या त्या विषयांच्या फाईलला कागद लावताना आपोआपच उजळणी होईल.
वह्या आणि पुस्तकांचं ओझं कमी झालं की, दप्तर अगदी हलकं हलकं होईल. मग ओझ्याचा विचारच का करायचा?
     4) फाईली या प्लॅस्टिकच्या, हलक्या आणि आकर्षक वापराव्यात.
     5) पाठ्यपुस्तक मंडळाने दोन सत्रासाठी दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके बनवावीत. सध्या पहिली ते चौथीसाठी हा प्रयोग पाठ्यपुस्तक मंडळ वापरत आहे, मात्र बारावीपर्यंत हा प्रयोग राबवायला हवा.
     6) आरटीईनुसार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अनिवार्य आहे. शाळांनी फिल्टरचे पाणी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना घरून पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागणार  नाहीत. आठवीपर्यंत शालेय पोषण आहार शाळांमध्ये उपलब्ध आहे. पुढे हा पोषण आहार दहावीपर्यंत वाढवावा.त्यात आणखी सुधारणा केल्यास मुलांना घरून डबे आणावे लागणार नाहीत.यासाठी पालकांची पालकसभा घेऊन समजावून सांगावे. या गोष्टी पाळल्यास दप्तराचं ओझं वाटणार नाही.


Sunday, August 9, 2015

आम्ही लुटारु


   घटना एक:- राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवाने एका ट्रकचा अपघात झाला.बिचारे ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले.ट्रकमधला तांदुळ आणि डाळ रस्त्यावर इस्तत: पसरला.जवळच एक वस्ती होती.तिथल्या लोकांना अपघाताची वार्ता  कळली आणि त्यांनी पिशव्या भरभरुन डाळ आणि तांदुळ नेला.ड्रायव्हर, क्लिनर ओरडत होते. पण त्यांना त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता.
   घटना दोन:- शेंगदाण्याच्या तेलाचा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. तेल रस्त्यावरुन  वाहू लागलं.जवळच्या लोकांनी पातेलं, बादल्या भरभरुन तेल आपल्या घरी घेऊन गेले.वाटतं होतं,एवढ्यानं त्यांना सर्व काही मिळून गेलं.
   घटना तीन:- पेट्रोलने गच्च भरलेला टँकर समोरुन येणार्‍या वाहनावर जोरात आदळला.टँकर पलटी झाला. पेट्रोल वाहत जाऊन एका खड्ड्यात जमा झाले.  लोक पेट्रोल बादली बादलीने भरून घेऊ लागले. अक्षरश: लूट माजली. अचानक एका म्हातार्‍याला बीडी ओढण्याची तल्लप झाली. त्याने काडेपेटी पेटवली आणि मोठा स्फोट झाला. किती तरी माणसे आगीच्या लोटात सापडली. काही माणसे जळून मेली. कित्येक माणसे आगीत जखमी झाली.
    घटना चार:- रेल्वेत दरोडा पडला. आरडाओरडा माजला.वाचवणारे कमी आणि लुटणारे जास्त निघाले. लुटालुट झाली. प्रतिकार कारणार्‍यांची हाडे मोकळी केली. काहींना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले.काहींनी जीव मुठीत घेऊन जवळचे आहे ते देऊन टाकले.
    माफ करा. या सगळ्या घटना आपल्या देशातल्या आहेत. ज्या जनतेला आपण बिच्चारी म्हणतो , तीच जनता लुटारु निघाली. जनताच अशी लुटारु, दरोडेखोर निघाली असेल तर त्यांचा नेता म्हणवणारा कसा असेल? त्यांच्या नेत्यांकडून कोणती अपेक्षा करायची? जसे पुजारी असतात, तसे भगवान असणारच. म्हणतात कि, ज्या देवळातला पुजारी सज्जन असतो, त्या मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. इथले सगळेच लुटीत दंग आहेत. राजा आणि प्रजा. नेता दोन्ही हातांनी लुटत असतो, तेव्हा आपण हाय हाय म्हणून डोकं बडवून घेत असतो.परंतु, जनताच  लुटी करत असेल तर काय म्हणायचे?
    गर्दीचं एक आपलं मनोशास्त्र असतं.गर्दी विचार करत असते,जेव्हा सगळेच लुटतायेत , तेव्हा आपण का मागे राहायचे.सगळे नदीत कचरा वैगेरे टाकून नदी दुषित  करताहेत, तेव्हा आपल्या  एकट्याने घाण न टाकल्याने नदी थोडीच शुद्ध होणार आहे?  एका शिक्षकाला विचारलं,तेव्हा चांगलेच भडक ले. म्हणाले,तुम्हाला मी एकटाच दिसतोय का?सगळी यंत्रणाचा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे, तेव्हा फक्त शिक्षकांकडूनच कसली आशा बाळगता? आम्हीच का प्रामाणिक राहावं? आम्हादेखील मुलं-बाळं आहेत.
    हीच गोष्ट आम्ही कलमनवीसाला विचारली. तो उसळल्यासारखा म्हणाला,समाज सुधारण्याचा ठेका काय आम्हीच घेतला आहे? पुढार्‍याला विचारलंतर म्हणाला, आम्ही इमानदारीनं वागायला वागलो तर आमची दुकानदारी कशी चालेल? आम्हाला कोण विचारेल?
   चालले आहे तोपर्यंत चालू द्या. आपल्याला काय त्याचं. हीच गोष्ट सगळ्यांच्या तोंडी. मजेशीर गोष्ट अशी अशी की, जे लोक काचेच्या महालात राहतात, तेच लोक दुसर्‍याच्या घरावर दगड फेकताना दिसतात. लुटीच्या दर्येत सगळेच गटांगळ्या खाताहेत. बिचारे प्रामाणिक पाण्यात उतरायला धजावत नाहीत.कारण त्यांना वाटतंय,त्यांचे कपडे कोणी तरी उचलून नेईल. आणि आपल्या नागडं फिरावं लागेल, याची त्यांना धास्ती वाटतेय.