काळाच्या ओघात आणि आधुनिक माध्यमांच्या अंगिकारामुळे अनेक पारंपारिक कला लोप पावत चालल्या आहेत. अशातलीच एक कला म्हणजे दवंडी पिटवणे! आजच्या मोबाईल, एसएमएस आणि ई-मेलच्या जमान्यात ही कला पुरती लोप पावली आहे.
पूर्वीच्या काळी गावात एखादी महत्त्वाची गोष्ट ग्रामस्थांसमोर आणायची झाल्यास ती दवंडीच्या माध्यमातून पोहचवली जायची. साधारणत: गावातल्या सार्वजनिक मालमत्तेचा लिलाव असो अथवा पंचांसमोर आलेला भांडणाचा, वादाचा न्यायनिवाडा असो किंवा बैठका असोत यासाठी गावातल्या सरपंचांकडून दवंडीचा मजकूर दिला जात असे. यात विषय, एकत्र जमण्याचे ठिकाण , तारीख आणि वेळ यांचा समावेश असायचा.
दवंडी पिटवणारा गावातल्या मुख्य ठिकाणी जाऊन दवंडीद्वारे त्याची कल्पना गावातल्या लोकांना द्यायचा. ही दवंडी देण्याची एक लकब होती. हातातल्या डफावर जोरजोराने थाप मारीत तो तोंडाने ऐका हो ऐका... अशी आरोळी ठोकायचा. लोक आपला कामधंदा सोडून त्याच्याभोवतीने उभे राहायचे. बर्यापैकी लोक जमले की तो त्याला दिलेला मजकूर मोठ्या आवाजात सांगायचा. त्यावळचे तराळ विशेषत: शिकलेले नसायचे. केवळ लक्षात ठेवून ते आपल्याला सांगितलेला मजकूर पक्का लक्षात ठेवून सांगायचे.
परंतु, काळ बदलला. भौतिक साधने आली. कामाच्या पद्धती बदल्या, तशा अशा पारंपारिक कलांनाही कालबाह्य व्हावं लागलं. आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आला आहे. ज्याला लिहिता-वाचता येत नाही, अशा लोकांकडेही मोबाईल आला आहे. एकादे-दोन क्रमांक लक्षात ठेवले की, हा फोन कोणाचा आहे, असे लोक सांगू शकतात. सत्तेचे विकेंद्रीकरण होत चालल्याने ग्रामपंचायतीला आणि शिपायांनाही मोठा भाव आला आहे. ही मंडळी आता मोबाईलवरच सगळे संदेश देऊ लागले आहेत. निरक्षर महिला सदस्या असली तरी तिच्या घरात कोणी ना कोणी शिकलेला असतो. त्यामुळे मजकूर कळवून घ्यायला फारसा वेळ लागत नाही.
सध्या तर गावागावात, चावडीवर संगणक आला आहे. त्यासाठी खास ऑपरेटरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यात आता ई-मेलचीही भर पडली आहे. भौतिक सुखाची साधनं, माहिती देणारी टीव्ही, वृत्तपत्रांसारखी माध्यमं घराघरात पोहचली असल्याने लोकांना गावात काय नवीन आहे, याची कल्पना येत आहे. काही महत्त्वाच्या घटना असल्या तरच लोक गावचावडीवर जमा होतात, अन्यथा आपापल्या कामात गुंतून राहतात. साहजिकच दवंडी देणार्याची गरजच उरली नाही. नोटीसा वेगैरे द्यायच्या असतील तर शिपाई किंवा कोतवाल ही कामे पाहत आहेत.
No comments:
Post a Comment