Tuesday, August 18, 2015

मुलांना समजून घ्या

    पाच वर्षांच्या वेदान्तला शेजारच्या राधिकेने एका क्षुल्लक कारणावरून फारच रागावलं. इतकंच नव्हे तर त्याच्या हाताला धरून ती त्याला त्यांच्या घरी घेऊन गेली. घरी मग आईनेदेखील त्याची चांगलीच खरडपट्टी काढली. आपल्या मुलानं काय केलंय किंवा राधिका त्याच्यावर का रागावली? या गोष्टी तिला जाणून घ्याव्याच वाटल्या नाहीत.
      वेदान्तप्रमाणे साधारत: सगळेच पॅरेंटस आपल्या मुलाची चूक काय आहे, याची शहानिशा न करताच दुसर्‍या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन आपल्या मुलावर तोंडसुख घ्यायला , मारहाण करायला पुढे सरसावतात. यामुळे आई-वडील आपल्या मुलांपासून दूर जायला लागतात.
 मुलांची मनस्थिती समजून घ्या
      आपले आई-बाबा आपल्यावर विश्‍वास करत नाहीत, ही गोष्ट मुलांच्या मनाला फार लागते. सुरुवातीलाच जर पालक आपल्या मुलाची मनस्थिती जाणून घेऊ शकले तर ते आपल्या मुलाला चुकीच्या मार्गाला जाण्यापासून परावृत्त करू शकतात. पण, आपण कितीही प्रयत्न केले तरी आपले पालक आपल्याला काही किंमतच देत नाहीत, आपल्याला कळवूनच घेत नाहीत, हे जर का एकदा मुलांच्या मनात घर करून बसले की, मग ते आपोआप हळूहळू त्यांच्यापासून दूर व्हायला लागतात.
 अंतर वाढत जातं
      14 वर्षांचा सौरभ आपल्या कुठल्याही प्लॅनिंगविषयी जरादेखील आपल्या पालकांशी बोलायला  तयार नसतो. त्याने जो काही प्लॅन केला आहे, त्यावर विश्‍वास ठेवायला पालक तयारच नसतात. सौरभचं म्हणणं असं की, माझ्या पॅरेंटसला वाटतं , मी जे काही करतो ते सगळं चुकीचे करतो. कुणी काही म्हटलं की, लगेच ते मला रागावतात. ते माझ्या कुठल्याच गोष्टी बिलीव करत नाहीत.म्हणून मग मला माझी कुठलीच गोष्ट त्यांना सांगावीशी वाटत नाही.
      ज्यावेळेला मुलांचा आपल्याच आई-वडिलांवर विश्‍वास राहत नाही, तेव्हा मग अशी परिस्थिती निर्माण होते. आणखी एक, मुलांना त्यांच्याविषयी आवश्यकतेपेक्षा अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलेलं आवडत नाही. खपत नाही. कित्येकदा याच्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
 तज्ज्ञांचं मत
      बालमानसशास्त्रज्ञांचं म्हणणं असं की, मुलं म्हणजे कच्ची मातीच. त्यांना ज्या साचेत घातलं जाईल, तशी ती बनतात, अशा प्रकारे जर का कुणी कायमचाच विश्‍वास ठेवला नाही तर भविष्यातदेखील ते कधी आपल्या आई-वडीलांवर  विश्‍वास ठेवणार नाहीत. इतकंच नव्हे तर पुढे ही मुलं आपल्या आई-वडिलांचा दुसर्‍यासमक्ष पाणौतारा करायलादेखील कमी करत नाहीत. सुरुवातीच्या काळातच मुलांच्या मनांमध्ये आई-वडिलांविषयी एक इमेज बनून राहते. पुढे भविष्यात तिच आणखी गडद होते. जर आई-वडीलच बालपणापासून त्यांच्यावर अविश्‍वास ठेवायला लागले तर  त्याचे दुष्परिणाम भविष्यात नक्कीच पाहायला मिळतात.
      सांगायचा मुद्दा असा की, मुलांवर विश्‍वास ठेवणं म्हणजे त्यांचा विश्‍वास जिंकणं आणि त्यांना चांगल्या भविष्यासाठी सज्ज करणं होय. पण याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या मुलांवर डोळे झाकून विश्‍वास ठेवावा किंवा त्यांच्या सगळ्याच गोष्टी नजरेआड कराव्यात. पालकांचं   थोडं  जहाल, थोडं  मवाळ धोरण  आणि  थोडा विश्‍वास   त्याला एक चांगला नागरिक बनवण्यास  मदत करतं.
                                                                                                    

No comments:

Post a Comment