Tuesday, August 18, 2015

रहस्य कथा : पोस्टमन


 दुपार सरली होती. आणि थंड वारा  सुटला होता. उदय फुटपाथवरून निघाला होता. तेवढ्यात मागून सायकलच्या घंटीचा आवाज आला.त्यापाठोपाठ हाक ऐकू आली, “अरे उदय, इतक्या  घाईने कोठे निघालास  एवढा?”  वळून पाहिलं तर बालपणचा मित्र उल्हास सायकल थांबवून त्याच्याकडे पाहून हसत होता. उल्हास पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून नोकरीला हाेता.
      उदय म्हणाला, “चल, कोठे तरी बसून चहा घेत घेत गप्पा मारू.”
      उल्हास म्हणाला, “फक्त एकच पत्र राहिलंय. तेवढं टाकून येतो आणि मग मस्त गप्पा मारू.  इथेच थांब, दोन मिनिटात आलो.”  असे म्हणत त्याने सायकलला टांग मारलीसुद्धा  आणि समोरच काही अंतरावर असलेल्या  बिल्डिंग जवळ बघता बघता पोहचला. सायकल थांबवली नी  धावतच आत घुसला.
      उदय तिथेच थांबून त्याची वाट पाहत होता. तो बराच वेळ त्याची वाट पाहात राहिला, पण उल्हास काही लवकर परतेना. त्यानं वळून इमारतीच्या तोंडाकडे पाहिलं तर उल्हास सायकला टांग मारून जाताना दिसला. हाे, नक्की तोच होता. खाकी पोशाख आणि खांद्याला पोस्टाची पिशवी!
      उदयने त्याला आवाज दिला, “उल्हास, अरे,मला विसरलास की काय?”  पण तोपर्यंत  उल्हासची सायकल बरीच दूर गेली होती. बहुतेक आपल्याला खाली थांबवल्याचे त्याच्या लक्षात नसावं. आता काय करायचं, असा विचार करत थोडा वेळ तिथेच थांबला. तेवढ्यात तिकडून  दोन माणसे पळत येताना दिसली, जिकडे उल्हास गेला होता तिकडून. ते दोघे काही तरी बडबडताना उदयने ऐकले, “साला, आम्हाला मूर्ख बनवत होता. आता बस म्हणावं...”
      उदय जवळ जवळ पळतच निघाला -उल्हासला तर काही झालं नसेल? ती माणसं का पळत गेली?
 थोडे पुढे गेल्यावर त्याला लोकांची गर्दी दिसली. उदय जवळ पोहचला, पाहतो तर एक माणूस तिथे निपचिप पडला होता. जवळच तिथे बाजूला सायकल पडली होती. पोस्टमनचा ड्रेस त्याने लगेच ओळखला. अरे बाप रे! म्हणजे ते दोघे उल्हासवर हल्ला करून पळाले होते  तर...!      
      तो झुकला. त्यानं चेहरा निरखून पाहिला  आणि उडालाच.  अरे !हे काय? हा उल्हास नाही, दुसराच कोणी तरी आहे. पण पोशाख तर पोस्टमनचा आहे. मग उल्हास कोठे गेला? त्याला काही उमजेना. कोठे गेला हा  उल्हास? या प्रश्‍नानं त्याचं डोकं भंडावून सोडलं.
      तेवढ्यात तिथे पोलिसांची गाडी  आली. जमिनीवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या त्या  माणसाला गाडीत घालून दवाखान्यात पाठवण्यात आलं. आता तिथे फक्त  रक्ताचे डाग दिसत होते. म्हणजे  गुंडांनी त्या माणसाला हल्ला करून जखमी केलं होतं तर ... पण का? उदय काही वेळ तिथे थांबला. मग त्याने उल्हासच्या घरी जाण्याचा निश्‍चय केला.  नेमका काय प्रकार आहे, हे जाणून घेतल्याशिवाय त्याच्या जिवाला चैन पडणार नव्हती. तो विचार करत होता- नक्कीच आतापर्यंत उल्हास घरी पोहचला असेल. पण उल्हास घरी नव्हता. त्याची बायको वंदना म्हणाली, “ते आज लवकर घरी परतणार म्हणत होते. पण त्यांना  उशीर का झाला  कुणास ठाऊक?”
      उदयने वंदनाला काही सांगितले नाही. नाही तर ती विनाकारण काळजी करत बसली असती. त्याने त्यांच्या घरी का आलो आहोत, हेही सांगितलं नाही. तो म्हणाला, “वयनी, कदाचित उल्हास कुठल्या तरी महत्त्वाच्या कामात अडकला असेल... येईल. ”
 उदय आता त्याचा मित्र असलेल्या पोलिस इन्स्पेक्टर श्रीकांत याच्या पोलिस ठाण्यात गेला. त्याला पाहताच श्रीकांत म्हणाला, “मित्रा, या वेळेला पोलिस ठाण्यात?  काय काम आहे का? का काय घडलंय? तुझा चेहरा तर काळजीत दिसतोय.”
      उदयने त्याला सगळा प्रकार सविस्तर सांगितला. ऐकून श्रीकांत म्हणाला, “ प्रकरण बरंच गंभीर आहे.शेवटी उल्हास जातोय कुठं?”
      श्रीकांत आणि दोन पोलिस शिपाई उदयसह उल्हासच्या घरी गेले. वंदना दारातच उभी होती. तिच्या चेहर्‍यावर काळजी होती. इन्स्पेक्टर श्रीकांत तिला धीर देत म्हणाला, “काळजी करू नका. आम्ही लवकरच त्यांना शोधून काढू.”
      इन्स्पेक्टर श्रीकांत उदयला म्हणाला, “आपल्याला या कामगिरीचा तपास त्या इमारतीपासून करायला हवा, जिथून तू त्याला जाताना पाहिलं होतंस.”  पोलिसांसोबत उदय त्या इमारतीत गेला.  खालच्या तळमजल्यावर  चार खोल्या होत्या. आतूनच वर जायला जिना होता. इमारत फारशी मोठी आणि जुनीही  नव्हती. वरच्या मजल्यावरही तशाच चार  खोल्या हाेत्या. सर्व खोल्यांना कुलपं लावलेली होती. पोलिस शिपायांनी बॅटरीच्या प्रकाश झोतात पाहिले की, तीन खोल्यांना कुलुपे  होती तर  एका खोलीच्या दरवाज्याला कुलूप फक्त लटकावलेले होते. ते दरवाजा उघडून आत घुसले. आत कुणी तरी जोरजोराने श्‍वास घेत असल्याचा आवाज आला.बॅटरीच्या उजेडात त्यांना एक व्यक्ती  बांधलेल्या अवस्थेत पडलेली दिसली.  ती व्यक्ती म्हणजे  उल्हास. त्याच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबलेला होता. आणि त्याचे हात-पाय बांधलेले होते.
      इन्स्पेक्टर आणि उदयने त्याला मोकळे केले.उल्हास घाबरलेला होता. तो म्हणाला की, तो पत्र घेऊन खोलीसमोर आला, तसा आतल्या  दोघा गुंडांनी त्याला  आत खेचले,  आणि हात-पाय बांधले. नंतर त्यांनी त्याचा पोस्टमनचा ड्रेस उतरवला. तो त्यातल्या एकाने घातला. मग ते दोघे दरवाजा बंद करून निघून गेले.
     आता उदयच्या लक्षात आले की, त्याने ज्याला उल्हास समजला होता, तो उल्हासचे कपडे घातलेला एक गुंड होता. श्रीकांत म्हणाला,  त्या गुंडांना उल्हासचा पोस्टमनचा ड्रेस हवा होता. कदाचित त्यांना उघडपणे बाहेर पडायची भिती होती. म्हणून तो  पोस्टमनच्या पोशाखात पळाला असावा.
     उल्हास म्हणाला, “मला त्या गुंडांचे चेहरे अगदी चांगल्या प्रकारे लक्षात आहेत. मी त्यांना पाहताच ओळखू शकतो. ”
     ते हॉस्पीटलमध्ये गेले, तर तिथे गडबड उडाली होती. कळलं की रस्त्यावर पोस्टमनच्या पोशाखात बेशुद्ध पडलेला इसम हॉस्पीटलमधून गायब झाला होता. ऐकल्यावर श्रीकांत आणि उदयला धक्का बसला. ते  हिरमुसले.श्रीकांत मान झटकून म्हणाला, “छे! आता अवघड झालं. या  केसचा गुंता आणखीणच वाढला.मात्र एक निश्‍चित ! तो नक्कीच गुन्हेगार आहे. नाही तर जखमी अवस्थेत तो हॉस्पीटलमधून पळाला नसता. ”

arsid14691390   उदय नाराजीच्या स्वरात म्हणाला, “हो, पण आता आम्हाला कधीच कळणार नाही की, उल्हासवर हल्ला करणारे कोण होते? मग उल्हासचा हात धरत म्हणाला, चल, तुला घरी सोडतो.”

arsid14691390    इन्स्पेक्टर श्रीकांतने दोघांना आपल्या पोलिस गाडीत बसवलं. उल्हासला त्याच्या घरी सोडलं. वंदना काळजीत होती. म्हणाली, “गुंड गेले खड्यात पण माझा नवरा मला सुरक्षित मिळाला, हे का कमी आहे? ”
    श्रीकांत जाता जाता म्हणाला, “उल्हासला गुंडांनी जखमी वगैरे केले नाही, ते एक बरं झालं. पण आता माझं टेन्शन वाढलं आहे.  उल्हासला  हॉस्पीटलमधल्या त्या जखमी माणसाला ओळखायला संधी मिळाली  असती  तर  केस पुढे सरकला वाव होता. पण आता कुठलीच उम्मीद राहिली नाही. ”
     सगळचे शांत होते. श्रीकांतचं  बरोबरच होतं. पण तसं घडलं नाही. त्या रात्री उदय उल्हासच्या घरी बराच उशीरपर्यंत थांबला होता. त्याला समाधान होतं, ते उल्हास त्या गुंडांच्या तावडीतून सुखरुप परतला होता याचं. त्या रात्री उदयला झोप आली नाही. तो दिवसभरच्या त्या घटनांचा विचार करत पडून होता.
     जवळपास तीनच्या सुमारास पोलिसांची गाडी उदयच्या बंगल्याच्या बाहेर येऊन थांबली. एवढ्या रात्री कुणाची गाडी आली म्हणून तो पटकन उठला आणि  बाहेर आला, तर श्रीकांत त्याची वाटच पाहात उभा होता. गाडीत उल्हासही होता. उदयला काही बोध होईना. त्यानं  आश्‍चर्याने विचारलं, “आता काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? ”
     श्रीकांत हसून म्हणाला, “केसला एक नाटकीय वळण लागलं आहे. माझ्याबरोबर चल, सगळं काही समजेल. ”
     उदय आणि उल्हास कोड्यात पडले होते. श्रीकांत उल्हासला म्हणाला, “माझ्या केबीनमध्ये एक व्यक्ती बसली आहे. तिला तू ओळखतोस का ते सांगायचं. पण लांबूनच पहा बरं का? ”  उल्हासने  खिडकीवरचा पडदा सारून आत बसलेल्या व्यक्तीला निरखून पाहिलं. आणि त्याची खात्री झाली.  तो म्हणाला, “ज्यांनी मला हात-पाय बांधून खोलीत डांबून घातलं होतं  आणि माझे पोस्टमनचे कपडे घातले, त्यातलाच हा एक आहे. ”         
     इन्स्पेक्टर म्हणाला, “उल्हास, आता माझ्यासोबत आत चल आणि पहा तुला बघितल्यावर तो काय म्हणतो ते? ”
     उल्हासला पाहिल्यावर खोलीत बसलेली ती व्यक्ती एकदम उठून उभी राहिली. त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावर कसले तरी भाव उमटले.  त्याला समजून चुकलं की,  पोलिसांना या प्रकरणाची अगोदरच कल्पना होती. ती व्यक्ती श्रीकांतकडे पाहात म्हणाली,  “हो, मी याच माणसाच्या अंगावरचे पोस्टमनचे कपडे काढले होते. ”
     उदयनेसुद्धा त्याला ओळखले. रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला हाच होता. ती व्यक्ती श्रीकांतला म्हणाली, “ माझं नाव उमर आहे.मी संधीचा फायदा घेऊन हॉस्पीटलमधून पळालो, पण ...?
     तर मग पोलिसांकडे का परत आलास? श्रीकांत पुढे म्हणाला, “पहिल्यांदा तू काय करतोस ते सांग? ”
     उमर म्हणाला, “आता मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही. आमची एक गँग आहे. आम्ही अनेक ठिकाणी दरोडे घातले आहेत. मग आमच्यात  आणि दुसर्‍या एका गँगच्या लोकांमध्ये  संघर्ष पेटला. हद्दीवरून हा वाद पेटला. आमचे एकमेकांवर हल्ले झाले.  होताहेत. मला आता त्या कामाचा कंटाळा आला आहे. ते जिणं नको आहे. म्हणून मी स्वत: चा जीव  वाचवण्यासाठी इकडे-तिकडे लपत-छपत भटकत राहिलो. त्यादिवशी ज्यावेळेला हा टपाल द्यायला वर आला तेव्हा मी आणि माझा साथीदार तिथून कसे सटकायचे, याचाच विचार करत होतो. मला वाटलं, जर मी पोस्टमनचे कपडे घातले तर माझे शत्रू मला ओळखणार नाहीत. आणि मला कुठे तरी सुरक्षित ठिकाणी जाता येईल. ”
     मग पुढे काय झाल? श्रीकांतने विचारलं.
     “पोस्टमन बनण्याची माझी योजना सफल  झाली नाही. माझ्या शत्रू लोकांनी माझ्यावर हल्ला केला. तेवढ्यात तिथे गर्दी जमली आणि माझा जीव  वाचला. नंतर हॉस्पीटलमधूनही पळालो, त्यालाही हेच कारण होते. माझे शत्रू माझ्या मागावरच होते. माझ्या जिविताला धोका होता. मला कुठे तरी सुरक्षित ठिकाणी लपायचं होतं. पण संधी मिळताच मी तेथून पळ काढला. पण आता मला असा लपून-छपून जगण्याचा कंटाळा आला आहे.  मी पार दमलोय. आता पाेलिसांच्या सावलीत मी सुरक्षित आहे आणि पुढेही राहीन, अशी मला खात्री वाटतेय. त्यामुळेच  मी आपल्याला शरण आलो आहे.मी आपल्याला गँगच्याबाबतीत सर्व काही सांगेन.”
      नंतर उमरने पोलिसांना गँगसदर्भात सविस्तर जबाब दिला.गँगचा भांडाफोड केला.त्यात त्याला अटक झाली. त्याने सांगितल्या ठिकाणांवर छापा टाकण्यात आला. त्याचे बाकी साथीदार पकडले गेले. त्यात त्याचा दुसरा साथीदार होता, ज्याने  उल्हासचे पोस्टमनचे कपडे काढण्यास  उमरला मदत केली होती.  आणि ज्याने उमरवर हल्ला केला, तोही गळाला लागला.
     उल्हास उदयला म्हणाला, “जर मी तुला माझी वाट पाहायला लावली नसती तर आज मी जिवंत राहिलो नसतो. तुला संशय आला नी तू सगळे प्रकरण उजेडात आणलेस.मी वर  तसाच बंद खोलीत अडकून पडलो असतो तर कुणास ठाऊक माझं काय झालं असतं.”
     ऐकून उदय मंद हसला. म्हणाला, “चल, एक-एक चहा मारू.”
                                                                                                                                        
 

No comments:

Post a Comment