Tuesday, August 18, 2015

बालकथा : वाईट कामाचा परिणाम

      ही गोष्ट त्यावेळची आहे, ज्यावेळी सृष्टीची निर्मिती होऊन फार दिवस झालेले नव्हते. त्यावेळी  जंगलातले  पशु-पक्षी एकमेकांशी सतत लढाई-झगडा करत. यात कधी पशु भारी पडत तर कधी पक्षी. आणि या लढाई-झगड्यात जो समूह पराभूत व्हायचा तो दंड म्हणून  जिंकणार्‍या समुहाला भरपेट भोजन द्यायचा.
       त्या जंगलात एक आळशी आणि आरामप्रेमी वटवाघूळही राहत होते. त्याने दंडाचा चुकारा न करण्यासाठी एक मस्त आयडिया शोधून काढली होती. एकदा तो  पक्षांच्यावतीने लढत होता. या लढाईत प्राण्यांची बाजू भक्कम  होती.  प्राण्यांचा विजय दृष्टीक्षेपात होताच वटवाघळाने स्वत: ला  झाडावर  उलटे टांगून घेतले.
      प्राण्यांना विजयी घोषित करताच  तो लगेच त्यांच्या कळपात  सामिल झाला. प्राण्यांचा जल्लोष चालला असताना अचानक वाघाची दृष्टी वटवाघळावर पडली.  त्याने क्रोधाने डरकाळी फोडत विचारले, तू इथे कसा? आताच  तर तू पक्षांच्या बाजूने लढत होतास. वटवाघूळ म्हणाले, मी बरं पक्षांच्या बाजूने लढेन. माझे दात तरी बघा, पक्ष्यांचे दात असे असतात का? वाघाला वटवाघळाचे म्हणणे पटले. त्या दिवशी त्याने प्राण्यांबरोबर बसून  भोजनावर मस्तपैकी ताव मारला.
      काही दिवसांनी झालेल्या भांडणात पक्ष्यांची बाजू वरचढ दिसू लागली. वटवाघूळ पक्ष्यांच्या कळपात सामिल होता. पक्ष्यांच्या सेनापतीने त्याला पाहिले.  मागच्या खेपेला  विजयी मेजवानी वेळी वटवाघळाला प्राण्यांच्या पंक्तीला बसल्याचे पाहिले होते. त्याने वटवाघळाला विचारले, तू इथे पक्षांमध्ये काय करतो आहेस? त्यावेळी वटवाघूळ म्हणाले, मी प्राण्यांमध्ये कसा असेन? मला पंख आहेत. प्राण्यांना पंख असल्याचे कधी पाहिलंय तुम्ही? त्यावेळी वटवाघळाने पक्ष्यांच्या पक्तीला बसून मेजवानीचा स्वाद घेतला. अशा प्रकारे प्रत्येक वेळेला कोणीही जिंको, वटवाघूळ मात्र  जिंकणार्‍यांच्या पंक्तीलाच  बसून यथेच्छ भोजन करत असलेला दिसायचा. 
      काही दिवसांनी पशु-पक्ष्यांमध्ये समेट झाला. त्यांच्या  लक्षात आले की, या लढाई-झगड्यात काही राम नाही. त्याच्याने  कोणाचाच फायदा नाही. त्यामुळे आता आपण मिळून-मिसळून राहिले पाहिजे, या मतावर दोघेही आले. आणि अशाप्रकारे दोघेही गुण्या-गोविंदाने एकत्र राहू लागले. मात्र त्यांनी वटवाघळाला आपल्यातून बाहेर काढले. दोघांनाही दगा  िदल्याने त्यांनी वटवाघळाची चांगलीच खरडपट्टी काढली आणि म्हणाले, यापुढे तुला  पशू किंवा पक्षी कोणीही जवळ करणार नाही आणि आता इथून पुढे तू एकटाच रात्रीच्या वेळेसच भक्ष्य शोधायला बाहेर पडशील. म्हणूनच म्हणतात की, त्या दिवसापासून वटवाघूळ रात्रीच्या वेळेसच उडताना दिसतो. वाईट कामाचा परिणाम वाईटच घडतो, बालमित्रांनो खरंय ना?     
 

No comments:

Post a Comment