Sunday, August 9, 2015

आम्ही लुटारु


   घटना एक:- राष्ट्रीय महामार्गावर दुर्दैवाने एका ट्रकचा अपघात झाला.बिचारे ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर जखमी झाले.ट्रकमधला तांदुळ आणि डाळ रस्त्यावर इस्तत: पसरला.जवळच एक वस्ती होती.तिथल्या लोकांना अपघाताची वार्ता  कळली आणि त्यांनी पिशव्या भरभरुन डाळ आणि तांदुळ नेला.ड्रायव्हर, क्लिनर ओरडत होते. पण त्यांना त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता.
   घटना दोन:- शेंगदाण्याच्या तेलाचा ट्रक रस्त्यावर पलटी झाला. तेल रस्त्यावरुन  वाहू लागलं.जवळच्या लोकांनी पातेलं, बादल्या भरभरुन तेल आपल्या घरी घेऊन गेले.वाटतं होतं,एवढ्यानं त्यांना सर्व काही मिळून गेलं.
   घटना तीन:- पेट्रोलने गच्च भरलेला टँकर समोरुन येणार्‍या वाहनावर जोरात आदळला.टँकर पलटी झाला. पेट्रोल वाहत जाऊन एका खड्ड्यात जमा झाले.  लोक पेट्रोल बादली बादलीने भरून घेऊ लागले. अक्षरश: लूट माजली. अचानक एका म्हातार्‍याला बीडी ओढण्याची तल्लप झाली. त्याने काडेपेटी पेटवली आणि मोठा स्फोट झाला. किती तरी माणसे आगीच्या लोटात सापडली. काही माणसे जळून मेली. कित्येक माणसे आगीत जखमी झाली.
    घटना चार:- रेल्वेत दरोडा पडला. आरडाओरडा माजला.वाचवणारे कमी आणि लुटणारे जास्त निघाले. लुटालुट झाली. प्रतिकार कारणार्‍यांची हाडे मोकळी केली. काहींना धावत्या रेल्वेतून बाहेर फेकण्यात आले.काहींनी जीव मुठीत घेऊन जवळचे आहे ते देऊन टाकले.
    माफ करा. या सगळ्या घटना आपल्या देशातल्या आहेत. ज्या जनतेला आपण बिच्चारी म्हणतो , तीच जनता लुटारु निघाली. जनताच अशी लुटारु, दरोडेखोर निघाली असेल तर त्यांचा नेता म्हणवणारा कसा असेल? त्यांच्या नेत्यांकडून कोणती अपेक्षा करायची? जसे पुजारी असतात, तसे भगवान असणारच. म्हणतात कि, ज्या देवळातला पुजारी सज्जन असतो, त्या मंदिरात भक्तांची मांदियाळी असते. इथले सगळेच लुटीत दंग आहेत. राजा आणि प्रजा. नेता दोन्ही हातांनी लुटत असतो, तेव्हा आपण हाय हाय म्हणून डोकं बडवून घेत असतो.परंतु, जनताच  लुटी करत असेल तर काय म्हणायचे?
    गर्दीचं एक आपलं मनोशास्त्र असतं.गर्दी विचार करत असते,जेव्हा सगळेच लुटतायेत , तेव्हा आपण का मागे राहायचे.सगळे नदीत कचरा वैगेरे टाकून नदी दुषित  करताहेत, तेव्हा आपल्या  एकट्याने घाण न टाकल्याने नदी थोडीच शुद्ध होणार आहे?  एका शिक्षकाला विचारलं,तेव्हा चांगलेच भडक ले. म्हणाले,तुम्हाला मी एकटाच दिसतोय का?सगळी यंत्रणाचा भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे, तेव्हा फक्त शिक्षकांकडूनच कसली आशा बाळगता? आम्हीच का प्रामाणिक राहावं? आम्हादेखील मुलं-बाळं आहेत.
    हीच गोष्ट आम्ही कलमनवीसाला विचारली. तो उसळल्यासारखा म्हणाला,समाज सुधारण्याचा ठेका काय आम्हीच घेतला आहे? पुढार्‍याला विचारलंतर म्हणाला, आम्ही इमानदारीनं वागायला वागलो तर आमची दुकानदारी कशी चालेल? आम्हाला कोण विचारेल?
   चालले आहे तोपर्यंत चालू द्या. आपल्याला काय त्याचं. हीच गोष्ट सगळ्यांच्या तोंडी. मजेशीर गोष्ट अशी अशी की, जे लोक काचेच्या महालात राहतात, तेच लोक दुसर्‍याच्या घरावर दगड फेकताना दिसतात. लुटीच्या दर्येत सगळेच गटांगळ्या खाताहेत. बिचारे प्रामाणिक पाण्यात उतरायला धजावत नाहीत.कारण त्यांना वाटतंय,त्यांचे कपडे कोणी तरी उचलून नेईल. आणि आपल्या नागडं फिरावं लागेल, याची त्यांना धास्ती वाटतेय.                        




No comments:

Post a Comment