Tuesday, August 18, 2015

बालकथा - गाढव ते गाढवच

       मन्या घुबड उदास असायचा. जंगलात सगळ्यांचे मित्र होते.ते आपसात खेळायचे, हसायचे-खिदळायचे, हुंदडायचे, मिळून खाऊ खायचे. मिळून गाणी गायचे. मोठी धम्माल करायचे. मन्या घुबड मात्र बिलकूल एकटा असायचा. ना मित्र होते, ना नातेवाईक! झाडाच्या उंच फांदीवर आपल्या घरात एकटाच पडून राहायचा. जंगलातल्या दुसर्‍या लोकांना हसताना-खिदळताना पाहून त्याला आणखी वाईट वाटायचे.
       बिचार्‍यानं तरी काय करावं?सगळ्यांसोबत तो खेळू शकत नव्हता. कारण तो दिवसा झोपायचा. तो काही आपल्या मर्जीने झोपायचा नाही , तर निसर्गानंच त्याला असं बनवलं होतं. रात्री सगळे झोपी गेले की, तो जागा व्हायचा. त्यावेळी त्याला वाटायचं, आपणही फांद्या-फांद्यांवर उड्या माराव्यात, झाडाच्या उंच शेंड्यांवर जाऊन मोठ्या मोठ्यानं गावं. रात्रीच्या किर्र वातावरणात त्याचा गाण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या पक्ष्यांच्या घरांच्या बत्त्या उजळायच्या. खिडकीतून डोकी बाहेर काढून सगळे एका दमात ओरडायचे. कोण घुबड रात्रीचं किंचाळतंय?
      तो दबल्या आवाज म्हणायचा, मी घुबडच तर आहे!
 घुबड आहेस ना! मग  गपचिप पहारेदारीच काम कर! ओरडून आमची झोपमोड का करतोस?
 सगळ्यांची बोलणी खाऊन मन्या  आपल्या घरात येऊन गप्प पडायचा.
       एकदा रात्रीच्यावेळी मन्या आपल्या घरट्यात निपचिप पडला होता.रात्री त्याला कशाची भीती वाटत नसे. उलट अंधारात तो अगदी लांबच सहज पाहू शकत होता.त्यारात्री त्यानं पाहिलं की तिकडे लांब झाडं खूप कमी आहेत. आणि शहराकडं जाणारा रस्ताही दिसतो आहे. तिथे कोणी तरी होतं. तो गपचिप झाडावर बसला. पाच-दहा मिनिटे तशीच गेली. मन्या अजूनही तसाच बसला होता. आता मन्याच्या मनात कसलं तरी काहूर उठलं. कोण आहे? कशाला आला आहे? अगोदर असं काही घडलं नव्हतं.का कोणी शिकारी जाळं टाकून सकाळ होण्याची प्रतीक्षा करतो आहे? तो हळूच घराबाहेर आला. तो उडत उडत तिथल्या झाडावर जाऊन बसला. खाली वाकून पाहिल्यावर तो चकीत झाला. कोणी शिकारी-बिकारी नव्हता. गाढव होते.
  गाढव इथे कसे? मन्या पुटपुटला.
 मन्या सगळ्यात खालच्या फांदीवर आला. त्यानं गाढवाला विचारलं, तू इथे काय करतोयस?
 गाढव उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला इथेदेखील चैन पडत नाही.
      मन्यानं गाढवाकडं निरखून पाहिलं. गाढव खूप उदास दिसत होतं. थकल्यासारखा वाटत होता. त्याला गाढवाविषयी सहानुभूती वाटली. तो प्रेमाने म्हणाला, घाबरू नकोस. मी मन्या. वर पहा मी इथे बसलो आहे.तिकडे नव्हे, इकडे... अरे, बरोबर तुझ्या डोक्यावरच्या फांदीवर. आता सांग, कोण तुला शांतपणे जगू देत नाही.?
      गाढवाने भराभर आपल्या पापण्यांची उघडझाप केली आणि येणार्‍या अश्रूंना मोकळे. थोड्या वेळाने  म्हणाला, तुला काय सांगू? तू  तरी काय करशील?
      कोणाला तरी आपले दु: ख ऐकवले की, मन हलकं होतं... आणि तू जोपर्यंत काही सांगणार नाहीस, तोपर्यंत मी तरी कशी मदत करणार बरं. तसं माझं नाव मन्या. मला आपला मित्र समझ.
      मित्र शब्द ऐकून गाढव खूश झाला. त्याने डोळे गोल गोल फिरवले. लांबसे कान मस्तपैकी हलवले. शेपटी त्याने कितीदा तरी आपटली.
 मला आतापर्यंत कोणी मित्र नव्हता. तू मित्र ना मग माझी परेशानी ऐक.
      गाढवाने सांगायला सुरुवात केली, गावात एक परीट होता. त्याने मला विकत घेतले. त्याच्याजवळ सार्‍या गावाचे कपडे धुवायला येत असत. मळकट कपडे माझावर लादून धुवायला घेऊन जात असे. धुतलेले ओले  कपडे पुन्हा माझ्यावर लादून गावात आणत असे.ओले कपडे घेऊन भरभर  चालू लागलो  नाही तर मला काठीने  पायांवर मारत  असे. ठीक आहे, मारलं तर मारलं . निदान जेवण तर चांगलं द्यावं की नाही? नाही! मला जेवण द्यायचं म्हणजे त्याच्या उरावर ये ई. भुकेमुळे मला रात्री धड झोपही यायची नाही. सकाळी पुन्हा काम सुरू.
      गाढवाने सांगितले, आज रात्री माझ्या खोपटाचा दरवाजा उघडा होता. मी निघून आलो. वाटेत हरभर्‍याचं शेत होतं. मन भरून खाल्लो. खूप मजा आली. मग इकडे आलो. बर्‍याच दिवसांनी पोटभर खाल्लो.
 अरे गड्या,  मीच  एकटा दु:खी आहे, असा समजत होतो. पण तुही दु:खी आहेस. आता  सांग, पुढं काय करायचं ठरवलं आहेस?
 अजून तरी कुठला विचार  केला नाही. परत जायचा तर प्रश्‍नच नाही. काय करू?
 तुला मित्र म्हटलंय तर काही तरी विचार करायलाच हवा. असं कर. आता तू इथे या झाडींच्या मागे झोप. मी विचार करतो. मग सांगेन.
       इथे परटाच्या लाठीची भीती नव्हती. गाढव झुडपाच्या पाठीमागे जाऊन डाराडूर झोपी गेला. दुसर्‍यादिवशी मन्या म्हणाला, मित्रा, काम तर करावंच लागेल. कामाशिवाय दोन-चार दिवस ठीक आहे, पण सारी जिंदगी कशी जगणार?  असं करू, काही दिवस तू इथे राहा. दिवसभर आपण दोघे झोपू. रात्री तू शेतात जाऊन पोटभर खाऊन येत जा. तोपर्यंत  तुझ्यसाठीच्या कामाचा बंदोबस्त करीन. जिथे काम कमी आणि राहण्या-खाण्यासाठी चांगली व्यवस्था असेल, तिथे तू जा. गाढवाला फार आनंद झाला. तीन-चार दिवस त्याने आरामात काढले. गाढव मस्त रमले. त्याची तब्येत अगदी टणटणीत झाली.
      पाचव्या दिवशी मन्या अगदी आनंदाने परतला. मित्रा, फार चांगली नोकरी  मिळाली आहे. उद्या तू कामावर जा. रात्री भेटायला येत जा.   इकडे परटाचे  गाढवावाचून सगळे काम बिघडले. त्याने गाढवाची शोधाशोध केली, पण गाढवाचा पत्ता काही लागला नाही. परीट आता त्याच्या शोधासाठी जंगलाच्या दिशेने येत होता.
      नोकरी मिळ्याल्याचे  ऐकून गाढवाला फार आनंद झाला.  आनंदातच तो उड्या मारु लागला.  आता त्या राक्षस परटापासून मुक्त झालो. आज तर मला गाणं गावंसं वाटू लागलं आहे. असे म्हणच तो आपल्या भसड्या आवाजात गायला लागला.  गप्प गप्प!  मन्या ओरडला. अरे, मोठ्याने ओरडू  नकोस. पण गाढव आपल्याच मस्तीत होता. तो जोरजोरात गातच होता.
 हे तर माझेच गाढव आहे. परटाने त्याला ओळखले.  आणि त्याला काठीने बडवत घराकडे घेऊन चालू लागला.  मन्याने  अफसोसपणे मान हलवली. आणि पुटपुटला, शेवटी गाढव ते गाढवच!
 

No comments:

Post a Comment