Tuesday, August 18, 2015

बालकथा सर्कस आली

       पीटर आणि सांता अनाथ भाऊ-बहीण  होते. ते लहान असतानाच त्यांचे आई-वडील एका रेल्वे अपघातात गेले. त्यानंतर ते त्यांच्या आंटी- रेबेकाकडे  राहू लागले. त्यांना मूलबाळ नव्हते. रेबेका एका जहागिरदाराच्या पत्नीकडे  नोकरीला होती.मोठ्या घरात नोकरीला असल्याने रेबेकाच्या मनात अहंकार बळावला होता. दोन्ही मुलांशीही ती कठोरपणे वागत होती. पीटर आणि सांता दु:खी होते, पण शेवटी ते  जाणार कोणाकडे?
      आणि एक दिवस रेबेकाआंटी देखील त्यांना सोडून  देवाघरी गेली. आता तर पीटर आणि सांता बिलकूल एकटे पडले. रेबेकाच्या मित्रांनी ठरवलं की, त्यांच्यासाठी अनाथाश्रमच  सर्वोतोपरी  योग्य आहे. पण दोघांना वेगवेगळ्या अनाथाश्रमात जावं लागणार होतं, कारण तिथे मुला-मुलींसाठी एकत्र राहण्याची  व्यवस्था नव्हती.ही गोष्ट  पीटर आणि सांताला समजली, तेव्हा ते अक्षरश: खूप  रडू लागले. एकमेकांची ताटातूट असह्य होती. पण त्यांनी पक्का निर्धार  केला, काहीही झालं तरी एकत्रच राहायचं. कधी कधी वेगळं व्हायचं नाही.
      पीटरला आठवलं, रेबेका आंटीचा एक नातेवाईक सर्कशीत काम करतो. त्याचं नाव होतं, गस. पीटरला त्याचे काडर् मिळाले होते. दोघांनीही त्याच्याकडे जाण्याचा निश्‍चय केला. आणि मग एका रात्री दोघे बहीण-भाऊ  अनामिक अशा  प्रवासाला निघाले. कुठं जायचं आहे, याची माहिती नव्हती आणि ज्याच्याकडे जायचं आहे, तो कसा आहे, याची थोडीशीदेखील  कल्पना त्या उपयंतांना नव्हती. पण त्यांना एक छोटीशी आशा होती की तो  त्यांना भेटेल आणि त्यांचा स्वीकार करेल.
      रात्र उतरणीला लागली होती. दाेघे बहीण-भाऊ चालतच राहिले. निद्रेने त्यांच्यावर कब्जा केला. शेवटी ते एका घराच्या पायर्‍यांवर लवंडले आणि थकून झोपी गेले.
      अकस्मात पीटर आणि सांताला जाग आली. तेव्हा एक माणूस त्यांना हलवून  उठवित होता. तो त्याच घरात राहत होता. त्याने विचारल्यावर पीटरने सारी  हकिगत त्याला सांगितली. त्याचे अंकल ‘काब्स सर्कस’मध्ये काम करतात, असे सांगितल्यावर तो माणूस म्हणाला, ‘काब्स सर्कस’ ब्रायडलिंटनला लागणार आहे. तो पुढे म्हणाला, “आजची रात्र इथे काढा, आणि उद्या सकाळी  जा.”
      उर्वरित रात्र त्यांनी गरम मऊमऊ अंथरुणात अारामात काढली. सकाळी उठल्यावर गसअंकलच्या शोधार्थ निघाले. ते  विचारपूस करत करत पुढे सरकत  होते. पीटर आणि सांता ब्रायडलिंटनमध्ये पोहचले, तेव्हा  अजून  ‘काब्स सर्कस’ आलेली नव्हती.
      थोड्या वेळाने सर्कसच्या गाड्या येऊ लागल्या आणि मैदानात एका बाजूला उभारू लागल्या. त्यात हत्ती, घोडे आणि लोखंडी सळ्यांच्या पिंजर्‍यांत वाघदेखील  होते. ते अगदी रोमांचित होऊन सर्व काही पाहत उभे होते. . एखादी सर्कस अशी अगदी निक़टपणे पाहण्याचा उभयंत भावा-बहिणीचा  पहिलाच प्रसंग होता. त्यांनी गसची  तिथे विचारणा केली, तेव्हा एका माणसाने त्यांना एका मध्यम वयाच्या गंभीर चेहर्‍याच्या माणसाजवळ नेले. पण  त्याला  त्याचे  भाचा-भाची आल्याचे कळल्यावर,  मात्र   तो उडालाच. परग्रहावरील माणसांना पाहावा तसा चकीत होऊन त्यांना पाहात होता.  पीटर आणि सांताने त्याला नमस्कार घातला. रेबेका आंटीविषयी सांगितले. म्हणाले, “ आता आमच्याकडे काहीच पर्याय नव्हता. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोत.”
      गस एकटाच  होता. त्याला दोन्ही मुलांचं येणं बिलकुल आवडलं नाही. तो रेबेकाचा लांबचा नातेवाईक होता. पण त्याला  स्वप्नातही वाटलं नव्हतं की, अशाप्रकारे दोन अनाथ मुलं त्याचा  शोध इथंपर्यंत येतील,  मात्र तो त्यांना झिडकारू  शकला नाही, कारण तोपर्यंत संपूर्ण सर्कशीच्या कँपमध्ये त्याच्या छोट्या नातेवाईकांच्या आगमनाची वार्ता  पसरली होती.
      गसने  कठोर स्वरात विचारले, “ तुम्ही दोघे माझ्याकडे का आलात? अनाथाश्रमात जायचे होतात. आता आला आहात तर ठीक आहे, पण  सर्कस इथे असेपर्यंत माझ्याकडे राहा, पण इथून सर्कस उठल्यावर निघून जा. तेव्हा माझा रस्ता वेगळा आणि तुमचा रस्ता वेगळा, लक्षात ठेवा.”
      पीटर आणि सांताला त्याच्या कठोर व्यवहाराने धक्काच बसला. पण ते जाणार तरी होते कुठे? ते जाणू इच्छित होते, की सर्कशीचा मुक्काम इथे  किती दिवस आहे, पण काही विचारायची हिंमत मात्र त्यांना होत नव्हती. अशाप्रकारे ते काब्स सर्कसच्या काफिल्यात राहू लागले.
      सर्कस ज्या गावात जायचा, त्या गावातल्या शाळेत सर्कसमधल्या कलाकारांची  मुलं शिकायला जायची. पीटर विचार करायचा, ही कसली विचित्र शाळा? असं कोणी शिकलं असतं का? पण ते दोघे कधी शाळेला गेलेच नव्हते.
 गसच्या सांगण्यावरून ती मुलं शाळेत गेली. तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख पुसली, तेव्हा पीटर नि: संकोच म्हणाला, “आम्ही सर्कसवाले नाही आहो. आम्ही फक्त काही दिवसांपुरते आलो आहोत.”
      सर्कस कलाकारांची मुलं  शाळेत आपली कलाकारी दर्शवू लागली, पण पीटर आणि सांताजवळ दाखवण्यासारखं काही नव्हतं. सत्य असं की, रेबेका आंटीने त्यांना काही एक शिकवलेलं नव्हतं. दोघे बाजूला उभे होते. सांता म्हणाली,  “मला सर्कसमधल्या कसरती माहित नाहीत, पण मी वायलिन वाजवू शकते.”
 “ आणि मी लॅटिन जाणतो.” पीटर म्हणाला. ते दोघंही खोटे बोलत  होती.
      गसला ऐकायला मिळालं, तेव्हा त्यानं सांताला विचारलं, “मी ऐकलंय की, तुला फार चांगलं वायलिन वाजवता  येतं. सगळ्यांना  एकादी धून तरी ऐकव.” त्यावेळेला गसच्या आसपास काही लोक बसले होते.  सांताच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. ती भयंकर घाबरली.  वायलिन आणलं गेलं, पण ती नीटसं वाजवू शकली  नाही. सगळे तिची टर उडवू लागले.पीटरची तर भीतीने गाळणच उडाली होती. आपली लॅटीन ज्ञानाची परीक्षा घेतली गेली तर अवघडच! पण तसे काही घडले नाही.
 एका रात्री पीटर आणि सांताला झोप येत नव्हती. ते गस अंकलची मर्जी कशी संपादन करायची, याचा विचार करत होते. पण विचार करता करता कधी तरी उशिरा  ते झोपी गेले.
      सकाळ झाली. सांताने तंबूची साफसफाई केली आणि नाष्टा बनवायला घेतला.नाष्टा खाल्ल्यावर  गसअंकल  तिची प्रशंसा करेल, अशी तिला आशा वाटत होती. पण तिची साफ निराशा झाली. गस म्हणाला, “सांता, तुला नाष्टा बनवायला येत नाही. यापुढे कधीच  बनवण्याच्या भानगडीत पडू नकोस.”  दु:ख आणि अपमानामुळे सांताला रडू कोसळलं.
      तिकडे पिटर गसची कार  चकचकीत करण्याच्या प्रयत्नाला लागलेला होता. गसअंकल  गाडी पाहून खूश होईल आणि  कौतुकाने त्याची पाठ थोपटेल, असे पीटरला वाटत होते. पण त्याचीही निराशा झाली. गसने पाहिल्यावर त्याच्यावर खेकसत म्हणाला, “हे काम तुझं नव्हे. जा, मुलांच्यात जाऊन खेळ जा.”
      पीटर आणि सांताचे मन रुदन करीत होतं. गसचं मन आपण कधीच जिंकू शकणार नाही, असं त्यांना वाटत होतं. पीटर सांताला म्हणाला, “दीदे, मला वाटतं, आपल्याला दुसरा कुठला तरी मार्ग शोधावा लागेल.”
 “हो, मलाही तसंच वाटतं,”  सांता म्हणाली.
      त्यादिवसापासून त्यांनी गसला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न सोडून दिला. सांता मुलींना सर्कसमधल्या कसरती शिकवणार्‍या महिलेकडे गेली. तिच्यापुढे शिकण्याची इच्छा प्रकट केली. पीटर बेन नावाच्या व्यक्तीकडे गेला, जो घोडसवारीचे प्रशिक्षण देत होता. तो त्याला प्रशिक्षण देण्यास तयार झाला.
      पीटर आणि सांता गसच्या डोळ्यांआड गपचिप शिकत होते. गसला याची अजिबात कल्पना नव्हती. तो  फक्त इथला मुक्काम हलण्याची वाट पाहात होता, कारण त्याशिवाय या दोघांपासून त्याची  सुटका होणार नव्हती.
      एके दिवशी सकाळी सकाळीच सर्कसमध्ये भयंकर गोंधळ उडाला. सगळे सैरावैरा धावत सुटले होते. पीटरदेखील बाहेर येऊन पाहू लागला. वार्ता अशी की, राणी नावाची हत्तीण खवळली होती. तिने माऊतला उचलून फेकले होते. पीटर तिच्या तंबूसमोर जाऊन उभा राहिला. राणी सारखी सारखी सोंड उंचावून इकडे-तिकडे हलवत होती. ओरडत होती.  सगळे त्याला दूर हो, बाजूला  हो म्हणून ओरडून सांगत होते. पण तोपर्यंत पीटर तिच्याजवळ जाऊन पोहचला. तो हाताने राणीची सोंड  थोपटू लागला. तिथे उभे असलेल्या लोकांमध्ये एकदम शांतता पसरली. सगळ्यांनीच  श्‍वास रोखून धरले.आता काय घडणार, याची काळजीयुक्त उत्सुकता सगळ्यांना लागली. विचार करत होते, आता राणी त्याला पायाखाली चिरडणार!
      पण असं काही घडलं नाही. राणी थोड्याच  वेळात  शांत  झाली. पीटरच्या खिशात गाजरे होती. त्याने तिला गाजरं खाऊ घातली. ती खाऊ लागली. काही वेळात सर्व काही सामान्य झाले. पीटर खूप वेळ तिच्याजवळ थांबून तिला थोपटत होता. संपूर्ण सर्कसमध्ये पीटरच्या साहसाचीच चर्चा होती. लोक म्हणत होते, पीटर नसता तर कोण जाणे राणीनं काय धुमाकूळ घातला असता.
      तो सर्कशीचा शेवटचा दिवस होता. गस पीटर आणि सांताला म्हणाला, “आता मला निरोप द्या. मी तुम्हा दोघांची एका शाळेत व्यवस्था केली आहे. तुझ्या रेबेका आंटीचे मित्र तुमची काळजी घेतील.”
      रेबेका आंटीच्या मित्रांकडे जाण्याची गोष्ट ऐकल्यावर दोघेही काळजीत पडले. तेथूनच तर  ते पळून आले होते. आता त्यांनी सर्कशीतले जीवन स्वीकारले होते. पण आता त्यांना पुन्हा तेथून काढण्याची तयारी चालली होती.
      त्याच रात्री सर्कशीच्या तंबूला आग लागली. घोडे त्यात फसले. पीटरने पाहिलं आणि आपला जीव धोक्यात घालून तो तंबूत घुसला. घोड्यांची दोरी सोडून बाहेर आला. यात त्याला थोडीफार जखम झाली. पण, त्याने त्याची पर्वा केली नाही. घोड्यांचा जीव वाचवू शकलो, याचा त्याला आनंद होता.
      सकाळी सगळे निघण्याच्या तयारीला लागले. सर्कशीचे साहित्य वाहनांमध्ये भरले जात होते. पीटर आणि सांता एका बाजूला उभा होते. तेवढ्यात सर्कशीचा मालक गसला म्हणाला, “मी ऐकलंय की तू मुलांना लांब कुठे होस्टेलला पाठवतो आहेस म्हणे! हे तू काही चांगलं करत  नाहीयेस? आता ती आपली आहेत. लक्षात ठेव, आता ती  कुठेच जाणार नाहीत. आपल्यासोबत राहतील.”
      पीटर आणि सांताने गस अंकलला पहिल्यांदा हसताना पाहिलं. तो म्हणाला, “मुलं म्हणतील तसं.” आता दोघे बहीण-भाऊ अनाथ नव्हते. आता त्यांना  सर्कशीच्या रुपाने त्यांचे   कुटुंब मिळाले होते. ते आनंदाने एकमेकांकडे पाहात हसत होते.
                                                                                                                           - मच्छिंद्र ऐनापुरे               .                                                                                                            (मूळकथा-  नोएल स्ट्रीटफिल्ड)
 

No comments:

Post a Comment