Tuesday, August 18, 2015

खरेच खेडी बदलली का?

       आता आपल्या देशातील गावे मागे राहिलेली नाहीत. त्यांना शहरी रुपडं आलं आहे. गावात नवीन तंत्रज्ञान अवतरलं आहे. ती सुधारली आहेत आणि तिथे विकासाची गंगा वाहते आहे. म्हणजे एकूणच गावांचं चित्र बदललं आहे. हा निष्कर्ष आहे, देशातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या रेटिंग एजन्सी क्रिसिलचा!   नुकताच नॅशनल सँपल सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला आहे. गावात विकासाची गंगा वाहतासून तिथली खरेदी क्षमता वाधली आहे. मोबाईल, मोटरसायकलसारख्या वस्तूंचा वापर वाढला आहे. शिवाय शिक्षणाचा स्तरही उंचावला आहे. त्यामुळे गावे मागे राहिलेली नाहीत, ती पुढारलेली आहेत, असा हा निष्कर्ष सांगतो.
      यात काही प्रमाणात सत्यता असली तरी गावांमध्ये हा बदल कसा घडून आला अथवा नेमका कशाप्रकारचा बदल घडला आहे, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. या निष्कर्षाने काहींना धक्का बसला असेल, म्हणजे त्यांना त्यात चुकीचे वाटले असेल किंवा काहींना त्यात सत्यताही जाणवली असेल. पण आपल्याला एका निष्कर्षाप्रत यायचे असेल तर काही गोष्टींचा जरूर विचार केला पाहिजे. मुळात आपल्या देशातला किंवा गावातला आर्थिक मुलाधार तिथे उपलब्ध असलेल्या प्राकृतिक संसाधनांवर अधारलेला आहे. अन्य साचेबंद सुविधा म्हणजे रस्ता, वीज, आरोग्यसुविधा, शिक्षण या गोष्टी विकास घटकातल्या असल्या तरी गावातल्या अर्थकारणाचा खरा मुख्याधार तिथल्या प्राथमिक उत्पादनावर आधारलेला आहे. आणि हे उत्पादन पाणी, वन आणि जमिनीशी निगडीत आहे. मूळ अर्थकारणाचा पाया ठिकाण आणि ग्राम विशेष उत्पादन क्षमतांवर आधारलेला असतो.गावांमध्ये आज विकास दिसतो आहे किंवा जे सुधारित उपभोगीय तंत्रज्ञान आले आहे, ते यायला अनेक कारणे कारणीभूत आहेत. या कारणांचा धांडोळा घ्यायला हवा. संपन्न ग्रामीण कुटुंबातला शहरांमधला सदस्य आपल्या मिळकतीतील काही भाग आपल्या गावाकडच्या घरी पाठवत असतो. हा पैसा त्या कुटुंबांना अतिरिक्त खरेदी क्षमता देतो. याशिवाय अलिकडच्या काही वर्षात गावाकडच्या जमिनीचे भाव भयंकर वाढल्याचे दिसत आहे. शहरातला नोकरदार, व्यापारी-उद्योजक कर चुकवेगिरी अथवा गुंतवणूक म्हणून गावाकडच्या शेतीत पैसा गुंतवत आहे. त्यात बागायती पिके घेऊन पाण्यासारखा पैसा काढतो आहे. गावात फर्म हाऊस बांधतो आहे. आणि सर्व सुविधाही तो गावाकडे आणतो आहे. मोबाईल, टीव्ही, इंटरनेटमुळे गावे जव़ळ आली आहेत. शहरातल्या भौतिक सुविधाही तिथे अवतरल्या आहेत. अनेक कारणांनी गावातल्या साधनसंपत्तीचा वापर कमी होऊ लागला आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर गावातल्या जळणफाट्याचे देता येईल. गावात जळणफाटा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असताना गॅसचा वापर वाढू लागला आहे.फ्रिजनेही जागा व्यापली आहे.
      पवनचक्क्यांसारख्या कंपन्या आता उदारीकरणामुळे गावागावात अवतरल्या आहेत. 15-20 हजार रुपयांना कुणी विचार नाही, अशा जमिनींना एकदम लाखाचा भाव आला आहे. त्यामुळे जमिनी गेल्या तरी शेतकर्‍यांचा घरात पैशांचा महापूर वाहू लागला. साहजिकच सामान्य मोलमजुरी करणार्‍यांच्या मजुरीतही वाढ झाली आहे. कोरडवाहू शेती आजही मोठ्या प्रमाणात असली तरी बागायती क्षेत्र मात्र वाढत चालले आहे. गावांमध्ये पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे गावात चंगळवादी संस्कृती फोफावली आहे.
      मोठ्या शहरांजवळ असलेल्या गावांना याची लागण चांगलीच लागली आहे. शहरांमध्ये जमिनीचे दर भडकले आहेत. जागा कमी पडत आहे. पैशाच्या मोहापायी गावातला माणूसही शहराकडे धाव घेत आहे. याचा परिणाम शहरे विस्तारत आहेत. त्याच्याने मोठ्या शहरांजवळच्या गावे शहराला चिकटू लागली आहेत. गाववाल्यांना रोजगारही मिळू लागला.आणि त्यांच्या राहनीमानातही बदल घडू लागला. म्हणजे गावांचा विकास किंवा जो बदल झाला आहे, तो गाव म्हणून झाला नाही तर शहराचा भाग हो ऊन झाला आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार 2001 ते 2011 दरम्यान 2 हजार 530 गावे शहरांमध्ये रुपांतरित झाली आहेत. पण या गावांध्ये झालेल्या बदलांवरून देशातल्या लाखो गावाबद्दल निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
      ही जी गावे आहेत, तिथल्या जमिनी मोठ्या प्रमाणात बड्या बड्या कंपन्या, उद्योगांच्या घशात गेल्या आहेत. अशा गावांमधला रोजगार उद्योगधंद्यांमुळे वाढणे साहजिक आहे. आणि वाढणारी मिळकत त्या सगळ्या गोष्टी घरात, गावात आणणारच, ज्या शहरांमध्ये आहेत. पण ही गावे अशाप्रकारे पुढारली असली तरी या गावांचे नुकसानही तितके झाले आहे. आपल्या गावांमध्ये स्वच्छ मोकळी हवा होती, रुचकर भेसळहीन भोजन होतं आणि महत्त्वाचे म्हणजे स्वच्छ पाणी होते. त्या सगळ्याला ही गावे मुकली. शिवाय या गावपण गेलं. या गावांमधला शिक्षणाचा स्तर उंचावला असला तरी  उच्च शिक्षणासाठी अजूनही मोठ्या शहरांचा आश्रय घ्यावा लागतो.
      शहरांपासून दूर असलेली, दुष्काळात खितपत पडलेली, मेळघाटासारखी दुर्गम भागातील अशी अनेक खेडी आहेत की तिथे अशा अनेक सुविधा पोहचल्या नाहीत. अजूनही देशातल्या हजारो गावांना जायला रस्ते नाहीत, वीज नाही, पाणी नाही. एकिकडे शहरांजवळील गावे शहरीकरणाकडे वळत असली तरी दुसरीकडे अशी अनेक गावे आहेत की, जी विकासापासून वंचित आहेत. त्यांच्याकडे पाहायला कुणीच तयार नाही. असं म्हणतात की, पैसा पैशाकडे जातो, तसा विकास विकासाकडे जातो. एहरांपासून दूर असलेली, दुर्गम भागात असलेली, सतत कमी पर्जन्य छायेत जगणारी खेडी मात्र तशीच आहेत. अशा गावातले चार-दोन लेकरे शहरात गेली असतील त्यांनी आपल्या कमाईतला काही भाग आपल्या गावाकड्च्या आई-बाबाला पाठविला असेल, नातेवाईकाला पाठविला असेल, त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांना मोबाईल घेऊन दिला असेल, डेअरीला दूध घालण्यासाठी नातेवाईकांना, भावाला एखादी मोटरसायकल घेऊन दिला असेल तर गावाचा विकास झाला म्हणायचा का? मोबाईल, टीव्ही, मोटरसायकल ही विकासाची साधने आहेत का?  अशा वस्तू गावात आल्या म्हणजे गावाचा विकास झाला म्हणायचा का? असे अनेक प्रश्‍न आपल्याला विचार करायला भाग पाडतात.
      सर्व्हेक्षण गावे बदलल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात गावे बदलली नाहीत, तर आपली विचार करण्याची पद्धत बदलली आहे. गावे आहे तशी तिथेच आहेत. शहरांजवळील गावांमधली शेती अकृषी झाली आहे. गावाचा मूलाधार आहे, जे उत्पादन आहे, ते घटत चालले आहे. औद्योगिक प्रक्रिया होणार्‍या शेतीचा विकास होत आहे. अन्नधान्य मात्र घटत आहे. त्यांचा वाढता दर त्याचे घटते प्रमाणच दर्शवित आहेत.  शेती मोडीत निघत आहे.  धान्य, कडधान्याचे उत्पादन घट चालल्याने देशावर आणखी एक मोठे संकट ओढवत आहे, त्याकडे अद्याप कुणाचे लक्षच गेले नाही. आज देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण असला तरी त्यातल्या घटत्या प्रमाणाचा विचार व्हायला हवा आहे.आज आपण  इंधन तेलावर जवळपास 80 टक्के परकीय चलन खर्ची टाकत आहे. उद्या या अन्नधान्यावरही खर्ची टाकू लागल्यास नवल नाही.आणि तो दिवस दूर नाही. अन्न-धान्यासाठी शेती राखून नाही ठेवली तर मोठे अराजक चित्र आपल्यासमोर असणार आहे. आपला देश शेतीप्रधान आहे. आजही सत्तर टक्के लोक त्यावर अवलंबून आहेत. शेती वाचली पाहिजे. शहरांना आंदण देऊन, किंवा केवळ प्रक्रिया अन्न घटकांचेउत्पादन घेऊन चालणार नाही, शिवाय बाहेरच्या पैशाने गावांचा विकास होत नाही. पैसा गावातच निर्माण झाला पाहिजे.याचा विचार कुठे तरी झाला पाहिजे. तेव्हा कुठे गावे बदलली, असे म्हणायला हरकत नाही.
 

No comments:

Post a Comment