Tuesday, August 18, 2015

बालकथा कावळ्याचा सूड

   राजूच्या हातात लघोरी पाहून आईने आश्‍चर्य चकित होऊन विचारलं, “  अरे राजू, हे काय ? ”
 “ आई, ही गलोली! मला माझ्या मित्राने दिलीय. तो याच्याने एका दणक्यात पक्ष्यांना खाली पाडतो. आता मीदेखील पक्ष्यांवर नेम धरणार आहे. ”
       “ शी: तुला लाज वाटत नाही सांगताना. मुक्यांशी रे कसला जिवघेणा खेळ खेळायचा. खबरदार! जर कुठल्या पक्ष्याला मारलंस तर... ” आई त्याला रागावत म्हणाली.
      “ सॉरी आई, नाही मारत. ” राजू मान खाली घालून म्हणाला. पण आई कामात गुंतली तेव्हा, तो हळूच तिच्या न कळत गच्चीवर आला.खिशात गलोली आणि   काही खडे भरले होते. त्याच्या घरासमोर, शेजारच्या यादव, माळी काकांच्या बंगल्यांसमोर आंब्याची, सीताफळाची, पेरूची अशी पुष्कळ झाडे होती. आणि या झाडांमध्ये विविध पक्ष्यांची वस्तीदेखील होती.
     “  अरे व्वा! पोपट. किती सुंदर आहे. त्याला नेम धरून मारणार आणि पकडून पिंजर्‍यात टाकणार. किती मजा येईल! ” माळी   काकांच्या पेरवाच्या झाडावर राजूला पोपट दिसला.  त्याने खिशातला एक खडा काढला. गलोलीच्या  चामड्याच्या तुकड्यावर ठेऊन नेम धरू लागला. आणि एकदम खडा सोडला. पण तो खडा फांदीला जाऊन लागला. पाेपट मात्र त्याच्या आवाजाने ओरड्त उडून गेला.
 तो पुन्हा पक्ष्यांची शोधाशोध करू लागला. त्याला समोरच आंब्याच्या झाडावर कावळा दिसला. त्याने नेम धरला. या खेपेला मात्र त्याचा नेम अचूक लागला. कावळा ‘काव-काव’ ओरडत उडून गेला. त्याला चांगलाच मार बसला होता. आपला नेम पाहून राजू बेहद्द खूश झाला. तेवढयात आईने त्याला हाक मारली. तो गलोली  लपवत खाली गेला.
       पुन्हा थोड्या वेळाने लघोरी घेऊन तो गच्चीवर आला. पक्ष्यांचा शोध घेऊन नेम साधणार त्या अगोदरच तोच कावळा ‘काव-काव’  करत आला आणि राजूच्या डोक्यावर चोच मारून गेला. टोचीने त्याला चांगलीच कळ आली. त्याला कावळ्याचा भयंकर राग आला. गलोलीमध्ये खडा ठेवून कावळ्याचा शोध घेऊ लागला, इतक्यात कावळा कोठूनसा आला आणि पुन्हा त्याच्या डोक्यावर टोच मारून ओरडत निघून गेला.
      राजू रागाने खिशातले खडे त्याच्या दिशेने फेकू लागला. पण कावळ्याला काही ते लागले नाहीत. आता कावळा उंच आकाशात   घिरट्या घालू लागला. आणि अचानक सर्रकन खाली आला आणि ‘ काव-काव’ करत  त्याच्या कपाळावर टोची मारून पुन्हा वर उडाला. आता मात्र राजूला भयंकर कळ आली. “तो आई ... ” असा ओरडला आणि धावतच खाली गेला. त्याचा आवाज ऐकून आईदेखील   स्वयंपाक खोलीतून बाहेर आली. आईने पाहिलं, राजूच्या डोळ्यांत पानी होतं.
     “  काय झालं रे? ”आईने विचारलं. राजूने रड्त रडत सगळं काही सांगितलं.
 “  बघितलंस, पक्ष्यांनादेखील राग असतो. तुला तुझ्या चुकीची शिक्षा मिळालीच ना! पण त्याला जोराचा मार लागला असता तर तो मेलाही असता. तुला मघाशीच सांगितलं होतं, गरीब, मुक्या प्राणी-पक्ष्यांना मारायचं नसतं म्हणून... ”
     “  सॉरी आई, पुन्हा असं करणार नाही. ” लगेच त्याने आपल्या खिशातले सगळे खडे काढून फेकून दिले. गलोली  मोडून टाकून दिली.
     “  छान! आता असं कर, घरातला ब्रेडचा आणि भाकरीचा तुकडा घेऊन गच्चीवर  जा. आणि त्याला खायला दे.  कावळ्याचा राग जाईल आणि पुन्हा तो सूड घेणार नाही. ” आई म्हणाली.
      राजू एका प्लेटमध्ये ब्रेडचा आणि भाकरीचा चुरा घेऊन गच्चीवर आला. त्याने तो गच्चीवर पसरला. आणि एका कोपर्‍यात जाऊन उभा राहिला.  त्याने इकडे-तिकडे पाहिले. तेवढ्यात ‘ काव-काव’  करत कावळा आला. त्याच्याभोवती घिरट्या घालू लागला. तेवढ्यात त्याला ब्रेडचे आणि भाकरीचे चुरे  दिसले. तो घिरट्या घालत घालत चुर्‍यांजवळ गेला. हळूच खाली बसला. आणि चुरे चोचीने टिपू लागला. पण खाताना तो मधे मधे राजूकडे पाहत राहिला. त्याचबरोबर काही इतर पक्षीही आले. तेदेखील चुरा टिपू लागले. सगळे संपल्यावर कावळा इतरांबरोबर उडून गेला. तो पुन्हा माघारी आला नाही. राजूला आनंद झाला.
                                                                                                                             
 

No comments:

Post a Comment