Tuesday, August 18, 2015

बालकथा : नेकलेस

     विनिता सुंदर होती, पण तितकीच महत्त्वाकांक्षीदेखील होती. असं वाटत होतं की, चुकून ती एका क्लार्कच्या घरात जन्माला आलीय. ती आपलं आयुष्य दिमाखात, ऐटीत जगावं, अशी मनीषा बाळगून होती. मोठ्या अधिकार्‍यांच्या बायका जशा छान-छौकी  राहतात, तसे तिला राहायला आवडे. ती आपल्या गरिबीमुळे सतत दु:खी-कष्टी  असायची.
       एकदा तिच्या नवर्‍याला आणि तिला महसूलमंत्र्यांच्या इथे आयोजलेल्या एका पार्टीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले. निमंत्रण मिळाल्यावर तिला आनंद वाटायला हवा, पण उलट  ती त्यापेक्षा अधिक  दु:खी झाली. कारण काय तर  श्रीमंतांच्या पार्टीला जाण्यासाठी तिच्याकडे चांगले कपडे नव्हते. नवर्‍याने वर्षभरात जी काही बचत केली होती, त्या चार हजार रुपयांची तिला एक छानशी  साडी आणली. पण एक अडचण आणखीही होती, तिच्याकडे एकसुद्धा  दागिना- अलंकार नव्हता. तिला एक आयडिया सुचली. तिथेच शहरात उर्वशी नावाची एक श्रीमंत घरात  नांदत असलेली तिची बालमैत्रीण होती. विनिताने तिच्याकडून हिरेजडीत नेकलेस मागून आणला.
      पार्टीचा दिवस उजाडला. पार्टीत विनिता सगळ्यांपेक्षा सुंदर दिसत होती. साहजिकच मोठ्या अधिकार्‍यांच्या बायकांचा जळफळाट होऊ लागला. पार्टीतल्या प्रत्येकाची दृष्टी तिच्याकडे होती. ती मात्र आपल्याच मस्तीत दंग होऊन  उशीरापर्यंत डान्स करत राहिली. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या पार्टीतून ती पहाटे घरी परतली. त्यावेळेलाही तिला तिचा स्वत:चा अभिमान वाटत होता. परंतु, कपडे चेंज करू लागली, तेव्हा  अचानक केवढ्याने  तरी किंचाळली. नेकलेस तिच्या गळ्यात नव्हता. तो कुठे तरी पडला होता. नवर्‍याला सकाळी दहा वाजता कामाला जायचं होतं. शिवाय तो रात्रभर झोपलेला नव्हता. तरीही तो नेकलेस शोधायला बाहेर पडला. सगळा रस्ता पालथा घालून, धुंडाळून झाला, पण नेकलेस काही मिळाला नाही.
      खूप प्रयत्न करूनही नेकलेस मिळाला नाही, तेव्हा त्या दोघांनी ठरवलं की, उर्वशीला नवा नेकलेस खरेदी करून द्यायचा. नवीन नेकलेस बारा लाखाला मिळाला. ही रक्कम चुकती करण्यासाठी विनिताच्या नवर्‍याने वडिलोपार्जित  संपत्ती विकून  मिळालेले आठ लाख रुपये दिले. उरलेली रक्कम इकडून-तिकडून उधारीने घेतली.
      विनिता आणि तिच्या नवर्‍याला एक समाधान होतं, ते म्हणजे उर्वशीने नेकलेसचा बॉक्स उघडून पाहिला नाही. तिने जसा दिला, तसा ठेवून घेतला. तिने उघडून पाहिला असता तर तिचा नेकलेस हरवल्याचे बिंग फुटले असते. नेकलेसचे कर्ज चुकते केल्यावर विनिता आणि तिच्या नवर्‍याने आपले घर सोडले आणि एका छोट्याशा घरात भाड्याने राहायला आले. नोकरानीला  कामावरून काढून टाकावं लागलं. त्यामुळे घरची सगळी काम तिच्या एकटीच्या अंगावर पडली. आता ती सार्वजनिक नळावर पाणी भरू लागली. कपडेलक्ते स्वत: धुवू लागली. कारण कर्ज लवकरात लवकर फेडायला हवं. इकडे तिचा नवरादेखील  ऑफिसात दिवसभर काम करू लागला. शिवाय ओव्हरटाईमही करू लागला. यातच काही वर्षे लोटली. पण या दिवसांत विनिताची अवस्था फारच वाईट झाली. तिची तब्येत खचत चालली. अकाली वार्धक्याने ती विचित्र दिसू लागली. ती विचार करायची, आपण नेकलेस घेतला नसता तर आज आपलं आयुष्य कसं असतं?
      एक दिवस रविवारी पहाटे ती हवा खाण्यासाठी म्हणून बागेत गेली होती. तिथे तिला उर्वशी दिसली. तिने सुरुवातीला विनिताला ओळखलेच नाही.  ओळख करून दिल्यावर मग तिला ओळख पटली. उर्वशीने तिच्या या दुर्दशेचे कारण विचारले.
 विनिता म्हणाली, “ हे सगळं तुझ्यामुळे झालं!”
 “ माझ्यामुळे?”
 “ हो हो, तुझ्यामुळे! आठवतं का तुला, तुझ्याकडून तो नेकलेस मागून घेतला होता. तो माझ्याकडून हरवला होता.”
 “पण,  तू तर  तो मला परत केला होतास, मग हरवला कसा?” उर्वशी तिच्याकडे विचित्रपणे पाहात म्हणाली.
 “ तो तुला मी नवीन आणून दिला आणि त्याचं कर्ज फेडताना माझी ही अशी अवस्था झाली.”
 “ म्हणजे! तू मला खरा नेकलेस विकत घेऊन दिलास?” आता उर्वशीला आनंदाच्या उखळ्या येऊ लागल्या. कारण तिच्याकडे जो नेकलेस आहे, तो अस्सल हिर्‍यांचा आहे, हे तिला आता समजलं होतं.
 ... अचानक उर्वशीने विनिताच्या गळ्याभोवती हात टाकला   आणि म्हणाली,” अगं विनिता,  माझ्या नेकलेसची किंमत फक्त पाचशे रुपये होती...  आणि तो नकली हिर्‍यांचा होता.” 
                                                                                                           
 

No comments:

Post a Comment