Tuesday, August 18, 2015

सजग तरुणाईला हवीय प्रतिष्ठा आणि स्थैर्य

     लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यातच यंदा पहिल्यांदाच युवा वर्ग मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होत आहे. त्यांच्यात कमालीचा उत्साहही  दिसतो आहे. त्यांचा उत्साह कुणाला तारक आणि मारक ठरणार हे काही दिवसांत कळणार असले तरी त्यांची मने जाणून घेणे, राजकारण्यांना आवश्यक आहे. वास्तविक त्यांच्या निर्णयावरच देशातले  राजकीय समिकरणे अवलंबून आहेत. देशभरात पसरलेले राजकीय अराजक , बिघडलेली सामाजिक परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे काहीसा अस्वस्थ झालेला आजचा तरुण वर्ग काही तरी चांगले घडण्याच्या  आणि घडविण्याच्या अपेक्षेत आहे.
      आजचा तरुण हुशार आहे. त्याला परिस्थितीची जाण आहे. त्याला भ्रष्टाचार समूळ नष्ट करावयाचा आहे, देशातली बेरोजगारी मिटावी, असे त्याला कळकलीने वाटते आहे. आज समाजात वावरताना महिला सुरक्षित नाहीत, याची त्याला जाणीव आहे आणि त्यांना सुरक्षितता  मिळावी असे वाटते आहे.याशिवाय आपल्या देशाचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढावे, अशा खूपशा अपेक्षा त्यांना आहेत. याचे मूळ देशातल्या व्यवस्थेत आहे. त्या व्यवस्थेत अमूलाग्र बदल व्हावा आणि यासाठी राजकीय व्यवस्था बदलायला हवी, हे आता आजच्या तरुण वर्गाला उमलले आहे.
      अलिकडच्या  काळात अनेक घोटाळे उघडकीस आले. महिलांवरील अत्याचारांचे प्रमाणही वाढले आहे. आणि ज्यांना देशाच्या उन्नतीसाठी कायदे करण्यासाठी संसदेत वा विधिमंडळतात पाठवले, त्याच लोकांनी सभागृहाच्या शिष्टाचाराला काळिमा फासला. के सगळे ही तरुणाई पाहात आली आहे. वाढती गरिबी, चोरी-दरोडे, आर्थिक फसवणुकी प्रकार हे चित्र देशाच्या प्रतिष्ठेला घातक आहे, याची जाण त्यांना आहे.
 हे  सगळे घडत असताना आजचा तरुण वर्ग घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे वावरतो आहे. त्याला जागतिकीकरणाची आस आहे, त्यात तो स्वत: ला सामावून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याबरोबरच तो सामाजिक, राजकीय स्थितीबद्दल जागरूकही आहे. आजच्या नव्या तंत्र ज्ञानाला त्याने आपलेसे केले आहे. स्वत: त्याच्याशी जोडून घेतले आहे. तो सतत माहिती आणि ज्ञानाविषयी अपडेट राहत आहे. हे सगळे खरे असले तरी त्यांच्यात भरकटलेपणाही जाणवतो आहे. पहिल्यासारखे पुढार्‍यांच्या मागे लागून केवळ दारू आणि मटण त्याला नको आहे. त्याला स्वत: एक इमेज बनवायची आहे. मात्र यासाठी तो उतावळा आहे. आपण लवकरात लवकर सेटल व्हायला हवं, म्हणून सतत धडपडत आहे. आणि यातच त्याची चूक होते आहे. संधीसाधू लोक याचाच फायदा घेतात. आजचा तरुण त्यात फसत चालला आहे.
       आजचा तरुण आपली मते पटकन जाहीर करतो. त्याला विस्तृत विचार करावासा वाटत नाही.सोशल मिडियावरची त्यांची मतं त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे जाणवून देतात. सव्वाशे कोटीच्या देशात जादूची कांडी फिरवावी, तसा लगेच काही चमत्कार घडणार नाही, मात्र त्यांचा ही माजलेली आराजकता घालवण्याप्रती किती चीड आहे, हे त्यांच्या उत्साहावरून जाणवते आहे. हा उत्साह चांगलाच आहे, परंतु, त्याबरोबर विचाराची, आणि शांतपणे मते मांडण्याचीही आवश्यकता आहे.
      तरुणाईला  विकास हवाय. हा विकास समाजकारणातून यायला हवा. केवळ सवंग लोकप्रियता मिळवून राजकारण कराणारा नेता त्यांना नको असला तरी तरुणाईला अती घाईही महागात पडणार आहे. आजचा तरुण विचारी आहे, हे खरे आहे, मात्र त्याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी झाला आहे. आज जे काही आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. चोर्‍या-मार्‍या होत आहेत, यात तरुण पिढीच आहे. स्त्रिया किंवा तरुणींवर जे अत्याचार होत आहेत, त्यात आजची तरुणाईच आहे. असल्या प्रवृतींना खतपाणी घालणार्‍यांना पहिल्यांदा करा. जे या जाळ्यात अडकले आहेत, त्यांचे मत परिवर्तन करा.
      आजच्या राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही या तरुणाईची मते जाणून घ्यायला हवीत. ही तरुण पिढी आता केवळ दारू-मटणाला भूलणारी नाही. त्यांना सर्वच दृष्टीने स्थैर्य हवे आहे. त्यांना रोजगार हवाय. त्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. ते देण्याचे काम राजकीय पक्षांनी, नेते म्हणवणार्‍यांनी करणं गरजेचं आहे.  तरुणाईची मते जाणून घेण्याची संधी या निवडणुकीद्वारे मिळणार आहे. ही संधी दवडली तर  तरुणाई त्यांना माफ करणार नाही.     
 

No comments:

Post a Comment