Tuesday, August 18, 2015

बालकथा : एक होता फिलिपोक

     एक मुलगा होता. त्याचं नाव होतं फिलिपोक. एकदा सर्व मुलं शाळेला निघाली होती. फिलिपोकदेखील टोपी सावरत त्यांच्या मागे मागे निघाला. तेवढ्यात आई ओरडली, “ कुठे निघालास फिलिपोक?”
 शाळेला!
     “ पण तू तर अजून छोटा आहेस.” आणि आईने त्याला घरीच थांबवलं. दुसरी सगळी मुलं शाळेला निघून गेली. बाबा सकाळी-सकाळीच जंगलात गेले होते. थोड्या  वेळाने आईदेखील रोजंदारीच्या कामाला गेली. घरात फिलिपोक आणि म्हातारी आजी दोघेच उरले. फिलिपोकला  एकटेपणाचा  कंटाळा येऊ लागला, कारण आजीला तर झोप लागली होती.त्याने आपली टोपी शोधण्याचा प्रयत्न केला. त्याची तर मिळाली नाही, पण बाबांची जुनी टोपी आवश्य मिळाली. फिलिपोक तीच घालून शाळेच्या दिशेने निघाला.
      शाळा गावाबाहेरच्या  मंदिराजवळच  होती. फिलिपोक आपल्या गल्लीतून निघाला, तेव्हा कुत्री त्याच्यावर भुंकली नाहीत, कारण ती त्याला ओळखत होती. पण जसा तो दुसर्‍या गल्ली पोहचला, तसा एक बारकुळा कुत्रा त्याच्यावर भुंकला. त्याच्या पाठोपाठ मोठा कुत्रा बोल्चोकदेखील जोरजोराने भुंकू लागला. फिलिपोक पळाला. मग कुत्रीदेखील त्याच्या मागे मागे लागली. फिलिपोक ओरडू लागला आणि ठेचकाळून  रस्त्यात पडला. तिथून जाणार्‍या एका शेतकर्‍यानं कुत्र्यांना हाकललं आणि फिलिपोकला विचारलं, “तू कुठे एकटा पळालायेस? ”  फिलिपोक काहीच बोलला नाही. तो उठला. कोट एकसारखा केला आणि डोक्याला पाय लावून धावत सुटला.
      तो शाळेजवळ पोहचला. व्हरांड्यात कोणीही नव्हतं. आतून मात्र मुलांचा आवाज ऐकू येत होता. अचानक फिलिपोकला भीती वाटू लागली,  गुरुजींनी पळवून लावलं तर? काय करावं, याचा तो विचार करू लागला. परत जावं तर कुत्री चावायला मगे लागतील. आणि वर्गात जावं,  तर  गुरुजींची भीती वाटतेय. तेवढ्यात तिथून रिकामी बादली घेऊन एक बाई निघाली. ती म्हणाली, सगळी मुलं शाळा शिकताहेत आणि तू का एकटा बाहेर उभा आहेस? ” फिलिपोक ते ऐकून वर्गाच्या दारासमोर गेला. टोपी काढून काखेत घुसवली. दरवाजा ढकलला. सगळा वर्ग मुलांनी खचाखच भरला होता. सगळे मोठ्याने दंगा करत होते आणि गळ्याला लाल मफलर गुंडाळून  गुरुजी मुलांमधून फिरत होते.
      “काय रे? ” फिलिपोकला पाहून गुरुजींनी विचारले. फिलिपोकने टोपी गच्च पकडली. पण काही उत्तर दिलं नाही.
      “तू कोण आहेस? ”
      फिलिपोक पुन्हा काही बोलला नाही.
     “ काय मुका आहेस का? ”
      फिलिपोक इतका घाबरला होता की, त्याच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते.
     “ बोलायचं नसेल तर मग घरी जा. ”
      फिलिपोकला बोलण्यानं आनंदच झाला असता, पण भीतीपोटी शब्दच घशात अडकले होते. त्याने गुरुजींकडे पाहिले आणि त्याला रडू कोसळले. गुरुजींना त्याची  दया आली. त्यांनी प्रेमानं त्याचं डोकं हलवलं. मुलांकडे पाहात विचारलं, “कोणाचा रे हा मुलगा? ”
      “हा कोस्त्याचा भाऊ फिलिपोक आहे. तो शाळेला येतो म्हणतोय, पण त्याची आई पाठवून देत नाही. आता बहुतेक आईला न सांगता आला असावा. ”
     “ ठीक आहे, जा ! तुझ्या भावाजवळ जाऊन बस. मी आज तुझ्या आईला भेटून तुला  शाळेला पाठवायला सांगेन. ” असे म्हणून त्यांनी फिलिपोकला  अक्षर दाखवू लागले. पण फिलिपोक ती अगोदरच जाणत होता आणि थोडं फार वाचतही होता.
     “ सांग, तुझे नाव कसे लिहितात? ”
     “ फ-इ-फि, ल-इ-लि,प-ओ पो आणि क, फिलिपोक, ” फिलिपोक बोलला. सगळे हसले. “शाब्बास! गुरुजी म्हणाले, कोणी शिकवलं तुला? ”
      फिलिपोकला आता भीती वाटत नव्हती. तो म्हणाला, “कोस्त्याने. मी हुशार आहे. मला लगेच समजतं. तुम्ही पाहिलं नाही, पण मी फार हुशार आहे. ”  गुरुजी हसले आणि म्हणाले, “प्रार्थना येते? ”
     “ हो ” आणि तो पटकन म्हणायला देखील लागला. पण प्रत्येक शब्द  चुकीचा उच्चारत होता. गुरुजींनी त्याला थांबवलं आणि म्हणाले, “ फार  शहाणा होऊ नकोस. अजून तुला खूप शिकायचं आहे. ”
      त्या दिवसापासून दुसर्‍या मुलांबरोबर फिलिपोकदेखील शाळेला जाऊ लागला.  -
                                                                                                                               मच्छिंद्र ऐनापुरे, .                                                                                                                     (मूळ कथा- लिओ टॉल्सटॉय ) 
 

No comments:

Post a Comment