Tuesday, August 18, 2015

बालकथा : जिंग आणि जोंग

      चीनमधल्या एका गावात जिंग आनि जोंग नावाचे दोन मित्र राहात होते. जिंग मोठा कष्टाळू , तर जोंग तितकाच आळसी होता. एक दिवस जिंग सकाळी सकाळीच जोंगच्या घरी गेला. म्हणाला,” जोंग चल, जंगलातून लाकडे आणू. पावसाळा सुरु होतोय. परत आपल्याला वाळलेली लाकडे मिळणार नाहीत.”
      “ जिंग, अरे माझ्याकडे अजून खूप लाकूडफाटा आहे. मला इतक्यात त्याची आवश्यकता नाही.” जोंग म्हणाला.
      “ जोंग, जितका लाकूडफाटा अधिक तितका त्रास कमी. आणि नंतर वाळलेली लाकडे मिळणं मुश्किल हो ऊन जाईल. “ जिंग समजावणीच्या सुरात म्हणाला. जिंग मात्र काही ना काही बहाणे बनवत त्याच्याबरोबर जाण्याचे टाळत राहिला. शेवटी वैतागून जिंग एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला.
       जंगलात जाऊन जिंगने दिवसभर लाकडं तोडली. संध्याकाळी ती आपल्या घोडागाडीत टाकली आणि घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने घरासमोर ती लाकडं रचली. घोडा बागेत बांधून तो घरात गेला. जिंग आत जाताच जोंग हळूच तेथे आला.रचलेल्या लाकडांमधली काही लाकडे उचलून घेऊन आपल्या घरात गेला. त्यानंतर जोंगला ज्या ज्या वेळेला संधी मिळे त्या त्या वेळेला तो जिंगचा लाकूडफाटा चोरत असे आणि आपल्या घरात आणून रचत असे. याचा परिणाम असा झाला की, जिंगचा लाकूडफाटा लवकरच संपला. त्यामुळे त्याला पुन्हा जंगलात जावं लागलं.
      या खेपेला जिंगने पहिल्यापेक्षा अधिक लाकूडफाटा गोळा केला आणि आपल्या घोडागाडीतून घेऊन घरी आला. पावसात ती भिजू नयेत म्हणून त्याने ती घोडयाच्या पागेत रचली. पागेचे दार व्यवस्थित बंद केले. सगळी कामे आटोपून तो आपल्या खोलीत  जाऊन झोपला.इकडे संधी मिळताच जोंग आपल्या घरातून बाहेर आला. आणि हळूच जिंगच्या घोड्याच्या पागेत गेला. त्याने भराभर लाकडांची मोळी बांधली आणि तितक्याच वेगाने मोळी घेऊन घरी आला. पण या गडबडीत त्याने पागे दार लावण्याचेच विसरला.
 त्याच रात्री मुसळधार पाऊस झाला. पागेचा दरवाजा उघडा असल्याने  जिंगची लाकडे सारी भिजली.सकाळी उठल्यावर जिंग पागेत गेला तर त्याला सगळी लाकडे भिजली  असल्याचे दिसले.
       जिंगला वाटलं, आपल्या बेफिकिरीमुळे दार उघडे राहिले आणि लाकडे भिजली. तो स्वत: ला दोष देत बाहेर आला. आता त्याला लाकडांची गरज होती.
 “ काय रे जिंग, असा का सुतकी चेहरा करून बसला आहेस?” जोंगने विचारल्यावर जिंग सगळा प्रकार सांगितला.
      “खरेच वाईट झाले, पण तू काही काळजी करू नकोस. हवं तर माझ्याकडून लाकडे घेऊन जा.” जोंग म्हणाला.
      “ धन्यवाद मित्रा, खरेच मला लाकडांची गरज होती.” जिंग काहीसा अडखळत म्हणाला. मग जोंगने त्याला लाकडे आणून दिली.
 “ जोंग, मी लवकरच तुला तुझी लाकडे परत करीन.’
 “ अरे, तुला वाटेल तेव्हा परत कर. काही काळजी नाही.”
      “ बरंझालं, तू लाकडे दिलीस नाही तर आज मी स्वयंपाक करू शकलो नसतो.” असे म्हणत त्याने लाकडे फोडायला घेतली. त्याचे तुकडे करताना त्याच्या लक्षात आले, ही लाकडे काल त्यानेच आणली होती. म्हणजे जोंगच आपले लाकडे चोरत होता! त्यामुळेच त्याच्या दुर्लक्षामुळे पागेचे दार उघडे होते आणि सगळी लाकडे भिजली होती. त्याला तर राग खूप आला होता, परंतु तो काही म्हणाला नाही. जोंगला धडा शिकवण्याचा मनातल्या मनात निश्‍चय केला.
      काही दिवस लोटले. एक दिवस जिंग जंगलात गेला आणि अन्य लाकूडफाट्याबरोबरच त्याने अशीही काही लाकडं तोडली की, ज्याच्या जळण्याने उग्र दुर्गंधी उठते. अधिक धूर निघतो. डोळ्यांची आग आग होते. ती लाकडे त्याने बेफिकिरीने दारासमोरच टाकली. संधी मिळताच जोंग घराबाहेर आला आणि त्यातलीच काही लाकडे घेऊन घरात पळाला.
 दुसर्‍यादिवशी जिंगला लाकडे कमी दिसली. तो समजून चुकला की, जोंगने त्याची लाकडे चोरली आहेत. पण आता त्याला आनंद झाला होता.
       संध्याकाळी जोंगने त्याच लाकडांचा जळणासाठी वापर केला. लाकडे जळताच घरभर उग्र दुर्गंधीयुक्त दूर पसरायला लागला. धूर नाका-तोंडात गेल्याने तो खोकल्याने बेजार झाला. डोळ्यांमध्ये आग आग हो ऊ लागली. ओरडत-खोकलतच तो घराबाहेर आला.
 त्याचा आवाज ऐकून जिंग बाहेर आला. म्हणाला,” का रे, असा का खोकलतोयस? आणि ही उग्र दुर्गंधी कसली?’  जिंग काही न कळल्यासारखे हावभाव करत म्हणाला. जोंगने घडला प्रकार सांगितला.
      “ कदाचित तू चुकून जंगलातून दुर्गंधीयुक्त लाकडे तोडून आणली आहेस. अरे पण जोंग, जंगलात असली लाकडे खूप आत आहेत. पण चांगली लाकडं तोडायची सोडून असली लाकडे तोडण्याची बुद्धी तुला कोठून आली? “जिंग त्याला खिजवण्यासाठी म्हणाला, पण जोंग समजून चुकला की, आपण जोंगची लाकडे चोरतोय, हे जिंगला समजले आहे. त्यामुळे जोंग मोठा खजिल झाला. त्याने जिंगची क्षमा मागितली. शिवाय यापुढे असा प्रकार करणार नाही, असे वचनही त्याने जिंगला दिले.  
 

No comments:

Post a Comment