Tuesday, August 18, 2015

कानाचे विकार बळावण्यास इअरफोन कारणीभूत

      स्मार्ट फोनने सगळ्यांनाच आणि त्यातल्या त्यात तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. सध्या त्याचाच जमाना आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मोबाईल कंपन्यांच्या जीवघेण्या प्राईस वॉरमुळे किंमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळेतल्या पोराकडेही आता स्मार्टफोन दिसतो आहे. पालकांनाही त्याबाबत काही वाटेनासे झाले आहे. आजची पिढी सध्या मोबाईलवर सतत गाणी-एफएम ऐकणे,व्हिडीओ पाहणे, गेम खेळणे आणि इररफोन लावून अखंडपणे बोलत राहणे, यातच मश्गुल आहे. पण या इररफोन लावण्याने कानाचे विकार बळावण्याचे प्रमाण तर वाढले आहेच, शिवाय हा इररफोन जीवावर बेतला असल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
      सततच्या कानाला इअरफोन लावून वावरण्याच्या घटनांमुळे कानाचे अनेक विकार बळावण्याचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष नुकताच मुंबईतल्या संवेदना नामक समाजसेवी संस्थेने केलेल्या वैद्यकीय पाहणीतून काढला आहे. या संस्थेने अलिकडेच आपल्या स्वयंसेवकांकरवी कॉलेजमधल्या तरुणाईची आणि नोकरदार-व्यावसायिक लोकांची पाहणी केली. शिवाय शासकीय व खासगी रुग्णालयांतून त्यांनी कानांचे विकार असलेल्या रुग्णांचा अहवाल मागवला. या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. एवढे हो ऊनही त्रुणाई याकडे गांभिर्याने पाहायला तयार नाही, असा निष्कर्षही त्यांनी काढला आहे.

     आधीच कानांत इअरफोन घालून रस्त्यावरून जाताना, रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताने अनेकांना आपला जीव गमवायला लागला आहे. याच्या बातम्या मोठ्या प्रमाणात माध्यमांमधून आल्या आहेत. त्यावर लेख-चर्चा झडल्या आहेत.जनजागृतीचाही प्रयत्न होतो आहे, तरीही याकडे तरुणाई कानाडोळा करताना दिसत आहे.  शिवाय वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये , हे कायद्याने गैरवर्तन असतानादेखील तरुणाई कायदा पाळायला तयार नाही. पोलिसांकडून दंड हो ऊनही ही मंडळी आपल्याच नादात झिंगताना दिसत आहे.

      वास्तविक उन्हळ्यानंतर कान व नाकाचे विकार वाढतात. कानात जमा होणारा मळ पावसाळी वातावरणामुळे प्रसरण पावतो. छरिणामी कानांत फंगस झाल्यामुळे कान दुखायला लागतो. सर्दीमध्ये शिंका येऊन रोगजंतू हवेत पसरल्याने इतरांना त्याचा संसर्ग होतो.त्यातून कानाचे दुखणे वाधते. पावसाळ्यात कान दुखण्याच्या तक्रारीत 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते. सध्याची तरुणाई मोबाईलशिवाय जगत नाही. अगदी शौचाला जाताना, झोपताना मोबाईल आपल्याजवळच ठेवते. स्मार्टफोन तर त्यांचा जीव की प्राण झाला आहे. एकवेळ जेवळ नसले तरी चालेल पण मोबाईल त्यांच्या हातून सुटत नाही. सतत इअरफोन लावून गाणी ऐकणे व व्हिडीओ पाहणे हाच त्यांचा उद्योग चालू असतो. इअरफोनच्या सततच्या वापरामुळे कान दुखण्याचे प्रमाण वाढते. इअर फोनमुळे होणारे अपाय लगेच जाणवत नसले तरी त्याचे दुरगामी प्रिणाम जाणवतात, असे मत कान, नाक आणि घसा तज्ज्ञांनी या संस्थेकडे मांडले आहे. मोबाईलवर अखंड बोलणे, त्याचे रेडिएशन आदींमुळे कायमचे भिरेपण वा डोकेदुखीचा त्रास होतो. त्यामुळे कानाच्या आतील भागात समस्या निर्माण होतात.
      इअरफोनमुळे आपल्याकडे कानाच्या दुखण्याकडे फारसे गांभिर्याने घेतले जात नाही. कुठले तरी डॉप्स कानांत घालून मोकळे होतात. तज्ज्ञांचा सल्ला याबाबत घेतला जात नाही. सतत इअरफोनच्या वापरामुळे कानासह मेंदू,नाक आणि पर्यायाने अप्रत्यक्षरित्या अन्य अवयवांवरही परिणाम होतो. बाह्य, मध्य आणि आंतर हे कानाचे तीनही भाग महत्त्वाचे व संवेदनशील आहेत. त्यांची निगा राखलीच पाहिजे. आज कानाच्या विकारांसाठी अद्यायवत तंत्रज्ञानही उपलब्ध आहे;परंतु मुळातच कानाची काळजी घेतल्यास कोणताही विकार उद्भवणार नाही. त्यामुळे सर्वांनीच विशेषत: तरुणाईने इअरफोनचा वापर कमी करावा आणि अकाली बहिरेपण अथवा विकारांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. 
 

No comments:

Post a Comment