Tuesday, August 18, 2015

बालकथा : सोन्याच्या मोहरांची थैली


       रमाकांत दरिद्री नारायण होता. चिंता- काळजीने ग्रासलेला होता. एक दिवस जंगलात तो इकडे-तिकडे भटकत  असताना त्याला परीराणी भेटली. म्हणाली, “रमाकांत, मला माहितेय, तू मोठ्या काळजीत आहेस. मी तुला मदत करू इच्छिते. मी तुला सहा वस्तूंची नावे सांगेन. त्यातल्या कुठल्याही एका वस्तूची निवड तुला करावी लागेल. ती नाव ऐक, बुद्धी,बळ,आरोग्य,सौंदर्य, दीर्घायुष्य आणि धनदौलत. ”
      रमाकांतला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या. आपले दैन्य सरणार या कल्पनेनेच त्याचे मन हवेत तरंगायला लागले. आपण आता वेडेपिसे होतोय की, काय असेही त्याला  वाटायला लागले. तो  मागचा-पुढचा काहीच विचार न करता म्हणाला, “या जगात धनदौलतीपेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. मला धन देऊन टाक. ”
     त्याचा आततायीपणा पाहून ती हसली, म्हणाली, “ रमाकांत तुझी निवड यथोचित नाही. पुन्हा विचार कर. ”     परंतु, रमाकांतला तर धनदौलतीशिवाय काहीच नको होतं. कारण धनदौलतीच्या जोरावर काहीही मिळवता येऊ शकत होतं, अशी त्याची पक्की धारणा झाली होती.
     परीराणीने त्याला एक अद्भूत थैली दिली. त्यात दहा सोन्याच्या मोहरा होत्या. त्या थैलीचं वैशिष्ट असं  की, त्यातून कितीही वेळा  मोहरा काढल्या तरी त्यांची संख्या दहापेक्षा कमी होणार नव्हती.थैली देवून परीराणी अदृश्य झाली.
      मोहरांची थैली मिळाल्याने रमाकांत अक्षरश: आनंदाने  नाचायला लागला. त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि आनंदाचा क्षण होता. तेवढ्यात तिथे आणखी दोन पर्‍या अवतरल्या. त्यांना पाहून तो एका झाडामागे लपला आणि हळूच तिथून सटकला. कारण आता त्याला कशाचीच गरज  वाटत नव्हती. तो थडक घरी आला.
      तिकडे जंगलात अवतरलेल्या पर्‍यांमधील एक सुष्ट आणि एक दुष्ट परी होती. त्या जंगलात त्यांच्या गुणावगुणांनी भरलेल्या फळ-झाडांचे रोपण करायला आल्या होत्या. दुष्ट परीने एक बियाणं टोचताच तिथे रसदार  फळांनी लगडलेला एक  वृक्ष अवतरला. फळं मोठी मोठी आणि मधुर होती.  सुष्ट परीने टोचलेल्या वृक्षाला मात्र छोटी छोटी फळं लागली. हे  पाहून दुष्ट परी सुष्ट परीची टर उडवत  हसत सुटली. सुष्ट परी म्हणाली, “ठिक आहे, तुझ्या मार्गाने चाललेल्यांना  प्रारंभी लाभ होतो पण, शेवटी विजय चांगल्याचाच होतो.आपण आपापले काम करत राहू. पाहू, कोण जिंकतं ते? ” असे म्हणत दोघी वेगवेगळ्या दिशांना निघून गेल्या.
 इकडे  रमाकांतने आपल्या मुलांना खुशखबर ऐकवली. काशीराम आणि ज्योतीराम ही त्याची मुलं.  ती त्याच्याला हाताला आली होती. मुलेदेखील पार आनंदून गेली. रमाकांत म्हणाला, “या थैलीच्या जिवावर आपण जगातील सगळी सुखं भोगू  शकतो. आता  फक्त मज्जा करायची. ”
      थैलीतून त्याने आपल्या मुलांना चिक्कार मोहरा काढ्न दिल्या. आता मी पुरी विश्‍वयात्रा करून येतो, असे सांगून  रमाकांत तेथून निघाला. सोनेरी मोहरांच्या थैलीच्या जिवावर रमाकांतचा प्रवास अगदी मजेत चालला होता. तो जिथे जिथे जाई, तिथे तिथे त्याचे स्वागत मोठ्या आदबीने आणि दिमाखात होई.हळूहळू सर्वांना कळले की, रमाकांतकडे अद्भूत थैली आहे. एकदा फिरत फिरत रमाकांत एका नगरात पोहचला. तिथल्या राजाला भेटायला गेला. राजाला त्याने अमूल्य अशा वस्तू नजराणा म्हणून दिल्या. एव्हाना राजालादेखील  कळले होते की, या प्रवाशाकडे अद्भूत थैली आहे.    राजाने त्याला विचारले, “आतापर्यंत तू या थैलीच्या मदतीने पुष्कळ धन मिळवले असशील? ”
      हो... हो, ” रमाकांत अभिमानाने म्हणाला.
      “मग ही थैली काही दिवसांकरिता आम्हाला दे. ”ऐकून रमाकांत हादरलाच. त्याला काहीच सुचलं नाही, काय उत्तर द्यावं ते! राजा त्याला आपल्या रथात बसवून नगर दाखवायला घेऊन गेला. वाटेत तो रमाकांतला म्हणाला, “फक्त तुझ्याजवळच अद्भूत थैली आहे, असे समजू नकोस. माझ्याकडेदेखील एक अद्भूत टोपी आहे. ”
 “कसली टोपी आहे, दाखवा मला, महाराज. ”  रमाकांत अगदीच उत्सहात येऊन म्हणाला.
      राजाने त्याला टोपी काढून दाखवली. म्हणाला, “ ही घालणारा पक्ष्यांसारखा उडत कोठेही जाऊ शकतो. ”
 त्यावेळी रमाकांत राजाच्या बागेत हिंडत  होता.त्याने बोलता बोलता टोपी आपल्या हातात घेतली. डोक्यावर घातली आणि  मनात घरी जाण्याची इच्छा प्रकट केली. आणि काय आश्‍चर्य! तो तात्काळ उडाला आणि आपल्या घरासमोर येऊन उभा राहिला.घरी आल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला अद्भूत थैलीवर पाणी सोडावे लागणार, याची भीती सतावत  होती, पण आता त्याला अद्भूत टोपीदेखील मिळाली होती. तेवढ्यात त्याच्यासमोर परीराणी येऊन उभी राहिली.म्हणाली, “तू तुझे आयुष्य जगला आहेस. आता तुझा मृत्यू जवळ आला आहे.मला दु:ख वाटतं आहे, पण काय करणार? तू दीर्घायुष्याच्या मोबदल्यात धनदौलत मागितली होतीस.”
 रमाकांत दारात उदास बसून राहिला. मुलांना बोलावून  अद्भूत थैली आणि चमत्कारी टोपी  मुलांकडे सोपवत त्यांना  म्हणाला, “बाळानों, प्रामाणिकपणे जगा. आपसात प्रेमाने वागा आणि सुखात राहा. ” यानंतर काही दिवसांत रमाकांतचा मृत्यू झाला.
      काशीरामच्या वाट्याला सोन्याच्या मोहरा असलेली थैली आली. आयता धनदौलतीचा न संपणारा कटोरा हाती लागल्यावर मग काय? मज्जाच मज्जा! बिनधोक राहू लागला. त्याच्याने तो स्वच्छंदी, भोगविलासी बनला. बापासारखाच जगाच्या सहलीला निघाला. मुशाफिरी करता करता तो एका नगरात पोहचला. तिथल्या राजाला भेटला. त्याला बहुमूल्य उपहार दिला. याचवेळेला त्याची सुंदर राजकन्येशी ओळख झाली. तिच्या प्रेमात पडला. आता तो राजकन्येशी विवाह करण्याचे स्वप्न पाहू लागला. परंतु राजकन्या मोठी चतुर आणि चाणाक्ष होती. प्रेमाचे नाटक करून त्याच्याकडून तिने थैली हिरावून घेतली आणि त्याला नोकरांकरवी हाकलून लावले.
     उद्विग्न, कफल्लक  झालेला काशीराम असाच काही काळ भटकत राहिला आणि एक दिवस आपल्या गावी पोहचला.
     “ दादा, झालं गेलं विसरून जा आणि  इथे निवांत राहा. ” ज्योतीराम म्हणाला.
      पण काशीराम चरफडत होता. कसेही करून आपली सोन्याच्या मोहरांची थैली मिळवायची, असा चंगच त्याने बांधला होता. आणि एक दिवस त्याने ती जादूची टोपी पळवली आणि उडत जाऊन राजकन्येसमोर उभा राहिला. त्याने तिला आपली अद्भूत थैली मागितली.तेव्हा ती  बहाणे बनवू लागली.   तिने  विचारले, “इथे एकदम अचानक कसा आलास ?  आणि पाहरेकर्‍यांनी तुला आत येताना  अडवलं नाही? ”
 काशीराम मोठ्या घमेंडीत म्हणाला, “ राजकन्ये, तुला वाटलं असेल, माझ्याकडे फक्त सोन्याच्या मोहरांची थैली आहे. पण माझ्याकडे अशा अनेक अद्भूत वस्तू आहेत. ”
      बोलता बोलता त्याने टोपीचे वैशिष्टदेखील सांगून टाकले. राजकन्येला पुन्हा मोह आवरला नाही. ती त्याच्याशी पुन्हा लगट करू लागली. गोड गोड बोलू लागली. काशीराम भुलला आणि एक दिवस राजकन्येने टोपी हिरावून घेतली आणि त्याला पुन्हा  धक्के मारून  महालाबाहेर काढले.
      काशीराम भटकत भटकत एका जंगलात शिरला. समोर एक  सुंदर झाड होतं. त्याला रसरशीत सुंदर गोड-मधुर फळे लगडलेली होती. त्याला भयंकर  भूक लागली होती. त्याने धावत जाऊन त्यातले एक फळ तोडले आणि खायला  लागला. आणि काय आश्‍चर्य! त्याच्या डोक्यावर  काळीकुट्ट  शिंगे  उगवली.  त्याला विद्रुपता आली.ते फळ  दुष्ट परीने  लावलेल्या झाडाचे  होते. काशीरामला पाहून ती जोरजोराने हसू लागली.
      सुष्ट परीदेखील तिथेच होती. तिला काशीरामची अवस्था सहन झाली नाही.  ती  आपल्या झाडाचे फळ तोडून त्याला खायला देत म्हणाली, “रडू नकोस. हे घे फळ, सगळं ठीक होईल. ”
      त्याने ते छोटेशे फळ घेतले आणि खाल्ले. दुसर्‍याच क्षणी त्याच्या डोक्यावरची शिंंगे  गायब झाली. सुष्ट परी म्हणाली, “आता तरी स्वत: ला सांभाळ. वडिलांच्या मार्गाने जाऊ नकोस. ”
      काशीरामने  परीला वचन दिलं की, यापुढे  प्रामाणिक  मार्गानेच चालेन. मग त्याला आशीर्वाद देऊन परी अदृश्य झाली. काशीरामने जंगलातल्या चांगल्या आणि वाईट झाडांवर फुल्या केल्या. मग काही तरी विचार करून त्याने दुष्ट परीच्या झाडावरची फळे तोडली आणि ती घेऊन   राजकन्येला भेटायला गेला. तो  तिला फळे  देत म्हणाला, “मी तुझ्यासाठी विशेष नजराणा आणला आहे”
      राज्यकन्येने  फळ  घेतले. महालातल्या सगळ्या नोकरांनादेखील त्याने फळे खायला दिली. फळे खाल्यावर राजकन्येसह सर्वांच्याच डोक्यावर   शिंगे उगवली. तोपर्यंत काशीराम महालाबाहेर आला होता. तिथे त्याला त्याचा भाऊ ज्योतीराम भेटला. तो त्यालाच शोधत तिथे आला होता. ज्योतीराम  म्हणाला, “दादा, ती थैली आणि टोपी आपल्याला नष्ट करायला हवी. नाही तरी त्या आपल्यासाठी आफतच ठरल्या आहेत. ”
      काशीरामला धाकट्या भावाचे म्हणणे पटले, तो जंगलात गेल्या आणि सुष्ट परीच्या झाडाची फळं तोडली आणि वैद्याचा वेश धारण करून पुन्हा राजमहालात आला. राजकन्येचा अवतार मोठा विद्रुप दिसत होता. तिला पाहून सारेच पळून जात होते. राजकन्येनेही रडून रडून मोठा गोंधळ घातला होता. वैद्याचे रुप घेतलेल्या काशीरामने तिला आपल्याजवळचे फळ खायला दिले. राजकन्येने फळ खाल्ल्यावर  लगेच  राजकन्येच्या डोक्यावरची शिंगे गायब झाली. शिंगे उगवलेल्या महालातल्या इतर लोकांनीदेखील फळे खाल्ली. सगळे ठिकठाक झाल्यावर काशीरामने आपले खरे रुप प्रकट केले. राजकन्येला माफ केले. तर ज्योतीरामने महालात घुसून थैली आणि टोपी आणली आणि  लगेच जाळून टाकली.
      काशीरामलादेखील  आपली चूक उमगली. अधिक धन म्हणजे दु: खाची खाण, याची त्याला जाणीव  झाली.कष्ट करून समाधानाने जगण्याचे ठरवून तो आपल्या भावाबरोबर आपल्या गावाच्या दिशेने निघाला.
                                                                                                                
 

No comments:

Post a Comment