पूर्वी, अर्थात आमच्या वेळेला एक पाटी, एक पिशवी आणि एक-दोन पुस्तके या व्यतिरिक्त आमच्याकडे काही नव्हतं. पुढे शिक्षणाचा प्रसार वाढला.शासनाने मोफत पाठ्यपुस्तके द्यायला सुरवात केली.पालकालाही आपल्या पाल्याला शिकवलं पाहिजे असे वाटायला लागले, त्याला हवी ती गरज पालक पुरवू लागले. खासगी शाळांचा पसारा वाढला, तसा दप्तराचा बोझ्यादेखील वाढला. मात्र ग्रामीण शाळांपेक्षा खासगी शाळांच्या मुलांच्या दप्तराचं ओझं अधिक आहे. मुलांच्या दप्तरात असतं तरी काय पाहू. सर्व विषयांची पुस्तकं,तितक्याचं वह्या,कंपासपेटी,प्रयोग वही, मार्गदशिका(गाईड),जेवणाचा डबा,पाण्याची बाटली, हवामानानुसार छत्री, रेनकोट किंवा छत्री, पी.टी. तासासाठीचे शर्ट-पँट याशिवाय नकळतचं बरंच काही.याच्यानं दप्तर फाटून आतल्या वस्तू बाहेर डोकावू लागल्या. आणि मुलं ती वागवत नेताना झुकू लागले.
पण दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार केला असता, इतरांशी चर्चा केली असता दप्तराचं ओझं पुष्कळ म्हणजे पुष्कळचं कमी करता येणं शक्य आहे. आमच्या वेळेला आम्ही शिल्लक कोरी पानं काढू त्याचे पायडिंग करायचो. त्याचा विषयासाठी उपयोग करायचे. पण आता तसा उपयोग होताना दिसत नाही. त्याला खर्च योतो. लिहिताना अडचण येते. मुलांनादेखील ते आता आवडत नाही. पण वह्या कमी कशा करता येतील? याला एक उपाय आहे. 1)एक फाईल बनवावी. त्या फाईलमध्ये किमान (जितके विषय आहेत तितके ग्रहीत धरून) बारा कागद लावावेत. फाईलमधील कागदांचे विषयांप्रमाणे गट करावेत.प्रत्येक गटावर विषयांचे नाव, प्रकरणाचे नाव, त्याचा क्रमांक आणि तारीख टाकावी.
2) शाळेला नेताना ही एकच फाईल न्यावी.शाळेत जे लेखन करायचे, ते या फाईलमधील विषयांनुरुप लावलेल्या कागदांमधे करावी. प्रकरण पूर्ण होईपर्यंत तो संच तसाच जवळ ठेवायचा.पूर्ण झाला की, तो पिन लावून वेगळा करायचा.
3) प्रत्येक विषयांची स्वतंत्र फाईल घरी ठेवावी. फाईलीवर ठळक अक्षरात विषयाचं नाव मोठ्या आणि ठळक अक्षरात लिहावे.प्रकरण किंवा धडा पूर्ण होई तोपर्यंत घरी आल्यावर शाळेत नेलेले कागद त्या त्या विषयाच्या फाईलीत लावावीत.यासाठी पालकांनी मुलांना थोडी फार मदत करावी. यामुळे वह्यांचं ओझं शून्यवत होईल.शेवटपर्यंत फक्त एकच फाईल न्यावी लागेल. घरी आल्यावर त्या त्या विषयांच्या फाईलला कागद लावताना आपोआपच उजळणी होईल.
वह्या आणि पुस्तकांचं ओझं कमी झालं की, दप्तर अगदी हलकं हलकं होईल. मग ओझ्याचा विचारच का करायचा?
4) फाईली या प्लॅस्टिकच्या, हलक्या आणि आकर्षक वापराव्यात.
5) पाठ्यपुस्तक मंडळाने दोन सत्रासाठी दोन स्वतंत्र पाठ्यपुस्तके बनवावीत. सध्या पहिली ते चौथीसाठी हा प्रयोग पाठ्यपुस्तक मंडळ वापरत आहे, मात्र बारावीपर्यंत हा प्रयोग राबवायला हवा.
6) आरटीईनुसार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय अनिवार्य आहे. शाळांनी फिल्टरचे पाणी उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना घरून पाण्याच्या बाटल्या आणाव्या लागणार नाहीत. आठवीपर्यंत शालेय पोषण आहार शाळांमध्ये उपलब्ध आहे. पुढे हा पोषण आहार दहावीपर्यंत वाढवावा.त्यात आणखी सुधारणा केल्यास मुलांना घरून डबे आणावे लागणार नाहीत.यासाठी पालकांची पालकसभा घेऊन समजावून सांगावे. या गोष्टी पाळल्यास दप्तराचं ओझं वाटणार नाही.
No comments:
Post a Comment