Tuesday, August 18, 2015

पेपरवाला पोर्‍या: सकाळी सकाळी प्रकाश दाखवणारा

     सकाळी ठरल्या वेळेत पेपर आला नाही तर मन अस्वस्थ व्हायला होतं. काही तरी हरवल्यासारखं, राहून गेल्यासारखं होतं. कित्येकदा वृत्तपत्रात वाचण्यासारखं नवीन असं काही नसतंच. टीव्ही, इंटरनेटच्या आजच्या जमान्यात सगळंच अगोदर कळतं. परंतु तरीदेखील वृत्तपत्र वाचण्याची तल्लफ काही जात नाही. तीदेखील एक नशा आहे. दारुड्याला, मावा-गुटखा खाणार्‍याला विचारा, तल्लफ काय असते ती! वृत्तपत्र वाचण्याचीही एक तल्लफ आहे. त्याशिवाय त्याचा दिवस चांगला जात नाही. अर्थात ती ठरल्या वेळेला मिळायला हवी.    सकाळच्या चहा किंवा नाष्टाबरोबर वृत्तपत्र नसेल तर चहा, नाष्टाचा स्वाददेखील बेचव लागतो. ऋतु कोणताही असो, पावसाळा असो की हिवाळा. पेपरवाला ठरल्यावेळी हमखास येतो. कितीही विपरीत वातावरण असलं तरी त्याचं आगमन त्याच्या निष्ठेला, त्याच्या जबाबदारीला आपलं मन सलाम करायला उठतं.
      जवळजवळ सगळीचं वृत्तपत्रं रात्री उशिराच प्रेसमधून बाहेर पडलेली असतात. आता नव्या तंत्रज्ञानामुळं काही वृत्तपत्रांनी पुरवण्यादेखील नेहमीच्या अंकात समाविष्ठ करून देतात. या अगोदर स्थानिक पुरवण्या, विशेषांक, रविवारसह अन्य विषयांवरच्या पुरवण्या पेपरवाल्या मुलालाच घालाव्या लागत होत्या. अजूनही काही वृत्तपत्र पुरवण्या स्वतंत्ररित्या देतात, तेव्हा या मुलांची दमछाक होते. काही स्थानिक लोक वृत्तपत्रांच्या जाहिरातींचा खर्च परवड्त नाही, म्हणून आपल्या संस्थेच्या जाहिरातीच्या पॉंम्लेट वृत्तपत्रात घालायला देतात. चार पैशाच्या आशेपायी ही मुलं तीदेखील कामं न कुरकुरता करतात. ही मुलं आपली जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडताना दिसतात.या मुलांचा दिवस पहाटेलाच सुरू होतो. 
      एका मुलाकडे अनेक वृत्तपत्रांची चळत असते. एजंट किंवा मालक आपलं काम करीत असतात. मात्र खरं काम या पेपर वाटणार्‍या मुलांचं आहे. पोस्टमनसारखं जाण्या-येण्याचा एरिया ठरवून त्या विविध वृत्तपत्रांची मांडणी करून सायकलच्या मागच्या कॅरेजला लावतो किंवा पिशवीत सरकावतो. आणि अनेक बातम्यांचं ओझं घेऊन तो सायकलला टांग मारतो. वृत्तपत्रात काय छापलं आहे, हे त्याच्या खिजगणीतही नसतं. ॠायकल चालवता चालवता मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच विचार घुमत असतो. कुणाला कोणतं वृत्तपत्रं द्यायचं आहे, कुणाकडे किती महिन्याचं बील बाकी आहे. तू रोज पेपर टाकत नाहीस, तुला मिळणार नाही, असे ओरडणारी अन्नू आँटीचं काय करायचं. असे एक ना अनेक सवाल, प्रश्‍न  त्याच्या डोक्यात फिरत असतात. टसगल प्लोर घरांमध्ये पेपर वाटणं सोपं असतं, सायकलवर बसल्या-बसल्या पेपर फेकता येतो. पण डबल फ्लोर घरांमध्ये पेपर टाकायचं म्हणजे सायकलला स्टँड लावून वरपर्यंत जावं लागतं. कधी सायकल पडते, मग पुन्हा चळत बांधावी लागते. पहाटेच्यावेळी कुत्र्यांच्या हमला असतोच. कधी कधी पेपरच्या गाड्या वेळेत येत नाहीत. कधी एका वृत्तपत्राची गाडी आलेली असते, तर दुसर्‍या वृत्तपत्राची नाहीच.त्याच्यासाठी मग थांबावं लागतं आणि कस्टमरच्या बोलल्या बोलण्याला सहन करावं लागतं. सारखं बोलून सारवासारव करावी लागते. लोकांना मात्र वेळच्यावेळी पेपर हवा असतो. एवढं सगळं झेलत तो रुटीन पार पाडत असतो.
      वर्षातले बारा महिने एकच काम. त्यात बदल असा नाहीच! मला वाटतं, या पेपरवाल्या पोरांशिवाय आणखी कोणाचं असं ताईट रुटीन नसणार आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे, प्रत्येकाला वाटत असतं की, सगळ्यात अगोदर वृत्तपत्र आपल्याच हाती पडावं. मोठ्या शहरात तर हीच मुलं अगदी अचूक नेम धरल्यासारखे वृत्तपत्र खालून दुसर्‍या-तिसर्‍या फ्लोरवर टाकत असतात की, ते बरोबर हव्या त्या घरात किंवा दारासमोर जाऊन पडतं.
      सकाळचं वृत्तपत्र आणि त्याचा सुवास हवाहवासा वाटतो. ते हाती पडल्यावर धन्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या पचनक्रियेला खाद्य मिळाल्यासारखं वाटतं आणि तृप्ती झाल्याचंही समाधान वाटतं. सकाळी पेपर वाचायला नाही मिळाला तर दिवसाचा मूडदेखील बिघडून जातो. माझे काही वार्ताहर मित्र तर पहाटे पहाटेच पेपरची वाट पाहात स्टँडच्या एरियात  घुटमळताना पाहिली आहेत. त्यांना तर आपण दिलेली बातमी कशी लागली आहे आणि कुठे लावली आहे, हे पाहण्याची अतुरता असते. असं हे पेपरचं अनोखं वेड आहे.
      घरात आल्यावर मुलाला दिनविशेषचं पान हवं असतं किंवा क्रीडा पान. मुलीला आजचा मेनू काय दिलाय याची उत्सुकता. मग त्या मायलेकीच्या त्यावर गप्पा! सकाळी जरी सगळ्या पानांवर एकदा नजर फिरवली तरी समाधान होतं. नंतर त्या पेपरची पानं कुठे कुठे गेलीत, याची चिंता नसते. त्याची चिंता गृहकुट्उंबाला असते. त्यातून तिला महिन्याच्या रद्दीचे पैसे मिळत असतात. त्यामुळे तिचा पेपर वाचून (की चाळून) झाला की तो घडी घालून रद्दी ठेवण्याच्या जागी व्यवस्थित पडलेला असतो. नंतर दिवसभर त्याच्यकडे बघायचं झालं नसलं तरी दुसर्‍यादिवशीच्या वृत्तपत्राची वाट पाहतच असतो.

No comments:

Post a Comment