Tuesday, August 18, 2015

प्रेरणादायी जलतरणपटू काव्या गुप्ता

      20 ऑगस्ट 2000 मध्ये जन्मलेल्या काव्या गुप्ता हिने केवळ 26 महिने वयाची असताना  यंगेस्ट स्वीमर ऑफ इंडिया  हा किताब पटकावला आहे. याशिवाय तिने अनेक ऍवार्ड पटकावले आहेत. इतक्या लहान वयात तिची इतकी मोठी झेप आपल्याला आश्‍चर्यात टाकल्याशिवाय राहत नाही. कानपूरच्या राष्ट्रीय जलतरण पटू रीनिका गुप्ता यांची ही मुलगी आहे.  काव्या  अग्दी दोन वर्षांची असल्यापासून जलतरण क्षेत्रात आपला हात आजमावत आहे.
      काव्याने 2002 मध्ये केवळ 26 महिना वयाची असताना कानपूरच्या गंगा नदी काठावर असलेल्या प्रार्थना घाट ते काला घाट हे सुमारे अडीच किलोमीटरचे अंतर केवळ 18.24 मिनिटांत पूर्ण करून सगळ्यांच आश्‍चर्याचा धक्का दिला होता.  यामुळे तिचे नाव यंगेस्ट स्वीमर ऑफ इंडियाच्या रुपाने लिम्का बूक ऑफ रेकॉर्डमध्ये कोरलं गेलं. 2004 मध्ये पोगो अमेझिंग किड्स ऍवार्ड पटकावले तर 2005 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने यश भारती या खास ऍवार्डने तिला सन्मानित केलं. 2007 मध्ये गाजियाबादमध्ये तिचा निराला पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय 2008 मध्ये राष्त्रीय खेळ ऍवार्ड, 2011 मध्ये जय जगत केसरी रत्न ऍवार्ड, 2012 मध्ये राष्ट्रीय महिला जलतरण चॅम्पियनशीपचा पुरस्कारदेखील तिने जिंकला.
       जलतरणात राष्ट्रीय चॅम्पियन राहिलेल्या काव्याला अगदी लहानपणापासूनच पोहण्याचे बलकडू मिळाले.काव्याची आई रीनिका गुप्ता सांगतात की, ती दीड वर्षांची होती तेव्हापासून तिला स्वीमिंग पूलमध्ये घेऊन जायची. साधारणत: लहान मुलं पाणी म्हटले की, रडायला लागतात. पण काव्याला पाण्याशी खेळायला आवडायचं. एकदा माझे वडील कानपूरला आले होते. गंगा नदीत स्नान गेले. जाताना त्यांनी काव्याला सोबत नेले. तिथे नदीत काव्या उड्या मारताना, खेळताना पाहून त्यांना आश्‍चर्य वाटलं. त्यांनी काव्याच्या स्वीमिंग ट्रेनिंगची जबाबदारी घेतली. मग काय पावणे दोन वर्षाची काव्या रोज आपल्या आजोबांसोबत सायकलवर बसून यमुना नदीवर पोहायला जाऊ लगली. तिथे तिला सतीश राव कोचिंग देऊ लगले. ती ज्या ज्या वेळी कानपूरला यायची तेव्हा तिला ज्योती बाबा स्वीमिंग शिकवायचे.
      काव्याचे आजोबा श्याम गुप्ता सांगतात की, काव्यामध्ये एक अद्भूत क्षमता आहे. तिची मेमरीदेखील शार्प आहे. ती हार्ड वर्कर आहे. इतकंच नव्हे तर तिच्यात काही ना काही नवीन शिकण्याची लालसा आहे. नाही तर दोन वर्षाची चिमुरडी चार-पाच दिवसाच्या सरावामध्येच यमुना नदी कशी पार करू शकली असती.
 काव्या फक्त पोहण्यातच माहीर नाही तर शाळेमध्ये अभ्यासातदेखील अव्वल आहे. स्वीमिंगबरोबरच टेबल टेनिसचीदेखील प्रॅक्टीस करते. आठवी वर्षात शिकणारी काव्याने याच वर्षात टेबल टेनीसमध्ये ज्युनिअर गोल्ड आणि महिलांमध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे. अष्टपैलू काव्या गेल्या चार वर्षांपासून शाळेत अभ्यास टॉपवर आहे. काव्याचे रोल मॉडेल तिचे आजोबा आहेत.  
 

घरबसल्या खेळ आणि ज्ञानही!

     मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. बाहेर कडाक्याचं ऊन पडलं आहे. त्यामुळे आई-वडील मुलांना खेळायला बाहेर सोडत नाहीत. मग खेळायचं काय? आणि सुट्टीची मज्जा लुटायची कशी ?असा प्रश्‍न मुलांना पडतो. त्यांना आई-बाबांचा राग येतो. असं असलं तरी घरात बसून मुलांना सुट्टीची मजा लुटता यावी, म्हणून अनेक स्तरावर अनेक पर्याय टाकलेले असल्याचे आपल्याला दिसते. सापशिडी, कॅरम, बुद्धीबळ, पत्ते त्याचबरोबर टीव्हीवर खास मुलांसाठी असलेल्या वाहिन्यांवर खास कार्यक्रम वगैरे. वेबसाईटवर तर असे अनेक पर्याय खुले आहेत. अशाच एका वेबसाईटची ओळख पहा.
      वेबसाईटचं नाव आहे लर्निंग गेम्स फॉर किड्स. यात गेम्सचा खजिना तर आहेच शिवाय यातून बच्चे कंपनीला शिकण्यासारखंही बरंच काही आहे. घरात कॉम्प्युटर असेल किंवा लॅपटॉप. अथवा बाबांचा स्मार्टफोन. याद्वारे आपल्याला सुट्टीची मज्जा लुटता येते. ना अभ्यास ना गृहपाठ ना कसलं टेन्शन. फक्त गेम्स विद फन. असंच या वेबसाईटबाबत म्हणता ये ईल. यात खूप काही गेम्स आहेत. इतकंच नव्हे तर या गेम्स मुलांना खूप काही शिकवूनही जातात. आपल्या विषयात स्ट्रॉंग बनवण्यासाठी अशा विषयावर गेम्स बनवण्यात आल्या  आहेत. शिवाय मुलांना मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठीदेखील गेम्स तयार करण्यात आले आहेत.
       या वेबसाईटवर विषयानुरुप गेम्स बनवण्यात आले आहेत. हे गेम्स खेळताना मुलांना मज्जा तर येतेच शिवाय त्यांना विषयाचे अधिक ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे त्यांची विषयांवरची पकड मजबूत होते. आई-बाबांनी थोडी मुलांना  मदत केली तर त्यांना त्याचा चांगलाच उपयोग हो ऊ शकतो. गेम्स कॅटॅगरीमध्ये गेल्यावर मुलांना त्यात अनेक सेक्शन दिसतील. गणिताच्या (मॅथ्स)च्या सेक्शनमध्ये किंडरगार्टनपासून ते फिफ्थ ग्रेड मॅथ आणि ऍडिशन, सब्सट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, रँडो मॅथसारखे गेम्स दिले आहेत.
      ज्योग्रॉफी विभागात आफ्रिका गेम्स, अंटार्क्टिका गेम्स, एशिया गेम्स असे खंडांनुसार गेम्स उपलब्ध आहेत. सोशल स्टडीजमध्ये बेंजामिन फ्रँकलिन,इन्वेंटर्स, युएस प्रेसिडेंट, वुमन इन हिस्ट्रीसारखे गेम्स आहेत. सायन्स विभागात सायन्स एक्सपेरिमेंटस, सायन्स सॉंग्ज, स्पेस गेम्स,वेदर गेम्स, मोशन गेम्स, टू प्लेयर, सिम्पल मशीन गेम्स याशिवाय हीट एनर्जी गेम्ससारखे विभाग आहेत. ब्रेनगेम्समध्ये हँड आय गेम्स, लॉजिक गेम्स, मेमरी गेम्स, टू प्लेयर गेम्स इत्यादी आहेत. याशिवाय ऍनिमेशन गेम्स, आर्ट अँड मुझिक गेम्स, प्री स्कूल गेम्स, स्पेलिंग गेम्स, ग्राफिक गेम्स, अल्फाबेट गेम्स, वर्ड गेम्स, लिटरेचर गेम्स, की-बोर्डिंग गेम्स, युएस स्टेट सारखे गेम्स आहेत. कुठल्याही सेक्शनमधे गेलात की खेळाबरोबरच मेमरीची पॉवरदेखील वढवू शकते.
      मुलांना आरोग्यसंपन्न बनवण्यासंदर्भातदेखील हेल्थ गेम्स आहेत. कारण घरच्याघरी गेम्स खेळताना मुलं मानसिक आणि शारिरीकदृष्ट्या फिट राहावीत हे त्यामागले कारण आहे. त्यादृष्टीने विविध गेम्स दिले आहेत 
                                                                                                      
 

प्रकृती चंद्रा

     लखनौमधल्या सीएमएस स्कूलमधली दहावीची विद्यार्थींनी प्रकृती चंद्रा हिची सेवा भावना अनोखी आहे. केवळ चार वर्षाची असल्यापासून ती समाजसेवीशी जोडली गेली. या लहान वयात असल्यापासून ती लोकांना नेत्रदानासाठी प्रेरित करीत होती. तेव्हापासून आजतागायत ती या सेवेशी जोडली गेली आहे. आता पर्यंत ती नेत्रदानासाठी प्रेरित करण्यासाठी सडे तीन लाख लोकांपर्यत पोहचली आहे. आणि तिच्या प्रयत्नांवर प्रभावित हो ऊन 38 हजार लोकांनी नेत्रदानाचा संकल्प सोडला आहे. प्रकृतीच्या या सद्प्रयासामुळे आतापर्यंत चारशेपेक्षा अधिक लोकांच्या जीवनात प्रकाश उजळला आहे. आपल्या या अभियानाकडे लोकांचे लक्ष अकृष्ट करण्यासाठी तिने 2008 आणि 2009 मध्ये जनजागृती यात्राही आयोजित केली होती.
      पंधरा वर्षाची प्रकृती दृष्टी संरक्षण अभियानाची ब्रँड  अँबॅसिटर आहे. ती युनिसेफच्या विटामिन ए अभियानशीदेखील जोडली गेली आहे. नेत्रदानासाठी लाखो लोकांमध्ये जाग्ती करण्याच्या तिच्या प्रयत्नांमुळे तिचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि नॅशनल बुक ऑफ ऑनरमध्ये नाव सामिल झाले आहे. याशिवाय तिला पोगो अमेझिंग किड्स लीडर ऍवार्ड, भारत गौरव आणि राज्य शासनाचा महिला सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले   आहेत. प्रकृतीचा जन्म 27 नोव्हेंबर 1998 मध्ये झाला. ती लहान होती तेव्हा ती तिच्या आईसोबत-रंजनासोबत तिच्या क्लिनिकमध्ये जात असे. या काळात तिची नेत्रहिन मुलींशी मैत्री झाली. यातलाच एक मुलगा म्हणजे शिवम. त्याला खूपच कमी दिसायचे. एक दिवस ती चेंडूशी खेळत होती. तिने चेंडू शिवमला उचलायला सांगितला. पण त्याला दिसत नसल्याने तो चेंडू उचलू शला नाही. रिचे वडिल डॉ. रुपेश कुमार यांनी सांगितलं की, कॉर्निया खराब झाल्याने त्याला दिसत नाही. ती एकदम म्हणाली, कॉर्निया खराब झाले असतील तर मेडिकल स्टोअरमधून आणायला सांगा ना! मग वडिल तिला म्हणाले, ते विकत घेतले जाऊ शकत नाहीत. पण एखाद्याने आपल्या मृत्यूनंतर कॉर्निया दान केल्यास शिवम हे जग पाहू शकतो. वडिलांनी सांगितल्यावर तिच्या बालमनावर  खोल असा परिणाम झाला. त्याचदिवशी नेत्रहिन लोकांसाठी कही तरी करण्याचा तिने निर्णय घेतला. त्यामुळे तिच्या अभ्यासावर परिणाम हो ऊ लागला. अशा वेळेला तिला तिच्या टिचर मंजित बत्रा यांनी खूप मोठी साथ दिली. प्रकृती सांगते की, नेत्रहिन लोकांसाठी आतापर्यंत जे काही करू शकले, त्यात माझ्या आई-वडिलांबरोबरच टिचर मंजित मॅडम यांचादेखील मोठा वाटा आहे.
     नेत्रदानसाथी पूर्ण वेळ देणार्‍या प्रकृतीने गेल्याचवर्षी   www.beyondthevision.in या नावाचे पोर्टल लॉंच केले आहे. या पोर्टलद्वारा नेत्रहिनांच्या शिक्षण, आरोग्य, नोकरी आणि जीवनसाथी शोधण्यासाठी त्यांना मदत केली जाते. नेत्रदानासाठी इच्छूक असलेले लोक या पोर्टलवर जाऊन नेत्रदानाचे संकल्पपत्र भरू शकतात. अशा या समाजसेविकेला मिस युनिवर्स बनायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून नेत्रहिनांसाठी मोठं काम करायचं आहे.


 

बोधकथा : मानव सेवा हिच खरी ईश्‍वर सेवा

     दक्षिणी राज्य तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या शहरापासून जवळपास तीस मैलावर तिरुचुजही नावाचं गाव आहे. महर्षी रमण यांचा जन्म या गावात 30 डिसेंबर 1879 ला झाला. त्यांचं बालपणाचं नाव व्यंकट. यांच्या वडिलांचं नाव सुंदरम अय्यर तर आईचं नाव अलगम्माल. त्यांचे वडील नामांकित वकिल आणि दिलदार मनाचे व्यक्ती होते. त्यामुळेच वेंकट रमण यांचंही मनही परोपकारी होतं. पुढे व्यंकट रमण महर्षी रमण म्हणून विख्यात झाले.
      युवावस्थामध्येच महर्षी रमण यांची कीर्ती दूर दूरवर पसरली होती. त्यांनी प्रत्यक्ष ईश्‍वरदर्शन घेतलं आहे, अशी लोकांमध्ये त्यांच्याबाबतीत चर्चा होती. त्यावेळी देशात इंग्रजांचं शासन  होतं. ही गोष्ट इंग्रजांपर्यंत पोहचली. त्यांना विश्‍वास वाटला नाही. काही इंग्रज महर्षी रमणविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सुक होते. एक दिवस ते लोक महर्षींना भेटायला आले.
      “ आम्ही ऐकलंय की, आपण परमेश्‍वराचं दर्शन घेतलं आहे.” त्यातला एका इंग्रजानं विचारलं. इतक्यात दुसरा इंग्रज म्हणाला,” आम्ही  असम्ही  ऐकलंय की आपण त्यांना रोज भेटता?”
      त्यांचं बोलणं ऐकूण महर्षी हसले. मग  शांत स्वरात म्हणाले, “ हे खरंय की, मी ईश्‍वर दर्शन घेतलं आहे आणि हेदेखील खरंय की, मी रोज ईश्‍वराशी भेटतो.”
      “ तर मग आपण आम्हालादेखील ईश्‍वराशी भेट घालून द्यालं ना? “ सगळे इंग्रज एका स्वरात म्हणाले.
      महर्षी हसत म्हणाले, “ जर तुम्ही उद्या सकाळी माझ्याकडे आला तर, मी तुमची ईश्‍वराशी भेट घालून देईन.”
      महर्षींचे आश्‍वासन घेऊन सगळे इंग्रज निघून गेले. ते आतुरतेने उद्याची वाट पाहू लागले. रात्रभर त्यांना झोपदेखील आली नाही. दुसर्‍यादिवशी सकाळीच ते महर्षींकडे पोहचले. इंग्रजांना पाहून महर्षी म्हणाले,” तुम्हाला परमेश्‍वराला भेटायचं आहे, माझ्या मागे या.” असे म्हणून महर्षी निघाले. महर्षी पुढे पुढे, इंग्रज मागे मागे निघाले. काही अंतर चालून गेल्यावर महर्षी एका झोपडीसमोर थांबले. इंग्रजांना म्हणाले, “ या झोपडीत ईश्‍वर आहे. त्यांची मी रोज भेट घेतो. तुम्हाला भेट घ्यायची असेल तर त्यांना आत जाऊन भेटू शकता.”
      इंग्रजांना वाटलं की महर्षी आपल्याशी कपटीपणाने वागत आहेत. लगेच ते सावाध झाले. हळूहळू ते झोपडीच्या दिशेने निघाले आणि तितक्याच सावधपणे त्यांनी झोपडीचे दार लोटले. आणि काय आश्‍चर्य ! ते आतले दृश्य पाहतच राहिले. झोपडीत एक अत्यंत वृद्ध दांम्पत्य अंथरुणावर  झोपले होते. ते फारच आजारी होते. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. ते वेदनेने कण्हत होते. महर्षी यांनी त्या दोघांना पहिल्यांदा आंघोळ घातली. मग त्यांच्या जखमांवर औषध लावलं. नंतर त्यांनी वृद्ध दांम्पत्यांसाठी जेवण तयार करायला घेतलं. स्वयंपाक करता करता ते इंग्रजांना म्हणाले, “ आपण पाहिलंत, मी परमेश्‍वराची सेवा करतो आहे. यांना मी रोज भेटतो.”
      इंग्रज अगदी मुग्ध हो ऊन सारं दृश्य पाहात होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. त्यांना समजून चुकलं की, ईश्‍वर तर माणसांमध्येच असतो.  आणि मानवसेव आ म्हणजेच ईश्‍वरसेवा आहे. 

बालकथा : जिंग आणि जोंग

      चीनमधल्या एका गावात जिंग आनि जोंग नावाचे दोन मित्र राहात होते. जिंग मोठा कष्टाळू , तर जोंग तितकाच आळसी होता. एक दिवस जिंग सकाळी सकाळीच जोंगच्या घरी गेला. म्हणाला,” जोंग चल, जंगलातून लाकडे आणू. पावसाळा सुरु होतोय. परत आपल्याला वाळलेली लाकडे मिळणार नाहीत.”
      “ जिंग, अरे माझ्याकडे अजून खूप लाकूडफाटा आहे. मला इतक्यात त्याची आवश्यकता नाही.” जोंग म्हणाला.
      “ जोंग, जितका लाकूडफाटा अधिक तितका त्रास कमी. आणि नंतर वाळलेली लाकडे मिळणं मुश्किल हो ऊन जाईल. “ जिंग समजावणीच्या सुरात म्हणाला. जिंग मात्र काही ना काही बहाणे बनवत त्याच्याबरोबर जाण्याचे टाळत राहिला. शेवटी वैतागून जिंग एकटाच जंगलाच्या दिशेने निघाला.
       जंगलात जाऊन जिंगने दिवसभर लाकडं तोडली. संध्याकाळी ती आपल्या घोडागाडीत टाकली आणि घरी निघून आला. घरी आल्यावर त्याने घरासमोर ती लाकडं रचली. घोडा बागेत बांधून तो घरात गेला. जिंग आत जाताच जोंग हळूच तेथे आला.रचलेल्या लाकडांमधली काही लाकडे उचलून घेऊन आपल्या घरात गेला. त्यानंतर जोंगला ज्या ज्या वेळेला संधी मिळे त्या त्या वेळेला तो जिंगचा लाकूडफाटा चोरत असे आणि आपल्या घरात आणून रचत असे. याचा परिणाम असा झाला की, जिंगचा लाकूडफाटा लवकरच संपला. त्यामुळे त्याला पुन्हा जंगलात जावं लागलं.
      या खेपेला जिंगने पहिल्यापेक्षा अधिक लाकूडफाटा गोळा केला आणि आपल्या घोडागाडीतून घेऊन घरी आला. पावसात ती भिजू नयेत म्हणून त्याने ती घोडयाच्या पागेत रचली. पागेचे दार व्यवस्थित बंद केले. सगळी कामे आटोपून तो आपल्या खोलीत  जाऊन झोपला.इकडे संधी मिळताच जोंग आपल्या घरातून बाहेर आला. आणि हळूच जिंगच्या घोड्याच्या पागेत गेला. त्याने भराभर लाकडांची मोळी बांधली आणि तितक्याच वेगाने मोळी घेऊन घरी आला. पण या गडबडीत त्याने पागे दार लावण्याचेच विसरला.
 त्याच रात्री मुसळधार पाऊस झाला. पागेचा दरवाजा उघडा असल्याने  जिंगची लाकडे सारी भिजली.सकाळी उठल्यावर जिंग पागेत गेला तर त्याला सगळी लाकडे भिजली  असल्याचे दिसले.
       जिंगला वाटलं, आपल्या बेफिकिरीमुळे दार उघडे राहिले आणि लाकडे भिजली. तो स्वत: ला दोष देत बाहेर आला. आता त्याला लाकडांची गरज होती.
 “ काय रे जिंग, असा का सुतकी चेहरा करून बसला आहेस?” जोंगने विचारल्यावर जिंग सगळा प्रकार सांगितला.
      “खरेच वाईट झाले, पण तू काही काळजी करू नकोस. हवं तर माझ्याकडून लाकडे घेऊन जा.” जोंग म्हणाला.
      “ धन्यवाद मित्रा, खरेच मला लाकडांची गरज होती.” जिंग काहीसा अडखळत म्हणाला. मग जोंगने त्याला लाकडे आणून दिली.
 “ जोंग, मी लवकरच तुला तुझी लाकडे परत करीन.’
 “ अरे, तुला वाटेल तेव्हा परत कर. काही काळजी नाही.”
      “ बरंझालं, तू लाकडे दिलीस नाही तर आज मी स्वयंपाक करू शकलो नसतो.” असे म्हणत त्याने लाकडे फोडायला घेतली. त्याचे तुकडे करताना त्याच्या लक्षात आले, ही लाकडे काल त्यानेच आणली होती. म्हणजे जोंगच आपले लाकडे चोरत होता! त्यामुळेच त्याच्या दुर्लक्षामुळे पागेचे दार उघडे होते आणि सगळी लाकडे भिजली होती. त्याला तर राग खूप आला होता, परंतु तो काही म्हणाला नाही. जोंगला धडा शिकवण्याचा मनातल्या मनात निश्‍चय केला.
      काही दिवस लोटले. एक दिवस जिंग जंगलात गेला आणि अन्य लाकूडफाट्याबरोबरच त्याने अशीही काही लाकडं तोडली की, ज्याच्या जळण्याने उग्र दुर्गंधी उठते. अधिक धूर निघतो. डोळ्यांची आग आग होते. ती लाकडे त्याने बेफिकिरीने दारासमोरच टाकली. संधी मिळताच जोंग घराबाहेर आला आणि त्यातलीच काही लाकडे घेऊन घरात पळाला.
 दुसर्‍यादिवशी जिंगला लाकडे कमी दिसली. तो समजून चुकला की, जोंगने त्याची लाकडे चोरली आहेत. पण आता त्याला आनंद झाला होता.
       संध्याकाळी जोंगने त्याच लाकडांचा जळणासाठी वापर केला. लाकडे जळताच घरभर उग्र दुर्गंधीयुक्त दूर पसरायला लागला. धूर नाका-तोंडात गेल्याने तो खोकल्याने बेजार झाला. डोळ्यांमध्ये आग आग हो ऊ लागली. ओरडत-खोकलतच तो घराबाहेर आला.
 त्याचा आवाज ऐकून जिंग बाहेर आला. म्हणाला,” का रे, असा का खोकलतोयस? आणि ही उग्र दुर्गंधी कसली?’  जिंग काही न कळल्यासारखे हावभाव करत म्हणाला. जोंगने घडला प्रकार सांगितला.
      “ कदाचित तू चुकून जंगलातून दुर्गंधीयुक्त लाकडे तोडून आणली आहेस. अरे पण जोंग, जंगलात असली लाकडे खूप आत आहेत. पण चांगली लाकडं तोडायची सोडून असली लाकडे तोडण्याची बुद्धी तुला कोठून आली? “जिंग त्याला खिजवण्यासाठी म्हणाला, पण जोंग समजून चुकला की, आपण जोंगची लाकडे चोरतोय, हे जिंगला समजले आहे. त्यामुळे जोंग मोठा खजिल झाला. त्याने जिंगची क्षमा मागितली. शिवाय यापुढे असा प्रकार करणार नाही, असे वचनही त्याने जिंगला दिले.  
 

प्रदुषित वसुंधरेला वाचवण्यासाठी आता प्राचीन परंपरांचाच आधार

      मही,पृथ्वी,वसुधा,देवी, धरा, वसुंधरा, धरणी, अवनी, भूमी, क्षमा,क्षीति अशी किती तरी नावं आहेत आपल्या पृथ्वीची! संस्कृत, मराठी, हिंदीसह  अनेक भाषांमध्ये या वसुंधरेला तब्बल 32 हून अधिक नावं आहेत. तिच्या प्रत्येक नावांमध्ये तिच्या  विशिष्ट विशेषता दडल्या आहेत. आपल्या सूर्यमालेतला  एकमेव असा गृह आहे, ज्यावर जीवन विद्यमान आहे.त्यामुळे या गृहाला जिवंत गृह (लिविंग प्लॅनेट) देखील म्हणतात. या प्राणवंत गृहाचे इको सिस्टीम म्हणजे इथले सगळे जीव-जंतू आणि झाडं -वेली इथे उगवतात, जन्माला येतात. वाढतात आणि जिवंत राहू शकतात. ही पृथ्वी आपल्याला जन्म देते, सांभाळते,पोसते. इतकेच नव्हे तर  शारिरीक आणि मानसिक विकासाबरोबरच आपल्याला आध्यात्मिक उत्कर्षाची भाव-भूमीदेखील प्रदान करते. आपल्या सभ्यतेची, आपल्या  संस्कृतीची आधारवडदेखील हीच आहे. आपल्या ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञानाच्या विकासाचा  पायादेखील हीच आहे. आपली निरंतर वाढणारी लोकसंख्येलादेखील आधार देण्याचं काम हीच देते. विशेष म्हणजे आपल्या वाईट-साईट कृत्यांचा भारदेखील हीच सोसते.  अशा मंगलमय पृथ्वीला आपल्या भारतीय ऋषींनी माता म्हणून सन्मान दिला आहे. हिच्या सगळ्या रुपांची स्तुती, प्रार्थना या आदरणीय मंडळींनी केली आहे.
 वसुंधरा दिवस मानण्याची गरज
       संयुक्त राष्ट्र संघाने 1970 मध्ये पहिल्यांदा वसुंधरा दिवस जाहीर केला. मात्र प्रारंभी 20 मार्च रोजी हा दिवस मानण्यत आला. कारण या दिवशी दिवस रात्र समान असतात. पण नंतर 22 एप्रिल दिवस निवडला गेला. शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की, वसुंधरा दिवस साजरा करण्याचे कारण काय? वास्तविक या भूमीवर किंवा पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व जवळजवळ 10 लाख वर्षांपासून आहे. मात्र आपण आपल्या हुशारीमुळे, तंत्रज्ञानामुळे केवळ 4-5 हजार वर्षांपूर्वीचा अभ्यास करू शकलो आहे. पण या कालावधीत मानवाने जैवमंडळाच्या वातावरणात अनेक प्रतिकूल गोष्टी केल्या आहेत. अर्थात मानवाने स्वत:च्या प्रगतीसाठी या गोष्टी केल्या, मात्र त्याची सजा मात्र वसुंधरेला भोगावी लागत आहे. आपल्याला आवश्यक असणार्‍या जल, वायू, मृदा या सगळ्यांना आपण प्रदूषित करून टाकले आहे. त्यामुळे जगभरातल्या लोकांमध्ये जागृती पोहचवण्यासाठी वसुंधरा वाचवा अर्थात सेव अर्थ ची घोषणा द्यावी लागली. भारतातले बरेचशी माणसं, संस्था संयुक्त राष्ट्र संघाच्या या हेल्प, सेव, प्रोटेक्ट अर्थ घोषणेनुसार काम करताना दिसतात. 2014 ची थीम आहे- झाडं लावा,आपलं घर स्वच्छ ठेवा, जलवायू परिवर्तन समजून घ्या आणि भविष्यात पृथ्वी वाचेल, अशा तंत्रज्ञानाचा शोध घ्या, विचार करा. केरकचरा कसा नष्ट करता ये ईल, असे तंत्रज्ञान विकसित होण्याच्या दृष्टीने पावले उचला. जेणेकरून पृथ्वीचे संरक्षण होईल.
 मगच सुरक्षित राहील वसुंधरा
      आता विचार करण्याजोगाप्रश्‍न म्हणजे केवळ एक दिवस वसुंधरा दिवस साजरा करून किंवा सप्ताह साजरा करून आपण काय विशेष मिळवणार आहोत? केवळ ङ्क झाडे लावा, झाडे जगवा. एक मूल एक झाड.हिरवीगार भूमी, ग्रीन धरतीङ्ख अशा घोषणा देऊन काय उपयोग होणार आहे? आपल्या फक्त एक दिवस नव्हे तर दररोज, वर्षभर वसुंधरा दिवस साजरा करावा लागणार आहे.प्रत्येक दिवस पृथ्वी दिवस असावा, हेच सांगून, हेच ऐकून आणि याचसाठी जागरूक राहून   काम करावम लागणार आहे. पृथ्वी वाचवा, असं म्हणण्याचं हे आधुनिक रुप असलं तरी आपल्या ऋषीमंडळींनी, संतमंतांनी आपल्या दूरदृष्टीने अगोदरच याबाबत लिहून ठेवलं आहे. त्यांना याचा धोका कळला होता.
 पृथ्वीवरील जीव-जंतू, झाडं-लता,वेली एकमेकाला पूरक आहेत. झाडं-वेली जसं आपल्याला जगवतात, तसं आपणदेखील त्यांना जगवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर म्हणतात- जो खांडावया घावो घाली। कां लावणी जयानें केली। दोघां एकचि सावली। वृक्ष दे जैसा॥तर संत एकनाथ म्हणतात- अतिथी आलिया वृक्षापासी। पत्र पुष फळ मूळ छायेसी। त्वचा काष्टासी देतसे॥तैसा वृक्ष समूळ सगळा। आर्थिया लागी सार्थक झाला॥
 जे वृक्ष लावतात, त्यांच्यावर कायमस्वरुपी निसर्गाचे छत्र लाभते असा संदेश देणारे संत एकनाथ जे वृक्ष लाविती सर्वकाळ। तयावरी छत्राचे झल्लाळ  ॥असे म्हणतात.संत तुकाराम वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें। म्हणतात.इतकेच नव्हे तर संत रामदासांनी नाना वल्लीमध्ये जीवन। नाना फळीं-फुलीं जीवन॥ म्हटले आहे.
      आपण मात्र पार उलटे वागत आहोत. पाश्‍चात उपभोगक्तावादाच्या दलदलीत सापडून आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जात आपण आपल्या धरती मातेला विसरून गेलो आहोत. प्रसिद्ध हिंदी कवी रमेश रंजक यांच्या धरती का गीत कवितेतल्या काही ओळी अशा आहेत- हे म्हारी धरती परी है बीमार/ दवाई-दारू कौन करें/ जो आवै/ सो रोग बतावै/ करै न कछू निदान।
  खरोखरच आपली धरती रोगग्रस्त बनली आहे. तिच्या रोगाचे निदान करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्याला जर स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर पहिल्यांदा आपल्या धरतीचा जीव वाचवला पाहिजे. कारण जसं धर्म रक्षति रक्षित:।  धर्माची रक्षण केले तर तो आपली रक्षा करेल, तसं पृथ्वीचे रक्षण केले तरच ती आपलं रक्षण करेल.
 वैदिक संस्कृतीपासून घ्या प्रेरणा
       पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला प्राचीन उदात्त परंपरांचा, ग्रंथांचा आधार घ्यावा लागेल. यातूनच आपल्याला सतत जागृतीचा मंत्र मिळतो. आठवा तो आवतार युग- ज्यावेळेला धरती दानवांच्या त्रासाला-जाचाला कंटाळून गो-रुप धारण करून मला वाचवा अशी आर्त विनंती करणारं पत्र ब्रम्ह लोकांत पाठवते.तेव्हा ब्रम्हदेव विष्णूदेवाला कधी राम रुपात तर कधी कृष्ण रुपात धरतीवर पाठवतो. आजच्या युगातली आव्हानं तर विचित्रच आहेत. आज प्रदुषणाच्या महाराक्षसाने आपल्या आक्टोपसीय क्षृंखलेने धरतीला पार जखडून ठेवलं आहे.  ती सुटकेसाठी धडपडते आहे.  पर्यावरणाचे संरक्षण करून आवताराने अरण्य संस्क्रती वाचवली. कालिया नागाला मारून जलप्रदूषणापासून दूर केलं. गोसंस्कृतीचे रक्षण केलं. तसे भगिरथ प्रयत्न आज कोठे दिसून येत नाही. आज गरज आहे ती, प्रत्येक माणसाच्या मनात  अंगी रामावतार, कृष्णावतार प्रकट होण्याची. तरच वसुंधरा प्रदूषणमुक्त होईल. राम आणि कृष्ण की ज्यांची प्रेरणा म्हणजे वैदिक ज्ञान होतं. त्यातून त्यांना धरतीच्या कल्याणाच्या जागृतीचा  मूलमंत्र मिळत होता. आपण ज्या मंत्रा-मंत्रांमध्ये आध्यात्मिक्तेबरोबरच आपल्या वसुंधरेला वाचवण्याचे संकेत सूत्र प्राप्त होतात, त्या वेदमंत्रांकडे परतायला हवं. ही सूत्रं आजदेखील तितकीच प्रासंगिक आहेत, जितकी त्यावेळी होती. त्यांची सार्वभौमिकता हीच त्यांची विशेषता आहे. आणि त्या मंत्रांचे अभिप्राय आपल्या दैंनदिन जीवनातल्या अगदी बारीक-सारीक प्रक्रियांमध्ये , छोट्या-छोट्या कार्यांमध्ये व्यक्त हो ऊन आपल्या जीवनात  अशाप्रकारे सामावले आहेत की, त्यांना विसरणं कठीण हो ऊन जातं. आजही कही माणसं अशी आहेत की, आपल्या जीवनाचा आधार असलेल्या  क्षमाशील वसुंधरेची धरतीवरती पाय ठेवण्या अगोदर क्षमा मागतात.    समुद्र वसने देवि। पर्वतस्तनमंडले, विष्णुपत्नि। नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्वमे।
 मनुष्य स्वत: इतका नम्र हो ऊन धरतीवर पाय ठेवण्यासाठीदेखील तिची क्षमा मागतो.  जगातल्या कुठल्याच संस्कृतीत अशी संवेदनशीलता सापडणार नाही. हीच संवेदनशीलता आपल्याला वैदिक काळापासून धरती किंवा तिजवरील विद्यमान कोणत्याही तत्त्व, वृक्ष, जल, वनस्पती आदींची हिंसा करण्यापासून परावृत्त करते. कोणत्या ना कोणत्या रुपात आजदेखील पृथ्वीप्रती सन्मान , आदरभाव, तिला देवी मानण्याची भावना जागृत आहे. म्हणूनच प्रत्येक घराच्या, दुकानाच्या किंवा अन्य कुठल्या प्रतिष्ठानचा पाया खोदताना भूमिपुजनाची उदात्त परंपरा आजही सांभाळली जाते.
 वसुधैव कुटुंबकम
      अथर्वेदाचं पृथ्वी सूक्त तर एकप्रकारे पर्यावरण संरक्षण किंवा पृथ्वी वाचवा मोहिमेचा दस्तावेजच आहे.याच्या 63 मंत्रांमधे जे स्तवन आहे,ते विलक्षण म्हणावे लागेल. यातले आणखी एक वर्णित तथ्य भूशास्त्रज्ञांच्या संशोधनाशी मेळ खातं, तर दुसर्‍या बाजूला या प्राणवंत भूमातेची अनंत अनंत अशा विशेषता अधोरेखित केल्या आहेत. संपूर्ण भौगोलिक, राजनैतिक, आणि राष्ट्रीय सीमांपलिकडे आणि पर्वत, समुद्र, वनप्रदेश आणि काळमर्यादा यापलिकडेही भूमीची वंदना, प्रेमपूर्ण स्तुती आणि तिच्या सतत रक्षणाच्या मौलिक सूत्रांचे विधान करणं हेच या संपूर्ण सुक्ताचं विशेष आहे. वास्तविक वैदिक संस्कृतीच्या दृष्टीने संपूर्ण पृथ्वी एक आहे. त्यावर निवास करणारा संपूर्ण प्राणी  एक आहे. त्यातलेच आपण मनुष्य लोक सर्वश्रेष्ठ आणि विवेकशील प्राणी आहोत. त्यामुळे या धरेच्या संपूर्ण संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर येते. याचाच अर्थ असा की, या पृथ्वीतलावरील अन्य प्राणी, जीव-जंतू आणि झाडं-वेली यांनादेखील इथे राहण्याचा अधिकार आहे. आमचा लोभ, आमचा मूड, आमचा अविवेक अनेक जाती-प्रजाती लुप्त करत आहे. म्हणजेच आपल्या धरतीचे सर्वांग सौंदर्य आपण नष्ट करत चाललो आहोत. या धरतीचे सौंदर्य पुन्हा खुलवण्याची जबाबदारी आपली आहे. हे केव्हा करू तर आपण वैदिक ऋषी अथर्वा यांच्या सुरात सूर मिसळू पाहू तेव्हा!
      माता भूमि: पुत्रो अहं पृथिव्या:   अर्थात माता भूमी आहे, आणि मी तिचा पुत्र आहे.  एक अनुभूत सत्य असे की,  आईचे आपल्या मुलाशी एक अतूट नाते असते. परंतु, अथर्ववेदाचा ऋषी राष्ट्रीय प्रेमापुरता मर्यादित राहत नाही. तो वसुधैव कुटुंबकम च्या सिद्धांताला मान्यता देतो. पुत्राची जबाबदारी आपल्या धरतीला कोणताच त्रास होता कामा नये, यासाठी प्रयत्नशील राहणे. पण आज आपण कुपुत्राच्या श्रेणीत जाऊन पोहोचलो आहोत. तिचा विध्वंस करायला टपलो आहोत. तिला कुरुप करतो आहोत. स्नेह-भाव हो ऊन आणि संवेदनशीलता कायम ठेवूनच पृथ्वीला  वाचवू शकू. छर्यावरणाची कोठली समस्या असो किंवा जैवमंडल असंतुलन कारण असो सगळ्या मुळाशी मनुष्याच्या मनातल्या इच्छा, त्याच्या आकांक्षा, त्याचा लोभ, त्याचा मोह आहे.
 तरच सुरक्षित राहील पृथ्वी
       आधुनिक काळात प्राचीन परंपरांच्या उदात्त रुपांची स्वीकृती करताना आम्हाला आधुनिक संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारावर पृथ्वीवर व्यापलेले सर्वप्रकारचे प्रदूषण दूर करण्याचा संकल्प सोडला पाहिजे.  कचर्‍याचा निपटारा ही आजच्या युगातली सर्वात मोठी समस्या आहे. त्यातल्या त्यात ई-कचरा मोठा धोकादायक आहे. आपल्या गरजेसाठी आपण वनाच्या चादरीचे तुकडे करतो आहोत. वृक्षारोपणाला धर्माचे अंग मानत चाललो तरच हिरव्यागार पृथ्वीचे स्वप्न साकार होईल. ऊर्जेचे नवे-नवे पर्याय शोधावे लागतील. तरच अणु ऊर्जेच्या विस्फोटाच्या दुष्परिणामापासून आपण वाचू शकू. वास्तूकला असेल किंवा नगर रचना विधी यांमध्ये पर्यावरण मित्र (इकोफ्रेंडली)तंत्रज्ञानाचा स्वीकार करायला हवा.तरच आपण येणार्‍या पिढीच्या हातात सुरक्षित रुपात वसुंधरा सोपवू शकू.                

                                                                  

पर्यावरण रक्षणासाठी वीज बचत करा

     भारतातील मोसमी पाऊस बेभरवशाचा झाला आहे. हवामानात वारंवार बदल होत असतात. परिणामी अन्नधान्य सुरक्षा धोक्यात येत असून कित्येक वनस्पती व प्राणयांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत.हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अनेक देशांना भोगावे लागतात.त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवर हवामान बदल रोखण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आणि याची सुरूवात आपण वीज बचतीपासून करू शकतो. त्यासाठी जनजागृतीची आवश्यकता आहे. सामाजिक स्वयंसेवक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन जागृतीसाठी प्रयत्न करावेत. अलिकडेच महाराष्ट्रात झालेली गारपीट हे हवामान बदलाचेच द्योतक आहे. पृथ्वीच्या सरासरी तापमानात गेल्या दीडशे वर्षांत अतिशय वेगाने वाढ झाली आहे.    वातावरणातील उष्णता धरून ठेवणार्‍या कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड वायूंचे उत्सर्जन यास कारणीभूत आहेत. औद्योगिक क्रातीपासून आजतागायत मानवी समाजाने औद्योगिक प्रगतीच्या नावावर खनिज तेल,कोळसा, जंगल आदी संसाधनांची प्रचंड लूट केली. परिणामी यांच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंचे उत्सर्जन झाले. आणि पृथ्वीचे तापमान वाढले. के प्रमाण 350 पीपीएम (पार्टपर मिलियन) पर्यंत खाली आणणे हे जागतिक उद्दिष्ट असले तरी सध्या हे प्रमाण 315 पर्यंत जाऊन पोहचले आहे. परिणामी पृथ्वीवरील हिमनग वितळून समुद्राच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्र किनार्‍यावरील निसर्ग आणि जनजीवन पाण्याखाली जात आहे. हवामान बदलाचे हे संकट जागतिक असले तरी त्याचे परिणाम अमेरिका, युरोप, भारत, बांगला देश अश सर्वच देशांना कमी-जास्त प्रमाणात भोगावे लागणार आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. याची सुरूवात आपल्याला वीज बचतीतून करता ये ईल. याचा दुहेरी लाभ आपल्याला मिळेल.उष्णता धरून ठेवणार्‍या वायूंवर नियंत्रण ये ईल आणि दुसरे म्हणजे वीज बचत केल्याने आपले आर्थिक नुकसानदेखील होणार  नाही.