Wednesday, September 21, 2011

सुट्टी घेणार्‍यांचा देश

       आपल्या देशाला सुट्ट्यांचा देश म्हटलं जातं. कारण आपल्या देशात सुट्ट्यांचा सुकाळ आहे. सरकारी कर्मचार्‍यांना तर साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर वर्षभरात विविध सुट्ट्यांचा एकप्रकारे खजिना उपलब्ध झाला आहे. शिक्षकांना दिवाळी आणि मे महिन्यात सुट्टी मिळते. १२ किरकोळ रजेसह आजारी, दिर्घमुदतीच्या रजा या हक्कांच्या सुट्ट्यांना तर मरण नाही. प्राध्यापक मंडळी तर एक पाय कॉलेजमध्ये तर एक पाय बाहेर अशा बेहिशेबी मामल्याने सुस्त का फुस्त झाली आहेत. त्यांना लेक्चरचा भार फारसा नसतो.कारण कॉलेजमधली  कळती आणि मो ठी मुलं आपला स्वार्थ  ओळखून असतात्.त्याप्रमाणे वागत असतात. मला एवढंच म्हणायचं आहे की, भारतात सुट्ट्या तर भरपूर आहेत. त्यात विविध कारणं सांगून सुट्ट्या घेण्याचा फंडा तर कमालीचा फोफावला आहे. त्यातल्या त्यात आजारी असल्याचं कारण सांगून कामाला टांग मारण्याची खोड मात्र अधिक असल्याचे दिसते.
        विशेष म्हणजे कामावरून सुट्टी घ्यायला आजार हे कारण पुरेसे आहे. शेवटी कारण ते कारणच असते. पण त्यात आजार म्हटलं की, त्यावर ' नो अपिल'. त्यामुळे आजाराचे कारण सांगून सुट्टीचा मनसोक्त आनंद लुटता येतो. आपले भारतीय आजारी असल्याचं कारण सांगून सुट्टी 'एन्जॉय' करण्यात आघाडीवर असल्याचं एका सर्व्हेद्वारे स्पष्ट झाल्यानं काही आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही.कामाला दांडी मारण्याची खरोखरची कारणं वेगवेगळी असली तरी आजारी कारणापुढे काही चालत नाही. बॉस कारवाई करताना विचार करतो. तर सरकारी कर्मचार्‍यांना तर ती हक्काचीच सुट्टी वाटत असते. त्यामुळे कोण त्यांना बोलायला जात नाही. 
         कामाचा व्याप, कौटुंबिक कलह यासह अनेक प्रकारच्या अनेक कारणांमुळे ताणतणाव वाढत असतात, हे खरं आहे. आनि त्यात अशा गोष्टी  स्टाफ आणि अधिकार्‍यांपुढे बोलून चालणार नसतं. त्यामुळे खर्‍या कारणाला 'अळीमिळी' करून  'सिक लिव' घेण्याचं प्रमाण वाढत आहे, असं हा सर्व्हे सांगतो. भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, फ्रान्स, ब्रिटेन, मॅक्सिको आणि अमेरिका या देशांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, यात आजारी रजा काढण्याच्या प्रकारात आपल्यापुढे चिनी ड्रॅगन आहे. भारतातले लोक याबाबतीत दुसर्‍या क्रमांकावर आहेत. चीनमधले जवळजवळ ७१ टक्क्यांपेक्षा अधिक लोक सिक लिव घेतात. तर भारतातले  ६२ टक्के लोक अशा सुट्टीचा उपभोग घेतात. आपल्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया ( ५८  टक्के), अमेरिका (  ५२), ब्रिटन  ( ४३) तर मॅक्सिकोमधील  ३८  टक्के लोक सिक लिव घेतात, असे आढळून आले आहे. म्हणजे खोटे-नाटे सांगून कामाला दांडी मारण्यात आपण आघाडीवर आहोत, हे स्पष्ट होते.
        वास्तविक  ताणतनावामुळे माणसाचे स्वास्थ बिघडत चालले आहे, ही वस्तुस्थिती असली तरी सुट्टी काढून घरात बसल्याने हा ताणतणाव कमी होणार असतो का , हा मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कामाचा क्षीण घालवण्यासाठी अनेक पर्याय आहेत. शिवाय सगळी कामं ज्या त्या वेळी, अचूक, अटोपशीर आणि विना टेन्शन न घेता केल्यास कामाचा थकवा जाणवणार नाही. अर्थात सगळेच अशा प्रकारे टेन्शन घेणारे किंवा कामचुकार नसतात. मात्र सर्व्हेक्षणाच्या टक्केवारीनुसार  

रजा काढण्याचे प्रमाण खरोखरच विचार करायला लावणारे आहे. कामात बदल हा सुद्धा थकवा घालवनारा पर्याय आहे. खरं 'ज्याची त्याची सोच' या मानवी स्वभावामुळे असली कारणं पुढं येत राहतात. 
           सगळा दोष कर्मचार्‍यांवर टाकून चालणार नाही. पण आता  काही कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांची काळजी करताना दिसत आहेत. त्यांचा कंटाळा जावा, त्यांना नेहमी फ्रेश वाटावं, म्हणू अनेक क्लृप्त्या राबवत आहेत. कामात कुचराई करण्यात काही मंडळी आघाडीवर असली तरी खरोखरच ताणतणावामुळे सुट्टी काढून घरात बसणार्‍यांची अथवा तणाव घालवण्यासाठी अन्य उपाय शोधणार्‍यांची संख्याही मोठी आहे, याचाही विचार व्हायला हवा आहे.  आपल्या लोकांना कामावर वेळेत पोहचण्याचे बंधन कमालीचे टेन्शन देणारे आहे. यात त्यांना सवलत अथवा लवचिकता हवी आहे. काही कामे घरी राहूनही करता येण्यासारखी असतील तर तीही हवी आहेत. कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांमध्ये ऊर्जा टिकून राहावी, त्यांचे स्वास्थ चांगले राहावे , यासाठी प्रयत्न करायला हवे आहेत. सरकारी नोकरांनाही असली सवलत पहिल्यांदा हवी आहे. पण त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही. कामाचा  ढिग पुढ्यात ठेऊन खुशाल गप्पा मारणार्‍या सरकारी बाबूंना लोक नेहमी पाहात आले आहेत. त्यांच्याविषयी कुणाला हमदर्दी नाही. वास्तविक असायची काही कारण नाही. कारण त्यांनी आपली विश्वासाहर्ता केव्हाच गमावली आहे. आणि हा सर्व्हे त्यांच्या नाकीपणाचीच  साक्ष देतो.                                                             _ मच्छिंद्र ऐनापुरे, जत 
लोकमानस
गुरूवार, १७ मार्च २०११
राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब
स्त्री-पुरुष यांच्या लोकसंख्येत संतुलन असायला हवे, तरच समाज सुदृढ आणि निरोगी राहतो. पण गर्भजल चिकित्सा तंत्रज्ञानाने जन्मापूर्वीच मुलींना मारण्याचा जो राक्षसी प्रयोग गेली दोन दशके चालला आहे. त्यामुळे भारताच्या अनेक राज्यांत हे संतुलन बिघडले आहे. समाज निरोगी ठेवायचा असेल तर यावर कठोर उपाययोजना करायला हवी.
एखादे तंत्रज्ञान समाजात वापरताना मुभा देताना त्याच्या गैरवापराचा अभ्यास करणे, अंदाज करणे अगत्याचे असते. लागोपाठ मुली जन्माला येतात म्हणून ज्या देशात व समाजात विवाहितेचा छळ होतो, तिच्या त्याग होतो, अशा समाजात अशी चिकित्सा मुलांना जन्मापूर्वीच मारण्यासाठी वापरली जाऊ शकते, याचा अंदाज समाजचिंतकांना आधीच यायला हवा होता. गर्भपात आणि गर्भलिंग चिकित्सा यांना मुभा दिल्यावर त्याचा उपाय होण्याऐवजी अपायच अधिक झाला. कारण सोयी व माहिती देताना त्याविषयी जागृती अत्यावश्यक असते. सरकारी खाक्याने सामाजिक बदल शक्य नसतात. एका सहीच्या फटकाऱ्याने फतवे व कायदे लागू होतात, म्हणून त्यांचा अंमल यशस्वी होण्याची खात्री देता येत नाही. गावातल्या महिलांनी बहुमताने ठरवल्यास दारूबंदी होते. मग पिणारे शेजारी, पलिकडच्या गावातून आपली सोय करून घेतात, म्हणजे दारूडा गावात असतोच. बालपणापासून मद्याचे, नशापानाचे विपरित परिणाम मनावर ठसविणे हा उपाय असतो. पण ते फार कष्टाचे काम आहे. त्यामुळे कायद्याचा कागदी बडगा उगारून पळवाट शोधली जाते. गर्भपात बालिकांची हत्या आणि बिघडलेले स्त्री-पुरुषसंख्या संतुलन त्याचेच परिणाम आहेत. सरकारने गर्भलिंग तपासणीवर र्निबध घातले असले तरी राजकीय लागे-बांधे, पैसा या सरकारी कायद्यांना पायदळी तुडवतात. ही याच राज्यकर्त्यांसाठी शरमेची बाब आहे.
मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली  loksatta

Tuesday, September 20, 2011

गुलशन बावरा

७ ऑगस्ट स्मृतीदिन
" आजचे संगीतकार अशा पिढीतील आहेत की, जिथे इंग्रजी खाल्ली जाते, पांघरली जाते आणि अंथरली जाते. बहुतांश फिल्मकार विदेशी अनुकराणाचे सराईत असल्याने तेही त्याच पश्चिमात्य चश्म्यातून पाहत आहेत. फिल्मकार अशा कबुतरासारखे आहेत की, मांजराकडे पाहत विश्वासाने डोळे बंद करून घेतात की, मांजराने आपल्याला पाहिलेच नाही....." हे परखड विचार आहेत, देशभक्तीने भारावून जायला लावणार्‍या ' मेरे देश की धरती....'सारखे यादगार गीत रचणार्‍या गुलशन बावरांचे !
गुलशन बावरा यांनी २००८ मध्ये इहलोकीची यात्रा संपवली. ७ ऑगस्ट हा त्यांचा स्मृतीदिन. त्यांच्या निधनापूर्वी त्यांनी एका मुलाकतीत वरील विचार मांदले होते. विसाव्या शतकात सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या ' मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे-मोती' या 'उपकार' मधील गीतासारखे गीत पून्हा लिहू शकत नाही, हे सांगताना आज पंडीत नेहरू अथवा लालबहाद्दूर शास्त्रींसारखे लोक  कुठे आहेत? असा सवालही उपस्थित केला होता.
आपल्या तत्त्वाशी निष्ठा राखणार्‍या गुलशन बावरांचे बालपण अत्यंत यातनामय, खडतर गेले. ११ एप्रिल १९३९ मध्ये लाहोरजवळच्या शेखपुरात त्यांचा जन्म झाला. फाळणीसमयी त्यांचे वय अवघे आठ वर्षांचे होते. फाळणीच्या दंगलीत त्यांच्या आई विद्यादेवी यांची दोघा भावांसमक्ष गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. वडिलांना दंगलखोरांनी तलवारीने हल्ला करून त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे करून अत्यंत क्रूरपणे मारले होते. शेतात लपत्-धपत लष्कराच्या मोटरीतून जयपूरला आपल्या भावाअकडे पळून आले होते. भजन, गीत लिहिण्याचा छंद त्यांना वयाच्या सहाव्या वर्षापासून्च लागला होता. मोहल्यातल्या स्त्रिया भजनसंध्या गायच्या. त्या भजनाचे मुखडे आणि अंतरे गुलशन बावरांचेअसायचे. भावाच्या कुटुंबासह राहताना त्यांना मोठी आर्थिक चणचण भासायची. पुढे त्यांनी रेल्वेत अँप्लिकेशन केले. नऊशे उमेदवारांमध्ये परीक्षेत ते प्रथम आले. पहिली नियुक्ती कोटामध्ये झाली. मात्र त्याठिकाणी जागा रिक्त नसल्याने त्यांची मुंबईत गुडस क्लार्क ( १९५५) या पदावर नेमणूक झाली.त्या दिवसांमध्ये राजेंद्रकृष्ण , इंदीवर, शकील, शैलेंद्र, हसरत जयपुरी आणि मजरुह सुलतानपुरी यांच्या गीतांची धूम होती. मनोजकुमार यांच्याशी त्यांची मैत्री बनली. निर्मात्यांकडे कामासाठी वरचेवर चक्रा वाढल्याने ऑफिसमध्ये अनुपस्थिती वाढत गेली. अखेरीस  १९६१ मध्ये रेल्वेने ४५० रुपयांचा धनादेश हातात टेकवून त्यांना कायमची सुट्टी दिली.
कल्याणजी-आनंदजी यांच्याशी त्यांची ओळख झाली.त्यांनी रवींद्र दवे यांच्या 'सट्टा बाजार'साठी एक गीत लिहून घेतले. अन्य गीते शैलेंद्र आणि हसरत यांची होती. ' चांदी के चंद टुकडों के लिए ' सारखी गीत लाईन ऐकून शांतीभाई दवे यांनी , या मिसरुडे फुटलेल्या पोरात गहराई कमालीची आहे, असे प्रशस्तीपत्र दिले. तर कल्याणजी यांनी हा मुलहा गीतकार नव्हे तर बावरा आहे, असे कौतुकाचे शब्द दिले. तेव्हापासून गुलशन मेहाताचे गुलशन बावरा असे नामकरण झाले.
आपल्या पन्नास वर्षाच्या फिल्मी करिअरमश्ये गुलशन बावरा यांनी केवळ २५० गाणी लिहिली. त्यांनी कुणाशी, कशाशी समझोता केला नाही. त्यामुळेच त्यांच्या खात्यावर कमी गाणी जमा झाली. उपकार, सस्स्सी पुन्नू (राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त), तीन चोर, गहरी चाल, ज्वारभाटा, झुठ्ठा कहीं का, जंजीर आणि जवानीसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारून आपला पेटप्रपंच सांभाळला. शेजारील अंजू नावाच्या सिंधी मुलीशी विवाह केला. त्यांना मुलबाळ नाही.
गुलशन बावरा यांचे नशीब 'उपकार' ( १९६७) मुळे चमकले. रेल्वेत कमाला असल्यामुळे  त्यांना पंजाबहून येणार्‍या सोन्यासारख्या पिवळाधमक गव्हाचे वॅगन भरून येत, हे त्यांनी पाहिले होते. ते पंजाअबी होतेच. चटकन त्यांच्या डोक्यात ट्युब पेटली. 'मेरे देश की धरती सोना उगले...! मनोजकुमारला गाणे ऐकवले. त्यांनी त्याचा'उपकार' मध्ये वापर केला. पुढे हे गीत राष्ट्राचे एकप्राकारे दुसरे राष्ट्रगीतच बनले.
आपल्या २५० गाण्यांपैकी १५० गाणी गुलशन बावरांनी एकट्या आर.डी. बर्मन यांच्यासाठी लिहिली. रमेश बहल, राकेश रोशन, रणधीर कपूर, आणि पंचम या संगीतकारांशी त्यांची दाट मैत्री होती. पंचम गुलशन यांना डमी गीत द्यायचे. त्यात मुखडे आणि अंतरे बसवण्याचे काम गुलशन बावरांना करावे लागायचे. त्यामुळेच गुलशन यांनी सीधीसाधी , मोकळी गीते पंचमसाठी लिहिली.जसे- 'हमने तुम को देखा, तुमने हम को देखा'
मध्यप्रदेश सरकारने त्यांना किशोरकुमार गौरव पुरस्कार जाहीर केला होता.पण हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी 'एक्झीट' घेतली.


9 ऑगस्ट फ्रेंडशीप डे निमित्त

9 ऑगस्ट फ्रेंडशीप डे निमित्त
अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'देल्ही बैली'ची कथा तीन दोस्तांच्या भोवतीनं फिरताना दिसते. यात ही दोस्त मंडळी आपापसात हरप्रकारची मस्ती करताना दिसतात. या चित्रपटात अपशब्दांचा भरिमाड असा वापर करण्यात आला आहे. पण वेळ पडल्यास खरी दोस्तीसुद्धा निभावत  एकमेकांना साथ देतानाही दिसतात . 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्येसुद्धा फरहान अख्तर,अभय देओल आणि हृत्विक रोशन या तिघा मित्रांभोवतीच  कथा घुटमळली असल्याचे दिसते. या सगळ्या चित्रपटांमध्ये पुरुष मैत्रीची महती गायिली आहे. पण मैत्रीचा उथळ खळखळाट अधिक यांमध्ये जानवतो.  'दिल चाहता है', रंग दे बसंती' अथवा 'थ्री इडियटस' हे सिनेमेसुद्धा पुरुष नायकांच्या मैत्रीवर आधारित होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांवरून असं लक्षात येतं की, आपल्या बॉलीवूडमधील निर्मात्यांना  'पुरुष दोस्ताना' पडद्यावर आणल्यास आपल्याला यश मिळतं, याचं गमक मिळालं आहे. 'दोस्ताना' च्या खांद्यावर बंदूक ठेवून वार केल्यास निशाणा अचूक बसतो, याची कल्पना आल्याने निर्मात्यांनी तोच तो फॉर्म्युला वारंवार वापरल्याचे दिसते. मित्रांची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्यांनी आपापल्यात चांगली केमेस्ट्री जमवून प्रेक्षकांनाही खूश करून टाकल्याने 'दोस्ताना' सिलसिला पुढे चालू राहिला आहे..
अर्थात हा फार्म्युला बॉलिवूडमध्ये पुराना आहे. 'शोले' च्या जय-विरूची जोडी आजही प्रेक्षकांच्या स्मरणातून गेलेली नाही. 'संगम' मध्ये गोपाल आपल्या 'सुंदर' नावाच्या मित्रासाठी आपली प्रियेसी राधा हिचासुद्धा त्याग करतो. तिला विसरायला तयार होतो.पण अलिकडच्या चित्रपटांमध्य्रे तो दर्द राहिला नाही. त्यात फुटकळपणा आला.   या  विषयांवर अलिकडे अनेक चित्रपट निघाले.'गोलमाल', 'डबल धमाल',' दोस्ताना',' नो एंट्री,'    'हे बेबी', सारख्या चित्रपटांमध्ये नायकांनी आपल्या धमाल अंदाजात, द्वीअर्थी संवाद आणि बावळट हरकती करून प्रेक्षकांची करमणूक केली. आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवत बॉक्स ऑफिसवरसुद्धा चांगला धंदा करून दिला. 
बॉलिवूडमध्ये पुरुष जोड्या हकली-फुलकी कॉमेडी करून व रुपेरी पडद्यावर उत्कृष्ट केमेस्ट्री जमवून प्रेक्षकांना हसवू शकतात. याची नाडी निर्मात्यांना सापदली. काही दिग्दर्शकांचं म्हणणं असं की, 'पुरुष ज्या पद्धतीनं पडद्यावर हास्य निर्माण करतात, त्या पद्धतीने करण्यास महिला असमर्थ आहेत. त्या गंभीर भूमिका साकारू शकतात.' अर्थात तसं काही नाही. अनेक महिला कलाकारांनी चांगल्या हास्यभूमिका केल्या आहेत्.परंतु अलिकडे शो पीस आणि अंगप्रदर्शनशिवाय महिला कलाकारांच्या वाट्याला काही येतच नाही. त्यांना भूमिका करण्यासारख्या अथवा जागण्यासारख्या  आल्याच नाहीत. वास्तविक मैत्रीसारखा गहन विषय बॉलिवूडने कधी गंभिर्याने घेतला नाही. निस्सीम मैत्री, त्यातील गहनता समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. नायकांचा विनोद कितीही बालिश असला तरी प्रेक्षकांनी त्यांना पसंद केलं आहे.  महिलांसाठी मात्र रोमांटिक, शरिराचे ओंगळवाणे प्रदर्शन आणि स्त्री केंद्रित चित्रपटच निर्माण केले गेले. ही वाट सोडलेली नाही.
बॉलिवूडमध्ये महिला जोड्या अथवा त्यांच्या मित्रत्वावर चित्रपट जवळजवळ नसल्यात जमा आहेत. ‘;फिलहाल’,‘दिल आशाना है' सारखे एक-दोन चित्रपट च समोर येतात. समाज अजूनही पुरुषी सत्तेच्या अंमलाखाली  आहे. पुरुष केंद्रित चित्रपटच पाहणे पसंद करतो.  म्हणून नाइलाजास्तव अशा चित्रपटांचा रतीब घालायला लागतो, असं खुद्द निर्माता -दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. 'सात खून माफ', फॅशन सारखे मोजकेच सिनेमे महिलांवार अधारित बनतात. त्यात त्यांच्या मैत्रीचं काय घेऊन बसलात? साहजिकच असा प्रश्न पदतो.आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, बॉलिवूडमध्ये सशक्त अभिनय करणार्‍या अभिनेत्रींची वाणवा आहे. त्याचबरोबर सगळ्यांना एखाद्या कथेच्या भूमिकांमध्ये सामावून घेण्याची कुवत असलेल्या दिग्दर्शकांचीसुद्धा इथे कमरता आहे. त्यामुळेच महिला मैत्रींवर आधारित चित्रपट बनत नाहीत. 
.                                                                                                         _       मच्छिंद्र. ऐनापुरे,                   

बालकथा जंगली पोपट

      एक शिकारी होता. त्याचं नाव गबरू. एक दिवस तो शिकारीला बाहेर पडला. सकाळची संध्याकाळ झाली, पण त्याला शिकार काही मिळाली नाही. शेवटी माघारी परतताना वाटेत त्याला एक मोठे घनदाट जांभळाचे झाड दिसले. त्यावर बरेच पक्षी बसले होते. गबरुने आपले जाळे फेकले. काही पक्षी उडाले, पण काही जाळ्यात फसले. त्यात एक सुंदर पोपटसुद्धा होता. तो घाबरला होता.
     पोपट गबरुला म्हणाला," मी तर इवला इवला पक्षी. मला मरू नको. मला सोडून दे. माझीसुद्धा छोटी-छोटी बाळं आहेत. माझी वाट पाहत असतील."  गबरु पोपटाची आर्जव ऐकली . पहिल्यांदाच एखाद्या शिकारवर त्याला दया आली. त्याने विचार केला, ' याला विकून टाकू. त्यामुळे त्याचा जीव  वाचेल आणि मला दामसुद्धा मिळेल.'
     असा विचार करून शिकार्‍याने पोपटाला बाजारात नेले. सुंदर पोपटाला एका शेठने विकत घेतले. त्याच्यासाठी एक पिंजरा आणवून दुकानाबाहेर दरवाज्याला लटकावले. शेठ त्याला संध्याकाळी घरी नेत असे आणि दुसर्‍यादिवशी दुकानात आणत असे. काही दिवसांनी त्याला पोपटाचा कंटाळा आला.  एक दिवस शेठ पिंजरा सोबत घेऊन भाजीमंडईत गेला. तिथे पोपटाची दृष्टी मिरच्यांच्या ढिगार्‍यावर गेली. पोपट ओरडला, " मिरची..मिरची."
     भाजी विक्रेत्याला पोपटाचे बोल आवडले. त्याने पोपटाला विकत घेण्याचा  निश्चय केला. भाजीवाल्याने वीस टक्याला पोपट विकत घेतला. त्याने पिंजर्‍यासह पोपटाला घरी आणले. त्याच्या घरात त्याची बायको आणि मुलगा असे दोघेच होते. मुलाचे नाव बिरजू होते.
एक दिवस नगरचा राजा नगरीत भ्रमण करत होता. काही दिवसांनी शेजारच्या राजाशी युद्ध होणार होते. शत्रू राजाने युद्ध पुकारले होते. राजाच्या स्वागताला प्रजा रस्त्यावर उभी होती. बिरजूसुद्धा आपल्या पोपटासह आपल्या दारात उभा होता. राजा जवळ येताच पोपट म्हणाला, '' राजाचा विजय असो. राजाचा विजय असो."
पोपटाची गोड शुभवाणी ऐकून राजा आश्चर्यात पडला. पोपट राजाच्या हातात आल्यावर म्हणू लागला, '' माझा मालक राजा आहे. माझा मालक राजा आहे."
     राजाने बिरजूला पुष्कळसे धन दिले आणि पोपटाला आपल्यासोबत नेले.  राजा पोपटाला आपल्यासोबतच ठेवत असे. पण काही दिवसांनी पोपटाला राजमहालाचा कंटाळा आला. त्याला आपल्या मुला-बाळांची आठवण येऊ लागली. तो उदास राहू लागला. राजाने त्याला कारण विचारले. पोपटाने आपली सगळी हकिकत राजाला सांगितली.
दुसर्‍यादिवशी राजा पोपटाला घेऊन राजमहालाच्या गच्चीवर आला. पोपटाला आकाशात सोडून दिले. पोपट उडत उडत म्हणाला, '' राजाचा आभारी राजाचा आभारी."  पोपट जंगलात आपल्या मुला-बाळात जाऊन पोहचला.  
                                                                                                                           _       मच्छिंद्र. ऐनापुरे,         gavakari ag.11           

मांडूळ शेतकर्‍यांचा मित्र

मांडूळ शेतकर्‍यांचा मित्र
गुप्तधनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतर गैरसमजुतींमुळे "मांडूळ' या बिनविषारी सापाची राज्यात बेसुमार तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याच्या तस्करी आणि अंधश्रद्धेमुळे आजच्या शिक्षणाचा आपणच आपल्या हाताने केलेला पराभव म्हाणायला हवा.
वास्तविक जगात कुठेच दोन तोंडाचा साप नाही. त्याला गुप्तधन ओळखता येत नाही. मात्र अंधश्रद्धेपोटी त्याच्याविषयी गैरसमज वाढले असून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षात राज्यभरात मांडुळाच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. येत आहेत. जादूटोण्यासाठी मांडूळ सापाला प्रचंड मागणी आहे.. हा साप मिळावा म्हणून काही तांत्रिक -मांत्रिक त्याच्या सतत शोधात असतात. काही वेळा समोरची व्यक्ती सांगेल त्या पैशांना तो साप विकत घेतला जातो.
  सापाला दोन तोंड असल्याच्या गैरसमजुतीमुळे त्याच्याविषयी अनेक अंधश्रद्धा पसरल्या आहेत.  तो दोन्ही बाजूंनी चालू शकतो. अथवा  हा साप उन्हात धरल्यावर त्याची सावली पडत नाही किंवा त्याला आरशासमोर धरलं तर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही. या सापाची पूजा केली की पैशांचा पाऊस पडतो अशा अनेक समजुती आहेत.ग्रामीण भागात  
सर्रास आढळणारा व उंदीर खाऊन उदरनिर्वाह करणारा हा साप अलीकडेपर्यंत कोणाच्या गणतीतही नव्हता. हा साप गुप्तधन मिळवून देतो, अशी चर्चा सुरू झाल्याने या अंधश्रद्धेपायी आजपर्यंत निवांत फिरणाऱ्या मांडुळाच्या मागे माणसांच्या टोळ्या हात धुऊन लागल्या. या सर्पासाठी काही मंडळी काही लाखांपर्यंत रक्कम मोजण्यास तयार आहेत. मांडुळाच्या खरेदी-विक्रीतून मालामाल होण्यासाठी तस्करांनी पाय पसरल्याने या सर्पाविषयीची अंधश्रद्धा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मांडुळाच्या जिवावर उठली आहे.
कथित गुप्तधनाच्या शोधासाठी मांडूळ सापाचा वापर केला जातो. प्रत्यक्षात मांडुळाचा असा कोणताही उपयोग होत नाही. इलेक्‍ट्रिक करंट आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीचा "टेस्टर' लावला तर यातील काही सापांना टेस्टरमधील लाइट लागतो, असा समज आहे. अशा लाइट लागणाऱ्या सापांना अधिक किंमत दिली जाते, असे सांगितले जाते. जेथे धन असते, त्याच्या जवळपास या सापाला आगळीवेगळी चकाकी येते, तसेच धनाच्या दिशेनेच हा साप सरपटत जातो. जणू मार्गदर्शकाचेच काम तो करतो, असे समज पसरले आहेत. प्रत्यक्षात टेस्टर लावल्यानंतर लाइट लागणारा असा साप अद्याप कोणालाही पाहायला मिळालेला नाही. हा साप दुर्मिळ किंवा गुप्तधन शोधणारा असल्याचे भासवण्यात येत असल्याने या सापाची किंमत काही लाख रुपयांपर्यंत जाते, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मांडुळाचे वजन किती यावरही त्याचा दर ठरतो. दोन किलोपेक्षा जादा वजनाचे सापच गुप्तधनापर्यंत नेतात, अशी आणखी एक उपअंधश्रद्धा आहे.
हा साप वन्य जीव संरक्षण कायदा 1972 नुसार शेड्यूल चारमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या सापाच्या चावण्याने व्यक्तीला कुष्ठरोग होतो, अशी एक गैरसमजूत या सापाबद्दल रूढ होती. या समजुतीमुळेही ग्रामीण भागात त्याच्या वाट्याला कोणी जात नसे आणि अनायासे या सापाला संरक्षण मिळत असे. पण आता मात्र अंधश्रद्धा, गैरसमजुती व वास्तुशास्त्रातील उपयोगामुळे या सापाला वाढती मागणी आहे. हा साप घरात विशिष्ट दिशेला पाळल्यास धन-संपत्ती मिळते, अशी गैरसमजूत आहे. काही भोंदू लोक सापाचा उपयोग कथित काळ्या जादूसाठी करतात. आर्थिक गुंतवणुकीची अधिक क्षमता बाळगून असणारे, मुख्यत: बांधकाम व्यवसायातील लोक मोठ्या प्रमाणात या सापाची खरेदी करतात. पुढे त्याला अधिक किमतीला दुसऱ्याला विकले जाते.

मांडूळ म्हणजे काय?
 "हेड सॅंड बोआ' या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सर्पाची आपल्या भागात मांडूळ किंवा दुतोंड्या अशी ओळख रूढ आहे. मऊ मातीमध्ये हा साप स्वत:ला गाडून घेतो. पावसाळ्यात त्याचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. दिसायला अजगराप्रमाणे असणारा मांडूळ हा साप पूर्णपणे बिनविषारी, निरुपद्रवी व मंद हालचाल करणारा आहे. तो रंगाने पिवळसर, काळसर, तपकिरी व तांबूस असतो. तोंडाच्या आणि शेपटीच्या भागाचे आकारमान जवळपास एकसारखे असते. त्यामुळे नेमके तोंड व शेपटी कुणीकडे हे कळत नाही. या सापाने जीभ बाहेर काढल्यानंतरच ही बाब कळते. या वैशिष्ट्यामुळेच त्याला "दुतोंड्या' म्हणतात. सरडे, पक्षी, घुशी, उंदीर व अन्य सर्व याचे खाद्य आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान या सापाची मादी सहा ते सात पिलांना जन्म देते.
मांडूळ सापांचे रक्षण करा

मांडूळ हा साप निरुपद्रवी असून, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. उंदरांचे मोठ्या प्रमाणावर भक्षण करून त्यांची संख्या तो नियंत्रणात ठेवतो. हा साप दुतोंडी असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे जमिनीतील गुप्तधन, मटक्‍याचे आकडे, गुदद्वारातून निघणाऱ्या द्रवापासून सेक्‍स टॉनिक तयार होते, अशा अनेक गैरसमजुतीमुळे संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर किंमत देण्यास तयार होतात. यामुळे सर्वत्र या सापांचा शोध घेऊन वरील कामांसाठी त्याचा उपयोग केला जातो. मात्र, यात सापाचा जीव जाण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे मांडूळ सापांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे.                                                                    - मच्छिंद्र ऐनापुरे, जत

स्वीस बँकेत खाते
चिंटूदादा डुकराच्या आकाराचा गल्ला घेऊन आपल्या आजोबांकडे गेला. त्यांच्या कानात जाऊन फुसफुसत म्हणाला, " आजोबा आजोबा, तुम्हाला माहित  का? स्वीस बँकेत खातं काढणं सोप्प आहे."
आजोबा आपल्या नातवाच्या गल्ल्याकडे निरखून पाहात म्हणाले," मग आपल्याला काय त्याचं?"
चिंटूदादा पुन्हा पफुसफुसला," तुम्ही माझंही खातं स्वीस बँकेत उघडून द्याना."
आजोबा हसत म्हणाले," का रे बाबा, तुला का स्वीस बँकेत खाते उघडण्याची गरज पडली?"
चिंटूदादा इकडे-तिकडे पाहात कोणी नसल्याचा अंदाज घेत आजोबांचे कान आपल्या तोंडाकडे खेचत हळूच म्हणाला, "तुम्हाला माहित नाही ? इन्कम टॅक्सवाले कधीही छापा ताकून माझा गल्ला जप्त करू शकतात्.सध्या वातावरण खूपच खराब आहे. म्हणूनच म्हणतो. लवकरात लवकर स्वेस बँकेत खातं उघडून द्या म्हणजे झझंट्च मिटून जाईल."
आजोबा टिव्हीवरचा  फालतू  कार्यक्रम पाहून बोर झाले होते. नातवाचं फुसफुसनं त्यांना मोठं मनोरंजक वाटलं.   त्यांनी त्याला मोठ्या प्रेमानं चिंटूला पुढ्यात ओढलं आणि म्हणाले, " पण चिंटू, इन्कमटॅक्सवाले तर ब्लॅकमनी ठेवणार्‍यांवरच छापा टाकतात. त्यांचे पैसे जप्त करतात. तुला रे कसली  काळजी. "
चिंटूदादा म्हणाला," तुम्ही कुणाला सांगू नका, माझ्या गल्ल्यातसुद्धा ब्लॅकमनी आहे. म्हणून तर मी टेन्शनमध्ये आहे."
आजोबा मोठे डोळे करत म्हणाले," तुला कुणी सांगितल?"
चिंटूदादा पुन्हा आजोबांचा कान आपल्याकडे खेचत म्हणाला," पप्पा-मम्मी रोज रात्री नोटा मोजताना म्हणतात. हे ब्लॅकमनी नसते तर आपलं जगणं मुश्किल झालं असतं. आपण उपाशी मेलो असतो. या गल्ल्यातसुद्धा त्या ब्लॅकमनीचेच पैसे आहेत."  
आजोबांच्या माथ्यावर आता चिंतेची लकेर उमटली. पण  ते सध्या चांगल्या मूडमध्ये होते. ते चिंटूच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले," पण बाळा तुला तर हे व्हाईतमध्ये मिळत आहेत. त्यामुळे तुला कालजीचं काही कारण नाही. जी माणसं चोरीचा, गोलमालचा  पैसा बाळगतात, तीच माणसं हा पैसा स्वीस बँकेत ठेवतात. तुझा तर पैसा शुद्ध पॉकेटमनीचा आहे."
चिंर्टूदादाचा घरात  सगळ्यांमध्ये  अधिक विश्वास आजोबांवरच होता. म्हणूनच आपल्या गुप्त गोष्टी तो आजोबांनाच शेअर करत असे. तो पुन्हा आजोबांच्या कानात आपलं छोटंसं तोंड खुपसून म्हणाला," तुम्हाला आणखी काय काय सांगू. काही शुद्ध-बिद्ध काही नाही. मीसुद्धा कधी कधी पप्पा-मम्मीच्या पाकिटमधून पैसे चोरून यात टाकत असतो. शिवाय मम्मीची चुगली पप्पांना आणि पप्पांची मम्मीला न करण्यासाठी मी लाच घेतो. रामूसोबत माल आणायला बाजारात जातो. यात तो गोलमाल करतो. यातसुद्धा त्याच्याकडून मी कमिशन खतो. माझ्या मित्रांची कामे पप्पांकडून करून घेतो, यातली दलाली सोडत नाही. हेरा-फेरी करण्याचं माझं वय नाही पण वेळ आल्यावर तेही करीन. आणि आजोबा, हा सगळा ब्लॅकमनी मी या गल्ल्यात ठेवला आहे. मग सांगा, स्वीस बँकेत खातं खोलणं किती महत्त्वाचं आहे. "
आता आजोबांचे होश उडाले. त्यांना विश्वासच वाटत नव्हतं. पण चिंटू खरं सांगत होता. त्यांनी

चेहर्‍यावर नाराजीचा भाव आणत म्हणाले," चिंटू, चांगली मुलं, असं बोलत नसतात. तुला हे कुणी

शिकवलं? " पण नातू महाशय त्यांच्या बोलण्यावर कमालीचे नाराज झाले. विद्युत गतीनं त्याने

आजोबांच्या पुढ्यातून उडी मारली आणि म्हणाला,"मला माहित होतं, मला माहित होतं, तुमच्यासारख्या

खडूस म्हातार्‍याच्या बस की बात नाही. मी तर मम्मी-पप्पांनाच सांगेन स्वीस बँकेत खाते खोलायला. "

एवढे म्हणून चिंटूदादा आपल्या हातात डुकाराच्या आकाराचा गल्ला सांभाळत चालता झाला. आजोबा भावी पिढीकडे अवाक हो ऊन पाहात राहिले. .                                                                                ….                                                                                                         - मच्छिंद्र ऐनापुरे, जत