मांडूळ शेतकर्यांचा मित्र
गुप्तधनाचा शोधक असल्याच्या अंधश्रद्धेपोटी व इतर गैरसमजुतींमुळे "मांडूळ' या बिनविषारी सापाची राज्यात बेसुमार तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षांत या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याने त्याच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. त्याच्या तस्करी आणि अंधश्रद्धेमुळे आजच्या शिक्षणाचा आपणच आपल्या हाताने केलेला पराभव म्हाणायला हवा.वास्तविक जगात कुठेच दोन तोंडाचा साप नाही. त्याला गुप्तधन ओळखता येत नाही. मात्र अंधश्रद्धेपोटी त्याच्याविषयी गैरसमज वाढले असून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. गेल्या काही वर्षात राज्यभरात मांडुळाच्या तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. येत आहेत. जादूटोण्यासाठी मांडूळ सापाला प्रचंड मागणी आहे.. हा साप मिळावा म्हणून काही तांत्रिक -मांत्रिक त्याच्या सतत शोधात असतात. काही वेळा समोरची व्यक्ती सांगेल त्या पैशांना तो साप विकत घेतला जातो. सापाला दोन तोंड असल्याच्या गैरसमजुतीमुळे त्याच्याविषयी अनेक अंधश्रद्धा पसरल्या आहेत. तो दोन्ही बाजूंनी चालू शकतो. अथवा हा साप उन्हात धरल्यावर त्याची सावली पडत नाही किंवा त्याला आरशासमोर धरलं तर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसत नाही. या सापाची पूजा केली की पैशांचा पाऊस पडतो अशा अनेक समजुती आहेत.ग्रामीण भागात सर्रास आढळणारा व उंदीर खाऊन उदरनिर्वाह करणारा हा साप अलीकडेपर्यंत कोणाच्या गणतीतही नव्हता. हा साप गुप्तधन मिळवून देतो, अशी चर्चा सुरू झाल्याने या अंधश्रद्धेपायी आजपर्यंत निवांत फिरणाऱ्या मांडुळाच्या मागे माणसांच्या टोळ्या हात धुऊन लागल्या. या सर्पासाठी काही मंडळी काही लाखांपर्यंत रक्कम मोजण्यास तयार आहेत. मांडुळाच्या खरेदी-विक्रीतून मालामाल होण्यासाठी तस्करांनी पाय पसरल्याने या सर्पाविषयीची अंधश्रद्धा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मित्र असलेल्या मांडुळाच्या जिवावर उठली आहे.
कथित गुप्तधनाच्या शोधासाठी मांडूळ सापाचा वापर केला जातो. प्रत्यक्षात मांडुळाचा असा कोणताही उपयोग होत नाही. इलेक्ट्रिक करंट आहे किंवा नाही हे तपासण्यासाठीचा "टेस्टर' लावला तर यातील काही सापांना टेस्टरमधील लाइट लागतो, असा समज आहे. अशा लाइट लागणाऱ्या सापांना अधिक किंमत दिली जाते, असे सांगितले जाते. जेथे धन असते, त्याच्या जवळपास या सापाला आगळीवेगळी चकाकी येते, तसेच धनाच्या दिशेनेच हा साप सरपटत जातो. जणू मार्गदर्शकाचेच काम तो करतो, असे समज पसरले आहेत. प्रत्यक्षात टेस्टर लावल्यानंतर लाइट लागणारा असा साप अद्याप कोणालाही पाहायला मिळालेला नाही. हा साप दुर्मिळ किंवा गुप्तधन शोधणारा असल्याचे भासवण्यात येत असल्याने या सापाची किंमत काही लाख रुपयांपर्यंत जाते, अशी धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मांडुळाचे वजन किती यावरही त्याचा दर ठरतो. दोन किलोपेक्षा जादा वजनाचे सापच गुप्तधनापर्यंत नेतात, अशी आणखी एक उपअंधश्रद्धा आहे.
हा साप वन्य जीव संरक्षण कायदा 1972 नुसार शेड्यूल चारमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या सापाच्या चावण्याने व्यक्तीला कुष्ठरोग होतो, अशी एक गैरसमजूत या सापाबद्दल रूढ होती. या समजुतीमुळेही ग्रामीण भागात त्याच्या वाट्याला कोणी जात नसे आणि अनायासे या सापाला संरक्षण मिळत असे. पण आता मात्र अंधश्रद्धा, गैरसमजुती व वास्तुशास्त्रातील उपयोगामुळे या सापाला वाढती मागणी आहे. हा साप घरात विशिष्ट दिशेला पाळल्यास धन-संपत्ती मिळते, अशी गैरसमजूत आहे. काही भोंदू लोक सापाचा उपयोग कथित काळ्या जादूसाठी करतात. आर्थिक गुंतवणुकीची अधिक क्षमता बाळगून असणारे, मुख्यत: बांधकाम व्यवसायातील लोक मोठ्या प्रमाणात या सापाची खरेदी करतात. पुढे त्याला अधिक किमतीला दुसऱ्याला विकले जाते.
मांडूळ म्हणजे काय?
"हेड सॅंड बोआ' या इंग्रजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सर्पाची आपल्या भागात मांडूळ किंवा दुतोंड्या अशी ओळख रूढ आहे. मऊ मातीमध्ये हा साप स्वत:ला गाडून घेतो. पावसाळ्यात त्याचे बाहेर पडण्याचे प्रमाण अधिक असते. दिसायला अजगराप्रमाणे असणारा मांडूळ हा साप पूर्णपणे बिनविषारी, निरुपद्रवी व मंद हालचाल करणारा आहे. तो रंगाने पिवळसर, काळसर, तपकिरी व तांबूस असतो. तोंडाच्या आणि शेपटीच्या भागाचे आकारमान जवळपास एकसारखे असते. त्यामुळे नेमके तोंड व शेपटी कुणीकडे हे कळत नाही. या सापाने जीभ बाहेर काढल्यानंतरच ही बाब कळते. या वैशिष्ट्यामुळेच त्याला "दुतोंड्या' म्हणतात. सरडे, पक्षी, घुशी, उंदीर व अन्य सर्व याचे खाद्य आहे. ऑगस्ट-सप्टेंबरदरम्यान या सापाची मादी सहा ते सात पिलांना जन्म देते.
मांडूळ सापांचे रक्षण करा
मांडूळ हा साप निरुपद्रवी असून, शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. उंदरांचे मोठ्या प्रमाणावर भक्षण करून त्यांची संख्या तो नियंत्रणात ठेवतो. हा साप दुतोंडी असल्याचा गैरसमज आहे. त्यामुळे जमिनीतील गुप्तधन, मटक्याचे आकडे, गुदद्वारातून निघणाऱ्या द्रवापासून सेक्स टॉनिक तयार होते, अशा अनेक गैरसमजुतीमुळे संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर किंमत देण्यास तयार होतात. यामुळे सर्वत्र या सापांचा शोध घेऊन वरील कामांसाठी त्याचा उपयोग केला जातो. मात्र, यात सापाचा जीव जाण्यापलीकडे काहीही होत नाही. त्यामुळे मांडूळ सापांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
माहिती वाचून ज्ञानात भर पडली. आभारी आहोत.
ReplyDelete