बंगालमध्ये एक म्हण चांगली प्रसिद्ध आहे, ती म्हणजे' लागेल धन तर देईल गौरीसेन". ऐकणारा पहिल्यांदा बुचकाळ्यात पडतो. कारण पैशाचा आणि गौरीसेनचा संबंधच काय? पण या मागची कहानी ऐकल्यावर मात्र सारा उलगडा होऊन जातो. तर त्यासंदर्भातीलच ही कथा.
खूप वर्षाम्पूर्वी बंगालमधल्या हुगली जिल्ह्यात हरिकृष्ण मुरलीधर नावाची एक व्यक्ती राहत होती. त्याला एक मुलगा होता, गौरीसेन. वडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे शिक्षण अर्ध्यावर टाकून त्याला कामधंद्याला लागावे लागले होते. आपला स्वतंत्र व्यवसाय करावा इतकीही त्याची ऐपत नव्हती. पण बुद्धीने तल्लख आणि स्वभावाने सत्यवचनी होता. म्हणूनच त्याला लहान वयातच कोलकात्याच्या वैष्णव शेठने आपल्या व्यवसायात भागिदार बनविले होते.
कोलकाता आणि हुगलीमधून माल गोळा करायचा आणि तो मेदिनीपूरला रवाना करायचा, हाच त्याचा व्यवसाय. मेदिनीपूरमध्ये भैरवदत्त नावाचा एजंट होता. तो माल घ्यायचा आणि अन्य एजंटांना विकायचा. भैरवदत्त मोठा प्रामिक होता.
एकदाची गोष्ट. गौरीसेनने सात नौका भरून मालाच्या पेट्या पाठवल्या. नौका मेदिनापूरच्या किनारी लागल्या. भैरवदत्ताने नेहमीप्रमाणे मालाची खात्री करण्यासाठी पेट्या उघदल्या तर त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. त्यात मालाऐवजी चांदी होती. सगळ्या पेट्या चांदीच्या दागिन्यांनी भरलेल्या होत्या. मात्र त्याने चांदी मागवली नसल्याने नौका माघारी पाठवून दिल्या.
इकडे रात्री गौरीसेनच्या स्वप्नात त्याच्या नौका माघारी येत असल्याचे दिसले. त्यातल्या पेट्या चांदीने भरल्या असल्याचे त्याला दिसले. सकाळी खात्री करण्यासाठी तो समुद्र किनारी पोहचला. पाहतो तर खरोखरच नौका माघारी परतल्या होत्या. पेट्या चांदीने भरल्या होत्या. चांदी पाहून त्याची शुद्धच हरपली. इतकी चांदी पहून कुणाचे होश उडणार नाहीत? पण गौरीसेन भानावर आला. इश्वरीप्रसाद समजून त्याचा स्वीकार केला.
यानंतर गौरीसेनमध्ये कमालीचे परिवर्तन झाले. पैसा हाती आल्यावर माणसे अहंकाराने पेटून उठतात. पण गौरीसेन त्याविपरित कमालीचा विनयशील बनला. त्याचा देवावरचा विश्वास आणखी दृढ झाला. पाप्-पुण्याबाबत अधिकच सतर्क झाला. तो आपल्या साथीदारांना वेळोवेळी मदत करू लागला. इतकेच नव्हे तर समाजोपयोगी अनेक कामे त्याने केली. किती मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. कित्येक मुलींचे विवाह त्याने केले. याचकाला तो सतत मदत करीत राहिला. यथावकाश गौरीसेन गरजवंतांचा देवता बनला. आर्थिक अडचण आली की, हमखास गौरीसेनकडे लोक जात. त्याचे काम हो ऊन जाई. सगळ्यांचा विश्वास होता की, त्याच्याकडील धनाचे भांडार कधीच संपणार नाही. मदत म्हटली की, गौरीसेन , असे सर्वांच्या मुखी त्याचे नाव होते. पुढे मनात वसलेल्या भावनेला म्हणीचे स्वरूप प्राप्त झाले.
तीनशे वर्षांपूर्वीचा गौरीसेन आजही विसरला गेला नाही. पैशामुळे कुणाचे काम अडले तर त्याला धीर देत म्हणतात, ' घाबएऊ नकोस. लागेल धन तर देईल गौरीसेन. म्हणजे चांगल्या कामाला कुणीतरी गौरीसेनच्या रुपात हातभार लावेल आणि काम होऊन जाईल. - मच्छिंद्र ऐनापुरे, जत
No comments:
Post a Comment