Tuesday, September 27, 2011

अमिताभ आणि त्याच्या नायिका

अमिताभ उदयाला आला सुपरस्टार राजेश खन्नाच्या युगात.पण त्यावेळेला ताडमाड उंचीच्या अमिताभसमोर उभं राहायला,काम करायला  कोणीही अभिनेत्री तयार होत नव्हती. आज तोच साठी ओलांडूनही बॉलीवूडमध्ये व्यस्त आहे. विशेष म्हणजे सध्याच्या पिढीच्या नायिका त्याच्याबरोबर काम करायला तयार आहेत. त्याला 'बुढ्ढा' म्हणणार्‍याला त्याने 'बुढ्ढा होगा तेरा बाप' म्हणत आपल्या कामाने सणसणीत चपराक दिली आहे.
१३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अँगी यंग मॅनने त्या त्या जमान्यात सगळ्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत नायक म्हणून काम केले आहे. त्याने केवळ सुमित्रा सान्याल, तनुजा, मालासिन्हा, मुमताज्,झिनत अमान, मौसमी चटर्जी, सायरा बानो, स्मीता पाटील, नीतूसिंग आणि डिंपल कापडियासोबतच काम केले नाही तर मीनाक्षी शेषाद्री, रती अग्निहोत्री, अमृतासिंगपासून रमैया, मनीषा कोईराला, शिल्पा शेट्टी, नंदिता दास, माधुरी दीक्षित, तब्बू, जिया खानपर्यंतच्या  नायकाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आला आहे. आज २० वर्षाच्या मुलीसुद्धा त्याच्यासोबत एका पायावर काम करायला तयार आहेत. पण सुरुवातीला एकसुद्धा अभिनेती त्याच्यासोबत काम करायला धजावत नव्हती.
जंजीरमध्ये खरंतर सुरुवातीला होती मुमताज. पण राजकुमार आणि त्यानंतर देवआनंदने या सिनेमाला नकार दिल्यानंतर तिच्यासमोर अमिताभ आला. तेव्हा तिने या ताडमाड उंचीच्या हिरोसमोर उभं राहायलाही नकार दिला. तेव्हा जया भादुरी पुढे आली. प्रत्यक्ष जीवनातही उत्तम ट्‌युनिंग जुळलेली  ही जोडी त्या सिनेमात पडद्यावरही हीट ठरली. या चित्रपटात संतापाचा कडवट घोट पिताना 'यंग मॅन' च्या रुपात दिसला. " शोले"त विधवा बनलेल्या जयाने आपले दु:ख-दर्द डोंळ्यांनी व्यक्त करताना दिसली. "अभिमान", "मिली" या चित्रपटांमधील जया-अमिताभच्या जोडीची प्रशंसा झाली. 'सिलसिला' तर त्यांच्या जीवनावर बेतलेलाच सिनेमा आहे. दोघे  जवळपास डझनभर चित्रपटात एकत्र आले. अलिकडे ' कभी खुशी कभी गम" या चित्रपटात हे दोघे पून्हा दिसले. पण अमिताभची प्रत्यक्षात सगळ्यात अगोदर नायिका होण्यास तयार झाली होती, अरुणा ईराणी.  पण काही कारणांमुळे ;बॉम्बे टू गोवा" नंतर प्रदर्शित झाला.  
रेखा आणि अमिताभ आज खर्‍या अर्थानं नदीची दोन किनारे असली तरी अमिताभची खऱ्या अर्थाने जोडी जमली होती , ती रेखा बरोबर!  "नमकहराम'मध्ये त्याच्या मित्राची राजेश खन्नाची नायिका असणारी रेखा नंतर सवार्थाने बदलली. नंतरच्या सिनेमांत ती अमिताभची नायिका म्हणून शोभली.  कारण "नमकहराम'च्या काळातल्या काहीशा जाड्या ढब्ब्या रेखाचं रुपांतर रेखीव स्लीम अभिनेत्रीत झालं होतं. 'मुकद्दर का सिकंदर' मधील जोहराबाई ( रेखा) साठी तडपणार्‍या सिकंदरची भूमिका असो अथवा ;सुहाग' मध्ये अमिताभला मिळवण्यासाठी बैचेन असलेली अल्लड युवतीची भूमिका. या दोघांना प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतलं.
'सिलसिला' पर्यंत येता येता त्यांच्या रोमांसची चर्चा चांगलीच रंगली होती. त्यापूर्वी दोघांचे 'दो अनजाने', खूनपसीना', 'मि. नटवरलाल' आणि राम बलराम' सारखे काही चित्रपट आले होते. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री मस्तच जुळली. त्यामुळेच अमिताभची सर्वाधिक यशस्वी नायिका म्हणून रेखाला मानले जाते.परवीन बाबीशीही त्याची जोडी चांगलीच जमली. खरंतर रेखाच्या आधी परवीन त्याची नायिका बनली होती. 'मजबूर' पासून. पण तरीही रेखासारखी केमिस्ट्री  जुळली नाही.पण त्यांचे 'रोटी, कपडा और मकान', शान, कालिया, खुद्दार, अमर

अकबर अँथनी, महान आदी सिनेमे हिट ठरले होते. मध्यंतरी याच परवीन बॉबीने अमिताभ आपला जीव घ्यायला उठला होता, अशी मुलाखत देऊन खळबळ उडवून दिली होती.परवीनप्रमाणेच झीनत अमानलाही सिनेमात ग्लॅमर वाढविण्यासाठी घेतले जायचे. कारण अमिताभच्या
सिनेमात नायिकांसठी काही करण्यासाठी असायचंच नाही. द ग्रेट गॅम्बलर, डॉन, लावारिस, दोस्ताना, पुकार आणि महान आदी सिनेमांध्ये ही जोडी दिसली.
आणखी एका जया नावाच्या नायिकेसोबत अमिताभची जोडी जमली. ती नायिका म्हणजे जयाप्रदा. परवीन बॉबी, झीनत अमान, आणि राखी या नायिकेंची जादू ओसरली तेव्हा अमिताभशी जयाप्रदाची जोडी जमली. शराबी, गंगा जमुना सरस्वती, आखरी रास्ता , जादूगार, इंद्रजित आणि आज का अर्जुन या चित्रपटामध्ये ही जोडी दिसली. यातले तीन चित्रपट हिट ठरले.
नायिकाचं पडद्यावरचं आयुष्य अल्पच असतं. "स्त्री' प्रमाणे अभिनेत्रीही क्षणाची नायिका आणि अनंत काळची आई असते! राखीच्या उदाहरणातून हे स्पष्ट होईल. कारण ती अमिताभची अनेक यशस्वी चित्रपटातली नायिका. (त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर, बरसात की एक रात आणि इतर अनेक...) पण अनेक सिनेमानंतरही हा अंग्री यंग मॅन यंगच राहिला पण  राखी त्याची आई बनली. वहिदा रेहमानबाबतीतही तसंच झालं. 'शक्ती' मध्ये राखी, तर  "अदालत' आणि "कभी कभी' मध्ये त्याची नायिका असलेली वहिदा पुढे   'त्रिशुल' मध्ये आई बनली. पण यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते. अमिताभच्या नायिकांचा स्पॅन कितीतरी मोठा आहे. वहिदा रेहमान, नूतन  सारख्या आधीच्या पिढीतल्या अभिनेत्रीही त्याच्या नायिका होत्या आणि जिया खान सारखी अगदी अलिकडच्या  पिढीतली अभिनेत्री'ही त्याची नायिका होती.
'इंकलाब' मध्ये अमिताभ राजकारणी नेतांचा बदला आपल्या स्टाईलने घेतो, त्याला श्रीदेवी मदत करते.  या एकेकाळच्या नंबर वन अभिनेतीसोबत अमिताभचे आनखी दोन सिनेमे आले. 'आखरी रास्ता' आणि 'खुदा गवाह'. आता "इंग्लिश चिंग्लिश' या  चित्रपटात हे दोघेही पुन्हा एकदा एकत्रीत  काम करीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे श्रीदेवी आणि शहेनशाहा अमिताभ बच्चन तब्बल अठरा वर्षांनी एकत्र येत  आहेत. स्वप्नसुंदरी हेमामालिनीशी कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात त्याची जोडी जमली नाही. सत्ते पे सत्त, देशप्रेमी, नास्तिक आदी सिनेमात ती अमिताभची नायिका बनली. पण तिने अमिताभपेक्षा धर्मेंद्रला अधिक प्राधान्य दिल्याने त्यांचे कमी चित्रपट आले. 'गहरी चाल' मध्ये हेमामालिनीने अमिताभच्या बहिणीची भूमिका केली होती.  दुसऱ्या टप्प्यात मात्र ती जोडी हीट ठरली.या जोडीने 'बाबूल',' बागवान' मध्ये काम केले.  'फरार' या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याची नायिका असलेल्या शर्मिला टागोरबरोबर त्याची 'विरुद्धी' द्वारे  पुन्हा जोडी जुळली.  पण हिट  ठरली नाही. रेवती आणि तब्बुसारख्या वेगळ्या नायिकांसमोरही तो नायक म्हणून उभा राहीला. पण कारकिर्दीचा पहिला टप्पा असो की दुसरा, त्याच्या करिष्म्यासमोर त्याच्या नायिका अनेकदा झाकोळून जाताना दिसल्या. अमिताभची जादूच निराळी आहे. .                                                                                     ..                                                                                                                             _ मच्छिंद्र  ऐनापुरे             

No comments:

Post a Comment