भक्तश्रेष्ठ नामदेव
साक्षात देवाने ज्याच्या हातून नैवेद्य खाल्ला... मुक्ताबाईंनी ज्याला कच्च मडकं ठरवून विसोबा खेचरांचा शिष्य बनवलं...
कोरडी भाकरी खाणा-या कुत्र्यामागे जो तूप घेऊन धावला...
या आणि अशाच आणखी दोन-चार चमत्कृतिपूर्ण प्रसंगांसाठी संत नामदेव आपल्याला माहीत आहेत.
आजवर अनेक भक्त पांडुरंगाच्या प्रेमाचे धनी झाले. अनेकांवर त्याने कृपा केली. आताही करीत आहे, परंतु ज्याचे कोडकौतुक विठ्ठलाने केले तो मात्र संत नामदेवच. ईश्वराने नैवेद्य खाल्लाच पाहिजे हा नामदेवांचा बालहट्ट विठ्ठलाने पुरवला तर मोठेपणी समाधीस्थ ज्ञानेशांचे पुन:दर्शन घडवण्याचा त्यांचा जगवेगळा हट्टही पांडुरंगाने पुरा केला. इतकेच काय, नामदेवांना एकदा विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे कीर्तन करावे लागले तेव्हाही नामदेवांच्या दिशेने मंदिर फिरल्याची आख्यायिका आहे.
नामदेव हे विठ्ठलाचे लाडके भक्त होते, परंतु एकदा ते लटकेच रुसले व म्हणाले ‘पतित पावन नाम ऐकूनि आलो मी द्वारा। पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा।’ नामदेवांना खरे म्हणजे विठ्ठलप्रेमाशिवाय दुसरे काहीच नको होते. म्हणून ते म्हणतात, ‘नामा म्हणे देवा, तुमचे नलगे मज काही। प्रेम असो या हृदयी, तुमचे आठवीन पाय॥
ईश्वरभक्तीमुळे त्यांच्या अंतरंगात प्रेमकमळ उमलले होते. त्यामुळे त्यांच्याकडे भेदाभेद नव्हता. भागवत धर्माने जी सामाजिक क्रांती केली त्याचे नामदेव हे पाईकच होते. उच्च-नीच असा भाव त्यांनी बाळगला नाही.ज्ञानेश्वरांच्या समवेत त्यांनी तीर्थयात्राही केली. नामदेव हे ज्ञानेश्वरांचे पहिले अधिकृत चरित्रकार ठरतात. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचे चरित्र त्यांनी आदी, तीर्थावली व समाधी अशा तीन प्रकरणांतून ओवीबद्ध केले आहे. ‘तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे। जगी सूर्य जैसे प्रकाशले’ अशा शब्दांत त्यांनी या भावंडांची महती गायली आहे. ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याला संत नामदेव सहकुटुंब हजर होते. त्यामुळे संत नामदेवांनी केलेले समाधी सोहळ्याचे वर्णन हे चक्षुर्वैसत्यम असे आहे त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. ज्ञानेश्वरीविषयी नामदेव म्हणतात, ‘नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवावी’.
संत नामदेवांनी जवळपास पाच वर्ष संपूर्ण उत्तर भारत झाडून काढला. यापूर्वी त्यांनीज्ञानेश्वरांच्या संगतीने तीर्थयात्रा केली होती. त्यांच्या संगतीत त्यांची भक्ती अधिक व्यापक झाली. ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर नामदेवांनी अनेक तीर्थयात्रा केल्या. त्यानंतर दोनदा ते पंढरपुरातून तीर्थयात्रेसाठी निघाले. या दोन्ही वेळेस त्यांनी गुजरात , राजस्थान आणि पंजाब येथे जवळपास चाळीस वर्ष मुक्काम केला. पंजाबातील गुरुदारपूर जिल्ह्यातल्या घुमान येथे त्यांचं मुख्य ठाणं होतं. नामदेवांमुळेच हे गाव उभं राहिलं. नामदेवांच्या प्रभावामुळे दिल्लीच्या बादशहा अल्लाउद्दीनने तिथे मंदिरही बांधलं. त्याकाळातली वाहतुकीची आणि संवादाची साधने पाहता त्यांनी केलेल्या कामाची महती पटू शकेल.
उत्तर भारतात नामदेवांमुळेच भागवत धर्माचे विचार नव्यानेच पोहोचले होते. नाथ संप्रदायानेच सनातनी विचारांना थोडेफार आव्हान दिले होते. पण भागवत धर्मासारखा प्रेम , जिव्हाळा आणि साधेपणा त्यात नव्हता. त्यामुळे नामदेव तिथे नवी क्रांतीच करत होते. महाराष्ट्राप्रमाणेच भक्तीचं लोण त्यांनी सर्व जातीधर्मात पोहोचवलं. तिथेही सर्व जातींचे शिष्य उभे केले. एवढेच नाही , तर मुस्लिमांनाही उपदेश केला. त्यातून पुढे रामानंद , कबीर , रैदास , दादू अशा संतांनी समाजिक जागृती घडवून आणली. मीरा , नरसी मेहता , तुलसीदास , सूरदास अशा लोकप्रिय संतांच्या काव्यातही नामदेवांचा आदराने उल्लेख आढळतो. शिख धर्मीयांना देवतुल्य असणा-या गुरू ग्रंथसाहिबात नामदेवांच्या ६१ रचना मोठ्या आदराने समाविष्ट केलेल्या आहेत.
‘विठ्ठल ज्याने डोलेल असे बोल मी बोलेन’ अशी प्रतिज्ञा करून ती पुरी करणारे नामदेव 80 वर्षांचे झाल्यावर त्यांना आपले जीवितकार्य संपले असे वाटू लागले. त्यांनी पांडुरंगाकडे समाधी घेण्याची परवानगी मागितली व ती त्यांना मिळाली. नामदेवांनी पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच समाधी घेण्याचे ठरवले. महाद्वारासमोर असलेल्या संत चोखोबांच्या समाधी सान्निध्यातच आपली समाधी असावी असे त्यांना वाटत असावे, परंतु यापेक्षाही महत्त्वाचा उद्देश त्यांनी आपल्या अभंगातच सांगितला आहे. नामदेव महाराज म्हणतात, ‘संत चरण रज लाभो येता जाता, नामा म्हणे आता हेचि व्हावे.’ पांडुरंगाच्या दर्शनाला येणार्या भक्तांच्या, संतांच्या पायाच्या धुळीचा स्पर्श आपणास व्हावा असा त्यांचा उदात्त हेतू होता.
पांडुरंगाची जितकी देवळं आहेत , त्याहीपेक्षा अधिक भक्तराज नामदेवांची आहेत. थेट पाकिस्तानातही नामदेवांचं मंदिर आहे. वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रापुरता असलेली भागवत धर्माची ध्वजा आसेतूहिमाचल पोहचवण्याचा मान नामदेवांना आहे. अशा भक्तश्रेष्ठ नामदेवांना भक्तिपूर्वक वंदन! .- मच्छिंद्र ऐनापुरे . . . … ainapurem_2390@rediffmail.com punyanagari,sangli
No comments:
Post a Comment