Tuesday, September 20, 2011

मुलं प्रश्न विचारणारच!

मुलं प्रश्न विचारणारच!


तीनवर्षांतच मुलं सगळ्यात अधिक का, या प्रश्नाचा वापर करताना दिसतात. कारण त्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न घोळत असतात, उमटत असतात. या मनात उत्पन्न होणारी जिज्ञासा म्हणा अथवा सर्व काही जाणून घेण्याची घाई. त्यामुळे त्यांच्या ‘काय’ का आणि कसे या प्रश्नांचा भडिमार सतत चालू असतो. मुलांच्या मनात असलेले कुतूहल प्रश्नांच्या माध्यमातून बाहेर पडते. हे कुतूहल आणि प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा स्वभाव हे मानवाचे अस्सल लक्षण आहे. त्यामुळे साहजिकच मुलांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरू असते. कित्येकदा त्यांचे प्रश्न असे असतात की, समोरचा त्या प्रश्नात गुरफटून जातो. शेवटी मुलाला झिडकारून त्याला गप्प बसवण्याचा प्रय} होतो. त्यामुळे मूल हिरमुसले होते. अशा सततच्या वागणुकीमुळे त्याची जिज्ञासा कमी होते.

आजकाल मुलांना घरबसल्या अनेक गोष्टींच्या माहितीचा खजिना सहज उपलब्ध होत आहे. टीव्ही, इंटरनेटमुळे इन्फॉर्मेशन एक्स्प्लोजनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सहजरीत्या मिळणार्‍या माहितीमुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती आणि टीव्ही कार्यक्रमांमुळे काही विषयांचे ज्ञान त्यांना वय होण्याअगोदरच होऊ लागले आहे. साहजिक पालकांना या संबंधित प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत आई-वडिलांनी त्यांच्या प्रश्नानुरूप मुलांची मने समजावून घ्यावी. म्हणजे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देतानाच मुलांनाही समजून घेता येईल.

प्रश्नांना टाळू नका

प्रश्न विचारणे, समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत विचारत राहणे, ही लहान मुलांच्या मनोविकासाची मोठी खूण आहे. हे अद्भुत जग, त्यातील गोष्टी नव्यानेच पाहत असल्यामुळे त्यांच्या मनात अनेकानेक प्रश्न निर्माण होणे अगदी नैसर्गिक होय. माहिती करून घेण्याचा हा आपला नैसर्गिक हक्क लहान मुले प्रश्न विचारून बजावत असतात. त्यांचा तो हक्क दडपून टाकता कामा नये. उलट हा हक्क ते जेवढा जास्त बजावतील, तेवढा त्यांचा मनोविकास अधिकाधिक होईल. मुलांच्या मनातील जिज्ञासेला सार्थ उत्तराची वाट द्यायलाच हवी. त्यांचे कुतूहल सर्मपक उत्तरांनी शमवलेच पाहिजे. मात्र, पालक नेहमी मुलांच्या प्रश्नांना टाळण्याची मानसिकता ठेवताना दिसून येतात. पण त्यांनी लक्षात ठेवायला हवे की, त्यांच्या मनात उमटलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य प्रकारे देऊन जिज्ञासा शांत करणं ही समोरच्याची जबाबदारी आहे. तुम्हाला प्रश्नाने फारच गोंधळून टाकले असेल, तर काही वेळाने सांगेन, असे त्याला प्रेमाने सांगावे; पण उत्तर देण्याचे टाळू नये.

मुलांची मानसिकता समजून घ्या

मुलांना समजून घेताना त्यांच्या प्रश्नांना अधिक चांगल्याप्रकारे समजून घ्यायला हवे. मुलांच्या वय आणि परिस्थितीनुसार त्यांच्या प्रश्नांमध्ये बदल दिसून येतात. अशा वेळी समोरच्याने मुलांचे प्रश्न काळजीपूर्वक ऐकून घ्यावे. साधारणत: मुलांच्या मनात शारीरिक बदल, नातेवाईक, जन्म-मृत्यू आणि धर्म-कर्म यासंबंधी प्रश्न अधिक प्रमाणात उत्पन्न होतात. मुलाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याची मानसिकता समजण्याचा प्रय} करावा. कारण मुलांच्या प्रश्नांना समजावून घेण्याबरोबरच त्याच्यावर चांगले संस्कारही करता येतात. त्या दृष्टीने व्यक्तिमत्त्वात सुधारणा करण्यास मदत होऊ शकते.

चुकीची उत्तरे कधीच देऊ नका

कित्येकदा मुलांच्या प्रश्नांना उथळपणाने उत्तरे देऊन त्याची बोळवण केली जाते. त्याला थातूर-मातूर अथवा चुकीची उत्तरे दिली जातात; पण असे करू नका. त्यांच्या जिज्ञासेचे योग्य प्रकारे समाधान करा. या वयात सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतात. पुढे या आधारावरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. चुकीची उत्तरे मिळाल्याने त्याच्या मनाची गफलत होते. चुकीची उत्तरे त्यांना भरकटून टाकतात. त्याने त्याच्या आयुष्यावर परिणाम होऊ शकतो.

मूल सारखे प्रश्न विचारत असेल

मुलगा जर सतत प्रश्न विचारत असेल, खूप बोलत असेल, तर त्याच्या जिज्ञासेचे समाधान करण्याबरोबरच त्याला अन्य सकारात्मक कामात गुंतवून ठेवा. किस्से-गोष्टी, पौराणिक कथा ऐकवून सकारात्मकदृष्ट्या त्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रय} करण्यास सांगावे. त्याला इतिहासासंबंधीची माहिती पुरवावी. पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. त्यामुळे स्वत: उत्तरे शोधण्याचा सराव होत राहील. मुलांचे वेळापत्रक निश्चित करा. टीव्ही, इंटरनेटसाठी वेळ निश्चित करा. त्यामुळे मुले इन्फॉर्मेशन एक्स्प्लोजनचा शिकार होण्यापासून वाचू शकतात. वाचण्याचा छंद विकसित करा. त्यांच्या आवडीची पुस्तके आणून घ्या. ज्या विषयात त्याला अधिक रस आहे, त्या विषयाची पुस्तके पुरवा.

- मच्छिंद्र ऐनापुरे, सांगली   8/9/11 lokmat,sakhi

No comments:

Post a Comment