Tuesday, September 20, 2011

दृष्टीकोन

दृष्टीकोन
एक श्रीमंत व्यक्ती नेहमी आचार्य महाप्रज्ञ यांच्याकडे येत असे. ती व्यक्ती मोठी उद्योगपती होती. एकदा आचार्यांनी त्याला विचारलं, ' सध्या तुझ्याविरोधात वीस-पंचवीस केसेस चालू आहेत. तुझ्या अनेक प्रतिष्ठानवर कित्येकदा छापे पडले आहेत. काही कंपन्यांना सिल ठोकण्यात आले आहे. इन्कम टॅक्सवाल्यांचा तर सतत तुझ्यावर डोळा असतो. कॉरपोरेट विश्वात तू एक 'बदनाम व्यक्ती' म्हणून ओळखला जातोस. या सगळ्या गोष्टींमुळे तुला  कसलं सुख मिळतं?'
ती  व्यक्ती पहिल्यांदा थोडं गांभिर्यानं, नंतर बेपर्वाईनं म्हणाली, ' महाराज, माझी एक इच्छा होती की, मी देशातला एक नंबरचा उद्योगपती बनावं. मी या दिशेने वाटचाल केली. करोडोंची संपत्ती जमा केली. माझ्या मनाला मोठी शांती मिळाली. आता मी या संपतीचा भोग घेऊ अथवा ना घेऊ, याचा माझ्यावर आता काहीही परिणाम होत नाही. कोण माझ्याबाबतीत काय म्हणतो, काय विचार करतो, याची मला अजिबात पर्वा वाटत नाही.'
प्रत्येकाचं आपापलं चिंतन असतं. विचार करण्याची  पद्धतसुद्धा वेगळी असते. आपण नैतिकता, प्रामाणिकपणा, त्याग , संयम, अनुकरण इत्यादी गोष्टींबाबत बोलत असतो.  पण 'व्यक्ती तितक्या प्रकृती'  या न्यायानं प्रत्येकाचा विचार करण्याचा एक अंदाज असतो. त्यामुळे पहिल्यांदा समोरच्या व्यक्तीचा दृष्टीकोन , विचार समजून घेतला पाहिजे. माणसं समजून घेणं त्यामुळेच कठीण जात असतं. त्याचा दृष्टीकोण   चांगला की वाईट हा नंतरचा प्रश्न.  कारण तो त्याच मस्तीत जगत असतो. दृष्टीकोण बदलणार नसेल तर त्याचं आचरण बदलण्याची शक्यता कमीच असते. पहिल्यांदा दृष्टीकोण मग आचरण. जशी दृष्टी तशी सृष्टी.  हा निसर्गनियम आहे. त्यामुळेच आपल्याला वेगवेगळ्या तर्‍हेची आणि विक्षिप्त माणसं भेटत असतात.                           - मच्छिंद्र ऐनापुरे

No comments:

Post a Comment